स्वप्नील हिंगमिरे
‘आत्ता’चा विचार करणारे विलासी ‘अदर्स’ आणि विचार-नियमनाद्वारेच कार्यरत राहणारे ‘निओप्युरिटन’ यांच्यात मानवी भावना किती उरल्या?
आज इंटरनेटचे आणि स्क्रीनचे व्यसन सोडवण्यासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आपली लहान-लहान मुले मोबाइल वगैरे किती सराईतपणे वापरतात हे अनेक पालक कौतुकाने सांगत असतात. काही जाणकार मंडळी मधूनमधून ‘डिजिटल डिटॉक्स’ वगैरे करतात. आरोग्यभान असणारी अनेक मंडळी फिटनेस बँडसारखी उपकरणे वापरून आपल्या शारीरिक घडामोडींवर लक्ष्य ठेवतात. करोनाकाळात तर शिक्षण आणि काम दोन्ही ऑनलाइन होत असल्यामुळे, तसेच शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या; मन रमवण्यासाठीही स्क्रीन-तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला. त्यामुळे झोपेची गुणवत्ता घसरते आहे, कार्यक्षमता कमी होते आहे. स्क्रीनच्या अतिवापराचे गंभीर शारीरिक व सामाजिक दुष्परिणाम दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून बरोबर १०० वर्षांनंतर आपला समाज कसा असेल? प्रेम, कुटुंब, स्वातंत्र्य, स्वत्वाची जाणीव या संकल्पनांचे काय स्वरूप असेल? ब्रिटिश संसदेच्या खासदार असलेल्या, ऑक्सफर्ड विद्यापीठातील सुझॅन ग्रीनफिल्ड यांनी या प्रश्नांची काहीशी नकारात्मक उत्तरे यांच्या ‘२१२१ : अ टेल फ्रॉम द नेक्स्ट सेंच्युरी’ या डिस्टोपिअन कादंबरीत दिली आहेत.
मुळात एखादी कादंबरी डिस्टोपिअन का वाटते? आज आपल्याला कदाचित माहीत नसणारी गोष्ट कादंबरीत अति प्रमाणात घडते, अंगावर येते, भयानक असते. उदाहरणार्थ, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीची गस्त आपल्याला गरजेची वा सवयीची वाटते, पण जॉर्ज ऑर्वेलच्या ‘नाइन्टीन एटीफोर’ या कादंबरीत हीच गस्त सार्वत्रिक पाळतीच्या रूपात येते आणि भयावह भासते. याच धर्तीवर आज आपण ज्या तंत्रज्ञानाचा वापर (विशेषत: नॅनो/ जनुकीय/ माहिती/ औषध) अगदी सहजरीत्या आणि अधिकाधिक सुखी (समाधानी नव्हे!) आणि कार्यक्षम होण्यासाठी करत आहोत, त्याच तंत्रज्ञानाचा वापर ‘अति’ होत गेला तर काय होईल याचे चित्र या कादंबरीत रेखाटले आहे.
जडवादाच्या दृष्टिकोनातून बघितले, तर माणसाच्या सर्व भावना व त्यांना अनुसरून केलेल्या कृती या एक प्रकारच्या जैव-रासायनिक प्रक्रिया आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या प्रक्रिया नियंत्रित करून फक्त सुखाचा अनुभव दीर्घ करता आला तर? या प्रक्रियेत प्रेम, कुटुंब, स्वातंत्र्याची भावना, जगाबद्दल असणारे कुतूहल, त्यातून पडलेले प्रश्न या सगळ्यांची गरज संपून जाईल आणि त्यामुळे या साऱ्यांमुळे अनुभवाला येणारे कष्ट, अपयश वा दु:खसुद्धा अनुभवाला येणार नाही. मेंदूतील काही जैव-रासायनिक प्रक्रिया कार्यान्वित करून सगळ्या प्रकारच्या सुखांची अनुभूती बसल्याबसल्या घेता येईल. (विषयांतर : विदर्भातील एका धार्मिक स्थळी विकसित केलेल्या बागेत सहजासहजी दिसू न येणारे स्पीकर्स बसवले आहेत. त्यातून पक्ष्यांचा किलबिलाट प्रक्षेपित केला जातो, जेणेकरून बागेत फिरणाऱ्यांना वाटावे की अवतीभोवती पक्षीच पक्षी आहेत. असो.) ग्रीनफिल्ड यांच्या मते तंत्रज्ञानाचा असा वापर युटोपिअन भविष्यासाठी केलेला वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो डिस्टोपिअनच आहे. कारण तंत्रज्ञान न वापरता केलेल्या संघर्षातून आणि त्यामागच्या जाणिवांतूनच माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो असे ग्रीनफिल्ड यांचे गृहीतक आहे.
***
या कादंबरीत असे मानले आहे की, २१२१ साली जगाची विभागणी दोन प्रकारच्या समाजांत झाली आहे. पहिला समाज ‘निओप्युरिटन’ लोकांचा! ते ज्ञानाला, नियमांना, कष्ट करण्याला महत्त्व देतात, मौजमजा वर्ज्य मानतात. (कादंबरीतला ‘प्युरिटन’चा अर्थ धार्मिक कर्मठपणाशी संबंधित नाही. कोणतीही कृती करण्यामागे बौद्धिक उन्नती हा हेतू नसेल, तर ती कृती निरर्थक मानून तिला प्रतिबंध करणे हा या नव्या प्युरिटनांचा कर्मठपणा.) तर दुसरा समाज हा विलासवादी लोकांचा. या समाजास निओप्युरिटन लोक ‘अदर्स’ असे संबोधतात.
फ्रेड हा या कादंबरीतील एक महत्त्वाचा निओप्युरिटन ऊर्फ एनपी न्यूरोसायंटिस्ट. ‘जाणीव म्हणजे काय?’ हा त्याच्या संशोधनाचा विषय. या समाजाने फ्रेडसाठी तारा नामक एक ‘प्रजनन भागीदार’- पत्नी नव्हे – निवडली आहे. ही निवड दोघांच्याही बुद्ध्यांकावर आधारित आहे. एनपींचे जीवन रंगहीन आहे. सगळ्यांची घरे एकसारखी, प्रत्येक घरातले फर्निचरही गरजेपुरते आणि एकसारखे. प्रत्येक घरात केवळ तीनच सदस्य- एक मूल व त्याचे पालक. ‘हेल्मेट’ नामक एक तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. एका ठरावीक वयाचे झाल्यावर मुलाने ते हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्याच्या माध्यमातून मुलांच्या विचारांचे ‘नियमन’ केले जाते. या संदर्भात कादंबरीतील एक प्रसंग महत्त्वाचा आहे. तारा आणि फ्रेडचा मुलगा बिल काही नवीन शब्द शिकतो, तेव्हा फ्रेडला काळजी वाटू लागते : आता त्याच्या विचारांचे नियमन केले नाही, तर तो आत्मकेंद्रित होईल, अशी शक्यता फ्रेडला वाटते. कारण त्यांचा समाज हेल्मेटद्वारे मेंदूतील विविध घडामोडींच्या मागचा कार्यकारणभाव बदलू शकतो, ‘अनावश्यक’ भावनांवर नियंत्रण मिळवतो. त्यातूनच त्यांनी स्किझोफ्रेनियासारख्या आजारांचा नायनाट केला आहे.
‘अदर्स’चा समाज ‘एनपीं’च्या बरोबर विरुद्ध. ते लोक ‘आज-आत्ता’मध्ये जगतात. काल काय घडले याचे चिंतन करायचे नाही, की उद्याचे नियोजन करायचे नाही. फक्त भडक रंग, कर्कश संगीतात रमायचे आणि ‘आभासी वास्तवाच्या’ माध्यमातून वेगवेगळ्या सुखाचे अनुभव घ्यायचे! त्यांनी जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी स्वयंचलित केलेल्या आहेत, वार्धक्यावर विजय मिळवला आहे, कृत्रिम गर्भधारणा वैद्यकीयदृष्ट्या परिपूर्ण केलेली आहे. त्यामुळे प्रेम-प्रणय वा लग्न यांची गरज उरलेली नाही. लोक गटांमधून राहतात. प्रत्येक गटात लहान मुलांची काळजी घेणाऱ्या दाई, बीजांडे आणि गर्भाशये वापरू देणाऱ्या स्त्रिया वगैरे. या गटाला कुटुंब म्हणता येत नाही, कारण कोणीही कुणाशीही संवाद साधत नाही वा कसलेही शारीरिक-मानसिक संबंध येत नाहीत. इतकेच नव्हे, तर लोकांमधली उत्क्रांतीची प्रक्रिया थंडावलेली आहे, कारण जगण्यासाठी विशेष असे करण्यासारखे मुळी काही नाहीच. कुणाला काही प्रश्न पडला तर तो ‘फॅक्ट टोटम’ नामक तंत्रज्ञानाला विचारायचे, उत्तर लगेच मिळते. त्यापलीकडे काही जाणून घ्यायची गरज नाही हा दृढ समज. ‘फॅक्ट टोटम’च्या मते ‘मी कोण? स्व म्हणजे काय?’ इ. प्रश्न फिजूल आहेत, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि म्हणूनच असले प्रश्न माणसाला नैराश्याकडे घेऊन जातात.
एक काळ असा होता की, एनपी आणि अदर्स एकत्रच राहत होते. पण हळूहळू बरेच लोक स्क्रीनमग्न होत गेले, वास्तवात जगण्यापेक्षा दोन मितींच्या आभासी जगात रमू लागले, जे काही आहे ते आत्ता उपभोगायचे असा विचार करू लागले. कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार वा नियोजन दुर्मीळ होत गेले. यातून झालेल्या मतभेदांतून दोन समाज वेगवेगळे झाले.
२१२१ साली एनपींच्या दृष्टीने मागासलेल्या अदर्सची स्थिती जाणून घेण्यासाठी फ्रेडला त्यांच्या राज्यात पाठवले जाते. तिथे त्याची ओळख होते सिम या नवतरुणीशी आणि तिची दाई असलेल्या झेल्डाशी. सिम ही एक नमुनेदार अशी, निव्वळ वर्तमानात जगणारी माठ व्यक्ती. तिची बौद्धिक वाढ तिच्या शारीरिक वाढीच्या तुलनेत तोकडी आहे. तिला अनेक शब्द माहीत आहेत, पण त्यांचा अर्थ माहीत नाही. अनेक अमूर्त संकल्पनांबद्दल (उदा.- प्रेम, आनंद, विश्वास) ती अनभिज्ञ आहे. तिची काळजी घेणारी दाई झेल्डा मात्र संवेदनशील आहे. ही झेल्डा काहीशी जुन्या वळणाची. ती लहानपणी तिच्या आजी-आजोबांसोबत राहिली असल्याने प्रेम, लग्न, ‘जन्मजन्मांतरीचा साथीदार’ या संकल्पनांशी तिचा परिचय आहे. फ्रेड हळूहळू त्या घरात रुळतो. त्यांच्यात एक नाते निर्माण होते. साचेबद्ध आयुष्य जगलेला फ्रेड स्वच्छंदीपणे जगू लागतो. एनपींच्या जगात त्याज्य मानलेल्या गोष्टी त्याला कराव्याशा वाटू लागतात. सायकलवरून भटकावेसे वाटते. झेल्डा आणि सिम यांच्याशी त्यांचे अकृत्रिम बंध जुळतात. झोपेच्या गोळ्या घेण्यात काही चुकीचे वाटेनासे होते. हळूहळू मठ्ठ सिमच्या मनातही फ्रेडमुळे कुतूहल निर्माण होते. झेल्डालाही फ्रेड तिच्या आजी-आजोबांच्या गोष्टीतला ‘सोल-मेट’ वाटू लागतो. तंत्रज्ञानाने दबलेल्या त्यांच्या मूलभूत मानवी प्रेरणा जागृत होऊ लागतात आणि त्यातूनच त्यांच्यातली जवळीक वाढू लागते.
***
कादंबरीत काही प्रश्न अनुत्तरित राहतात. जगाची अशी विभागणी नेमकी कशी झाली, याबद्दल काहीच स्पष्टीकरण नाही. या दोन्ही समाजांच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक व्यवहारांवर ही कादंबरी विशेष भाष्य करत नाही.
कादंबरीच्या लेखिका ग्रीनफिल्ड साहित्याखेरीज इतर अनेक व्यासपीठांवरूनही व्हिडीओ गेम्स, सोशल मीडिया, इंटरनेट आणि एकंदरीतच स्क्रीन-तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम सतत सांगत असतात. त्यांच्या मते, पंचेंद्रियांमार्फत आपल्याला होणाऱ्या जाणिवा स्क्रीन-तंत्रज्ञानाच्या परिणामामुळे आता केवळ दृक-श्राव्य संवेदनांपुरत्याच मर्यादित होत आहेत. त्यामुळे सर्वंकष अनुभव घेण्याची आपली क्षमता, एकाग्रता कमी होत आहे. व्याकुळता वाढत आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीला ‘ज्ञान’ समजले जाते आहे. समाजमाध्यमांमुळे आत्मलुब्धतेचे प्रमाण वाढत आहे. स्क्रीन-तंत्रज्ञानामुळे मेंदूतील डोपामाइन स्रावण्याची क्रिया वाढीला लागते आहे आणि त्यातून तात्कालिक व अनैसर्गिक आनंदाची खोटी अनुभूती मिळते आहे. या सगळ्यामुळे स्वत:ची एक ठिसूळ प्रतिमा निर्माण होते, अशी त्यांची मांडणी आहे. ‘क्लायमेट चेंज’च्या धर्तीवर ‘माइंड चेंज’ नावाची संकल्पना त्या रुजवू पाहताहेत. अर्थात, त्यांच्या या मांडणीविषयी वाद आहेत; पण त्यांची भूमिकाही तितकीच आग्रही आहे.
ही कादंबरी वाचताना ‘ट्रान्सह्यूमॅनिझम’ या महत्त्वाच्या संकल्पनेची आठवण होते. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या मदतीने माणसाच्या सर्व शारीरिक, बौद्धिक व मानसिक मर्यादांवर कशा प्रकारे मात करता येईल, या प्रश्नाबाबतच्या चर्चेला तोंड फोडणारी ही संकल्पना. डेव्हिड पिअर्स हे या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक. त्यांच्या जाहीरनाम्यानुसार ज्याप्रमाणे आपण वेदनाशामक औषधे व भूल यांच्या माध्यमातून शारीरिक वेदनेवर मात केली, अगदी त्याचप्रमाणे नॅनो तंत्रज्ञान, जनुकीय अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, औषधशास्त्र यांच्या मदतीने माणसाच्या सर्व प्रकारच्या मानसिक वेदना समूळ नष्ट करता येतील! हे नैतिक दृष्टिकोनांतून योग्यच आहे, असे त्यांचे मत आहे. ‘ट्रान्सह्यूमॅनिझिम’च्या संदर्भात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सध्या चालू असलेले प्रयत्न, उदा. वैध-अवैध मार्गांनी एकाग्रता वाढवणे (रिटॅलिनसारख्या गोळ्या), मूड सुधारणे (प्रोझॅक वा प्रोव्हिजिल यांसारख्या गोळ्या) इत्यादी उपायांचा वापर अधिकाधिक यश मिळवण्यासाठी होत आहे.
या साऱ्याची परिणती २१२१ या कादंबरीत मांडलेल्या डिस्टोपियात होईल का, असा तात्त्विक वैज्ञानिक-सामाजिक पैलू असलेला प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे.
लेखक संगणकीय भाषाशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत.
swapnilhingmire@gmail.com