कादंबरीलेखनात नवे काही घडत नसल्याची तक्रार होत असतानाच कार्ल ओव्ह क्नाउसगार्डची ‘माय स्ट्रगल’ ही सहाखंडीय कादंबरी आली. आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून ती अनोखी ठरतेच, पण लेखकाच्या खासगी आयुष्याचे तपशील मांडता मांडता ती आधुनिक जगण्याचा अंत:स्तर उलगडत जाते. एकीकडे आधुनिक जगाने आणलेली सुखे तर दुसरीकडे स्व-स्वातंत्र्याचा संकोच हा पेच समोर दिसताना स्व-स्वातंत्र्याचा, किंबहुना जगण्याचाच नेमका अर्थ काय, याचा क्नाउसगार्डने घेतलेला शोध या कादंबरीला तत्त्वचिंतनात्मक स्वरूप प्राप्त करून देतो.. आभासी वास्तवात रमण्याच्या सद्यकाळात लेखकाच्या ‘स्व’शोधाचा प्रवास ठरलेल्या या महाकादंबरीचा आशय व साहित्यिक मूल्य सांगणारा हा लेख..
‘माय स्ट्रगल’चं ढोबळ स्वरूप, त्यातून उद्भवलेले वाद आणि ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ या विधेत ती कशी बसते, हे गेल्या लेखात पाहिलं होतं. कादंबरीचा घाट, आशय आणि तिचं साहित्यिक मूल्य यांविषयी पुढे –
इतरांविषयीचेच धक्कादायक किंवा खासगी तपशील पुस्तकात आहेत असं नाही; स्वत:विषयीचेही अनेक लज्जास्पद तपशील क्नाउसगार्ड कादंबरीत उघड करतो. पुरुषवर्चस्ववादी, स्त्रीलंपट, पण वश झालेल्या मुलींशी शीघ्रपतनाच्या समस्येमुळे संबंधही टिकवू न शकणारा क्नाउसगार्ड त्यात दिसतो. पोटच्या मुलांविषयीच्या आपल्या भावना अतीव कोमल आहेत हे सांगतानाच तो हेदेखील कबूल करतो, की पालक म्हणून त्यांच्या संगोपनाची जी जबाबदारी त्याला घ्यावी लागते तिचा त्याला कंटाळा येतो. लिखाणासाठी त्यामुळे वेळ मिळत नाही म्हणून तर त्याला आपल्या मुलांची चक्क चीडही येते. आधुनिक समाजातला बाप आणि पती म्हणून प्रसंगी त्याला इतकं कोमल वागावं लागतं, की आपलं पौरुष त्यामुळे धोक्यात येतंय; किंबहुना हे आपलं खच्चीकरणच आहे, इतके टोकाचे विचार त्याच्या मनात येतात. त्याचं प्रापंचिक जीवन त्याच्या वडिलांच्या जगण्याशी ताडून पाहिलं तर एक गुंतागुंतीचं कथन (ल्लं११ं३्र५ी) आणि अस्तित्वविषयक चिंतन उभं राहतं.
त्याचे वडील अतिशय बेजबाबदार बाप आणि पती होते. त्यातून ते एकाकी पडत गेले. ते पक्के दारूबाज होत जाताना क्नाउसगार्डनं पाहिलं. वडिलांविषयी त्याला आदर किंवा प्रेम वाटत नसे; त्याला त्यांची घृणा वाटे किंवा राग येई. तरीही, कादंबरीतला क्नाउसगार्ड वडिलांचाच कित्ता गिरवताना दिसतो. तरुण वयात तो दारूच्या आहारी जातो. नशेत त्याच्या हातून अनेक लज्जास्पद कृती घडतात. उदाहरणार्थ, एका मुलीपाशी तो प्रेमाची कबुली देतो, पण मुलगी त्याला झिडकारते असा एक प्रसंग आहे; मग दारूच्या धुंदीत तो बाटली फोडतो आणि आपल्या चेहऱ्यावर सपासप वार करून घेतो किंवा वडिलांच्या दहशतीमुळे त्याला आलेला न्यूनगंड अनेकदा जाणवतो. इतरांना खूश ठेवण्यासाठी तो सतत धडपडतो. आपल्याला साहित्यातलं काही कळत नाही किंवा आपल्याला लिहिताच येत नाही अशा न्यूनगंडामुळे तो सतत चिंताग्रस्त असतो. पुढे स्वत: पती आणि बाप झाल्यावर त्याच्या प्रवृत्ती आपल्या बापाप्रमाणेच असतात. क्नाउसगार्डला जर बापाची घृणा वाटत असेल, तर स्वत:चीही वाटायला हवी आणि तशी ती वाटतेदेखील. एकंदरीत, जे लिहायची शरम वाटते ते लपवलं तर मग आत्मचरित्रपर लिखाणात उघड केलेल्या गोष्टींना फारसा अर्थच राहत नाही, असं क्नाउसगार्डला वाटतं. तीच कदाचित त्याच्या लिखाणामागची प्रेरणा आहे.
मानसिक गोंधळांमुळे आणि अंगभूत आळसामुळे क्नाउसगार्डचं बरंचसं आयुष्य विशेष काही न घडता गेलं. त्यातल्या किरकोळ दैनंदिन तपशिलांची लांबलचक वर्णनं कादंबरीत आहेत. रोजचं जगणं क्नाउसगार्डला कंटाळवाणं आणि भकास वाटतं, पण त्यातून जगण्याचा अर्थ शोधण्याचाच त्याचा लढा आहे. त्यामुळे कादंबरीला एक तत्त्वचिंतनात्मक स्वरूप येतं. दिशाहीन जगताना क्नाउसगार्डच्या डोक्यात विचारचक्र सतत चालू असतं. घर, खोली, शाळा, गाव अशा जागांविषयीच्या बारीकसारीक तपशिलांमधून परिसर जिवंत करण्याचं कसब त्याच्यात आहे. व्यक्तिरेखांबाबतही असंच होतं. आजोबांच्या गावी गेल्यावर त्याच्या मनात आपले पूर्वज शेती कसे करत असतील, याविषयीचे विचार येतात; नकळत तो आपल्या श्रमजीवी पूर्वजांची तुलना स्वत:च्या आधुनिक बुद्धिजीवी बैठय़ा जीवनशैलीशी करू लागतो. एकदा त्याची बायको बाथरूममध्ये अडकते; बाथरूमचा दरवाजा फोडण्यासाठी कुणाला तरी बोलवावं लागतं; आपल्या किरकोळ शरीरयष्टीची त्याला तेव्हा जाणीव होते. मुलाला पाळणाघरात नेण्याच्या साध्या प्रसंगाचं निमित्त होतं आणि त्यातून त्याचं विचारचक्र गमतीशीररीत्या कुठच्या कुठे जातं – स्त्री-पुरुष समानतेमुळे पारंपरिक लिंगभूमिकांत (ॠील्लीि१ १’ी२) झालेले बदल; त्यामुळे पुरुषाला पत्कराव्या लागणाऱ्या कंटाळवाण्या सांसारिक जबाबदाऱ्या; याविषयी तक्रार केली तर लगेच पुरुषी मानसिकतेचा आरोप होणार म्हणून ते बोलून दाखवण्याची चोरी; अशा कामांत वेळ गेल्यामुळे लिखाण थंडावणं; या सगळ्यातून होणारी चिडचिड, येणारा हताशपणा आणि अखेर ‘आधुनिक जगण्यात ऐहिक सुख आहे; समता आहे; पण माणूस खरंच स्वतंत्र आहे का?’ असा अस्तित्ववादी प्रश्न – क्नाउसगार्डचा एक फेरफटका वाचकाला इतक्या ठिकाणी फिरवून आणतो.
आपलं आयुष्य आणि मनातले विचार कादंबरीत अशा प्रकारे मांडल्यामुळे क्नाउसगार्डला नवे आरोप झेलावे लागले. एकोणिसाव्या शतकापर्यंत, म्हणजे आधुनिकता येण्याआधी गोऱ्या मध्यमवर्गीय (बुज्र्वा) पुरुषाला एक विशेषाधिकाराचं स्थान उपभोगता येई. हे अधिष्ठान अर्थात वर्गभेद, वर्णभेद, पुरुषवर्चस्ववाद आणि वसाहतवाद यांसारख्या सामाजिक विषमता जोपासणाऱ्या गोष्टींमुळे त्याला मिळालं होतं. मनातले विचार कादंबरीतून मांडणारा क्नाउसगार्ड त्यामुळे काही पोथिनिष्ठ पुरोगामींसाठी प्रतिगामी ठरला. नीट पाहिलं तर मात्र ते तसं नाही; कारण समाजानं आखलेली नैतिक चौकट एक ‘आपण’पण किंवा गट-अस्तित्व व्यक्तीवर लादू पाहते आणि संवेदनशील व्यक्ती त्या ‘आपण’पणातून ‘मी’ शोधू पाहते, असा लढा पुस्तकात आहे.
आजूबाजूच्या धकाधकीत शांत आयुष्य जगू पाहणारा रोमँटिक माणूस त्यामुळे कादंबरीत उभा राहतो. खरं स्वातंत्र्य शोधताना साहित्यकृती, चित्रं, संगीत, तत्त्वज्ञान, संस्कृती, स्मृती-विस्मृती अशा अनेक विषयांबद्दलचं मुक्तचिंतन हे कादंबरीचं वैशिष्टय़ त्या रोमँटिकपणाशी सुसंगत आहे. दोस्तोयेव्हस्की आणि रेम्ब्रांसारख्यांच्या अभिजात कलाकृतींपासून समकालीन लोकप्रिय संगीतापर्यंत कित्येक विषय त्यात येतात. कादंबरीत हे तुकडय़ांत जरी येत असलं तरी त्यातून आताच्या समाजाविषयीचं एक चित्र उभं राहतं. नॉर्वे-स्वीडनसारखे (रूंल्ल्िरल्लं५्रंल्ल) देश मानवी विकासाच्या बाबतीत इतर पाश्चात्त्य देशांच्याही पुढे आहेत. कल्याणकारी राज्यव्यवस्थेनुसार सामान्य माणसाचं आयुष्य सुखाचं झालेलं आहे. धर्माचा पगडा फारसा नाही. स्त्रिया पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडून स्वतंत्र जगतात. समतेची आणि इतरांचा आदर करण्याची शिकवण लहानपणापासून मुलांना दिली जाते. त्यानुसार सभ्यतेचे निकष पाळत नागरिक जगतात. असं सगळं असूनही समाधान मात्र माणसाला हुलकावण्या देत राहतं का? आपण नक्की कसे आहोत? आपली ओळख काय आहे? सत्य म्हणजे काय? सुखी समाजात जगतानाही हे मूलभूत प्रश्न काही लेखकाचा पिच्छा सोडत नाहीत. हळूहळू एक दिशा मात्र खुली होताना दिसते. आपल्या लिखाणातूनच स्वातंत्र्य आणि आपल्यापुरता जगण्याचा अर्थ सापडेल, अशा आशावादापर्यंत पाचव्या खंडाच्या अखेरचा विशीतला क्नाउसगार्ड पोहोचताना दिसतो. अर्थात, कादंबरीची रचनाच अशी आहे, की त्याआधी (दुसऱ्या खंडातच) प्रथितयश लेखक झालेला आणि तरीही श्रेयस न गवसलेला लेखक आपण पाहिलेला असतो. त्यामुळे एकविसाव्या शतकात कोणताही रोमँटिक आशावाद टिकाऊ नसतो याची जाणीव क्नाउसगार्ड करून देतो.
हे लिखाण वास्तववादी आहे, कारण रोजच्या जगण्यातले बारीकसारीक तपशील त्यात बारकाव्यांसह आहेत. हा वास्तववाद गोष्ट सांगणारा मात्र नाही. डिकन्ससारख्या लेखकांच्या कथाप्रधान कादंबरीत वर्णनं येतात, पण इथे जवळपास सबंध कादंबरीच वर्णनांची आहे. ‘माझं विश्व प्रतिमांचं आहे, शब्दांचं नव्हे’ असं क्नाउसगार्ड मुलाखतींत सांगतो. त्याच्या गतस्मृतींमध्ये प्रतिमा, ध्वनी, गंध अशा संवेदना आहेत, पण एखाद्या प्रसंगात लोक काय बोलत होते ते त्याला नीट आठवत नाही. शिवाय, स्मृती वास्तवाशी मिळत्याजुळत्या असतीलच असं नाही; घटनांविषयी किंवा स्थळांविषयी त्याच्या मनावर उमटलेला ठसा त्यात आहे. कादंबरीचं लिखाण चालू असताना रोज २० पानं लिहायची असा त्याचा प्रघात होता. आठवे तसं तो लिहीत जाई. आशयानुसार विशिष्ट शैली हेतुपुरस्सर वापरणं, झिजलेले शब्दप्रयोग किंवा पुनरुक्ती टाळणं वगैरे सल्ले व्यावसायिक लेखकांना दिले जातात; पण शैलीविषयक तांत्रिक गोष्टी आणि लिखाणाविषयीचे व्यावसायिक संकेत क्नाउसगार्ड पाळत नाही. खरं तर, नॉर्वेमधल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात साहित्यिक लिखाणाचं प्रशिक्षण क्नाउसगार्डनं घेतलेलं आहे. जगभरातलं आणि विविध कालखंडांतलं उत्तमोत्तम साहित्य त्यानं वाचलेलं आहे. त्यामुळे लिखाणाचं तंत्र त्याला अवगत आहे. म्हणजे, त्याकडे त्यानं हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं आहे.
अशा वैशिष्टय़ांमुळे क्नाउसगार्डच्या कादंबरीचा एक पूर्वसुरी स्पष्ट जाणवतो. फ्रेंच लेखक मार्सेल प्रूस्तची ‘इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम’ ही बहुखंडीय आत्मचरित्रात्मक कादंबरी सुमारे १०० वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. मार्सेल हे त्यातलं प्रमुख पात्र लहानपणापासून लेखक होईपर्यंतची आपली गोष्ट सांगतं. घटनांपेक्षा निवेदकाच्या मनोव्यापारांवर आणि संवेदनांवर भर देणाऱ्या आणि काळात पुढेमागे जाणाऱ्या या कादंबरीनं तेव्हा क्रांती केली होती. दोन्ही कादंबऱ्यांत उघड साम्यस्थळं आहेत. आपण प्रूस्त कोळून प्यायल्याचं कादंबरीतला क्नाउसगार्ड कबूल करतो. मात्र, दोन्ही साहित्यकृतींत फरकही आहेत. विसाव्या शतकाच्या, म्हणजे आधुनिकतेच्या उंबरठय़ावर जगलेल्या प्रूस्तविषयी रोमँटिक क्नाउसगार्डला आत्मीयता वाटते हे उघड आहे. त्याचा प्रयत्न मात्र त्याला एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावरचा प्रूस्त ठरवतो. प्रूस्तच्या कादंबरीतलं प्रत्येक वाक्य कोरीव आणि शैलीदार आहे. क्नाउसगार्डची भाषा त्याउलट आहे. प्रूस्तनं आपलं जगणं आणि निर्मिती कसे एकमेकांत गुंफले गेले आहेत ते सांगितलं होतं. म्हणजे त्याची कादंबरीच आपली निर्मितिप्रक्रिया उलगडून दाखवते. वडिलांविषयी लिहायला सुरू करून अखेर आपलं अख्खं आयुष्य व्यापून टाकणारी कादंबरी क्नाउसगार्डनंही लिहिली. सर्जनशील व्यक्तीची जडणघडण त्यात दिसते; पण आपण वाचतो आहोत त्या कादंबरीची निर्मितिप्रक्रिया इथे उलगडत मात्र नाही. अर्थात, संवेदनशील माणसाचं लेखकात रूपांतर होतानाचा प्रवास हा दोघांमधला सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, क्नाउसगार्डचा निवेदक दोस्तोयेव्हस्कीच्या आत्मत्रस्त रोमँटिक नायकाशीही नातं सांगतो.
प्रूस्तपेक्षा क्नाउसगार्ड कसा वेगळा ठरतो आणि त्याच्या रोमँटिक प्रतिगामित्वाचा मुद्दाही का बाजूला पडतो, ते समजून येण्यासाठी मात्र क्नाउसगार्डचं हिटलरबद्दलचं आणि त्याच्या ‘माइन काम्फ’बद्दलचं मत लक्षात घ्यायला हवं.
हिटलरला झालेल्या तुरुंगवासादरम्यान सुमारे वर्षभर तो इतरांपासून तुटला होता. त्या काळात त्यानं वाचन केलं आणि ‘माइन काम्फ’ लिहिलं. या एकांतवासातून बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा कधीच कुणापाशी आपला खरा ‘स्व’ उघड केला नाही. क्नाउसगार्डच्या मते, जड विश्वाशी आपलं नातं कसं असतं त्यावर खूप काही अवलंबून असतं. जगाच्या नजरेत माथेफिरू किंवा संतुलन ढळलेले अनेक लोक असे स्वत:ला बंद करून घेतात. त्यांचं मन सभोवतालच्या जड वास्तवावर एक अमूर्त आवरण घालतं. त्यातून हिटलरसारख्यांचा उदय होतो, असं क्नाउसगार्ड मानतो. कोणताही आदर्शवाद टोकापर्यंत नेला तर सिद्धांताची अमूर्तता वास्तवाशी नातं तोडते. उदा. हिटलरनं जर्मनांशी आणि ज्यू वंशीयांशी सकस नाती जोडली असती, तर ‘जर्मन आर्यवंश सर्वश्रेष्ठ आहे आणि कनिष्ठ दर्जाचे ज्यू वंशी त्याचे शत्रू आहेत’ या अमूर्त सिद्धांताचा व्यर्थपणा कदाचित त्याला उमजला असता. जड विश्वाशी नातं तुटण्याचा धोका क्नाउसगार्डला प्रत्यक्ष अनुभवातून कळला. एके काळी तो दारूच्या आहारी गेला होता. दिवसभर व्हिडीओ गेम्स खेळत तो आपल्या खोलीत बसून राही. नैराश्याच्या भरात त्यानं अनेकदा आत्महत्येचा विचार केला. आता त्याला याची शरम वाटते. त्यातून बाहेर येण्यासाठीच त्याला आपल्या अनुभवांविषयी लिहावंसं वाटलं, कारण जड विश्वाशी सकस नातं प्रस्थापित करणं त्याच्या संतुलनासाठी गरजेचं होतं. आधुनिक माणसाचं स्वातंत्र्य या नात्याच्या सघनतेशी निगडित असतं असंही त्याला जाणवलं. त्यामुळे जड विश्वाविषयी तपशिलात लिहिणं हा त्याच्या संतुलित आणि स्वतंत्र अस्तित्वाकडचा प्रवास होता. स्वयंपाक करणं, सुपरमार्केटमध्ये खरेदी करणं, मुलांची शी-शू साफ करणं अशा अनेक प्रसंगांची तपशीलवार वर्णनं पुस्तकात आहेत. या जड विश्वाशी झगडता झगडता त्याच्याशी एक तलम आणि काव्यात्म नातं प्रस्थापित करण्यात तो यशस्वी झाला आहे. जड विश्व अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आणणं हा सखोल तत्त्वचिंतनासाठी उत्तम उपाय आहे असा अनुभव पुस्तक वाचताना येतो. बाह्य़ जगासाठी तुम्ही स्वत:ला जितके खुले करता तितका तुमच्या आतला ‘स्व’ सघन होतो, असा वरवर पाहता विरोधाभासी प्रत्यय क्नाउसगार्ड वाचकाला देतो. अनेकांच्या मते कादंबरी या साहित्य प्रकारात हे क्रांतिकारक होतं. आभासी वास्तवातच रमण्याच्या, समाजमाध्यमांतून आपल्या ‘स्व’ला कुरवाळत राहण्याच्या आणि जगाशी आभासी नातं प्रस्थापित करण्याच्या ‘पोस्ट-ट्रथ’ काळात तर हे विशेषच महत्त्वाचं आहे.
महाकादंबरीला साजेसा मोठा पट उभारण्यात क्नाउसगार्ड यशस्वी झाला आहे. त्याचा घाट गोष्ट सांगण्याचे रूढ संकेत पाळत नाही. संकेत मोडणाऱ्या पूर्वसुरींशी नातं सांगत सांगत क्नाउसगार्ड नवं आणि समकालीन काही तरी घडवतो. इतकी मोठी कादंबरी लिहिण्यासाठी त्यानं आपल्या आयुष्यातला एक मोठा कालखंड झपाटल्यासारखा घालवला. रोजच्या जगण्यातून थोडी सवड काढून त्याचा हा लढा वाचला, तरीही वाचकाला जगण्यातल्या मोठय़ा प्रश्नांची उत्तरं मात्र सापडणार नाहीत, कारण उत्तरं सापडण्याचा हा काळच नाही आणि तरीही उत्तरं शोधण्याचा एका संवेदनशील माणसाचा हा प्रवास कदाचित वाचणाऱ्याला समृद्ध करून जाईल. तेच त्याचं यश आहे.
(उत्तरार्ध)

अभिजीत रणदिवे
rabhijeet@gmail.com