|| रेश्मा भुजबळ
दहशतवाद ही विसाव्या शतकाने एकविसाव्या शतकाला दिलेली नकोशी देणगी. आज अफगाणिस्तानसारखा देश दहशतवादी संघटनांच्या हातात सापडला आहे. तालिबानच्या विरोधात स्त्रियाच निदर्शने करण्याची हिंमत दाखवत असल्या, तरी दुसरीकडे जगभरच्या अतिरेकी, दहशतवादी गटांमध्ये स्त्रियांचा सहभाग उघडपणे दिसून येतो. अशा गटांतील सगळ्याच स्त्रिया हातात शस्त्र घेऊन किंवा आत्मघातकी हल्ला करण्याच्या कामगिरीवर जात नाहीत. तर विविध संपर्क माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे, जखमी दहशतवाद्यांची सेवा-शुश्रूषा करणे, त्यांचे संदेश, हत्यारे अथवा निधी गोळा करून तो इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम करणे, अशा विविध प्रकारे स्त्रियांचा सहभाग असतो. प्रत्येक वेळी हा सहभाग स्वेच्छेनेच, असतो असे नाही तर अनेकदा तो लादण्यातही येतो.
भारतात जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्ये प्रामुख्याने दहशतवाद, नक्षलवाद किंवा स्थानिक अस्मितावादी अतिरेकाने ग्रासलेली आहेत. तेथील त्यांच्या कारवायांचा परिणाम अर्थातच सर्व देशाला भोगावा लागतोच. पत्रकार- लेखिका रश्मी सक्सेना यांनी ‘शी गोज टू वॉर’ यात प्रामुख्याने काश्मीर, छत्तीसगड, आसाम, नागालँड आणि मणिपूर येथील दहशतवादी, नक्षलवादी संघटनेत सहभागी झालेल्या – पण आता शरण आलेल्या आणि आजघडीला हिंसक लढ्यांशी संबंध नसलेल्या- स्त्रियांविषयी तटस्थपणे लिहिले आहे. त्या त्या भागातील पूर्वी दहशतवादी अथवा नक्षलवादी म्हणून सहभागी झालेल्या स्त्रियांच्या कथा आणि व्यथा पुस्तकात वाचायला मिळतात. ते करताना त्या कोणतीही टिप्पणी करत नाहीत की त्यावर अभिप्राय नोंदवत नाहीत. या स्त्रियांच्या निर्णयाची कोणत्याही प्रकारे भलामण करीत नाहीत वा त्यांना चूकही ठरवत नाहीत. त्यांच्याविषयी सहानुभूती वाटेल किंवा तिरस्कार वाटेल असे काहीही त्या मांडत नाहीत. केवळ आणि केवळ त्या-त्या स्त्रियांनी काय केले आणि का केले एवढेच त्या मांडतात. म्हणूनच काश्मीरमधील रुही, डेजी, फरिदा, निखत असो की छत्तीसगडमधील भीमा, तुलसी, कमला किंवा नागालँडची अवुली, आसामच्या प्रणाती, रुबिनी, मणिपूरमधील पूर्णिमा यांचे कथन वास्तवाचे भान देते.
काश्मीरमधील रुही अवघ्या चौदा वर्षांच्या न कळत्या वयात जेकेएलएफ (जम्मूू अॅण्ड काश्मीर लिबरेशन फ्रंट)च्या कमांडरच्या भाषणांनी प्रेरित होऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाण्याचा धाडसी निर्णय घेते. ‘स्वातंत्र्यासाठी इतका वेडेपणा होता की माझा असा विश्वास होता की फक्त बंदूक उचलून आम्ही ते साध्य करू’असे ती लेखिकेला सांगते. मात्र, तिथे गेल्यानंतरचे भयाण वास्तव तिचे आयुष्यच उद्ध्वस्त करून जाते.
काश्मीरमधील दहशतवादाचे आरोप असलेल्या स्त्रियांचे कथन ऐकताना जाणवते ते म्हणजे इस्लामचा पगडा आणि पुरुषप्रधान संस्कृतीची पकड. इथे स्त्रियांना कधीच पुरुषांच्या बरोबरीने वागवले गेले नाही, किंवा त्यांचा वापर केवळ दुय्यम कामांसाठीच केला गेला. रुहीसारख्या अनेकींची शारीरिक, मानसिक पिळवणूकच केली गेली. त्यांच्या हातात कधीच थेट शस्त्रे देण्यात आली नाहीत.
छत्तीसगड अथवा नागालँडमध्ये मात्र अगदी याच्याविरुद्ध स्थिती असल्याचे नक्षलवादी स्त्रियांच्या कथनांतून समजते. मुळातच आदिवासीबहुल अशा ठिकाणी नक्षलवादी किंवा (विशेषत: ईशान्येकडील राज्यांत) स्थानिक अस्मितावादी कारवाया सुरू आहेत. आदिवासींमध्ये स्त्रियांना समान अधिकार बहाल करण्यात आल्याने नक्षलवादी संघटनांमध्येही स्त्रियांच्या हाती बंदूक सोपवण्यात सहजता होती. अनेक जणींच्या नेतृत्वाखाली कारवाया करण्यात आल्या, याची माहिती भीमा अगदी सहजपणे देते.
तर महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या समजून घेताना त्यांना लाजिरवाणे वाटणार नाही, अशी वागणूक दिल्याचे नागा नॅशनल कौन्सिलची अवुली सांगते. जसा फरक राज्या-राज्यातील स्त्रियांच्या कामात होता तसाच तो त्यांच्या पुनर्वसनातही दिसून येतो. काश्मीरमधील तीव्र दहशतवादाची झळ त्यांना दहशतवादापासून दूर गेल्यानंतरही जाणवत राहाते, किंवा त्यांना भूमिगत होऊन, ओळख लपवून राहावे लागते. तेच इतर राज्यांमध्ये चळवळ सोडल्यानंतर अनेकांचे योग्य पुनर्वसन झाल्याचे निदर्शनास येते. असे अनेक पैलू रश्मी सक्सेना यांनी स्वत:ची कोणतीही भूमिका न मांडता समोर ठेवले आहेत.
प्रत्येक राज्यातील दहशतवादी, नक्षलवादी चळवळींचा एक इतिहास आहे, तो मात्र लेखिकेने देणे टाळले आहे. तसेच काश्मिरी स्त्रिया आणि छत्तीसगडच्या आदिवासींचे काही संवाद पुस्तकात हिंदीमधून वाचायला मिळतात आणि त्याखाली त्याचा इंग्रजी अनुवाद. हिंदी ही या दोन्ही राज्यांची भाषा नाही. त्यामुळे असे संवाद वाचनाचा निखळ आनंद देत नाहीत. या किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष केल्यास दहशतवादी, नक्षलवादी, माओवादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या स्त्रियांचे वास्तव अनुभव त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करून त्या असे का वागल्या असतील, याचा शोध घेतात.
reshmavt@gmail.com