सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर रशियात आमुलाग्र बदल झाल्याचेच चित्र नेहमी रंगवले जाते. पण वास्तव वेगळेच आहे. आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील अनागोंदीपासून ते एक राष्ट्र म्हणून निर्माण झालेल्या ‘आयडेन्टीटी क्रायसीस’पर्यंत समस्या तिथेही आहेत. त्या मांडल्या आहेत तिथल्याच जनसामान्यांनी..
अॅन गॅरेल्स या खूप अनुभवी पत्रकार गेली ३० र्वष सोव्हिएत युनियन आणि नंतर रशियाला भेट देत आहेत. ‘पुतिन कंट्री – अ जर्नी इंटू द रिअल रशिया’ हे पुस्तक म्हणजे त्यांनी रशियातील जनसामान्यांच्या- त्यात सुशिक्षित तसेच अशिक्षित, कारखान्यातले मजूर, सैनिक, तुरुंगातील कैदी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, गृहिणी, अगदी वेश्या आणि त्यांच्या दलालांच्यासुद्धा- ज्या अनेक मुलाखती घेतल्या त्यांचं साद्यंत वर्णन आहे. त्यांना दोनदा व्हिसा रद्द करून रशियातून चक्क बाहेर हाकलून देण्यात आलं. त्याचं कारण त्यांना सांगितलं गेलं नाही. वकिलाचा सल्लाही त्यांना घेऊ दिला नाही, की अपील करू दिलं नाही.
स्त्री असल्यामुळे त्यांचा वावर थेट स्वयंपाकघरात होई. रशियन स्त्रिया त्यांच्याशी विवाह, घटस्फोट, लैंगिक संबंध, निरोधचा वापर, घटणारी जन्मसंख्या वगैरेंसंबंधी मोकळेपणाने बोलत. अतिमद्यपानामुळे रशियन पुरुषांचं कमी झालेलं आयुर्मान हाही एक नेहमीचा विषय. रशियात बाळंतपणासाठी दिली जाणारी रजा जगात सर्वात जास्त आहे; पण त्याचा परिणाम वेगळाच झाला. स्त्रियांना कायम नोकऱ्यांवरून काढून कंत्राटी पद्धतीने ठेवले जाऊ लागले. तरुण देखण्या रशियन मुली आणि मध्यमवयीन निर्लज्ज चेहऱ्याचे अमेरिकन पुरुष यांच्या एका वधुवर मेळाव्यास लेखिका उपस्थित राहिली. बाहेर जायला निघण्यापूर्वी संचालकांनी तिला धक्काबुक्की करून पाडलं आणि तिच्या टेपरेकॉर्डरची मोडतोड केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या वेळेस नुसती बघ्याची भूमिका बजावली. लेखिकेच्या मते, हा सर्व प्रकार म्हणजे अमेरिकन मानसिक विकृती आणि रशियन लाजिरवाणी वागणूक यांचं एक उबळ येणारं दर्शन होतं.
पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये अपंग मुलांना अनाथाश्रमात पाठवावे लागे. हल्लीच्या रशियातही योग्य निदान झालं नसलं तरी अशा बालकांना अनाथाश्रमात पाठवण्याची सक्ती सरकार करतं. काही पालकांनी अशा सक्तीला खंबीरपणे विरोध केला. आज ती मुले कॉलेजमध्ये शिकत आहेत. अनेक अमेरिकन पालकांनी अपंग रशियन मुलं दत्तक घेतली. अमेरिकनांनी दत्तक घेतलेली काही मुलं दगावल्यावर रशियन वर्तमानपत्रांनी बरीच आरडाओरड केली. अमेरिकेने ‘मॅग्निस्की लॉ’ म्हणून ओळखला जाणारा कायदा संमत करून काही रशियन अधिकाऱ्यांवर प्रवेशबंदी घातली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून रशियाने अमेरिकन दत्तकांवर बंदी घातली; पण ज्या वेळेस पाच हजार अपंगांपैकी फक्त दोनशेच मुलांना रशियन पालक मिळाले, तेव्हा रशियाने ही बंदी उठवली. शेवटी अनाथालयापेक्षा कुटुंबात राहणं केव्हाही जास्त चांगलं.
क्रेमलिनच्या इस्पितळात काही जागतिक कीर्तीचे डॉक्टर होते; पण सामान्य रशियन डॉक्टर हा डॉक्टरचा मदतनीस शोभेल इतक्याच वकुबाचा असतो. तेथे अगदी मूलभूत अॅण्टिबायोटिक आणि भुलीच्या औषधांची कमतरता आहे. वैद्यकीय सेवा फुकट असली तरी रुग्णांना पलंगपोस, उशा, शस्त्रक्रियेचे मोजे वगैरे स्वत: आणावे लागतात. बहुतेक रशियन जनतेचं तिथल्या वैद्यकीय सेवेबद्दल चांगलं मत नाही. सोव्हिएत काळात जनतेला त्यांच्या शिक्षणाच्या उच्च दर्जाचा सार्थ अभिमान होता. हल्ली सर्रास कॉपी चालते. नैतिक अध:पतन ही एक चिंतेची बाब झाली आहे. विद्यार्थ्यांचा कल स्वत:चं डोकं न वापरता सर्व शिक्षकांकडून आयतं घेण्याकडे आहे. याला अपवाद आहे फक्त सक्तीच्या सैनिकी सेवेचा. तिथे रॅगिंग चालतं, विशेषत: अल्पसंख्याकांचं. इतकं की त्यामुळे काहींचा मृत्यू झाला. नवीन भरती केलेल्यांना योग्य साधनांशिवाय लढाईवर पाठवलं गेलं. परत आल्यावर तिथे जीव गमावलेल्यांचे मृतदेह रचून ठेवले होते. त्यात आपला मुलगा कुठला हे शोधणाऱ्या आईबापांना लेखिकेने प्रत्यक्ष पाहिलं.
रशियन क्रांतीचा दिवस मोठय़ा दिमाखाने साजरा होत असे. तो आता ‘एकता दिन’ म्हणून पाळतात; पण त्याला कोणी फारशी किंमत देत नाही. मादक द्रव्यांचं सेवन ही एक राष्ट्रीय समस्या आहे. रशियाची लोकसंख्या अमेरिकेच्या अर्धी असूनही गर्दुल्ल्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. सरकारच्या कडक धोरणामुळे चेचन्या, इंगुशेतीया, दागेस्तान, काबर्डीनो-बाल्केरीया या मुस्लीमबहुल भागांतल्या समस्या वाढतच गेल्या.
रशियाच्या आण्विक स्फोटांच्या जागा अतिविषारी बनल्या आहेत, हे प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे. शाळेची क्रीडांगणं, जवळपासची तळी, सरोवरंही प्रदूषित आहेत. तरी सरकारी अधिकारी मानायला तयार नाहीत. त्यांना आव्हान देणाऱ्या तज्ज्ञांना अडीच वर्षांच्या शिक्षा झाल्या, पण त्या अमलात आणल्या नाहीत. कैद्यांना कुटुंबीयांना भेटू देण्यास, फोन वापरण्यास किंवा औषधं घेण्यास तुरुंगातले अधिकारी पैसे मागतात. नाही दिले तर त्रास देतात अथवा मारहाणही करतात.
पुस्तकातील ‘द फॉरेन्सिक एक्स्पर्ट’ हे प्रकरण वाचताना खेदही होतो आणि संतापही येतो. १९३७-३८ मध्ये स्टॅलिनने हजारोंचा नरसंहार केला. त्यांच्या सामूहिक दफनाच्या जागा शोधून काढण्यास एका तज्ज्ञाने मदत केली. नंतर चर्च आणि सरकारी अधिकारी यांच्या लुडबुडीला कंटाळून त्याने राजीनामा दिला आणि दफनविधीचा जाणकार म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. तर सरकारी अधिकारी सारखे त्याच्याकडे लाच मागू लागले. त्याने विरोध केल्यावर त्याच्या साहाय्यकाला गोळी घालून ठार केलं आणि पुढची पाळी त्याची असं त्याला बजावण्यात आलं. शेवटी त्याने आपला व्यवसाय गुंडाळून टाकला. रशियात दफनविधी अतिशय महाग झाला आहे. त्या धंद्यात असलेल्यांना मात्र चांगलाच किफायतशीर ठरला आहे. रशियात अजूनही न्यायाधीश चौकशीविना बडतर्फ होऊ शकतात.
हे सारे वाचल्यावर, १९८९-९० सालच्या ऐतिहासिक क्रांतीनंतरही त्यात काहीच सुधारणा झाली नाही याचं कोणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. वर्तमानपत्रं आणि टी.व्ही. सरकारी नियंत्रणाखाली आहेत. एका रशियनाने या स्थितीचं वर्णन ‘सोव्हिएत युनियनचीच पुनरावृत्ती’ असं केलं आहे ते यथार्थच आहे.
‘न्यूक्लिअर नाइटमेअर’ या प्रकरणात लेखिकेने लाचलुचपत हा आण्विक अस्त्रांबाबत सर्वात मोठा धोका आहे असं वक्तव्य केलं आहे. आण्विक अस्त्रं आणि त्याबाबत गोपनीयता पाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती अशा अधिकाऱ्यांना लाच घेतल्याबद्दल अटक झाली आहे. ओझस्र्क येथे प्लुटोनियमवर प्रक्रिया करतात. ओझस्र्कमधील अनेक स्थानिक प्रशासकांना लाचलुचपतीच्या आरोपाखाली काढून टाकावं लागलं.
वरील सर्व वर्णनाअंतीही सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियन जनतेचं जीवनमान सुधारलं आहे या निर्णयाप्रत लेखिका पोहोचते. सामान्य रशियन आज ‘आयडेंटिटी क्रायसिस’ – आपला देश जागतिक राजकारणात नेमका कुठे बसतो – या संभ्रमात पडला आहे. युक्रेनचा पेच, पाश्चिमात्य देशांनी घातलेले र्निबध, तेलाच्या घटलेल्या किमती यामुळे राहणीमानावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. रशियन भाषिक क्रिमिया रशियाला जोडल्यामुळे सुरुवातीला वाटलेल्या उत्साहाचं भरतं जाऊन त्याची जागा आता वेढा पडलेल्या गावातल्या लोकांच्या मानसिकतेने घेतली आहे. तरीही बहुसंख्य रशियन लोकांत पुतिन हाच लोकप्रिय नेता असल्याचे या पुस्तकातून समोर येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा