हृषीकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज समाजमाध्यमांतून किंवा भाजपविरोधी पक्षांच्या राजकीय व्यासपीठांवरून चर्चा होते ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘माफीपत्रां’ची. प्रत्यक्षात ही ‘हमीपत्रे’ अरविंद घोष यांच्या बंधूंसह अनेकांनी दिली होती आणि त्यात विशेष काही नाही, असे हे चरित्रपुस्तक साधार नमूद करते आणि सावरकरांच्या प्रवासाचा साद्यंत आढावा घेते..

भारताचा ७०वा प्रजासत्ताक दिन रविवारी साजरा होईल आणि आणखी दोन वर्षांनी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करू, मात्र अजूनही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून वाद सुरूच आहे. समर्थक-विरोधक असे दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जातात, माध्यमांनाही खाद्य मिळते. पण नेमकी कोणती बाजू बरोबर असा प्रश्नही लोकांना पडतो. त्या दृष्टीने वैभव पुरंदरे यांचे ‘सावरकर : द ट्र स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्व’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे. अत्यंत सोप्या आणि समर्पक शब्दांमध्ये त्यांनी मांडणी केली आहे. सावरकरांचा हिंदुत्ववादी मार्ग बरोबर आहे की चूक यावर भाष्य न करता, त्यांचा जीवनपट लेखकाने मांडला आहे. त्यामुळे वाचकांनीच काय ते ठरवावे, कोण बरोबर हे ताडावे असाच संदेश यातून मिळतो.

त्यामुळेच हिंदुत्वाचा सावरकरी विचार भले पटत नसेल, तरी हे पुस्तक वाचल्यावर सावरकरांबाबतचे अनेक गैरसमज दूर होतील. त्यादृष्टीने समकालीन व्यक्तींचे संदर्भ, त्या वेळच्या वृत्तपत्रांमधील बातम्या त्या त्या ठिकाणी आपल्या मताच्या पुष्टय़र्थ देऊन लेखकाने मांडणी केली आहे. काँग्रेसने १९२९ मध्ये ब्रिटिशांकडून पूर्ण स्वराज्याची मागणी केली त्यापूर्वी दोन दशके सावरकरांनी ही भूमिका घेतली होती. इतकी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. मात्र त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस गांधी हत्येच्या कटाचा आरोप झाला. अर्थात त्यातून ते सुटले. पण त्या आरोपामुळे सावरकरांनी स्थापलेली हिंदूमहासभा राजकीयदृष्टय़ा कमकुवत झाल्याचे दाखले लेखकाने दिले आहेत. सावरकर लंडनमध्ये (१९०६-११) असताना या काळात गांधीजींशी झालेली चर्चा, सुभाषचंद्र बोस यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट तसेच १९४०च्या सुरुवातीला पाकिस्तानचा मुद्दा पुढे आल्यानंतर मोहम्मद अली जीना यांनीही सावरकरांना गुप्तपणे भेटीसाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख लेखकाने केला आहे. राजकीय मतभिन्नता असतानाही यापैकी कुणीही सावरकरांवर ब्रिटिशधार्जिणेपणाचा आरोप केलेला नाही हे लेखक नमूद करतो.

मग आज समाजमाध्यमांतून वा राजकीय व्यासपीठांवरून ‘माफीवीर’ अशी सावरकरांची संभावना होते ती का? या पुस्तकात सावरकरांनी कारागृहात असताना ब्रिटिशांकडे केलेले अर्ज, त्या वेळची परिस्थिती आणि त्या मागचा विचार याचे विश्लेषण विविध प्रकरणांमध्ये केले आहे. २३ डिसेंबर १९१० मध्ये कथित देशद्रोही वक्तव्य केल्यावरून जन्मठेप म्हणजे २५ वर्षे, तर जॅक्सन खून प्रकरणात ३० जानेवारी १९११ रोजी जन्मठेप. एकंदर पन्नास वर्षे तुरुंगवास म्हणजे भारतीयांच्या त्या वेळच्या सरासरी आयुर्मानापेक्षाही ही शिक्षा जास्तच. त्यामुळे इतकी शिक्षा झालेली व्यक्ती जिवंत बाहेर येईल ही शक्यता कमीच. शिक्षेनंतरही त्यांची मनोवस्था, त्यातही अंदमानची कोठडी, तेथील हवामान, तुरुंग अधीक्षक बॅरीची छळवणूक, काही सहकारी कैद्यांनी केलेल्या आत्महत्या, कारागृहातील आंदोलन या साऱ्या वातावरणात एक तपाहून अधिक काळ राहताना पत्नी यमुना, वहिनी येसूबाई तसेच भिकाजी कामा यांच्याशी वर्षांतून एकदा होणारा पत्रव्यवहार हेच त्यांना आधार देत. मार्च १९१९ मध्ये त्यांचे डॉक्टर बंधू नारायण यांनी आपल्या दोन्ही भावांच्या (विनायक व बाबाराव) यांच्या सुटकेसाठी दिल्लीत प्रयत्न चालविले. १९१९ मध्ये पहिले महायुद्ध संपल्यानंतर राजकीय कैद्यांना माफी द्यावी असा प्रस्ताव दिल्लीतून मुंबई सरकारकडे आला होता. मात्र त्यात सावरकर बंधूंचा उल्लेख नव्हता. १९२० मध्ये नारायण सावरकर यांनी दिल्लीस्थित व्हाइसरॉय व अंदमानचे प्रशासकीय प्रमुख (कमिशनर) यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र त्यातही त्यांना यश आले नाही. ३० मार्च १९२० मध्ये सावरकर यांनी सातव्यांदा अर्ज दिला. आपण व आपले बंधू ठरावीक काळासाठी राजकारणापासून दूर राहू किंवा एखाद्या ठरावीक ठिकाणी वास्तव्य करू असे नमूद केले. सावरकर ठरावीक ठिकाणी वा राजकारणापासून का दूर राहू इच्छित होते? तर बरिंद्र घोष व बंगालमधील इतर राजकीय कैद्यांना त्या वर्षी माफी देण्यात आली होती. त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले होते. त्याचा जर भंग झाला तर पुन्हा सेल्युलर तुरुंगवारी अटळ होती. अर्थात अंदमानातील अनुभवांवरील आपल्या पुस्तकात (माझी जन्मठेप) सावरकर यांनी कारागृहातील काही सहकाऱ्यांनी असे हमीपत्र लिहिण्यास विरोध केल्याचा उल्लेख आहे, हे सांगून लेखकाने असेही नमूद केले आहे की, सावरकरांची त्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या मते भविष्यातील कार्याचे नियोजन तसेच राष्ट्रहित पाहता यात गैर नाही. त्यासाठी त्यांनी पौराणिक काळापासून पराक्रमी राजांपर्यंतचे दाखले दिले आहेत.

सप्टेंबर १९२२ मध्ये त्यांचे बंधू बाबाराव यांची बिनशर्त सुटका करण्यात आली. त्यानंतर सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. बॉम्बे क्रॉनिकलच्या वृत्तानुसार डिसेंबर १९२३ मध्ये काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात सावरकरांचा मुद्दा उपस्थित झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्य़ात पाच वर्षे वास्तव्य तसेच राजकारणात भाग न घेणे अशा इतर अटींवर ६ जानेवारी १९२४ रोजी सावरकरांची सुटका झाली. अंदमानला धाडल्यापासून जवळपास १३ वर्षे व लंडनमध्ये अटक झाल्यानंतर १४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. सावरकरांवर कारागृहात असताना माफीनामे दिल्याचा आरोप सातत्याने होत असतो. मात्र १९२०च्या दशकाच्या अखेरीस सुटकेसाठी अशी हमी देणारे ते एकटेच नव्हते तर त्यांचे समकालीन क्रांतिकारी बिरेंद्रकुमार घोष, अरविंदो घोष बंधू यांनीही असे अर्ज दिले होते. त्यामुळे ‘या सगळ्यांना हस्तक म्हणणार काय?’ असा सवाल लेखकाने उपस्थित केला आहे.

१९१० मध्ये सावकरांनी मार्सेली येथून बोटीतून उडी मारून सुटण्याचा जो प्रयत्न केला त्यानंतर राजनैतिक पातळीवर ब्रिटन व फ्रान्स यांच्यातील तणाव वाढला. याप्रसंगी सावरकर यांनी केलेले युक्तिवाद त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देणारे ठरले. जेथून सुटकेचा प्रयत्न झाला त्या हद्दीवर ब्रिटिशांची सत्ता नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे काही ब्रिटिश लोकांनीही या मुद्दय़ावर, सावरकर यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यात इंग्लंडचे तत्कालीन गृहसचिव विन्स्टन चर्चिल यांचाही समावेश होता.

सुरुवातीच्या काळात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते असलेले सावरकर कडवे हिंदुत्ववादी झाले. त्यांचा हा प्रवास त्या वेळच्या नियतकालिकांतील टिप्पण्यांचे तसेच इतिहासकारांचे दाखले देत लेखकाने विशद केला आहे. त्यामुळे यात कोणा एका व्यक्तीचा विचार येण्यापेक्षा अगदी ‘केसरी’पासून ते ‘भाला’ यांच्या वार्ताकनाचे दाखले लेखकाने दिले आहेत. काही वेळा एखादी घटना विशद करताना विषय थोडा लांबला आहे. उदा. पुण्यात परदेशी कपडय़ांची जी ऐतिहासिक होळी १९०५ मध्ये झाली त्यावर एक अख्खे प्रकरण आहे.

सुटकेनंतर रत्नागिरीत आल्यावर १९२४च्या मध्यात त्या वेळच्या विधिमंडळात डॉ. एम. बी. वेलकर यांनी सावरकर यांच्यावरील सर्व निर्बंध उठविण्याचा ठराव आणला होता. मात्र ठरावाविरुद्ध ५० तर बाजूने ३७ मते मिळून तो फेटाळण्यात आला. १९३७ मध्ये १३ वर्षांनंतर रत्नागिरीतून त्यांची सुटका करण्यात आली. रत्नागिरीतील वास्तव्यात सावरकरांनी सामाजिक काम उभे केले. याखेरीज आंबेडकरांशी विविध मुद्दय़ांवर त्यांचा पत्रव्यवहार होता. सनातन्यांनी सावरकरांना अनेकदा विरोध केला होता, हे लेखकाने नमूद केले आहे. १९२९ मध्ये विठोबा मंदिरातील कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा केलेला प्रयत्न, गायींबाबतची त्यांची मते, त्यातून निर्माण झालेला वाद, धर्मातर केलेल्यांची शुद्धीकरण मोहीम, खिलाफत नेते शौकत अली यांच्याशी झालेली शाब्दिक चकमक अशा बाबींतून सावरकर आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. ‘भाषा शुद्धि’ ही त्यांची पुस्तिकाही गाजली. या पुस्तिकेतून, मराठीतील अनेक नवे शब्द त्यांनी दिले. बालपणी येवला तसेच धुळ्यातील जातीय दंगे, त्यातून त्यांची तयार होणारी वैचारिक भूमिका, मित्रांच्या मदतीने संघटना बांधणीची त्या वयातील धडपड यापासून ते अगदी आयुष्याच्या शेवटी हिंदूमहासभेची स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकांतील वाटचाल या प्रवासाचे विश्लेषण नेमक्या शब्दांत आहे. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा का मिळाला, याची मीमांसाही आहे. हिंदूमहासभेत असताना श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच दिवंगत कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांचे वडील एन. सी. चटर्जी या निकटवर्तीयांशी सावरकरांचे काही मुद्दय़ांवर मतभेदही झाले. तीच बाब आचार्य अत्रे यांच्याबाबत आहे. खरे तर सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी अत्रे यांनीच बहाल केली. मात्र नंतर ते त्यांचे टीकाकार झाले. ‘स्वातंत्र्यवीर ते रिक्रूटवीर’ अशी टीका अत्रे यांनी केली, त्यातून अत्रे यांना ठिकठिकाणी जनक्षोभाला तोंड द्यावे लागल्याचे दाखले आहेत.

सावरकर यांच्या ८३ वर्षांच्या आयुष्यात ३० वर्षे कारागृहात गेली. त्यांच्या कारकीर्दीत वाद, चढ-उतार तर नित्याचेच होते. या साऱ्याचा धांडोळा पुरंदरे यांनी सरकारी दस्तऐवज तसेच अन्य मूळ कागदपत्रे तपासून घेतला आहे. त्यामुळे जरी त्यांच्या विचारांशी सहमत नसाल तरी, सावरकर समजावून घ्यायचे असतील तर त्या दृष्टीने हे पुस्तक उत्तम आहे.

‘सावरकर : द ट्र स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्व’

लेखक : वैभव पुरंदरे

प्रकाशक : जगरनॉट बुक्स

पृष्ठे: ३७६, किंमत : ५९९ रुपये