स्लावोय झिझेक या तत्त्वचिंतकाबद्दल आजच लिहिण्याची कारणं तीन आहेत. त्यापैकी दोन प्रमुख- तर एक अगदीच साधं. करोनाबद्दल झिझेक जे बोलतो/ लिहितो आहे, ते महत्त्वाचं आहे- कारण तो प्रामुख्यानं युरोपबद्दल बोलत असला तरी त्याचं म्हणणं जगभरच्या अनेकांना आपापल्या संदर्भात विचार करण्याची दिशा देणारं आहे (तशी दिशा देणं हे तत्त्वचिंतकाचं कामच असलं पाहिजे, ते झिझेक करतोय). पण झिझेकनं करोना-निमित्तानं केलेलं चिंतन काय, हे पाहण्याआधी ‘कोण झिझेक?’ या प्रश्नाचं उत्तर ज्यातून सापडू शकेल असं पहिलं प्रमुख कारण म्हणजे, झिझेकनं इंग्रजीत लिहिलेलं ४६वं पुस्तक येत्या २० एप्रिल रोजी येतं आहे. हेगेल, मार्क्‍स, लाकां (लाकान) या तत्त्वज्ञांचा आधार घेऊन आणि कित्येक समकालीन तत्त्वचिंतकांचे संदर्भ देत झिझेक आजच्या काळाबद्दल चिंतन करतो; पण ते अशा प्रकारे की, तुम्हाला जरी हेगेलच माहीत नसला तरी काही बिघडणार नाही! झिझेक जे म्हणतोय त्यातलं आज वैचारिकदृष्टय़ा उपयुक्त काय, हे समजेल! म्हणून इंग्रजीत लिहिलेली ४५ पुस्तकं, शिवाय २६ पुस्तकांमध्ये लेखकीय सहभाग किंवा संपादन, तर मूळचा स्लोव्हेनियन असल्यामुळे त्या मातृभाषेत लिहिलेली आणखी २७ पुस्तकं, अशी झिझेकची ग्रंथसंपदा आहे. नव्या पुस्तकाचं नाव आहे – ‘अ लेफ्ट दॅट डेअर्स टु स्पीक इट्स नेम’. ३४ प्रासंगिक लेखांचा हा संग्रह असला, तरी भ्रष्टाचाराच्याही गंभीर आरोपांनासुद्धा गुंडाळून ठेवणारे ‘सत्त्योत्तरी’ काळातले लोकशाही मुखवटय़ाचे हुकूमशहा (ट्रम्प त्यापैकी एक) हे न्यायालयीन खटला वा महाभियोग अशा जुन्या उपायांना धूपच घालणार नाहीत, त्याऐवजी या उजव्यांना डावं उत्तरच दिलं पाहिजे, अशी मांडणी त्या पुस्तकात आहे. म्हणजे झिझेक हे बर्नी सॅण्डर्सचे समर्थक आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि सॅण्डर्स यांनी डाव गमावणं, दोन्ही एकाच वेळी झालं; त्याच वेळी नेमकी झिझेककडे, आगामी पुस्तकाबद्दल मुलाखती मागणाऱ्या पत्रकारांचीही संख्या वाढली. त्यापैकी ‘स्पेक्टेटर’ या अमेरिकी नियतकालिकाशी झिझेक बोलला, त्यात ‘करोनाचा मुकाबला करण्यासाठी जगानं एकत्र येताना साम्यवादाची आंतरराष्ट्रीयता अंगी बाणवली पाहिजे.. स्वत:पुरतं पाहून आता चालणारच नाही..’ अशी वाक्यं होती. झालं! बाकीच्या अमेरिकी सनसनाटी पत्रांनी (यात हल्ली संकेतस्थळंही आली) लगेच ‘इथे करोना वाढतोय आणि झिझेकला हवाय कम्युनिझम’ अशा हेडलायनी दिल्या.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

एरवी ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘गार्डियन’ अशा वृत्तपत्रांत लिहिणाऱ्या झिझेकनं ‘आरटी.कॉम’ या सहा भाषांत उपलब्ध असणाऱ्या वाहिनीच्या संकेतस्थळावर १७०० शब्दांचा लेख लिहिला (भारतीय वेळेनुसार २० मार्चच्या पहाटे हा लेख प्रकाशित झाला आहे). ‘ट्रम्प यांनी जर्मनीच्या टय़ुबिन्गेन शहरातल्या ‘क्युअर व्हॅक’ या कंपनीला करोना विषाणू-रोधक लस तयार करण्यासाठी एक अब्ज डॉलरची ‘मदत’ देऊन अट घातली की, संभाव्य लशीचा वापर ‘फक्त अमेरिकेसाठीच’ व्हावा. यावर जर्मन आरोग्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केलीच आणि वर – ‘जी काही लस असेल ती जगासाठी असेल’ – हेही ठणकावलं’ या ताज्या (१७ मार्च) घडामोडीची माहिती देऊन झिझेक विचारतो की, हेच ट्रम्प अमेरिकेत खासगी कंपन्यांनी काय काय उत्पादन करावं ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देणारा ‘डिफेन्स प्रॉडक्शन अ‍ॅक्ट’ लागू करतात; जर्मन मंत्री त्यांच्या देशातली खासगी कंपनी जगासाठी उत्पादन करेल असं परस्पर म्हणतात, हे ‘उत्पादन-साधनांचं सरकारीकरण’ नाहीये का? साम्यवादाचं नाव का नाही घ्यायचं मग?

मात्र झिझेकचं प्रतिपादन या युक्तिवादच्याही पुढलं आहे. ‘व्यक्तिगत भीती, कौटुंबिक काळजी, यांना थाराच न देण्याएवढी अक्राळविक्राळ आपत्ती आज जगापुढे आहे. अशक्य ते घडलंय, त्याचा प्रतिकारसुद्धा आज अशक्य वाटणाऱ्या कोटीतला असायला हवा’, ‘रोग टाळण्याची जबाबदारी व्यक्तीवरच टाकून देतोय आपण, मात्र ज्यांना बाधा झाली आहे (ज्यांच्यापासून बाधा पसरणारही आहे) त्यांना आपण वाचवणार आहोत की नाही? ती जबाबदारी सामूहिक आहे की नाही?’, ‘वय ८०च्या पुढले लोक मरताहेत तर मरू दे हे म्हणणं, लष्करी नैतिकतेच्यासुद्धा विरुद्ध आहे’, हे सांगून झिझेक सुचवतो की, ‘आरोग्याच्या जागतिक काळजीची हमी’ देणारी नवी व्यवस्था या आपत्तीतून उदयाला यावी! महाआपत्तीनंतर व्यवस्थेनंही बदलायचं असतं, या ऐतिहासिक सत्याची आठवण तो देतो.

इथं पुन्हा आपण ‘डब्यात गेलेले’ अमेरिकी डेमोक्रॅटिक पक्षाचे स्वघोषित ‘डावे’, ‘समाजवादी’ उमेदवार बर्नी सॅण्डर्स यांची आठवण काढू या. झिझेक हा या सॅण्डर्सची पाठराखण करत होता. जणू सॅण्डर्स यांना उमेदवारी अधिकृतपणे मिळालीच, तर झिझेक यांचं ‘अ लेफ्ट दॅट डेअर्स टु स्पीक इट्स नेम’ हे सॅण्डर्स यांच्या नव-राजकारणाची नांदी वगैरे ठरणार होतं, पण सॅण्डर्स जवळपास हरलेत आणि ज्यो बिडेन यांनाच अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणार, हे उघड आहे. अशा वेळी झिझेकचा ताजा लेख करोना-संदर्भात साम्यवादी तत्त्वांचा पुनशरेध घेणारा आहे!

हे कदाचित आगामी पुस्तकालाही उपयोगी पडेल.. म्हणजे, आता ‘डाव्या तत्त्वांनी आपापल्या देशात जर वागताहात तर साम्यवादाचं नाव घ्यायला का कचरता?’ असा प्रश्न विचारणारा पहिला लेख (आरटी.कॉम या संकेतस्थळावरून आगामी पुस्तकात) असेल.. किंवा नसेलही! झिझेकचं ते नवं- ४६वं- पुस्तक कसं असेल ते असो.. आपल्यासाठी झिझेकचा लेख विचारप्रवर्तक आहे तो निराळ्या कारणासाठी.

भारतात डावे पक्ष वगैरे झोपलेच असं आपण समजतो. जे कुणी डावे उरलेत त्यांच्यासाठी ‘अर्बन नक्षल’ वगैरे शिक्के तयारच आहेत. अशा वेळी साध्या साध्या प्रसंगातही आपल्या शेजारची माणसं आपापल्या भाषेत ‘‘समाजच बदलला पाहिजे’’ असं अगदी मनापासून म्हणताहेत की नाही? इटली वा स्पेनमधल्या लोकांनी वाजवल्या तशा टाळ्या वाजवून समाज बदलण्याची सुरुवात करू या, असं नेते म्हणतात.. पण देशात ‘डावे’ म्हणून जे नेते उरले आहेत, त्यांच्यापैकी केरळचे मुख्यमंत्री राज्याच्या वाटय़ाचा पैसाही करोना-विषाणूबाधितांच्या काळजीकडे वळवतायत. सामूहिक जबाबदारी ओळखतायत.

झिझेक काही भारताचा विचार करणार नाही, पण त्यानं जगाचा विचार मात्र मांडलाय.. आणि हो, तिसरं बिनमहत्त्वाचं कारण- हा मजकूर वाचकांहाती पोहोचेल त्या दिवशीच (२१ मार्च) झिझेकचा वाढदिवस आहे.. ७० पूर्ण होतील त्याला. तरीही तो ‘अरेतुरे’च.. कारण त्यानं विचार तरुण ठेवले आहेत.. ‘आजचे’च ठेवले आहेत!