अत्यंत अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकाला अलीकडेच (१ नोव्हें.) ‘टाटा लिट-लाइव्ह ग्रंथ पुरस्कार’ मिळाला. ‘गीता प्रेस’च्या प्रभावातून आजच्या ‘हिंदुत्वा’ची कल्पना कशी घडत गेली याचा मागोवा घेताना, गीता प्रेसतर्फे प्रकाशित ‘कल्याण’ हे हिंदी आणि ‘कल्याण कल्पतरू’
हे इंग्रजी नियतकालिक, यांची ९० वर्षांपूर्वीपासूनची बाडे लेखक अक्षय मुकुल यांनी अभ्यासली.. मात्र तरीही काही उणे राहिले आहे. ‘गीता प्रेस’ने सनातन धर्माचा केलेला पुरस्कार आणि आजघडीला बहुसंख्याकांवर होणारा ‘असहिष्णुते’चा आरोप यांचा काही संबंध आहे का?
अहिष्णुता हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे. अशा विद्वेषी वृत्तीची जडणघडण कोणत्या मुशीत घडली ते समजण्यासाठी श्री. अक्षय मुकुल यांनी परिश्रमपूर्वक ग्रथित केलेल्या माहितीइतका दुसरा अभ्यासपूर्ण संग्रह मला तरी माहिती नाही.
िहदू धर्मातील सुधारणांचे प्रयत्न ब्राह्मो समाज (१८२८) आणि आर्य समाज (१८७५) यांनी प्रामुख्याने केले, परंतु असा सुधारणावाद हा एकमेव प्रवाह नव्हता. १९१९ ते २४ मधील खिलाफतचे लांगूलचालन, १९२१ मधील मोपल्यांचे अत्याचार इ.मुळे संघटित सनातन धर्माचेसुद्धा आकर्षण वाढले. जयदयाल गोयंदका आणि हनुमान प्रसाद (भाईजी) पोद्दार यांनी ‘गीता प्रेस’ आणि ‘कल्याण’ मासिक यातून जे परिश्रम केले, त्याचा मुकुल यांनी अभ्यास केला आहे. मुकुल यांनी दिवसरात्र एक करून इतिहास धुंडाळला तो असा :
गोयंदका प्रामाणिक व्यापारी होते. पोद्दार यांच्या उपक्रमाला गोयंदका यांनी संपूर्ण साथ दिली. कामाच्या वेळेनंतर ‘गोिबद भवन’मधील गोयंदका यांच्या खोलीत १९२२ पासून छोटय़ाशा गटात गीतापठण आणि इतर धार्मिक चर्चा असा क्रम सुरू झाला, त्यातून हा पसारा उदयास आला. १९२३ मध्ये कलकत्ता येथे नोंदणी झालेल्या गीता प्रेसचा पसारा नंतर गोरखपूरला गेला. अनेक पुस्तके प्रकाशित झाली. िहदी ‘कल्याण’चा खप २,००,००० च्या घरात आणि इंग्रजी ‘कल्याण-कल्पतरू’चा खप १,००,००० च्या घरात आहे. गेली ९० वष्रे हा उपक्रम अव्याहत चालू आहे. या दोघांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यात खंड नाही. धर्मविचारांबद्दल इतर नियतकालिकांतही चर्चा झाल्या तरी बहुतेक सर्व निष्प्रभ झाली, कित्येक अल्पावधीतच लुप्त झाली. यामुळे ‘कल्याण’ आणि ‘गीता प्रेस’ची नोंद घेणे मुकुल यांना आवश्यक वाटले.
उर्दू शिक्षण हे िहदू संस्कृतीच्या विरोधात असल्याचे पोद्दार यांचे वयाच्या सातव्या वर्षीच मत झाले. वयाच्या १२ वर्षी कलकत्ता येथे व्यापाराचे आणि विशेषत: सनातनी धार्मिक विचारांचे संस्कार घट्ट झाले. क्रांतिकाऱ्यांसोबत काम करताना त्यांना अटक झाली. ते दूरच्या गावी स्थानबद्ध झाले. एकटेपणात गीता/देव यांचा प्रभाव वाढला. मुंबईला आल्यानंतर भजन इत्यादी चालूच राहिले. व्यापार इत्यादीत मारवाडी समाजाच्या मान्यवरांशी संपर्क झाला. ‘गीता प्रेस’, ‘कल्याण’ मासिक आणि इतर कामांमुळे तो वृिद्धगत झाला.
अस्पृश्यतेचे पालन करणे, विधवांच्या पुनर्वविाहाला विरोध करणे हे त्यांच्या सनातनतेचे निकष होते. पारंपरिक ‘शास्त्रे’ आणि आधुनिक विज्ञानाच्या आभासातून ते अस्पृश्यतेचे समर्थन करीत. पूर्वसंचितामुळे त्यांची शरीरे अपवित्र झाली (पुस्तकातील पृष्ठ २७०), पिढय़ान्पिढय़ा घाणीचे काम केल्यामुळे त्यांच्या शरीरात जंतूंचा शिरकाव होऊन जीवशास्त्रीय बदल झाले (पृ. २६९) असे त्यांचे मत होते. अस्पृश्य किंवा मुसलमान यांच्या स्पर्शाने अपवित्र होण्याची शक्यता असल्यामुळे (पृ. ८०) बाहेरचे अन्न (उदा. पाव) खाण्यास त्यांचा विरोध होता. डॉ. आंबेडकरांवर ‘हीन वर्णा’चे म्हणून (पृ. २२) विखारी टीका करून, िहदू कोड बिल आणल्यामुळे आणखीच कठोर टीका (पृ. २५९) करतात.
महात्मा गांधींशी पोद्दार यांचे पूर्वी अत्यंत जवळचे संबंध होते तरीही पुढे पुणे करार (पृ. ५२), मंदिर प्रवेश (पृ. १७४), तसेच मुसलमानांबाबतची भूमिका (पृ. १७५) यावरून त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. ‘मरणान्तानि वैराणि’ हे तत्त्व पंचम जॉर्ज, मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर पोद्दार यांनी पाळले (पृ. १५४), परंतु गांधींच्या हत्येनंतर प्रसिद्ध झालेल्या ‘कल्याण’च्या (फेब्रुवारी आणि मार्च १९४८) अंकांमध्ये गांधींचा ओझरता उल्लेखही आढळत नाही (पृ. ५८).
स्त्रियांबाबत पोद्दार यांची भूमिका प्रतिगामी होती. ‘िहदू सामाजिक व्यवस्थेत स्त्रिया परावलंबी असल्यामुळे’ विभक्त होणाऱ्या स्त्रियांना कोणतीही भरपाई देण्यास त्यांचा सक्त विरोध होता (पृ. २५८), स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता (पृ. ३५१), आनंदीबाई जोशींच्या परिचयात साडी परिधान करणे, बांगडय़ा, कुंकू लावणे, देवादिकांचे फोटो वापरणे (पृ. ३५७) फक्त यांचाच उल्लेख आहे. वैवाहिक जीवनात त्रास झाला तर स्त्रीने तसेच खितपत जीवन व्यतीत करावे (पृ. ३५८), पतीबाबत कर्तव्ये पार पाडण्याचे उदात्तीकरण (पृ. ३६०), पतिदेवांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्या पायाचे तीर्थ पवित्र मानावे (पृ. ३६१), गर्भाचे िलग ठरविणे ही स्त्रीची जबाबदारी असते (पृ. ३७८), स्त्रीमुक्तीमुळे समाजाचा ऱ्हास होईल (पृ. ३६५) असे विचार मांडले होते. ‘स्त्रियांनी बाहय़ जगात लुडबुड करू नये’ असे हिटलरचे मत उद्धृत केले होते (पृ. ३६७).
पोद्दार यांच्या जन्माची दैवी भविष्यवाणी झाली असल्याचे, पोद्दार यांना साक्षात्कार होत असल्याचे दावे करून त्यांच्याभोवती गीता प्रेसने वलय निर्माण केले. मंत्रोच्चार विभाग सुरू करणे (पृ. १०६), पुराणे, महाभारत इत्यादीच्या कथा-नाटकांमधून, रामचरितमानसाच्या पारायणातून भक्तिभाव रुजविणे (पृ. १९), गीता, रामायण इत्यादी पाठ आयोजित करणे (पा. २०) आणि जपजाप्यातून आरोग्य, संपत्ती व अन्य भौतिक समस्यांवर तात्काळ उपाय मिळेल असे सांगून भक्तिभाव आणि निष्ठा वाढविणे (पृ. २२९) इत्यादींतून एका आंधळ्या भक्तीचा पंथ करण्याचे प्रयत्न दिसतात. ‘गीतेमुळे नाझी प्रभावित झाले’ (पृ. १२६) अशीही माहिती आहे.
िहदू राष्ट्र व्हावे- मुसलमानांना लष्कर किंवा वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्यांत स्थान नसावे (पृ. २५४), संघबळ वाढावे (पृ. १०२), िहदूंची भाषा म्हणून िहदीचा वापर व्हावा (पृ. ३), सनातन िहदू धर्म वाढावा (पृ. २२९) ही त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना होती. प्रत्येक बाब (उदा. िहदी विरुद्ध उर्दू वाद, िहदू मुलींना वारसा हक्क) िहदू विरुद्ध मुसलमान याच दृष्टिकोनातून बघितली. लेखांमध्ये मुसलमानांविषयी तिरस्कारयुक्त भडक शब्दांचा वापर (पृ. २३५) आणि त्यांच्याबाबत तीव्र संताप (पृ. २३७), खोटय़ा अत्याचारांचे वर्णन (पृ. २३६) असे दिसते. अर्थात कधी कधी दोलायमान भूमिकाही घेतली. िहदू-मुसलमान एकतेचा पुरस्कार, सांप्रदायिक एकतेचा आग्रह, सर्व एकाच देवाची मुले आहेत असा उल्लेख हेसुद्धा आढळते (पृ. २३६, २३७, २४१).
मुस्लीम हे ‘परके’ आहेत, विषयासक्त आहेत, त्यांच्यापासून िहदू स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे (पृ. २९) असा प्रचार झाला. मुसलमानांच्या कथित आसक्तीबद्दल आक्षेप घेणारे पोद्दार, उच्चभ्रू समाजात सिफिलिसचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होता याबद्दल अवाक्षर काढत नाहीत, असे निरीक्षण मुकुल नोंदवितात. उलट ‘एका दालमिया यांचा स्वैराचार ही देवाची इच्छा आहे, लवकरच ते वर्तन सुधारेल’ (पृ. ६२) असे सांभाळून घेणे दिसते. त्यांच्या ‘गोिबद भवन’मध्ये ‘सेक्स स्कँडल’ झाले ते लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले, पोलिसात तक्रारच झाली नाही (पृ. ११६-११८), असा दुट्टपीपणा होता.
मुकुल यांच्या माहितीशी मला साधम्र्य आढळते ते असे : ज्यूंबाबतच्या नाझी भेदभावाला लैंगिक पावित्र्याचे अंग होते. ज्यूंचा आर्यन स्त्रियांबद्दल दृष्टिकोन विकृत असतो असे चित्र १९३३ च्या आधी आणि नंतर नाझी वृत्तपत्रांनी निर्माण केले. ज्यू हे ‘परके’ आणि जर्मनीशी नाळ न जुळणारे आहेत हा विचार १९४५ नंतरसुद्धा काही प्रमाणात प्रचलित होता. नाझीवाद आणि ‘कल्याण’च्या विचारातील साधम्र्य मला लक्षणीय वाटते.
िहदू समाज एक दिसावा म्हणून गीता प्रेसने अनेक विवाद झाकले. पुराण इत्यादीतून भक्तीचा प्रसार होतो, पण वेदवाङ्मयाकडे दुर्लक्ष केले (पृ. १९), वेदान्ती वाङ्मयातील विचार मांडताना श्रुति आणि स्मृति यांच्यातील मतभेदांची चर्चाच केली नाही (पृ. १६९), िहदू महासभा आणि आर्य समाज यांचे अस्पृश्यता इत्यादी सुधारणांचे कार्यक्रम याबाबत मतभिन्नता स्पष्ट असूनसुद्धा वैचारिक संघर्ष टाळला गेला (पृ. २२९-२३०), बौद्ध, जैन आणि शीख नेत्यांशी मतभेद होऊ दिले नाहीत (पृ. २३३), ‘चांद’ किंवा ‘िहदू पंच’ या त्या काळच्या अन्य हिंदी नियतकालिकांनी परकीय सत्तेच्या विरोधात भूमिका घेतली, पण ‘कल्याण’ने तसे न करण्याची (पृ. ३९०) वृत्ती पाळली.
पोद्दार यांचे (नेहरू पिता-पुत्र वगळता) विविध स्तरांतील मान्यवरांशी घनिष्ठ संबंध होते (पृ. १५४), बहुतेकांना िहदू विचारांचे आकर्षणही होते. गीता प्रेससाठी पंडित नेहरूंनी तर अल्पसा औपचारिक संदेश देण्यासही नकार दिला (पृ. १८०). गीता सोसायटीच्या कामात नेते, उद्योगपती, कुलगुरू, न्यायाधीश, विचारवंत यांचा सहभाग होता (पृ. १२५), ‘भारतीय चतुर्धाम वेद भवन ट्रस्ट’मध्ये काँग्रेस, िहदू महासभा नेते, उद्योगपती, गव्हर्नर पोद्दार यांच्याशी संपर्क झाला. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील ‘ऑल इंडिया कल्चरल अकॅडमी’च्या १९५१ च्या परिषदेत त्यांना सरकारने आमंत्रित केले होते! गांधी आणि गीता यांच्यावर माहितीपट काढण्यासाठी त्यांना उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९६९ मध्ये निमंत्रित केले (पृ. १२९), १९५० च्या सुमारास भारतरत्न सन्मानाविषयी जी. बी. पंत यांनी विचारणा केली, असे सूचित होते (पृ. ६६), पोद्दार यांचा पोस्टाचा स्टॅम्प काढण्याचा निर्णयही १९९२ मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांनी घेतला होता. डालमिया आणि जैन यांच्या अटकेबाबत (पृ. ६५) आणि मोहनलाल गोयंदका यांच्या अटकेबाबत (पृ. ९५), रदबदली करण्यासाठी १९६४ साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या भेटीची परवानगी मिळाली.
महात्मा गांधींच्या हत्येसंबंधात अटक झालेल्या २५,००० लोकांच्या यादीत पोद्दार आणि गोयंदका यांचाही समावेश होता. परंतु ‘तुमच्या नावे अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, तुम्ही शहरात येऊ नका’ अशी सावधगिरीची सूचना पोद्दार यांना गोरखपूरच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटनी खुद्द दिली (पृ. ५८). सरकारी अधिकारी तसेच काँग्रेससह सर्व राजकारणी आणि उच्चपदस्थ यांच्यामध्ये असलेले पोद्दार यांचे वजन बघता गांधीहत्येतील या संशयितांविरुद्ध सरकारी पक्ष आणि अधिकाऱ्यांनी कितपत प्रामाणिकपणाने कारवाई केली असेल? याबाबत आजचा वाचक म्हणून माझ्या मनात संदेह निर्माण झाला.
१९३०च्या सुमारास, अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाबाबत मुंबईत देवळातील मतपेटय़ांत २४,९७९ सवर्णानी प्रवेशाच्या बाजूने कौल दिला, फक्त ४४५ सवर्ण विरोधात होते (पृ. ५३). म्हणजे, ‘सनातन’ धर्मविचाराला जनाधार तेव्हापासूनच नव्हता. भारताला सनातनी िहदू मानसिकतेचा बनविण्यात, गीता प्रेसच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे मुकुल यांच्या पुस्तकात दिसत नाही. ‘निखळ धार्मिक कार्यक्रम’ घेणाऱ्यांना १९८९ पर्यंतच्या निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर आक्रमक िहदुत्वाची वाढ झाली. याची कारणे केवळ ‘गीता प्रेस’मध्ये शोधता येणार नाहीत.
ती पुस्तकातही नाहीत; परंतु वाचताना काळातील फरक मला जाणवला तो असा: १९७० नंतर आíथक स्तर सुधारू लागला. नोकरदारच नव्हे तर घरांना ग्रिल बनविणारे, टीव्ही/स्कूटर मेकॅनिक, इ. ‘आधुनिक बलुतेदारां’च्या हातात बऱ्यापकी पसा आला. गाव तेथे एसटी पोहोचली, शहरांकडे जाणे सुलभ झाले, फक्त मुंबईच नव्हे तर बारीकसारीक शहरे पसरट वाढू लागली. रिक्षांचा धंदा वाढला. बिल्डर, वाळू पुरवठादार, स्टॅम्प व्हेण्डर वाढू लागले. उच्चवर्णीयांसारखीच काहीशा कनिष्ठ जातींच्या सदस्यांकडे आíथक सुबत्ता आली. धार्मिक आचारांचे प्रस्थ वाढले आणि ‘दूरदर्शन’च्या रामायण-महाभारत मालिकांनी त्याला दिशा घेण्यास हातभार लावला असावा. पण हा िहदुत्वाचा प्रवाह ब्राह्मणी नव्हता. ‘भटजी आणि शेटजींचा सनातन धर्म’ यानंतरच्या काळात प्रबळ राहिला नाही. हिंदुत्वाला राजकीय आवाज आणि व्यापक पाया मिळाला, पण तो पाया सनातन धर्माचा नव्हता. आíथक ‘सुधारणां’च्या नावाखाली झालेल्या बदलामुळे या प्रक्रियेला गती मिळाली. सनातनी ताबा गेला.
दलितांविषयी परकेपणा, राखीव जागांना विरोध, पाश्चिमात्य विकासापेक्षा सनातनी विचार पुढे आणणे असे प्रयत्न आज संघ परिवारातील काही संस्थांकडून होतात; पण व्यवहाराचे, राजकीय गणिताचे भान येताच या संस्थांना आणि नेत्यांना माघार घ्यावी लागते. अर्थात, धर्माधिष्ठित श्रेष्ठत्व असो किंवा भाषिक/प्रादेशिक अस्मिता असो, ‘तीव्र भावना’ ब्राह्मणी असोत किंवा अ-ब्राह्मणी असोत, मानवी प्रगतीत भावनाधिष्ठित राजकारण अडथळाच आणते. ‘काय व्हायला आवडेल आणि काय घडवून आणता येईल’, यामधील अंतर उमजण्यास सनातनी विचारांच्या मुशीत घडलेल्यांना विलंब लागल्यामुळे असेल, असहिष्णुतेविरुद्ध बोलण्यास बरीच खळखळ केली, पण मोदींना शेवटी सहिष्णुतेचा मुखवटा चढवावा लागला. जेम्स आयर्वनि या निग्रोचे १९३३ साली जॉर्जयिा राज्यामध्ये जमावाने बराच वेळ अनन्वित हालहाल केले, जखमांनी तडफडत असताना पेट्रोल टाकून आग लावली. ते दृश्य पाहण्यासाठी मलोगणिक अंतरावरून हजारो लोक घोडय़ावरून येत राहिले. शहराच्या अधिकाऱ्यांनी बराच वेळ दुर्लक्ष केले, त्याचा देह रात्री उशिरा हलविला. १९३३ मधील अमेरिका आणि २०१५ मधील दादरी यांत फरक असला तरी साम्यांबद्दल गाफील राहून चालणार नाही.
लेखक अक्षय मुकुल यांनी मांडलेली निरीक्षणे मनोज्ञ आहेत, ती अशी : गीता प्रेस आणि ‘कल्याण’ मासिक यांचा तर्कशुद्ध प्रतिवाद झाला नाही. िहदी साहित्यिक जगताने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले (पृ. २४). बाबरी मशिदीत राममूर्तीचा शिरकाव करविण्याचा पद्धतशीर कट दिसत असूनही, िहदू आंदोलनाची धास्ती खरी मानून मुख्यमंत्री जी. बी. पंत यांनी परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले नाहीत (पृ. ३१९-३२०). येथे गाफीलपणा झाला. ‘रामसेतूला ऐतिहासिक आधार नाही’ असे पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र यूपीए सरकारच्या बोटचेपेपणामुळे मागे घेतले (पा. ४२०). हाही असाच गाफीलपणा झाला.
कोणतीही बाब ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ करून बघणे समाजाला आणि हितसंबंधी नेतृत्वाला सोयीचे असते. ‘कोलकाता नाइट रायडर्स’वर कारवाई झाली की, शाहरूख खानच्या धर्मावरून अन्वयार्थ लावला जातो, जुही चावला किंवा मेहता हे मुसलमान नाहीत याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. वनस्पती तुपात बीफ टॅलोची भेसळ करण्याचा आरोप असलेले जैन आणि मित्तल यांचे कृत्य त्यांच्या धर्मविचारांशी जोडले तर ते गरसोईचे असल्याचे चटकन उघड होते. लोकसाहित्याचे अभ्यासक कृष्णमूर्ती हनुर म्हणतात, ‘टिपूचा उपमर्द किंवा उदात्तीकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंचा भक्कम पुरावा मिळेल. त्याचे ब्लॅक किंवा व्हाइट असे एकांगी चित्रण चुकीचे आहे’. सोयीचे आणि सयुक्तिक यांतील फरक मांडला गेला पाहिजे. अन्यथा सोयीचे पण विकृत चित्रण भावनांना चिथावणी देत राहील. लैंगिक स्वैराचाराची धर्म-वंश यांच्याशी सांगड घालून ‘ब्लॅक किंवा व्हाइट’ असे एकांगी चित्रण चिथावणी देण्यासाठी कसे वापरले जाते त्याची चर्चा वर केलीच आहे.
सामाजिक संबंधांचा आणि त्यातही प्रामुख्याने आíथक प्रवाहांचा, समाजमन बदलण्यात फार मोठा प्रभाव पडत असला आणि वैचारिक प्रबोधनाचा तात्काळ परिणाम दिसत नसला तरी सुपीक भूमी कधी निर्माण होईल याची पूर्वसूचना नसल्यामुळे सदैव दक्ष राहणे आवश्यक आहे. पुरोगामी किंवा नास्तिक विचारांच्या उपक्रमाला ९० वर्षांसारखे प्रदीर्घ सातत्य असल्याचे लोकांपुढे आलेले नाही ही त्रुटी आहे. िहदू आणि मुसलमान यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्यामधील वैचारिक प्रगती किंवा अधोगतीबाबत जी स्थिती असेल, त्याची कारणे शोधण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत.
भारताच्या व्यापक जनमानसावरील ‘गीता प्रेस’च्या प्रभावाची या पुस्तकात चर्चा नाही, हा पुस्तकाचा दोष म्हणता येईल. मान्यवरांनी ‘माहितीचा खजिना’ या मलपृष्ठावर दिलेल्या अभिप्रायाइतकेच मुकुल यांच्या परिश्रमाचे मूल्य सीमित आहे. मात्र वैचारिक लढाई सातत्याने आणि जागरूकतेने चालू राहिली पाहिजे, हे अधोरेखित करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा