|| गिरीश कुबेर

सत्यजित रे, भीमसेन जोशी, सुचित्रा सेन, किशोर कुमार, बिमल रॉय, सलील चौधरी, आर.डी. बर्मन, संजीव कुमार, हृषिकेश मुखर्जी, गालावरच्या कृष्णविवरी खळ्यांत पाहणाऱ्याचं अस्तित्व शोषून घेणारी शर्मिला टागोर, महाश्वेता देवी, रित्विक घटक… आणि अन्य काहींमध्ये भीमसेन जोशी, पं. रविशंकर… यातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे किमान एकेक पुस्तकाचा ऐवज. आणि या सर्वांवर लिहिणार गुलजारजी!

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हे म्हणजे आनंदानं श्वास कोंडावा अशी स्थिती. गुलजारजींचं इंग्रजीतलं ताजं ‘अ‍ॅक्चुअलीङ्घआय मेट देम’ हे पुस्तक हातात घेताना आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून गेलेलो असतो. ही लखलखीत माणसं एक तर आपल्यासाठी प्रेमविषय. आणि त्यांच्या आपल्या संबंधांची कहाणी गुलजारजी सांगणार म्हणजे पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याला रातराणीच्या मादक गंधानं लपेटून टाकल्यासारखंच.

हे पुस्तक वाचून त्या आनंदाची तहान अधिकच तीव्र होते. या पुस्तकाची संकल्पनाच इतकी आकर्षक आहे की ती वाचून आपल्या अपेक्षांत अतिरेकी वाढ होते. काही वर्षांपूर्वी गुलजारजी एका बंगाली वर्तमानपत्रासाठी या सर्वांवर स्तंभलेखन करत होते. त्यांचं बंगाली उत्तम आहे. त्या वर्तमानपत्रासाठी ते हे सर्व अनुभव सांगत. त्या वर्तमानपत्राची एक प्रतिनिधी ठरावीक दिवशी कोलकात्याहून मुंबईत यायची आणि गुलजारजींशी त्या त्या व्यक्तीविषयी मारलेल्या गप्पा रेकॉर्ड करून जायची. त्याचं लिखित शब्दांकन ती करायची. या सगळ्याचं संकलन २०१७ साली बंगालीत प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचा २०२१च्या अखेरीस इंग्रजीत आलेला अनुवाद म्हणजे हे पुस्तक.

खरं तर गुलजारजींना अनुवादित वाचणं म्हणजे मधुबालाची झेरॉक्स पाहून समाधान मानण्यासारखं. अर्थात कधी तरी त्यालाही इलाज नसतो हे मान्य. पण चित्रण सविस्तर असेल तर तेही गोड मानून घेता येईल. तसं प्रत्यक्ष गोड मानून घेण्यापेक्षा त्या गोडपणाची छानशी झलक या पुस्तकातून मिळते.

यातला सर्वात उत्कट म्हणावा असा लेख आहे तो बिमल रॉय यांच्यावरचा. एका अर्थी ते गुलजारजींचे गुरू. त्यांच्या लकबींचं, स्वभावाचं रसाळ वर्णन गुलजारजी करतात. यातली सचिनदा, बिमलदा आणि गुलजारजी यांच्या संभाषणातली अप्रतिम आठवण आहे ती ‘बंदिनी’त काळ्यासावळ्या नूतनवर चित्रित झालेल्या ‘मोरा गोरा अंग लइ ले…’ या अजरामर गाण्याची. त्या चित्रपटावर, त्या गाण्यावर आणि त्या नूतनवर प्रेम करणाऱ्यांनी ती मुळातूनच वाचायला हवी. या पुस्तकात त्यातल्या त्यात सविस्तर आहे तो हाच लेख. तो वाचताना या सर्वांची उत्कटता, सौंदर्यजाणीव आणि ती व्यक्त करण्यासाठी त्या माध्यमाच्या भाषेवर प्रभुत्व हे सर्व ‘त्या’ हरवलेल्या जगाची आठवण करून देतं. त्या काळाच्या अशा अनेक आठवणी मग पुढे येत राहतात आणि आपली तहान आणखीनच वाढवतात. महत्त्वाचं म्हणजे यातल्या अनेकांच्या राजकीय, सामाजिक जाणिवा तीव्र आहेत. ‘इप्टा’सारख्या चळवळीतनं त्या जाणिवांना धार आलेली आहे. त्या त्या जाणिवांसह ही माणसं आपल्या कलाकृती सादर करतात आणि तरीही अजिबात त्या प्रचारकी न वाटता उत्तम कलात्मक मूल्यं पिढ्यान् पिढ्या आपल्यासाठी राखून ठेवतात. या दृष्टीने सलील चौधरींवरचा लेख फारच मोहक आहे. त्यांचं मनस्वी असणं, कॅरम खेळत बसणं आणि मग हजर होऊन उत्तम गाणं करून देणं. वाचून त्यांच्याविषयीचा आदर आणखीनच वाढतो. 

‘तु ऽऽम पुकाऽ र लो… तुम्हारा इंतजार है…’  हे हेमंतकुमारांचं गाणं ऐकताना त्यातलं ‘ख्वाब चुन रही है रात…’  कानावर पडल्यावर स्वत:च्या स्वप्नात न गेलेल्या व्यक्तीस उत्तरायुष्यात निद्रानाश जडत असेल. हेमंतकुमार चांगले ताडमाड तगडे होते. गाण्यातला तरलपणा त्यांना ‘पाहण्यात’ नव्हता. ‘गंगा आए कहाँ से…’  गाण्याच्या रेकॉर्डिंगची तयारी सुरू आहे आणि हेमंतदा गायच्या आधी सिगरेट ओढायला गेले. गायक आपल्या गळ्याला फार जपतात. काही काही तर या जपण्याचं इतकं कौतुक करतात की ‘गाणं नको पण गळा आवर’ असं त्यांना म्हणावंसं वाटतं इतका वात आणतात. आणि इथे हा गायक रेकॉर्डिंगआधी धूर काढतोय. रेकॉर्डिंग उत्तम होतं. पण त्यांना त्या सिगरेटविषयी विचारल्याशिवाय गुलजारजींना राहवत नाही. ते विचारतात. त्यावर हेमंतकुमारांचं उत्तर :  सिगरेट ओढली नाही तर माझा आवाज सपाट वाटतो. तो दाणेदार होण्यासाठी सिगरेट लागतेच.

हे वाचल्यावर हलवा होत चाललेला तीळ डोळ्यापुढे आला. त्याला कसे मंद आचेवर काटे फुटू लागतात तसं सिगरेट धूरस्पर्शानं हेमंतकुमारांच्या गोल स्वराला सर्व बाजूंनी काटे फुटू लागलेत वगैरे. गुलजारजींचा आवाजही असाच दाणेदार आहे. त्यांना आणि अमिताभ बच्चन यांना प्रस्तुत लेखकानंच आवाजाच्या धूम्रसंस्काराविषयी विचारलं होतं. अमिताभचं उत्तर होतं : नाही… माझा आवाज नैसर्गिकच असा आहे. गुलजारजी फक्त हसले. ‘इजाजत’मधल्या ‘मेरा कुछ सामान’मधल्या ‘एकसो सोला चांदकी रातें’तल्या रात्री ‘एकसो सोला’च का, पंधरा वा सतरा का नाही, हे विचारल्यावरही ते असेच हसले होते. कवी असल्याचे अनेक फायदे असतात… 

यातले उत्तम कुमार, किशोर कुमार आणि संजीव कुमार हे लेखही असेच उत्कट आहेत. मुळात ही तीन माणसंच इतकी प्रतिभावान की त्यांच्या संबंधांचा हेवा वाटावा. किशोरकुमारचं वर्णन ते ‘वेडा प्रतिभावान’ असं करतात. ‘आनंद’मधल्या आनंदच्या भूमिकेसाठी आधी किशोर कुमार मुक्रर झाला होता. पण र्शूंटगच्या दिवशी हा गृहस्थ टक्कल करून आला आणि सेटभर नाचत-गात सुटला. शेवटी हृषीदांना ती भूमिका राजेश खन्नाला द्यावी लागली. एका निर्मात्याला किशोर कुमारच हवा होता. किशोर कुमार म्हणाले मी हे करीन, पण त्या निर्मात्यानं माझ्या घरी कुडता आणि अर्धी विजार अशा वेशात यायला हवंङ्घ! येताना तोंडात पान हवं आणि एका बाजूनं त्याचा लाल ओघळ पाझरताना दिसायला हवा. घरी आल्यावर तो एका टेबलावर उभा राहणार, मी दुसऱ्या. आणि उभं राहून आम्ही कराराची कागदपत्र देणार-घेणार.

हा आचरटपणा ऐकल्यावर बिमल रॉय त्याला म्हणाले: हा वेडपटपणा कशासाठी?

किशोर कुमार : या सर्व अटींचं पालन करत हा निर्माता आज माझ्या घरी आला आणि आम्ही तसाच करार केला. आता सांगा अधिक वेडा कोण? मी का तो निर्माता?

याच्याबरोबर द्वंद्वगीत गाताना लताबाईं नेहमीच तणावात असायच्या. किशोर त्याच्या ओळी गाऊन झाल्या की संगीतकारांशी टिवल्याबावल्या करायचे किंवा काही करून त्यांना हसवायचे. असं झालं की आपण चुकू याची भीती वाटायची लताबाईंना. आणि स्वत:ची पुढची ओळ हा गृहस्थ कशी घेईल याची परत काळजी. पण गाण्याचा क्षण आला की किशोरदा असा आवाज लावत की समोरच्यांच्या डोळ्यात पाणी येई.

हे वाचताना आपलेही डोळे ओले होतायत की काय, असं वाटू लागतं. अनेकांचे असे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. पण या सर्वांचे आपल्यावरचे उपकार इतके आहेत की आहेत ते कमी वाटतात आणि गुलजारजींनी आणखी लिहायला हवं होतं असं वाटत राहतं.

पण हेच या पुस्तकाचंही यश असावं. ‘आनंद’मध्ये आनंद म्हणतो… बाबु मोशाय…  जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही.

हे सत्य पुस्तकालाही लागू पडतं.

girish.kuber@expressindia.com       @girishkuber

Story img Loader