अनुप, बिहारसारख्या मागास राज्यातल्या एका दुर्गम गावात राहणारा मुलगा. या गावाला नक्षलवाद्यांचे ग्रहण लागलेले. अशा गावात अनुपच्या कुटुंबाला रोजच्या दोन वेळच्या जेवणाची चणचण ही रोजचीच. आठ वर्षांचा असताना अनुप भुकेने अगदी व्याकूळ झाला होता. त्याची ती अवस्था पाहून त्याच्या आईने अनुपच्या वडिलांना थोडे तांदूळ मिळाले तर पाहा, म्हणून सांगितले. तांदूळ आणायला गेलेले वडील परतलेच नाहीत. खूप शोधाशोध केली, पण त्यांचा पत्ता काही लागू शकला नाही. कोणी म्हणे त्यांना नक्षलवाद्यांनी पकडून नेले. अनुपला त्याचे वडील काही मिळाले नाहीतच. अनुप मोठा झाला तो सुडाची भावना घेऊनच. त्याची आई मात्र जाणत होती की, या सगळ्यावर मात करण्यासाठी मोठे शस्त्र म्हणजे शिक्षण. तिने अनुपला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. अनेकदा उपाशीपोटी राहून अनुप दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला खरा, पण पुढे काय?
असे अनेक अनुप बिहारच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांत आहेत. या मुली आणि मुलांजवळ गुणवत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे, शिकण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारीही आहे; मात्र चांगले मार्गदर्शन आणि शिक्षणापुरती आर्थिक मदत यांचा अभावच आहे.
असाच काहीसा अनुभव आनंद कुमार यांनी आपल्या महाविद्यालयीन काळात घेतला होता. अशा मुलांसाठी काही तरी करायचे हीच तळमळ त्यांना स्वस्थ बसवत नव्हती. त्यातूनच साकारला गेलेला प्रकल्प म्हणजे – ‘सुपर ३०’. त्याची यशोगाथा आता पुस्तकरूपाने आली आहे. कॉपरेरेट प्रसिद्धीच्या काळात अशी अनेक पुस्तके ‘ब्रँडिंग’साठी येतात आणि जातात, पण ‘सुपर ३०’मागे ग्रामीण गुणवत्तेच्या संघर्षांची कहाणी असल्याने ते निश्चितच वेगळे आहे.
आनंद कुमार, हा पाटणा शहरात राहणारा तरुण. खूप हलाखीच्या स्थितीत वाढलेला नसला तरी गरिबी होतीच. शिक्षणात हुशार, गणित हा आवडता विषय. त्यात वडिलांची शिकवण ही की, ‘जे आवडेल तेच शीक, मात्र जे शिकशील त्यात मनापासून रस घे.’ त्यामुळे त्याच्याबरोबर उत्तीर्ण झालेले आणि त्याच्यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थीही इंजिनीअरिंगकडे वळले तेव्हा तो मात्र गणिताकडे वळला होता. महाविद्यालयात असताना गणिताचे वेगवेगळे प्रॉब्लेम विविध पद्धतींनी सोडवणारा आणि गणिताविषयी अनेक समस्या विचारणारा हा तरुण त्याच्या प्राध्यापकांचा आवडता विद्यार्थी होता. महाविद्यालयीन काळातच त्याने गणितासंदर्भात अनेक संशोधनात्मक पेपर लिहून परदेशातल्या विद्यापीठांना पाठवले होते. त्यातूनच त्याला केंब्रिज विद्यापीठातून पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. मात्र त्यासाठी आवश्यक असणारा निधी मात्र आनंद यांच्याकडे नव्हता. बिहारसारख्या राज्यात निधीचे पैसे गोळा करणे आनंद कुमार यांना जीवनभराचे अनुभव देऊन गेले. संधी हुकली याने निराश व्हायलाही आनंद कुमार यांना वेळ मिळाला नाही, कारण त्यांचे खरे पाठबळ असणाऱ्या त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यामुळे घरची जबाबदारी आनंद यांच्यावर येऊन पडली.
पोस्ट खात्यात काम करत असलेल्या वडिलांच्या जागी सरकारी नियमांप्रमाणे आनंद कुमार यांना नोकरी देऊ करण्यात आली. मात्र, आनंद कुमार यांचे लक्ष्य काही वेगळेच होते. त्यांना गणितातच किंवा गणिताशी निगडित काही तरी करायचे होते. त्यांनी ती नोकरी नाकारली. उदरनिर्वाहासाठी काही तरी करणे गरजेचे असल्याने जवळपासच्या मुलांसाठी गणिताचे क्लास त्यांनी सुरू केले. त्यांच्या क्लासचे वैशिष्टय़ असे की, ज्याला जमेल तेवढे आणि जमेल तेव्हा फी द्यायची. पण यातून रोजीरोटी सुटणे कठीणच होते. म्हणून मग आनंद कुमार आईने बनवलेले पापड घेऊन सायकलवर विकायला जात असत.
याच काळात अभिषेक नावाचा विद्यार्थी त्यांच्याकडे आला. त्याला त्यांच्याकडून आयआयटीसाठी मार्गदर्शन हवे होते. त्यासाठी त्यांच्या फीचे पैसे त्याच्याकडे नव्हते, पण कष्ट करण्याची तयारी होती आणि जेव्हा केव्हा पैसे असतील तेव्हा देण्याची तयारी. आनंद कुमार त्याला शिकवायला तयार होते, मात्र तो राहणार कुठे अशी चौकशी केली असता तो चाळीच्या जिन्याखाली राहत असल्याचे समजले. त्यांनी त्याला आपल्याच घरी राहून शिकावे असे सुचवले. त्यातूनच त्यांच्या ‘सुपर ३०’ योजनेचा प्रारंभ झाला.
अभिषेकच्या उदाहरणावरून त्यांनी अत्यंत मागास आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली करण्याचा निर्णय घेतला. बिहारच्या कानाकोपऱ्यातून अशा मुलांना एकत्र करून त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय आपल्याच घरी करून त्यांनी त्यांची आयआयटी-जेईईची तयारी करून घेण्यास सुरुवात केली.
पहिल्या वर्षी १८, दुसऱ्या वर्षी २२ असे करता करता ‘सुपर ३०’ प्रकल्प सुरू केल्यानंतर सहाव्या वर्षांपासून ३०च्या ३० विद्यार्थी आयआयटी-जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) उत्तीर्ण होऊन देशभरातील वेगवेगळ्या आयआयटीमध्ये शिक्षण घेऊ शकले, घेत आहेत. गेल्या १२ वर्षांत ३०८ विद्यार्थी आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
आनंद सर नक्की काय जादू करतात की त्यांचे विद्यार्थी एवढे गुण मिळवतात? तर सर शिकवण्यापूर्वी त्यांच्यात उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण घेण्याचे, स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करण्याचे शिक्षण देतात. एकदा मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की त्यांची परीक्षेची निम्मी तयारी तिथेच पूर्ण झालेली असते, असे आनंद कुमार यांचे मत आहे. त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलेही ते मान्य करतात. सर आत्मविश्वास निर्माण करतातच पण त्यांची शिकवण्याची हातोटी काही औरच आहे असे प्रत्येक जण सांगतो.
‘सुपर ३०’च्या यशानंतर अनेकांनी निधीच्या रूपाने आनंद कुमार यांच्याकडे मदतीचा हात देऊ केला. मात्र त्यांनी तो साफ नाकारला. त्यांचे म्हणणे आहे की, बिहारसारख्या अत्यंत मागास भागातसुद्धा तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. पण ही मदत नाकारल्याने अनेक शत्रू त्यांनी निर्माण करून घेतले. क्लासेसच्या व्यवसायातील माफियांनी त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत.
‘सुपर ३०’ यशस्वी झाला. अनेक परदेशी विद्यापीठांपर्यंत त्याची कीर्ती पोहोचली. सरकारी पातळीवरही त्यांची दखल घेतली गेली. लहानशा जागेत असणारा हा प्रकल्प भाऊ प्रणव आणि आता आनंद कुमार यांची पत्नी यांच्या मदतीने पूर्वीच्या तुलनेत मोठय़ा ठिकाणी सुरू आहे. आजही मागास मुलांची स्थिती तीच आहे आणि त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा आनंद कुमार यांचा उत्साहदेखील!
रेश्मा भुजबळ
pradnya.talegaonkar@expressindia.com
सुपर ३० आनंद कुमार
लेखक : बिजू मॅथ्यू
प्रकाशक : पेंग्विन
पृष्ठे : २३०, मूल्य १९९