पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात ‘द गर्ल इन व्हाइट कॉटन’ या नावाने उपलब्ध असलेली ‘बर्ण्ट शुगर’ ही अवनी दोशी यांची कादंबरी बुकर पारितोषिकाच्या लघुयादीत यंदा आहे. दोशी या नावाच्याच भारतीय, तसे या कादंबरीचे कथानक नावालाच पुण्यात घडणारे! पण नेहमीच्या भारतीय स्त्रीजीवनापेक्षा नक्की निराळे, धक्कादायक. ‘आई’ या महन्मंगल संकल्पनेलाच दिलेला धक्का हे या कथानकाचे केंद्रस्थान..

मानवी दांभिकतेचा दैनंदिन भाषाविष्कार हा मातृवाचक (अप)शब्दातूनच सर्वाधिक प्रगट होतो. एकेकटय़ा व्यक्ती आपापल्या कुटुंबात वावरताना हजारो वर्षांच्या संस्कृती वगैरे घटकाशी एकरूप होत आपल्या मातृदैवतास निष्ठा वाहतात. अन् समाजात वावरताना खटकणाऱ्या प्रत्येक बाबीवर दुसऱ्याच्या मातृदेवतेचे विटंबनासूक्त गायला मागेपुढे न पाहणे, हादेखील ‘संस्कृती’चाच जणू भाग ठरतो. ‘बुकर’च्या लघुयादीत दाखल झालेल्या अवनी दोशी यांच्या ‘बण्र्ट शुगर’ (गर्ल इन व्हाइट कॉटन) या कादंबरीतील निवेदिका मात्र आत्ममातृ-विटंबना-सूक्त जोरकसपणे मांडताना दिसते.

‘बुकर’ आणि अरुंधती रॉय, किरण देसाई वगैरे जुन्या गोष्टी झाल्या. पण अरविंद अडिगा यांना ‘द व्हाइट टायगर’ कादंबरीसाठी गेल्या दशकात बुकर पुरस्कार मिळाल्यानंतर जीत थाईल (‘नार्कोपोलीस’), झुंपा लाहिरी (‘द लोलॅण्ड’), नील मुखर्जी (‘द लाइव्ह्ज ऑफ अदर्स’), संजीव सहोटा (‘द इयर ऑफ द रनअवेज्’), सलमान रश्दी (‘क्विशोट’) या भारतीय नावांच्या लेखकांचा या दशकात बुकरच्या लघुयादीत शिरकाव झाला. यातील नील मुखर्जी आणि जीत थाईल वगळता कुणीही निवासी भारतीय नाही (अडिगांनीही ऑस्ट्रेलियन नागरिकत्व स्वीकारले). पण सर्वाच्या कादंबरीमध्ये सोज्ज्वळ नसलेल्या भारत आणि भारतीयांचे चित्र आहे. ड्रग्ज व्यसन, स्वातंत्र्योत्तर काळात उभ्या राहिलेल्या नक्षलवादी वा इतर राजकीय चळवळी आणि त्या दाबण्यासाठी झालेले अनन्वित प्रकार, ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेले भारतीय या विषयांवरल्या या कादंबऱ्या खरा भारत दाखविण्यात किती यशस्वी झाल्या, हे महत्त्वाचे नाही. पण भारताविषयी जगाची असलेली प्रतिमा बदलण्यात महत्त्वाच्या ठरल्या. इथल्या जगण्याचे ठोकताळे- तेही वादग्रस्त राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींसह- विशेषत्वाने अभारतीय वाचकांसाठी सादर करताना येथील मुळांचा सन्मान वगैरे करण्याचे कार्य या आंतरराष्ट्रीय भारतीय लेखकांनी केले. सर्वसाधारण भारतीय वाचकांना मात्र ‘यात काय नवे अन् थोर होते?’ हा प्रश्न अडिगांच्या ‘द व्हाइट टायगर’पासून पडायला सुरुवात झाली.

अवनी दोशी वरील प्रतिभावंतांपेक्षा सर्वार्थाने अधिक आंतरराष्ट्रीय लेखिका आहेत. जन्माने अमेरिका, शिक्षणकर्माने ब्रिटन आणि कुटुंबानिमित्ताने अमिराती देशांत वास्तव्य असलेल्या दोशी यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि साहित्यिक नगरी पुणे शहरात कादंबरीचे कथानक घडविणे, हा आपल्या वाचकांसाठी सुखद धक्का आहे. पण कादंबरीतील पुणे वास्तविक एम.जी. रोड, जर्मन बेकरी ते ओशो-स्वरूपाच्या काल्पनिक आश्रमापलीकडे दिसत नाही. शिवाय इथल्या पुण्यात मराठी बोलणाऱ्या त्रोटक व्यक्तिरेखाघरकाम करणाऱ्या महिला, रस्त्यावर क्षुल्लक वादातून तावातावाने आई-बहिणीचा उद्धार करणारे भांडखोर किंवा भिकारीच असतात, हा बराच दु:खद धक्का आहे. अवाढव्य घरांत राहणाऱ्या, समाजजीवन निरनिराळ्या क्लबांमध्ये व्यतीत करणाऱ्या आणि सदोदित चारचाकी गाडय़ांमध्ये वावरणाऱ्या उच्चभ्रू अमराठी वर्तुळात ही कादंबरी घडते. त्यामुळे दोषमुक्तपणे तिच्याकडे पाहण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय वाचकाची नजर तयार करावी लागू शकते.

कादंबरीचे गुणविशेष हे तिच्या रचनेत आहेत. अवनी दोशी यांचा भारतीय मुळांशी इमान वगैरे राखण्याचा काहीही इरादा नाही. त्यामुळे पुणे शहराच्या सामाजिक अभिसरणाची दखल आणि इथल्या सांस्कृतिक संदर्भाचे तपशिलात दाखले या दोन्हींचा अभाव वाचनात आडकाठी आणत नाही. किंबहुना तो नसल्याने अधिक अ-निर्बंधपणे इथल्या व्यक्तिरेखांचा व्यवहार सुरू राहतो. भारतीय साहित्यपटलावर शोभा डे यांची ‘मेट्रोसेक्शुअल’ स्त्री अवतरण्याच्या आधीच्या दशकातील स्त्री-बंडखोरी अवनी दोशी यांनी आपल्या कादंबरीतून उभी केली आहे.

इथली निवेदिका आहे अंतरा लाम्बा. तिशी-पस्तिशीतील हौशी चित्रकार. पुणेस्थित अमेरिकी-भारतीय नवऱ्यासह तिचा संसार सुरू झालाय. पण मनावर आणि आयुष्यावर ओझे आहे, ते स्मृतिभंशाचा आरंभ झालेल्या आईचे. जिने हातावरच्या फोडासारखे मुलीला कधीच जपले नाही. जिने लहानपणी आनंदाचा छोटासा क्षणही मिळू दिला नाही. उलट जिने लहरी स्वभावानुरूप संसार उधळून बुवा-बाबाचा नाद करीत तिच्या आयुष्याची फरपट केली! अशा आईबाबतच्या स्मृतिदंशांचा दस्तावेज या कथानकातून तयार होतो.

कादंबरी सुरू होते अंतराची आई तारा हिच्या स्मृती वजा होत असतानाही अंतराला तिच्याकडून मिळणाऱ्या अपमान आणि लज्जानुभवांच्या घटनांमधून. आयुष्यभर स्वैराचाराशिवाय कोणतीही गोष्ट करू न शकलेल्या आणि आत्मसुखापलीकडे विचार न करणाऱ्या या आईविषयीचा तिरस्कार अंतराच्या वाक्या-वाक्यांमधून प्रगट होत राहतो. याबाबत तिच्या शरीरावरच्या प्रत्येक भागाला फोडून काढण्याचीही इच्छा अंतराला होत राहते. तरीही या आजाराचा, त्यावरच्या औषधांचा परिणाम-दुष्परिणाम गूगलवरून अभ्यासत ती नवनव्या डॉक्टरांकडे तिला उपचारांसाठी घेऊन जाते. त्यानंतर सूड म्हणून तिने केलेल्या वाईट कृत्यांचा तपशील कागदांवर लिहून तिला वाचता येईल, अशा ठिकाणी घरात पेरून ठेवते.

कादंबरीत खऱ्या अर्थाने रंग भरायला लागतो, तो ताराच्या स्वैराचाराचे मासले समोर यायला लागतात तेव्हापासून. सत्तरच्या दशकात शालेय जीवनापासून पुण्यानजीक महामार्गावरील ढाब्यांवर बीअर ढोसून मुक्त जीवन जगू पाहणाऱ्या ताराचे कुटुंबाकडून मनाविरुद्ध लग्न लावून दिले जाते. आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित घरात नोकरचाकर दिमतीला असताना सासूच्या देखरेखीखाली रेडिओवर नावडती गाणी ऐकत दिवस व्यतीत करण्यात आणि संध्याकाळी आदर्श भारतीय गृहिणीचा मुखवटा धारण करीत नवऱ्याची वाट पाहण्यात कंटाळलेली तारा पुण्यातील जगप्रसिद्ध बाबाच्या आश्रमात सुख शोधण्याचा प्रयत्न करते. घर त्यागून आपल्या चिमुकल्या मुलीसह आश्रमवासी होते. तिथे बाबाच्या प्रेम-सेवेत मुलीला पूर्णपणे विसरून जाते. श्रद्धेने अमेरिकेतून आश्रमात दाखल झालेली कालीमाता नावाची दासी अंतराची काळजी घेते. निळ्या डोळ्यांची ही कालीमाता तिला आईहून अधिक महत्त्वाची वाटू लागते.

तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर बाबापासून मन भरलेली तारा आश्रमातूनही अंतराला घेऊन पळ काढते. घरात आणि सासरी थारा दिला जात नाही म्हणून क्लबबाहेरील भिकाऱ्यांच्या पंगतीत बसून आप्त-नातेवाईकांच्या इभ्रतीला आव्हान देते. ते बंद करून सासरची मंडळी तिला घरी नेतात. आर्थिक अडचणी सोडविण्याच्या मोबदल्यात घटस्फोटाचा पर्याय तिच्यासमोर ठेवतात. घटस्फोटानंतर पुन्हा घर हरवलेल्या अंतराला ताराच्या मुक्तछंदांचा जाच सहन करावा लागतो. रेझा नावाच्या भटक-भणंग कलाकाराशी उघड प्रेमव्यवहार सुरू होतो. माख्र्वेजच्या पुस्तकांतील उताऱ्यांसह भित्तिचित्रे काढणाऱ्या या कलाकारामुळे काही काळासाठी तारा पुन्हा आनंदी होते. पण अंतराचा एकटेपणा अधिक गडद होत जातो.

पुढे थोडे मोठे झाल्यावर मुंबईतील कला महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेली अंतरा पुण्यातून एकाएकी पळून गेलेल्या रेझाला शोधून काढते. तिथे आईची बंडखोरी अंगी बाणवत त्याच्याशी संगत धरते. ड्रग्ज, संभोग आणि मद्याची नशा यांचा पुरेसा आस्वाद घेतल्यावर शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात परतते. अंतराची वाईट जडणघडण तिला आईविषयी प्रचंड तिटकारा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे, याची जाणीव कादंबरीच्या आरंभापासून वाचकाला करून दिली जाते. पण पुढे केवळ आईला नामोहरम करण्याच्या ईर्षेतून अंतराही तिच्यासारखीच बनत चालल्याचे तपशील समोर यायला लागतात. विविध वर्षांच्या आकडय़ांचीच शीर्षके असलेल्या प्रकरणांतून अंतरा आणि तारा यांच्यातील संघर्ष स्पष्ट होत जातो. आईच्या प्रियकराला गटविण्याचे कर्म ती पार पाडतेच. पण खऱ्या वडिलांकडेही एक पुरुष म्हणून पाहायला लागते. लग्न झाल्यानंतर बरीच वर्षे मूल होऊ न देणारी अंतरा मातृत्व आल्यानंतर आपल्या मुलीला खिडकीतून दिसणाऱ्या मैदानात फेकून देण्याचाही विचार करताना दिसते.

कटू स्मृती, माय-लेकींमधील तीव्र विसंवाद हे कादंबरीचे मूलभूत घटक असले, तरी लग्नसंस्था, पारंपरिक भारतीय कुटुंबव्यवस्था, मातृत्व यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न दोशी यांनी केला आहे. काळाच्या आकलनासाठी येथे मुंबईतील दंगलीपासून ते जर्मन बेकरीवरील बॉम्बस्फोटाचे संदर्भ आलेले आहेत. पण ते तोंडदेखले आहेत. शहर-गावांच्या आणि घटनांच्या तपशिलांपेक्षा एका आईचे आपल्या मुलीशी असणारे संबंध यांच्यात विविध वर्षांच्या अंतरांनी कसे बदल होत जातात, याचे तपशील अत्यंत बारकाईने रंगविले आहेत.

मध्यमवर्गीय खुराडय़ातील जीवन जगणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेल्या बहुतांश भारतीय कादंबऱ्या वाचणाऱ्यांना ‘बण्र्ट शुगर’चा वाचनानुभव खूप वेगळा असेल. खरा आव्हानात्मक भाग हा इथले मातृ-विटंबना-सूक्त पचविण्याचा आहे. अवनी दोशी या आपल्या मुळांसह अमेरिकी असल्यामुळे अत्यंत तटस्थतेने त्यांना ते रचता आले. तुम्ही कितीही आधुनिक भारतीय लेखिकांचे साहित्य वाचले असले, तरी ‘बण्र्ट शुगर’मधील धाडसी विधानांतून चक्रावून जाण्याचीच शक्यता अधिक.

बुकरच्या लघुयादीमध्ये स्थान पटकावल्यानंतर वर्षांतील महत्त्वाच्या पुस्तकांत वर्णी लागलेले हे पुस्तक आणि लेखिका अवनी दोशी पुढल्या पडावात किती यशस्वी ठरतात, याचे कुतूहल पुढले काही दिवस भारतात तरी वाढत राहणार आहे.

pankaj.bhosale@expressindia.com

‘गर्ल इन व्हाइट कॉटन’

लेखिका : अवनी दोशी

प्रकाशक : फोर्थ इस्टेट इंडिया

पृष्ठे : २८८, किंमत : ५९९ रुपये