काश्मिरात सैन्याला विशेष अधिकार मिळाले, त्यानंतर दर वेळी सैन्याने भलेच केले असे नव्हे. सैनिकी खाक्यामुळे काही संसार उद्ध्वस्तही झाले, हे सांगणारी ही कादंबरी.. त्यातली नायिका- हालीमा- काश्मीरविषयीचे अनेक प्रश्न उभे करते..
‘हाफ मदर’ ही शहानाज बशीर याची कादंबरी. ती काश्मीरच्या ज्या नातीपोरा या भागात घडते, त्या भागातच शहानाज लहानाचे मोठे झाले. त्यामुळे कादंबरीला सत्य घटनांचा आधार आहे. काश्मीरच्या अंतर्गत परिस्थितीविषयी वाचताना नेहमीच मन अस्वस्थ होते. शांतता प्रस्थापित करायला मुंबईत सन्याला काही वेळा बोलवायला लागले होते, पण तेव्हा सन्य जनतेचे मित्र असल्याची भावनाच लोकांकडून व्यक्त झाली होती. काश्मीरविषयी वाचताना मात्र नेहमीच, सन्य लोकांचे वैरी असल्याची भावना प्रबळ होते. काश्मीरमध्ये फुटीरतेची चळवळ प्रबळ होती हे कबूल! तशी ती पंजाबमध्येही होती. दोन्ही चळवळी पाकिस्तानपुरस्कृत होत्या, तसेच फाळणीपासूनच दोन्ही प्रांतांत काही अनुत्तरित प्रश्न होते.

तेव्हापासूनच प्रश्न सोडवण्याऐवजी, त्याकडे फक्त दुर्लक्ष करण्यात आले. अर्थात या प्रश्नांची चर्चा करण्याचे हे स्थान नाही, पण कादंबरी वाचताना हे प्रश्न सतत आपल्या पुढे येत असतात. आपल्याला हे नेहमी जाचत असते की, ‘काश्मिरी लोक बोलताना नेहमी भारतात गेलो होतो,’ असे म्हणतात. त्यांना भारत आपला वाटत नाही. सत्य हे आहे की, पंडितही इतके दिवस असेच म्हणायचे. कादंबरी वाचताना प्रश्न हा पडतो की, आपण तरी काश्मिरींना आपल्यापकी एक मानायचो का? मानत असू तर सन्याला तिथे पाठवताना आपली ही भूमिका समजावून सांगितली होती का? कारण फक्त ही कादंबरी नाही, पण काश्मिरींनी लिहिलेले काहीही वाचले, तरी वाटते की, सन्य आपल्या माणसांशी वागते तसे नाही, तर परक्यांशी वागावे तसे काश्मिरी लोकांशी वागले आहे. हडेलहप्पी, क्रूरता, बेदरकारी सर्व काही. मणिपूर, नागालॅण्ड इथेही हे असेच वागले असतील? असे असेल तर, खऱ्या अर्थाने तिथे शांतता प्रस्थापित करणे किती अवघड आहे. सन्याला कुठेही पाठवण्यापूर्वी, तिथे जाऊन आपल्याला नक्की काय करायचे आहे याची जाणीव, सन्याला तिथे धाडण्याचा निर्णय घेणाऱ्या राजकीय नेतृत्वाला असायला हवी. याची समज ना राजकीय नेतृत्वाला आहे ना नेतृत्वावर टीका करणाऱ्या टीकाकारांना आहे असे वाटते.
कुठल्याही समाजात अशांतता माजवणारे संख्येने कमीच असतात, परंतु समाजातील मोठय़ा वर्गाला जर असे वाटायला लागले की, या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यां वर्गाला आपल्या कष्टाची पर्वा नाही. त्यापेक्षा निराळाच पर्याय आपल्याला न्याय मिळवून देईल; तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. सन्याला अनुभव नव्हता, नकळत त्यांच्या चुका झाल्या, ही कारणे मान्य करूनही, हे मानावेच लागेल की, राज्यकर्त्यां नेतृत्वाच्या चुका देशाला व काश्मिरी जनतेला फार महागात पडल्या.. हेच दाखवून देणारी ही गोष्ट एका सामान्य काश्मिरी स्त्रीची, हालीमा हिची आहे. आई-वडिलांची एकुलती एक लाडकी हालीमा, आई लवकर वारल्याने शिक्षण सोडून घराची जबाबदारी उचलते. आजही श्रीनगरला वरकामाला कुणी मिळत नाही. त्यामुळे केर-पोत्यापासून सर्व घरकाम बाईलाच करावे लागते. गरीब नसूनही हालीमाला शिक्षण पुढे चालू ठेवणे अशक्य होते. वडील नोकरी व निवृत्त झाल्यावर छोटेसे दुकान चालवत असतात.
आलुबुखाऱ्याची बाग, काही दुभती जनावरे यांत त्यांचे दिवस मेहनत करत पण समाधानात जात असतात. हालीमा तरुण होताच तिच्यासाठी एक तरुण व रुबाबदार घरजावई शोधला जातो. त्याचे मन मात्र ती आपलेसे करून घेऊ शकत नाही. आत्मसन्मान जपणारी हालीमा, त्याच्यावर प्रेम असून, त्याच्या मागणीनुसार त्याला मुक्त करते. तो गेल्यावर तिला कळते की, काही दिवसांचा त्याचा सहवास तिला आई बनवणार आहे. तिचे पुढील जीवन मुलगा इरफान व वडील यांच्या संगतीत समाधानाने जात असते. मुलगा दहावीला येतो आणि काश्मीरच्या खोऱ्यात ‘स्वातंत्र्यवादी’ उद्रेकाला सुरुवात होते. त्यांचे घर श्रीनगरच्या एका खेडेवजा उपनगरात असते. वडील सन्याच्या दडपशाहीला विरोध करतात व म्हणून मारले जातात. काही दिवसांनी मुलगा इरफान उचलला जातो. का? कशासाठी? त्याला कुठे ठेवले आहे? याची उत्तरे शोधण्यासाठी हालीमाने केलेली धडपड म्हणजे ही कादंबरी.
या प्रवासात हालीमाला अनेक बरे-वाईट अनुभव येतात. काश्मीरच्या पोलिसांची माणुसकी, त्यांची हतबलता जशी दिसते तशीच जनतेला मदत करण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांची चैनी-छंदी राहणीमान, खोटी सहानुभूती हेही लेखक उघड करतो. कहाणीच्या ओघात आपल्याला कळते की, सन्याच्या जुलमामुळे पकडला गेलेला एक दहशतवादी आपले जुलूम टाळण्यासाठी इमरान भटऐवजी इम्रान जूचे नाव सांगतो. लेफ्टनंट अमन कुशवाहा मेजर होण्याच्या व मेडल मिळण्याच्या लालचीने निर्दोष इमरान जूला पकडतो.
कादंबरीच्या शेवटी आपल्याला कळते की, मेजर कुशवाहा सरहद्दीवरील चकमकीत मारले गेले आहेत. या बातमीमुळे हालीमा निराश होते, कारण इम्रानचे काय झाले हे सांगणारा दुवाच नष्ट झाला होता. या प्रवासादरम्यान नकळत, पण गरजेपोटी ती ‘हरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंब संघा’ची स्थापना करण्यात पुढाकार घेते. त्या वेळी ज्यांचे नवरे हरवले आहेत, त्या बायकांना ‘हाफ विडो’ म्हणवून नोंदवले जात असताना, उत्स्फूर्तपणे ती स्वत:च्या नावापुढे ‘हाफ मदर’ असे नोंदवते. फारशी घराबाहेरही न गेलेली ही स्त्री मुलाच्या शोधात सर्वदूर पोचते. या संघाची अध्यक्ष होते व भाषणे करणे, निदर्शने करणे, प्रसारमाध्यमांशी बोलणे व कधी कधी लाठय़ा खाणे यांत तरबेज होते.
लेखक पोटतिडिकेने लिहितो व आपल्या मनात अशा वातावरणात लहानाच्या मोठय़ा झालेल्या पिढीची मानसिकता कशी असेल याच्या चिंतेची पेरणीदेखील करतो. एका काश्मिरी प्राध्यापकाने सांगितलेले एक सत्य की, ‘पूर्वी काश्मिरी तरुण खोऱ्याच्या बाहेरच पडायला तयार नसत, पण इन्सर्जन्सीमुळे शिक्षणासाठी ते भारतात गेले. तिथे गेल्यामुळे भारताशी त्यांचे भावबंध निर्माण होण्यास मदत झाली.’ यामुळे थोडी आशा वाटते; तरीही या विधानाला छेद देणारे अनुभवही दुसऱ्या एका पुस्तकात (stories of occupation and resistance) आले आहेत तेही विसरता येत नाहीत. सतत सनिकांनी घेरलेल्या वातावरणात व अत्याचार बघत मोठे झाल्याने, मानसावर झालेल्या परिणामामुळे असेल, असे वाटते. सांप्रतकाळी सन्याचा ‘ख्मौफ’ वाटत नाही, असेही काश्मिरी सांगतात. असे असेल तर बरेच आहे. तरीही आपण आपल्या प्रांतात शिक्षणासाठी आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना आश्वस्त करण्याची निकड या कादंबरीमुळे जाणवली.
कादंबरीची भाषा ओघवती व उत्तम आहे. वातावरणनिर्मितीसाठी काश्मिरी भाषेचा मुक्तपणे वापर केला आहे, तो कधी कधी अडचणीचा ठरू शकतो, कारण आपण काश्मिरी भाषेशी फारसे परिचित नसतो. त्यासाठी या शब्दांचे अर्थ शेवटी दिले असते तर चांगले झाले असते.
vasantidamle@hotmail.com
* हाफ मदर
लेखक : शहानाज बशीर
प्रकाशक : हॅचेट बुक पब्लििशग प्रा. लि.
पृष्ठे : १८२, किंमत : २९५ रुपये

Story img Loader