ताज्या विषयांवर भाष्य करणं, हे काही पुस्तकांचं काम नाही. पण आजकाल छपाईचं तंत्र सुलभ झालंय. करोना किंवा ‘कोविड- १९’ विषाणूमुळे होणारा रोग हा संसर्गजन्यच आहे, यावर २० जानेवारीला शिक्कामोर्तब झालं आणि २५ मार्च रोजी ‘ऑरबुक्स.कॉम’ या संकेतस्थळानं घोषणा केली : स्लावोय झिझेकचं ‘पॅन्डेमिक! : कोविड-१९ शेक्स द वर्ल्ड’ हे नवं-कोरं १४६ पानी पुस्तक लिहून तयार झालंय आणि आम्ही त्याचं ई-बुक लवकरच आणत आहोत. आणि ८ एप्रिल रोजी हे पुस्तक आलंसुद्धा!
या पुस्तकासाठी झिझेकनं कोणतीही ‘रॉयल्टी’ प्रकाशकांकडून घेतलेली नाही. त्याऐवजी, रॉयल्टीचा सारा पैसा ‘मेडिसिन्स साँ फ्राँटियर्स’ या जागतिक संस्थेला देण्याचं प्रकाशकांकडून कबूल करून घेतलंय. दुसरं म्हणजे, या पुस्तकाच्या (ई-बुक) पहिल्या १० हजार प्रती – प्रकाशकांकडे नोंदवलेल्या प्रत्येक ईमेल-पत्त्यासाठी एक याप्रमाणे मो-फ-त, अगदी विनामूल्य देण्याचा उपक्रमही नुकताच संपला. म्हणजे, १० हजार लोकांनी हे पुस्तक डाउनलोड केलेलं आहेच. त्यापैकी दोनपाच हजार तरी पुस्तक वाचणारे असतील.. आणि मराठी पुस्तकांची आवृत्तीच हजारची असते असं गृहीत धरल्यास, दोनपाच आवृत्त्या निघाल्या म्हणावं लागेल. पण ते असो. सध्या हे ई-पुस्तक तीन डॉलरना मिळतं आहे.
फुकटबिकट दिलं म्हणजे पुस्तक काही खास नसणार, असं वाटत असेल तर थांबा- ग्रंथपरीक्षणाच्या पानांसाठी नावाजलं जाणाऱ्या ‘द गार्डियन’ या ब्रिटिश दैनिकानंही नुकताच या पुस्तकावर समीक्षालेख लिहिला आहे. अगदी साक्षेपी वगैरे म्हणतात तसा. ‘साक्षेपी’ म्हणजे आक्षेपांसह.. तर ‘द गार्डियन’साठी समीक्षण करणाऱ्या योहान कोशी यांचा एक महत्त्वाचा आक्षेप असा की, पुस्तकातलं एक प्रकरण युरोपात लिबिया, इराक आदी अरब देशांतून आलेल्या स्थलांतरितांबद्दल आहे आणि त्यातून असा सूर दिसतो की, हे स्थलांतरित म्हणजे युरोपच्या संस्थात्मक वित्तीय बांधणीपुढलं आव्हानच आहेत. या प्रकरणाची आणि या सुराची काही गरज नव्हती, असा आक्षेप या समीक्षालेखानं सभ्यपणे घेतलेला आहे. शिवाय, मार्क्सवादाचा समकालीन विचारवंत म्हणवणारा झिझेक असंही म्हणतो की, ‘मी ख्रिश्चन नास्तिक आहे’- यावरही त्या समीक्षालेखाचा आक्षेप आहे.
थोडक्यात, पुस्तकाची दखल पुरेशा गांभीर्यानंच घेतली गेलेली आहे. तुम्ही नाही घेतलीत, तरी ज्यांना गांभीर्य आहे ते घेताहेत.
असं काय एवढं गंभीर आहे या पुस्तकात?
झिझेकची पद्धत अशी की, तो चर्चेतल्या प्रश्नांच्या मागे, या बाजूला, त्या बाजूला जाऊन पाहातो. हेगेल आणि लाकां (लाकान) यांच्या चिकित्सापद्धती आणि सोबत फ्रॉइडची मनोविश्लेषणपद्धती नव्या रीतीनं वापरतो आणि मार्क्सवादाचाही विचार पोथीनिष्ठपणे नाही करत.. आजच्या व्यवहाराचं भान ठेवूनच करतो. जोडीला अगदी ताज्या चित्रपटांमधून तत्त्वज्ञान सोपं करून सांगणारे असे काही संदर्भ शोधून काढतो की, तरुण पिढी झिझेकवर फिदा का आहे हा प्रश्नच कुणाला पडू नये! या प्रकारे आता तो ‘करोनामुळे हादरलेल्या जगा’बद्दल बोलतो आहे. माणसं तुटताहेत, एकटेपणाची जाणीव ‘आपल्या माणसां’पुरतीच विसरली जाते आणि एरवी अस्पृश्यतेला वाव मिळतो आहे, भीती/ अनिश्चितता ही आरोग्य आणि पैसा अशा दोन्हीबद्दलची आहे, सरकारी पातळीवर आरोग्याकडे अर्थकारणानं दुर्लक्षच कसं केलं हे धडधडीत दिसतं आहे.. नेत्यांनी स्वत:ची पाठ कितीही थोपटून घेतली (हल्ली हे काम काही कवी, पटकथाकारही करू लागलेत) तरीदेखील ‘काही तरी चुकतंय’ हे निश्चित आहे. ते काय चुकतंय? माणूसकेंद्री विचार केलेला नाही कोणी. हे चुकत आहे. तसा विचार केला तर काय दिसेल? झिझेकच्या मते, ‘नव्या प्रकारचं, पण मार्क्सवादाला अभिप्रेत जग’ दिसू शकेल. व्यवस्थाबदलाची ही संधी आहे. आपल्याला पुतिन-एदरेगनसारखे नेते हवे आहेत की खरोखरच लोकांचा व लोकशाहीचा सन्मान करणारे नेते घडवायचे आहेत, असा प्रश्न झिझेकचं हे पुस्तक विचारतं. विचाराला प्रवृत्त करतं, कारण आत्ताच्या जगाचे बारकावे झिझेकचं लिखाण अचूक टिपतं. जुनं आठवा जरा.. विचारप्रवृत्त करणं, जगातला विचार नव्या दिशेला नेऊ पाहणं, हे पुस्तकाचं कामच की!