प्रा. अविनाश कोल्हे
गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांचा सात ऑगस्ट हा स्मृतिदिन. ८० वर्षांनंतर त्यांच्या ‘राष्ट्रवाद’ विषयक मतांची चर्चा करणाऱ्या एका पुस्तकाचं हे पुनरावलोकन.
या छोटेखानी पुस्तकाचे शीर्षकच पुरेसे धक्कादायक आहे- ‘राष्ट्रवादाची अवैधता’! ज्या राष्ट्रवादाला आधुनिक काळातील ‘नवा धर्म’ म्हणतात, त्याला डॉ. आशीष नंदी यांच्यासारखा (जन्म : १९३७) ख्यातकीर्त अभ्यासक ‘अवैध’ म्हणतो तेव्हा पहिला धक्का बसतो. दुसरा धक्का बसतो, जेव्हा समजतं की डॉ. नंदी यांनी या पुस्तकात गुरुदेव टागोर यांच्या तीन कादंबऱ्या घेऊन टागोरांच्या मनात राष्ट्रवादाबद्दल कशा गंभीर शंका होत्या याची चर्चा केली आहे. अशा स्थितीत नंदींच्या या पुस्तकाची गंभीरपणे दखल घ्यावीच लागते. ७ ऑगस्ट १९४१ रोजी- म्हणजे आजपासून बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी टागोरांचे देहावसान झाले. गुरुदेव जसे नामवंत कवी, चित्रकार, संगीतकार, शिक्षणतज्ज्ञ होते, तसेच ते राजकीय विचारवंतही होते. टागोरांनी १९१७ साली ‘नॅशनॅलिझम’ नावाचे पुस्तक लिहिले होते.
जेव्हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत जगभर राष्ट्रवादाचे गोडवे गायला जात होते तेव्हा टागोरांनी राष्ट्रवादाची दुसरी बाजू दाखवणारे हे पुस्तक लिहिले होते. टागोरांच्या मते, युरोपच्या भूमीवर जन्माला आलेला आणि झपाटय़ाने जगभर पसरलेला राष्ट्रवाद मूळात ‘ते विरुद्ध आम्ही’ या संकुचित तत्त्वावर उभा आहे. राष्ट्रवादाचा दुराग्रह धरला तर अमानुष पातळीवरची हिंसा पसरते. मुख्य म्हणजे या हिंसेचं समर्थन केलं जातं. टागोरांनी पहिल्या महायुद्धात झालेली प्रचंड मनुष्यहानी बघितली होती. त्यांना ‘अतिरेकी राष्ट्रवाद’ या संकल्पनेचे धोके जाणवत होते. त्याअगोदर त्यांनी १९०५ साली भारतात सुरू झालेली स्वदेशीची चळवळ बघितली होती. बंगालची फाळणी बघितली होती. त्यादरम्यान भारतीय समाजात झालेल्या चर्चा आणि हिंसाचार त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्यातून त्यांचे राष्ट्रवादाबद्दलचे आकलन आणि आक्षेप आकाराला आले. ‘नॅशनॅलिझम’ या पुस्तकाव्यतिरिक्त त्यांनी तीन राजकीय कादंबऱ्या लिहिल्या. ‘गोरा’ (१९०९), ‘घरे बाइरे’ (१९१६) आणि ‘चार अध्याय’ (१९३४). या तिन्ही कादंबऱ्यांवर यथावकाश चित्रपट आले.
प्रा. डॉ. आशीष नंदी यांनी या तीन कादंबऱ्या समोर ठेवून या पुस्तकाची रचना केली आहे. डॉ. नंदींच्या लेखनाचं वैशिष्टय़ म्हणजे मानसशास्त्र व समाजशास्त्र एकत्र करून सामाजिक समस्यांचा अभ्यास करणं. त्यांनी डझनापेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी हे- ‘इलेजिटीमसी ऑफ नॅशनॅलिझम : रवींद्रनाथ टागोर अॅण्ड द पॉलिटिक्स ऑफ सेल्फ’!
अपेक्षेप्रमाणे या पुस्तकाला लेखकाची छोटीशी प्रस्तावना आहे. ते नमूद करतात की, ‘आधुनिक राज्य-राष्ट्र’ ही संकल्पना भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आली. डॉ. नंदी जरी दाखवत नसले तरी युरोपातसुद्धा ही संकल्पना तशी अलीकडचीच आहे. प्रशियातील (आजचा जर्मनी) वेस्ट फॅली या गावी इ. स. १६४६ मध्ये झालेला करार म्हणजे आधुनिक राष्ट्राची जननी असे मानले जाते. त्यानंतर युरोपात या संकल्पनेचा प्रसार झपाटय़ाने झाला. लेखकाने नामवंत अभ्यासक प्रा. डॉ. सुदिप्ता कविराज यांचं निरीक्षण उद्धृत केलं आहे. कविराज म्हणतात की, कलकत्त्याचे विचारवंत भूदेव मुखोपाध्याय (१८२७-१८९४) यांच्यामुळे भारतात आक्रमक राष्ट्रवादाची सुरुवात झाली. यासाठी भारतीयांनी इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजांकडून आधुनिक राष्ट्राची तत्त्वं शिकून घ्यावीत.
मुखोपाध्यायांना भारतातील इंग्रजपूर्व शासनव्यवस्थेबद्दल, इथल्या एकूण समाजव्यवस्थेबद्दल राग होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात या युरोपियन संकल्पनेबद्दल अनेक भारतीयांच्या मनांत शंका निर्माण व्हायला लागल्या. युरोपातील ‘एक भाषा- एक धर्म- एक संस्कृती’ असलेल्या देशांतील संकल्पना भारतासारख्या ‘बहुभाषिक- बहुधर्मीय-बहुसांस्कृतिक’ देशात चालेल का, या दिशेने विचार सुरू झाला. एकूणच ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. यातील एक विसंगती डॉ. नंदी यांनी नमूद केली आहे. पाश्चात्त्यांच्या राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्या विचारवंतांत एकी नव्हती. प्रत्येकाचा विरोध वेगवेगळ्या कारणांसाठी होता. यातील एक विचारवंत म्हणजे रवींद्रनाथ टागोर. (१८६१-१९४१)
प्रा. नंदी यांनी एकानंतर दुसरी, मग तिसरी कादंबरी असे निवेदनाचे तंत्र न वापरता जसा मुद्दा असेल त्यानुसार या कादंबऱ्यांतील पुरावे समोर ठेवले आहेत. टागोरांची पहिली राजकीय कादंबरी ‘गोरा’ १९०९ सालची. तेव्हा स्वदेशीची चळवळ जोरात होती. या कादंबरीचा काळ मात्र १८७० च्या दशकातला आहे. (पृ. ३५) कादंबरीचा नायक गौरमोहन ऊर्फ गोरा एका आयरिश दाम्पत्याचा मुलगा. युद्धकाळात त्याची आई त्याला एका बंगाली दाम्पत्याच्या आश्रयाला असताना जन्म देते आणि मृत्यू पावते. बंगाली दाम्पत्य त्याचा सांभाळ करतं. तत्कालीन भारतातील सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर गोरा-सुचरिता आणि विनय-ललिता यांची प्रीती फुलते. त्याकाळच्या बंगाल प्रांतात एकीकडे नवे विचार, राष्ट्रवाद वगैरे चर्चेत होते, तर दुसरीकडे धार्मिक पुनरुज्जीवन जोरात होते. या संकल्पनांचा संघर्ष हा कादंबरीतला महत्त्वाचा भाग आहे. नंदी दाखवून देतात की, गोरा या नायकावर विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव होता. गोराला भारताच्या प्राचीन परंपरांचा कडवा अभिमान आहे. कादंबरीतील अनेक घटनांमुळे त्याला सतत त्याच्या भूमिकेचा विचार करावा लागतो. एकोणिसाव्या शतकात भारतात ‘राष्ट्रवाद’ हा पुरेसा प्रबळ नव्हता. त्याला बळ मिळाले ते १९०५ साली जाहीर झालेल्या बंगालच्या फाळणीमुळे. कादंबरीच्या शेवटी गोराला जाणवतं की, आपण इंग्रजांसारखं शक्तिशाली होण्यासाठी जर त्यांची नक्कल करू लागलो तर आपण कधीच शक्तिशाली होणार नाही. अशी नक्कल करून कोणताही समाज मोठा होत नाही. त्याला हिंदू संस्कृतीचा तीव्र अभिमान आहे. पण जेव्हा त्याला समजतं की, तो हिंदू नसून आयरिश आहे, तेव्हा तो कोलमडून पडतो. नंदींच्या मते, या कादंबरीच्या केंद्रस्थानी ‘देशप्रेम’ आहे. त्यातूनच राष्ट्रवादाचा उगम होतो. टागोरांनी गोराचे आई-वडील आयरिश दाखवून प्रेमाला राष्ट्राच्या मर्यादा नसतात याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
टागोरांची दुसरी राजकीय कादंबरी ‘घरे बाइरे’ १९१६ साली प्रकाशित झाली. या कादंबरीतील कथानक १९०७ साली घडते. लॉर्ड कर्झन यांनी १९०५ साली बंगालची फाळणी घोषित केली तेव्हा देशात स्वदेशीची चळवळ जोरात होती. या कादंबरीला या घटनांची पार्श्वभूमी आहे. एक तरुण जोडपं, त्यांचं सुखी, श्रीमंत, जमीनदार कुटुंब आणि त्यांच्यात अचानक आलेला सशस्त्र क्रांतिकारक. अभ्यासकांच्या मते, या कादंबरीत टागोरांच्या अंतर्मनात सुरू असलेले वादळ व्यक्त झालेले आहे. एका बाजूला त्यांच्या मनात पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल प्रेम होतं, तर दुसरीकडे याच संस्कृतीच्या विरोधात बंड केलं पाहिजे असंही वाटत होतं. या कादंबरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती. हंगेरीतील नामवंत मार्क्सवादी अभ्यासक ग्वेओर्जी लुकाक्स (१८८५-१९७१) यांनी या कादंबरीवर १९२२ साली एक लेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं- ‘टागोरांची गांधीवादी कादंबरी’! नंदी याची दखल घेत लुकाक्सच्या प्रतिपादनाशी असलेले गंभीर मतभेद नोंदवतात. ‘घरे बाइरे’चा नायक निखिल जरी खानदानी जमीनदार असला तरी तो अनेकदा गरीब, अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या बाजूने उभा राहतो. (पृ. १७) निखिलची पत्नी विमला गृहिणी आहे. तिला बाहेरच्या जगात काय चाललं आहे हे माहिती नाही. तत्कालीन भारतीय विवाहित स्त्रीच्या मानसिकतेप्रमाणे माहिती करून घेण्याची इच्छाही नाही. अशा शांत, श्रीमंत जमीनदाराच्या घरात संदीप हा सशस्त्र क्रांतिकारक येतो आणि कादंबरी गती घेते. विमला संदीपकडे ओढली जाते. पाश्चात्त्य विचार, व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे मूल्यं पचवलेल्या निखिलला याचा अंदाज येतो. पण तो आदळआपट न करता तिला समजून घेतो. निखिल ‘देशप्रेमी’ आहे. पण ‘कडवा राष्ट्रवादी’ नाही. म्हणूनच तो स्वदेशीच्या चळवळीत भाग घेत नाही. ‘वंदे मातरम’ म्हणायला नकार देतो. उलट, संदीपसारख्या राष्ट्रवाद्याला निखिल ‘शक्तीपेक्षा सत्य महत्त्वाचं असतं’ असं ठणकावून सांगतो. संदीपला मात्र येनकेन प्रकारेण देशाचं स्वातंत्र्य हवं असतं. या दोन विभिन्न दृष्टिकोनांमुळे विमलाची फरफट होते.
टागोरांची ‘चार अध्याय’ ही तिसरी राजकीय कादंबरी १९३४ साली प्रसिद्ध झाली. टागोरांची ही शेवटची कादंबरी. ही कादंबरी १९१८ साली संपलेल्या पहिल्या महायुद्धानंतर लिहिली आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिल्या महायुद्धाच्या आधीसुद्धा जगात युद्धं झाली होती.. आजही होत आहेत. रामायण-महाभारतापासून मानवी इतिहासात युद्धं झालेली आढळतात. मात्र, विसाव्या शतकात पहिले ‘महायुद्ध’ झाले. यात जवळजवळ दोन कोटी माणसं मारली गेली. या महायुद्धाबद्दल ‘हे युद्ध सगळी युद्धं संपवेल’असा जो प्रचार झाला होता तो व्यर्थच ठरला. तेव्हापासून ‘राजकीय हिंसा’ याबद्दल जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. टागोरांची कादंबरी या आशयसूत्राला हात घालते. या कादंबरीचं कथानक १९२० च्या महात्माजींच्या असहकाराच्या चळवळीनंतर घडतं. महात्माजींनी चौरी चौरा येथे घडलेल्या घटनेनंतर ही चळवळ मागे घेतली आणि देशभर हिंसाचार, दंगे सुरू झाले. या कादंबरीतसुद्धा टागोरांनी राष्ट्रप्रेमासाठी झालेल्या अमानुष हिंसाचारावर टीका केली. या कादंबरीत इंद्रनाथ हा ज्येष्ठ सशस्त्र क्रांतिकारक आहे. जोडीला इला आणि अतिन यांची प्रेमकहाणी आहे. या कादंबरीत साधी वाटणारी माणसंसुद्धा बघता बघता कशी अमानुष होतात याचं प्रभावी चित्रण आहे. एका प्रसंगी सशस्त्र क्रांतिकारकांचा म्होरक्या इंद्रनाथ इलाला विचारतो, ‘जर तुझ्या प्रेमामुळे क्रांतिकार्याला हानी होत असेल तर तू अतिनला मारून टाकू शकशील का?’ दुसऱ्या एका प्रसंगी तो इलाला म्हणतो, ‘मला जर शक्य असतं तर मी तुला इथल्या इथं मारून टाकलं असतं.’
या छोटेखानी, पण विचारप्रवर्तक निरीक्षणांनी भरलेल्या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण महत्त्वाचं आहे. नंदी दाखवून देतात की, टागोर जसे राष्ट्रवादाच्या विरोधात होते तसेच ते साम्राज्यवादाच्यासुद्धा विरोधात होते. (पृ.८०) टागोरांनी जरी अनेकदा राजकारणात भाग घेतला असला तरी त्यांच्यासाठी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त महत्त्वाचं होतं. गांधीजींसाठी राजकारण म्हणजे नैतिकतची कसोटी पाहणारी प्रयोगशाळा होती. दोघांनाही राजकारणाच्या वर नैतिकतेची स्थापना करायची होती. आधुनिक शासनव्यवस्थेत ‘राजकारण आणि नैतिकता’ यांची झालेली फारकत त्यांना मान्य नव्हती. त्या अर्थाने त्यांच्यासाठी राष्ट्रवाद अवैध होता. वाचक पुस्तकाच्या शेवटी येतो तेव्हा त्याला पुस्तकाच्या शीर्षकाचा खरा आशय समजतो. ‘राष्ट्रवादी’ न होता ‘देशप्रेमी’ होणं शक्य आहे. नव्हे, गरजेचं आहे’ असं टागोर या कादंबऱ्यांतून सुचवतात असा नंदींचा निष्कर्ष आहे. टागोरांना जागतिक पातळीवर मानवी संस्कृतीला भेडसावणाऱ्या समस्या जाणवत होत्या. लेखकाने पुस्तकाच्या शेवटी टागोरांनी इ. स. १९४१ साली- म्हणजे त्यांच्या ८० व्या वाढदिवशी लिहिलेल्या ‘क्रायसिस इन सिव्हिलायझेशन’ या निबंधाचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी राष्ट्रवादाच्या दुराग्रहापोटी माणसाने कसा संस्कृतीचा बळी दिला आहे याचे विवेचन केले आहे. लेखकाच्या मते, टागोर आणि गांधीजींनी भारतीय संस्कृतीच्या मदतीने पाश्चात्त्यांच्या आक्रमक राष्ट्रवादाचा तात्पुरता का होईना, सामना केला होता. (पृ. ८४)
दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना टागोरांचा मृत्यू झाला. यापुढे अशी महायुद्धं होऊ नयेत म्हणून ऑक्टा ेबर १९४५ मध्ये ेस्थापन झालेला ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ त्यांना बघता आला नाही. हा राष्ट्रसंघ म्हणजे आक्रमक राष्ट्रवादाला लगाम घालण्याचा एक प्रयत्न होता. आज २०२१ साली आपल्याला दिसते की हा प्रयत्न तितकासा यशस्वी झालेला नाही. आता तर आक्रमक राष्ट्रवादाला रान मोकळं आहे. आज जगातल्या अनेक देशांकडे महासंहारक अण्वस्त्रं आहेत. आणि हीच खरी भीती आहे.
‘: इल्लेजिटिमसी ऑफ नॅशनॅलिझम- रवीन्द्रनाथ टागोर अॅण्ड द पॉलिटिक्स ऑफ सेल्फ’
लेखक : आशीष नंदी
प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे : ९४, किंमत : १२५ रु.
टागोरांचा बुद्धिनिष्ठ राजकीय संघर्ष
‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ हे रामचंद्र गुहा लिखित पुस्तक अनेकार्थानी महत्त्वाचं. ही ‘थोरांची ओळख’ आहेच, पण त्या-त्या वेळी या थोरांनी कोणत्या तात्त्विक भूमिका घेतल्या याचं दर्शन घडवणारं हे पुस्तक आहे. यातलं रवीन्द्रनाथ टागोरांविषयीचं प्रकरण टागोर यांच्या राष्ट्रवाद-विषयक मतांची चर्चा करणारं आहे आणि त्याचा आधार म्हणून जो निबंध गुहा यांनी चर्चेला घेतला आहे, तो १९१० सालचा आहे.. म्हणजे यानंतर अवघ्या वर्षभरात, कोलकाता इथं १९११ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात, टागोरांचं ‘जन गण मन’ पहिल्यांदा जाहीरपणे गायलं जाणार होतं, तेव्हा! टागोर यांनी काँग्रेसी वळणानं तेव्हा (१९१०) चाललेल्या बहिष्कार चळवळीला विरोध केला होता. त्यापैकी काही अवतरणं आजही, बुद्धिनिष्ठ राजकीय म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरावीत अशीच आहेत :
विद्यार्थ्यांना या चळवळीत सामील व्हायला सांगणं आणि त्यासाठी शाळा सोडा असं आवाहन करणं, याला टागोरांनी विरोध केला होता. असं केल्यामुळे रेम्याडोक्यांची फौज तेवढी मिळेल, पण विद्यार्थ्यांचा हा सहभाग दिशाहीन ठरेल, त्यातून अराजकवादच दिसून येईल, अशी भीतीदेखील टागोर व्यक्त करतात. विद्यार्थ्यांना या प्रकारे हाताशी धरणे हे स्वातंत्र्यलढय़ाच्या ‘तात्पुरत्या’ विचाराचे लक्षण आहे, असेही मत ठामपणे मांडतात.
ब्रिटिश सत्तेला ‘मायबाप’ मानण्यास टागोर तयार नसत, परंतु या परकीय आक्रमणामुळेच भारतवर्षांच्या कुंठितावस्थेवर प्रहार झाला, असे त्यांचे मत होते. ब्रिटिशांनी त्यांच्या विचारांची ज्योतही आपल्याला पाहाण्यासाठी आणली, त्या ज्योतीवर आपण आपल्या मशाली पेटवूया, अशा शब्दांत त्यांनी परकी आक्रमणाला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे सूतोवाच केले होते.
ब्रिटिशांनी त्या काळात रावबहादुर वगैरे पदव्या देण्याचा सपाटाच लावला होता. अनेक ‘नेटिव्ह’ ब्रिटिशांसमोर हात बांधून जातात, लवून-झुकून मुजरे करतात हे जसे चुकीचे, तसेच ब्रिटिश वाईट म्हणून हत्या-हिंसा हा एकच मार्ग मानणे हेही चूकच, असे म्हणणे टागोर निग्रहाने मांडतात.
पश्चिम आणि पूर्वेच्या संस्कृती परस्परांशी फटकून राहिल्या, त्यांनी एकमेकांशी आदानप्रदान केले नाही हेच जगाचे दुखणे आणि संवादाचा हा अभाव हेच संघर्षांचे मूळ,असे टागोर मानतात.