अभिजीत ताम्हणे
रझांबद्दल तटस्थपणे माहिती देणारं, तपशील पुरवणारं हे चरित्रपुस्तक व्यक्तिमत्त्वाचा प्रवास साधार सांगतं.
सय्यद हैदर रझा हे आणखी सहा वर्ष जगले असते तर येत्या मंगळवारी, २२ फेब्रुवारीला शंभरावा वाढदिवस साजरा केला असता त्यांनी. ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’च्या संस्थापकांपैकी एक म्हणून इतिहासात अमर झालेले आणि १९५० साली म्हणजे तो समूह विखुरण्यापूर्वीच शिष्यवृत्तीवर पॅरिसला जाऊन पुढे तिथंच राहिलेले, अगदी उतारवयात भारतात परतलेले आणि लिलावांत मोठय़ा बोली मिळवणारे, ज्यांची चित्रांची छापील रूपंही अत्यंत लोकप्रिय आहेत असे हे चित्रकार. पॅरिसला राहायचे, तेव्हाही दर फेब्रुवारीत (तिथं हिमकाळ, भारतात तुलनेनं छान वातावरण म्हणूनही) भारतातच वाढदिवस साजरा करायचे, २०१६ पूर्वीची अनेक वर्ष. कुठल्या ना कुठल्या कलादालनात त्याच सुमारास त्यांचं नवं चित्रप्रदर्शनही सुरू असायचंच या काळात. ‘रझा फाउंडेशन’च्या स्थापनेत पुढाकारासह अनेक प्रकारे रझांच्या स्मृती जपणाऱ्या दिल्लीच्या ‘वढेरा आर्ट गॅलरी’नं यंदाच्या या शताब्दीवर्षांत कोविड नियंत्रणं सांभाळून अनेक उपक्रमही केले. पण या शताब्दीनंतरही कायम राहावा असा रझा यांचा चरित्रसंदर्भ, यशोधरा दालमियालिखित ‘सय्यद हैदर रझा : द जर्नी ऑफ अॅन आयकॉनिक आर्टिस्ट’ या पुस्तकातून यापूर्वीच मिळालेला आहे. गेल्या फेब्रुवारीतच हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. रझांवर त्याहीआधी, म्हणजे दोन दशकांपूर्वी गीती सेन यांनी लिहिलेलं मोठय़ा आकाराचं पुस्तक आणि अशोक वाजपेयींचं पुस्तक ही महत्त्वाचे संदर्भ मानली जायची. पण गीती सेन यांचं पुस्तक ‘कॉफीटेबल’ स्वरूपाचं होतं आणि वाजपेयींचं ‘अंडरस्टँडिंग रझा’ हे पुस्तक तरी, रसग्रहणासारखं होतं. रझा कसे घडले, कसे जगले हे ज्यातून कळेल, असं चरित्रपुरस्तक दालमिया यांचंच. रझांच्या पत्रसंग्रहाचा भरपूर अभ्यास केल्यामुळे हे पुस्तक वैशिष्टय़पूर्ण झालं आहे. त्या काळच्या राम कुमार, अकबर पदमसी, सतीश गुजराल यांच्या मुलाखतींचे संदर्भही या पुस्तकात वारंवार येतात. अर्थात लेखिका चित्रकलेच्या अभ्यासक आहेत आणि १९४० ते १९६० या दशकातल्या चित्रांबद्दल त्यांना विशेष रस असल्याचं दिसून आलं आहे, त्यामुळे या पुस्तकात रझांच्या १९६० पर्यंतच्या काळाबद्दलचं कुतूहलही जाणवत राहातं. अडीचशे पानी पुस्तकाची दीडशे पानं उलटल्यानंतर १९७८ साल उजाडतं. तोवर रझांना त्यांच्या चित्रांतला तो अतिप्रसिद्ध ‘बिंदू’ सापडला नव्हता. रझांचं दैवतीकरण मध्य प्रदेशच्या चित्रकारांनी गेल्या तीस वर्षांत केलं, तेही अर्थातच सुरू झालेलं नव्हतं. १९७८ मध्ये रझांना मध्य प्रदेश कला परिषदेचा पुरस्कार मिळाला, फ्रेंच पत्नीसह मध्य प्रदेश आणि राजस्थानात ते भरपूर फिरले, दामोह या मूळ गावी जाऊन गहिवरले आणि भारतीयत्वाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला, हे पुस्तकातूनही कळतंच. पण पुस्तकातून जे रझा नव्यानं समजतात, ते त्याआधीचे पॅरिसमधले रझा. उदाहरणार्थ, १९५३-५४ मध्ये शिष्यवृत्तीचा काळ संपल्यावरही पॅरिसलाच राहिलेले रझा. त्यांनी ‘लोला मॉन्ते’ या एका चित्रपटातही काम केलं असा उल्लेख इथं येतो पण पोटापाण्याची खरी सोय झाली ती पुस्तकांची मुखपृष्ठं केल्यामुळे. एकाच पुस्तकाबद्दल त्यांनी मुंबईतल्या राजेश रावत या मित्राला, ‘हे पुस्तक करताना बरं वाटलं. नाही तर सारीच पुस्तकं वाचून आवडतात असं नाही. कधी तरी व्हिक्टर ह्यूगोच्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्याही आवृत्त्या हेच प्रकाशक काढतील आणि त्यासाठी मला काम करता येईल तर किती बरं’ असं लिहिलं आहे. वयाच्या तिशीतला, संघर्ष स्वीकारलेला चित्रकार इथं डोळय़ासमोर येतो. अर्थात अदबशीर, रुबाबदार व्यक्तिमत्त्वातून जनसंपर्क वाढवणं हे रझांनी त्याही काळात सुरूच ठेवलं असणार ते कसं, याचेही दाखले पुस्तकात आहेतच. त्या वेळी सीन नदीजवळ नुकतीच आर्ट गॅलरी उघडणाऱ्या लारा विंची यांनी रझा यांना अन्य युरोपीय चित्रकारांसह समूहप्रदर्शनात संधी दिली आणि ‘फक्त माझ्याच गॅलरीला चित्रं द्यायची, तर मी विक्री करेन’ असंही सांगितलं. रझांनी ही अट १९५५ ते ७१ पर्यंत पाळली. याहीपेक्षा बारीकबारीक तपशील हे पुस्तक पुरवत राहातं. म्हणजे कल्याणला रझा १९५० साली काही काळा कुटुंबासोबत राहिले होते ते कुठे, किंवा १९५२ मध्ये पॅरिसमध्ये घरांच्या किमती किती होत्या.. अशा तपशिलांमुळे कदाचित, चित्रकलेत फारसा रस नसणाऱ्यांनाही ते आवडेल. कारण रझांनी जगलेला काळ त्यातून उभा राहतो.
रझांबद्दल अत्यादरानं बोलणाऱ्या- लिहिणाऱ्यांचा एक पंथच १९९०/९५ नंतर दिसू लागला होता. त्या पंथातलं हे पुस्तक नव्हे, ही त्याची फारच मोठी जमेची बाजू. लेखिका तटस्थपणे टिपते. सर्व तपशील नोंदवते. तपशील कुठून मिळाले, हेही सांगते. त्यामुळे कुणी जुने लोक ‘हे असं नव्हतंच’ म्हणाले तरी फार काही बिघडणार नाही आणि माझे संदर्भ हे होते असं लेखिका म्हणू शकेल. याच लेखिका- यशोधरा दालमिया- यांनी गुंफण केलेल्या ‘द मॉडर्न्स’ या प्रदर्शनाबद्दल १९९७ मध्ये ‘लोकसत्ता’मधूनच साधार आक्षेप घेण्यात आले होते. प्रोग्रेसिव्ह ग्रुपची मोडतोडच दालमियांनी केल्याचं म्हणणं कलासंघटक, चित्रकार आणि संग्राहक सतीश नाईक यांनी वृत्तलेखांच्या मालिकेद्वारे मांडलं होतं. त्या आक्षेपांना या पुस्तकातून एक संभाव्य उत्तर मिळतं. ते असं की, प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे चित्रकार एकमेकांपासून दूरच गेले होते. तेव्हाच्या काळात सूझा आणि रझांसाठी अकबर पदमसी हे वैचारिकदृष्टय़ा अधिक जवळचे होते. रामकुमार तर रझांमुळेच चित्रं काढू लागले होते. हे तपशील आणि त्यांचा विस्तार रझांच्या चरित्रात शोभतोच. पण प्रोग्रेसिव्ह आणि इतर म्हणून रामकुमारही समाविष्ट करावेत का, हा वाद उरेल. हे पुस्तक फक्त रझांबद्दल आहे, एक चित्रकार मोठा होतो म्हणजे काय होतं याविषयीचं कुतूहल शमवणारं आहे.. आणि तरुण चित्रकारांना कदाचित, रझांचं वाचन कसं नेमकं आणि सकस होतं याचीही आठवण देणारं आहे!
abhijit.tamhane@expressindia.com