जुनी न होणारी जी पुस्तके असतात, त्यापैकी एक म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑगस्टात आलेले डॉ. अमर्त्य सेन यांचे द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’. या नोबेल-मानकरी अर्थतत्त्वज्ञाने स्वतवरले संस्कार, त्या प्रकाशात दिसलेले-अभ्यासलेले जग, ते बदलण्यासाठी केलेले प्रयत्न यांविषयी साधलेला हा संवाद दीर्घकाळ स्मरावा असाच..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोळ्यादेखत एक जण दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसतो, रक्ताचे थारोळे साचते. अकरा वर्षांचा कुमार हे सारे भेदरून पाहत आहे. त्याचे वडील भोसकला गेलेल्याला घरी आणून पाणी पाजवतात, रुग्णालयात घेऊन जातात. तो काही वाचत नाही. परंतु हे दृश्य व त्या प्रतिमा, तो बालक पुढे आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही. ‘मारणारा हिंदू, मरणारा मुस्लीम’ असा धार्मिक चष्मा त्याला मिळालेला नव्हता. जात, धर्म, भाषा, प्रांत या क्षुद्र सीमांच्या पलीकडे पाहण्याची रवींद्रनाथ टागोर यांची वैश्विक दृष्टी त्याला लाभली होती. मरणारा बेकार होता. त्याला रोजगार का मिळत नव्हता? एक माणूस दुसऱ्याला जिवे मारायला का तयार होतो? कठोपनिषदात मृत्यूचे रहस्य उलगडण्याकरिता बालक नचिकेत, यमाचा पिच्छा पुरवतो. त्याप्रमाणे या ‘कुमाराने’ दारिद्रय़ाचा व हिंसेचा उगम शोधण्याचा ध्यास घेतला. बंगालमधील १९४२च्या महाभयंकर दुष्काळाच्या आठवणी त्या बालमनाला काळरात्रीच्या दु:स्वप्नासारख्या होत्या. गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी असूनही गोदामाबाहेर हाडाचे सापळे का हिंडतात? याचा ‘अर्थ’बोध करून घेण्यासाठी अमर्त्यकुमार सेन अथक झटत राहिला. त्यातून दुष्काळाचे व भुकेचे अर्थशास्त्र जगासमोर आले. टागोर यांच्या मानवतावादी विचारांचा विस्तार डॉ. अमर्त्य सेन यांनी केला. गेली तीन दशके जगातील निवडक विचारवंतांमध्ये त्यांचे नाव अग्रभागी असते. जागतिक समस्यांवरील त्यांचं भाष्य ऐकण्यासाठी आज अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन, अ‍ॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अ‍ॅटिक्सन हे अर्थवेत्ते ‘आíथक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ हे मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय’ अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात.

सेन हे व्यक्तित्व (आयडेंटिटी), नीती, न्याय, हिंसा अशा मूलभूत समस्यांवर अस्वस्थ होऊन त्यासंबंधी सातत्याने चिंतन करीत आहेत. त्यांचे विचार व्याख्याने व निबंधांतून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’ या पुस्तकातून सेन यांनी भूक, शिक्षण, आरोग्य, प्रसार माध्यमे, जागतिकीकरण, परस्परावलंबी जग या अनेक अंगांनी विकास तपासून पाहिला आहे.

सेन यांनी ‘दारिद्रय़, युद्ध आणि शांतता’ या निबंधातून हिंसेचा अन्वय लावला आहे. श्रीमंत राष्ट्रामधील सर्व नागरिक सुखी आहेत का? जगातील प्रबळ लष्करी राष्ट्रे शांत व सुरक्षित आहेत का? समाजातील अशांततेच्या आणि असुरक्षिततेच्या कारणांचा नायनाट केला नाही तर शांतता कशी प्रस्थापित होईल? मग अर्थशास्त्राचा अर्थ तरी काय? विकास केवळ आíथक नसून त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे. निर्जीव वस्तूंच्या उत्पादनाचे मोजमाप हे विकासाचे निर्देशक होऊ शकत नाही. त्यावरून सामान्य माणसाच्या परिस्थितीचा यित्कचितही अदमास लागत नाही. मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला तरच तो विकास अर्थपूर्ण असेल, या विषयावर अनेक वर्षांपासून चालू असणाऱ्या वाद-संवादाला १९८० ते ९०च्या दशकात टोक आले. त्या दशकात ब्रिटनच्या मार्गरेट थॅचर व अमेरिकेचे रोनाल्ड रेगन यांनी मोकाट अर्थकारणाचा जाहीरनामा घोषित केला होता. ‘‘सरकारने कल्याणकारी कार्य थांबवावे. पाणी, शिक्षण, आरोग्य याची हमी घेऊ नये. बाजारपेठेमधील हस्तक्षेप थांबवावा ते सर्व खासगी संस्थांवर सोपवावे.’’ थॅचर-रेगन आणि मंडळींनी, संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबामुख धोरणे बदलण्यास भाग पाडले. ‘‘१९८०चे दशक हे रोजगाररहित विकासाचे दशक होते. अशीच स्थिती चालू ठेवल्यास जगाची वाटचाल विध्वंसाच्या खाईकडे असेल,’’ असा पाकिस्तानमधील अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी या मोकाट अर्थकारणावर घणाघाती हल्ला चढवला. त्यांनी अमर्त्य सेन, सुधीर आनंद, कीथ ग्रिफिन, फ्रान्सिस स्टय़ुअर्ट यांच्या सहकार्याने विकासाची मीमांसा करणारा अभ्यास गट स्थापन केला. डॉ. हक यांनी ‘शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण, यांचा विचार करून माणसांची अवस्था ठरवली पाहिजे,’ हा सिद्धांत १९९० साली मांडला आणि जगाच्या अर्थविचारांना कलाटणी दिली. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता मनुष्य विकास निर्देशांक तयार केला. प्रो. सेन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. हक यांच्या विचारांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले. तेव्हापासून अवघे जग मनुष्य विकास निर्देशांकांच्या घोषणेची दरवर्षी वाट पाहत असते. ‘प्रत्येक देशाचे प्रगती पुस्तक’ अशी ख्याती मनुष्य विकास निर्देशांकाला प्राप्त झाली आहे (या दोन्ही अर्थतत्त्वज्ञांना जन्माला घालणारे भारत व पाकिस्तान हे सख्खे शेजारी, लष्करी सामर्थ्यांमध्ये जगात आघाडीवर आणि मनुष्य विकासाच्या यादीमध्ये जगाच्या तळाशी आहेत.).

पहिल्याचेफाजील लाड

पहिला नंबर! सर्व जातीधर्मातील आबालवृद्धांना या पहिल्या नंबरची विलक्षण भुरळ आहे. त्यामुळे पहिल्या नंबरला भारतभूमीवर सदासर्वदा कमालीचा आदर आहे. हा ‘नंबरी भाव’ सर्वाच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे अनेक भेदभाव जपले गेले आहेत. आय.टी., आय.ए.एस., डॉक्टर, इंजिनीअर, सी.ए., यांना घर व शाळेपासूनच विशेषत्व बहाल केले जाते. ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’ या पुस्तकाच्या शीर्षक-निबंधात प्रा. सेन ‘‘समस्त भारतीयांना अनेक कालखंडात पहिला क्रमांक हा पछाडलेला लक्षणसमूह (सिंड्रोम) आहे.’’ असे म्हणतात. पन्नास वर्षांपूर्वी िवदा करंदीकर यांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती. राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना शाळेतील नंबरचा आणि गुणांचा विसर कधीही पडू शकत नाही. प्रगत देशांत असे हे फाजील लाड होत नाहीत. ‘वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे. केवळ अभिजनांच्या शिक्षणाची काळजी वाहणारी पद्धत प्राथमिक शिक्षणाची पुरेपूर उपेक्षा करते. आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षण यंत्रणेमुळे कोटय़वधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मुनष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे. मनुष्यबळाची अशी परवड करणारी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही,’’ असं मर्म सेन सांगतात.

१८७२ साली जपानने ‘शिक्षणाविना कुठल्याही समूहातील एकही कुटुंब वा कुटुंबातील सदस्य अशिक्षित राहणार नाही,’ असा शिक्षणविषयक महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसृत केला. शिक्षणामधील त्रुटींकडे बारकाईने लक्ष दिले गेले. १९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर होऊन आíथक झेप घेण्यासाठी सक्षम झाला. या जपानी अनुभवापासून दक्षिण कोरिया, चीन, तवान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या देशांनी स्फूर्ती घेऊन तोच कित्ता गिरवला. आíथक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियाई देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ती परिणती होती. त्यामुळे या देशात नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या. व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जीवनात विद्योमुळे कसा ‘अर्थ’ प्राप्त होतो, हे डॉ. सेन उलगडून दाखवतात. वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची किमया शिक्षणच करू शकते. शिक्षण हा अग्रक्रम नसणारे देश विकास घडवू शकत नाहीत. परंतु मोकाट अर्थव्यवस्थेचे पाठीराखे तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’चा सुळसुळाट म्हणजे शिक्षणक्षेत्राची प्रगती मानतात. त्यांना शिक्षणदेखील पूर्णपणे बाजारपेठेच्याच हातात सोपवायचे आहे. शिक्षणप्रसार हा दारिद्रय़ निर्मूलनातील कळीचा व अटळ भाग आहे याची जाण असणाऱ्या अ‍ॅडम स्मिथलासुद्धा अशी भांडवलशाही अभिप्रेत नव्हती.

भारतात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यातील मोठा अडसर, पायाभूत रचना हाच आहे. अजूनही शिक्षणाच्या महामार्गावर कित्येक जाती-जमातींमधील पहिली पिढी येऊ शकत नाही. भटके व आदिवासींना शिक्षणात सामावून घेण्यासाठी उदार व लवचीक धोरण आवश्यक आहे. परंतु ती प्राथमिकता नसल्यामुळे शिक्षणातील दरी वाढतच आहे. याची खंत बाळगणाऱ्या प्रो. सेन यांनी प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंग समानता रुजविण्यासाठी नोबेल पुरस्काराची पूर्ण रक्कम घालून १९९८ साली ‘प्रतिची’ या संस्थेची स्थापना केली (१९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल रक्कम शांतिनिकेतन स्थापण्यासाठी दिली होती) बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल राज्यांत ‘अतिशय हलाखीतील पालक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असतात. प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी भरमसाट देणग्या मागितल्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असे या संस्थेचे सर्वेक्षण सांगते. शिक्षक आणि आरोग्यसेवकांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, दिल्लीतील वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अंगाचं मुटकुळं करून हाताच्या आधारावर डोकं टेकवत गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीचं छायाचित्र आहे.

पाचव्या शतकात साहित्य, भाषाशास्त्र, वास्तुकला, शिल्पकला, खगोलशास्त्र, औषधी विज्ञान, सार्वजनिक आरोग्य या विषयांमधील जगभरातील अभ्यासकांना उच्चशिक्षण मिळवण्याकरिता नालंदा हे एकमेव विद्यापीठ उपलब्ध होते. चीन, जपान व इतर आशियाई देशांमधील विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. सन ११९० पासून झालेल्या हल्ल्यांमुळे, सुमारे ७०० वष्रे चाललेली अध्ययन व अध्यापन यात्रा खंडित झाली (ऑक्सफर्डची स्थापना ११६७, केम्ब्रिज- १२०९) अशा या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना सेन अनेक वर्षांपासून मांडत होते. २००७ साली आशियाई राष्ट्रांच्या परिषदेमध्ये फिलिपाइन्स, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर या देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेचा ठराव मंजूर केला. पुढे जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची निवड करून कार्यकारी समिती तयार केली आणि त्याचे नेतृत्व डॉ. सेन यांच्याकडे चालून आले. तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदीसुद्धा) यांनी सदैव व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो हे उत्साहाने सहभागी झाले. केवळ व्यापारच नाही तर ज्ञानसाधनासुद्धा विविध देशांना एकत्र आणू शकते, हे दाखवून देण्यासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्था निर्माण करण्याचे अथक प्रयत्न चालू होते. मोदी सरकार आल्यानंतर अनेक हस्तक्षेपांमुळे त्याला कशी खीळ बसली, याची सविस्तर कैफियत सेन यांनी मांडली आहे. सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रो. सेन, डॉ. अनिल काकोडकर व रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते.

‘रागमाला’ या आत्मचरित्रात रविशंकर यांनी ‘‘टागोर यांचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला असता तर त्यांना शेक्सपियर व गटे यांच्या मालिकेत स्थान लाभले असते,’ असे म्हटले आहे. सेन म्हणतात, ‘हा दावा अतिशयोक्त असला तरी त्यातून टागोरांच्या विचारांची महती आजही टिकून असल्याकडे रविशंकर लक्ष वेधू इच्छितात. केवळ भारत व बांगलादेशच नाही तर जपान व चीनमध्येसुद्धा आजदेखील टागोर यांच्या लघुकथा, कविता, निबंध व पत्रव्यवहारांना वाचकवर्ग लाभत आहे.’ खुल्या मनाने प्रत्येक बाबीची कसून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य हे रवींद्रनाथांचे विलक्षण वैशिष्टय़ होते. याबाबत ते काळाच्या खूपच पुढे होते. ‘१९३४ साली झालेला बिहारचा भूकंप म्हणजे जातिभेद पाळण्याची परमेश्वराने दिलेली शिक्षा आहे,’ असे गांधीजी म्हणाले होते. याला जाहीर उत्तर देताना ‘जातिप्रथा ही वाईटच आहे, परंतु भूकंप हा नसíगक आहे, दोन्हींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही,’ असे रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितले. गांधीजींविषयी असलेल्या अतीव आदरामुळे त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने गौरवणाऱ्या रवींद्रनाथांनी त्यांच्याशी असणारे मतभेद वेळोवेळी नि:संकोचपणे व्यक्त केले. व्यक्ती वा सत्ता यांच्यामुळे दबून न जाता सुसंस्कृतपणे मतभिन्नता जपण्याच्या स्वातंत्र्याला रवींद्रनाथांनी मूलभूत हक्क मानले. सेन यांनी ‘टागोर यांनी कोणता बदल घडवला?’ या निबंधात रवींद्रनाथांच्या विचारांमधील अभिजाततेची महती उलगडून दाखविली आहे. पौर्वात्त्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधत भारताला त्यांनी आधुनिक व उदार विचार दिला. ‘क्षुद्र िभतींविना अखंड जग, मुक्त ज्ञान आणि भयशून्य मन’ ही रवींद्रनाथांची आकांक्षा पसायदानासारखी त्रिकालाबाधित राहणार आहे.

‘कोणाच्या आधारे करू मी विचार,

कोण देईल धीर माझ्या जीवा,

शास्त्रज्ञ, पंडित नाही मी एक वाचक,

याती शुद्ध एक ठाव नाही.’

संत तुकराम यांनी सांगितलेली अशी अवस्था, आपल्यासाठी अनेक वेळा होते. आपल्या सर्वाच्या आयुष्यातील घटना व प्रसंग साधारणपणे सारखेच असतात. सर्वसाधारण व्यक्ती घटनांच्या खोलात जात नाहीत. एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्यास वैयक्तिक निष्कर्ष काढत व्यक्तीला अथवा नशिबाला जबाबदार धरून हा प्रवास  थबकतो. असामान्य व्यक्ती खोलवर बुडी मारून त्या प्रसंगामागील कारणांचा शोध घेतात. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नांचं स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते. समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यातून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृती आराखडा देणारे प्रो. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात. महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करीत जातात, निरनिराळ्या पद्धतीने ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुल निर्माण होतात. गेल्या ४४ वर्षांपासून प्रो. सेन, दारिद्रय़ामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करीत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करीत आहेत. विलंबित, द्रुत, टप्पा, तराणा, या सर्व रीतींनी एकच राग ऐकण्याचा अवर्णनीय आनंद शब्दातीत आहे. त्या दर्जाचा आनंद प्राप्त करायचा असेल तर सुज्ञांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

 

द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज

लेखक :  अमर्त्य सेन

प्रकाशक :  ऑक्सफर्ड युनिव्हर्सटिी प्रेस

पृष्ठे :२७६ ; किंमत : ५५० रुपये (पुठ्ठा बांधणी)

 

– अतुल देऊळगावकर
atul.deulgaonkar@gmail.com

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The country of first boys