आधी यू टय़ूब मालिकेला लोकप्रियता; मग कादंबरी, पण तिलाही निराळी लोकप्रियता.. असा प्रवास एक पुस्तक करतं आहे. भयकथाअसूनही ती अमक्याच माध्यमात अधिक प्रभावी ठरली असं होत नाही, हे विशेष.. एका  उफराटय़ा माध्यमांतराची आणि त्या पुस्तकाची ही ओळख..

‘एमटीव्ही’मुळे १९९०च्या दशकात सर्वच बाबतीत शिगोशीग बंडखोरी भरलेली सुपरस्मार्ट पिढी निपजली. मात्र संगणकाच्या आणि त्याला पर्यायी गॅजेट्सच्या जन्मांतरामुळे, ती सुपरस्मार्ट पिढीही कालबा ठरवणारी ‘यू-टय़ूब बेबी’ पिढी विकसित झाली. २००५-२००७  या काळात रांगणाऱ्या या समाजमाध्यमाने पुढल्या दहा वर्षांत दोन शतकांपूर्वीच्या ब्रिटिशांच्या ‘साम्राज्यी’करणाच्या संकल्पनेलाही थिटे ठरविले. यू-टय़ूबने सेलेब्रिटीपणाची पारंपरिक संकल्पना संपुष्टात आणली. ‘टेस्ट टय़ूब बेबी’सारखी कृत्रिमरीत्या स्टारपद तयार करणारी वैश्विक फॅक्टरीच ‘यू-टय़ूब’च्या दृक्श्राव्य चकटफू माध्यमाद्वारे निर्माण झाली. सुरुवातीला आवडलेल्या गाणी, सिनेमा यांचा दुर्मीळ साठा सर्वाना पोहोचवण्याचा विडा उचललेल्या ‘यू-टय़ूब अपलोडकरां’नी नंतर वैयक्तिक माहिती प्रसाराचा सोस असणाऱ्यांना व्यासपीठ दिले. आज या माध्यमाची सक्षमता वाढत यू-टय़ूबचे सध्याचे स्वरूप हलता-बोलता विश्वकोश असे झाले आहे. ‘कोलावरी डी’पासून ‘गंग्नम स्टाइल’पर्यंत आणि गायक जस्टिन बिबरपासून सध्याचा यंग अ‍ॅडल्ट फिक्शन सम्राट जॉन ग्रीन या लेखकापर्यंत ‘व्हायरल’ घटकांची अनंताएवढी यादी तयार होईल. ‘यू-टय़ूब बेबी’ पिढीने नक्की काय काय केले, हा स्वतंत्ररीत्या अवघड पीएच.डी.चा विषय होऊ शकेल. बुकमार्कच्या वाचकांसाठी इथे मात्र या यू-टय़ूबने तयार केलेल्या ‘हॉण्टिंग ऑफ सनशाइन गर्ल’ या पुस्तकाची ओळख महत्त्वाची ठरेल. या कादंबरीच्या मुखपृष्ठावर यू-टय़ूबचा नुसता लोगोच नाही, तर या नावाने तेथे लोकप्रिय झालेल्या पेज मॅकेन्झीच्या दोन-चार मिनिटांच्या व्हीडिओ मालिकेचा आधार असल्याचे ठळक शब्दांत गोंदवले आहे.

साधारणत: होते काय, की एखाद्या कथा-कादंबरीचा मुद्रित आराखडा चित्रपटाचा किंवा मालिकेचा आधार होतो. या माध्यमांतराला शतकाचा इतिहास आहे. पण दृश्यमाध्यमातून मुद्रित माध्यमात रूपांतराची घटना विरळच. त्यातून ‘हॉण्टिंग ऑफ सनशाइन गर्ल’ ही नवतरुणांची (यंग अ‍ॅडल्ट) कादंबरी मालिका गाजत आहे. या मालिकेतील दुसरे पुस्तक या वर्षांत दाखल झाले असून, पुढील वर्षी तिसरा म्हणजे कदाचित शेवटचा भाग अपेक्षित आहे.

या कादंबरी मालिकेची निर्मिती यू-टय़ूबशिवाय पूर्णत: अशक्य होती. काही वर्षांपूर्वी रोजनिशीसारख्या व्यक्त होणाऱ्या ब्लॉगप्रमाणेच ‘व्लॉग (व्हिडीओ ब्लॉग)’ यू-टय़ूबद्वारे प्रसारित होण्यास सुरुवात झाली होती. त्या काळात पेज मॅकेन्झी या तरुणीने ‘सनशाइन’ हे टोपणनाव धारण करून छोटय़ा छोटय़ा घटनानोंदींचे व्हीडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. नवीन घरात आलेल्या या सनशाइनला आपल्या घरात भूत असल्याचा संशय होता. त्याचा पुरावा हाती लागावा यासाठी तिने व्हिडीओ शूटिंगचा आधार घेत आपल्या भयकल्पनांचे चित्रीकरण करायला सुरुवात केली. आई, मित्र-मैत्रीण या आप्तांनाच सहकलाकार बनवून सुरू झालेल्या भयनोंदींना यू-टय़ूबच्या व्यासपीठावर इतके कुतूहलप्रेमी दर्शक लाभले की प्रत्येक व्हिडीओची संख्या मोजताना आपल्याला कराव्या लागणाऱ्या ‘एकं-दहं-शतं’ या प्रकाराची कसोटी लागावी.

तर हॉलीवूडच्या बडय़ा कंपन्यांनी हे दशलक्ष, दशकोटी संख्येत पसंती मिळविणारे व्हीडिओ कथारूपात मांडण्यासाठी आणि त्याच्यावर चित्रपट बनविण्यासाठी पेज मॅकेन्झीच्या पायऱ्या झिजविल्या. त्यातून व्यावसायिक लेखकांचा ताफा हाताशी घेऊन तयार झालेली कादंबरी म्हणजे ‘हॉण्टिंग ऑफ सनशाइन गर्ल.’ आता दृश्य माध्यमातून लिखित माध्यमात येण्याचा उलटा प्रकार करूनही पुस्तकाचा दर्जा काही खालावला नाही. उलट या यू-टय़ूब बेबी कादंबरीचेही त्याच्या व्हीडिओंइतकेच स्वागत झाले.

कादंबरीला सुरुवात होते ती सनशाइनचे मोठय़ा शहरातून वॉशिंग्टनच्या उपनगरात होणाऱ्या स्थलांतरापासून. मुख्य परिचारिका म्हणून या शहरात एकमेव रुग्णालयात रुजू झालेल्या आईला प्रोत्साहन देण्यासाठी कुठलीही बंडखोरी न करता ही दत्तक सनशाइन सज्ज झालेली असते. ती नव्या शहराला गप्पपणे स्वीकारायचे ठरवते. दत्तक असलो, तरी आईवरील प्रेम खऱ्या मुलीइतकेच असल्याचा तिचा दावा असतो.

मात्र सुरुवातीच्या निवेदनातच, नवे घर पाहून ती काहीशी हादरून जाते. त्या घरात शिरण्याच्या क्षणापासूनच तिच्या मनात इथे काही तरी गडबड असल्याची शंका येते. या शंकेची, घरातील पहिल्याच रात्री ‘खात्री’ होते. तिला आपल्या घरामध्ये अमानवी शक्ती कार्यरत असल्याचे दाखले सापडू लागतात.

सुरुवातीला ती आपल्या आईला याबाबत सांगू पाहते. मात्र प्रत्येक गोष्ट तर्कावर तोलणारी सनशाइनची आई तिची खिल्ली उडविते. मग आपल्या कॅमेऱ्याद्वारे ती भुताचा पाठपुरावा घेण्यास आरंभ करते. मोबाइलवरून जुन्या शहरातील मैत्रिणीशी सल्लामसलत करीत, हायस्कूलमध्ये नवीच ओळख झालेल्या मित्राला पाठीशी ठेवत तिचा भुताचा माग सुरू होतो.

या भुताच्या शोधात अमानवी प्रसंगांची मालिका, गूढ, विचित्र आणि चिरपरिचित माणसांचा जथाच तिच्यासमोर उभा करतो. मग कादंबरी प्रचंड मोठा वेग घेऊ  लागते. स्वत:च्या जन्मापासूनच्या नवनव्या प्रश्नांची मालिका सनशाइनसमोर येते आणि एक एक प्रश्न उलगडताना नव्या मोठाल्या रहस्यांच्या गुंफा तिच्यासमोर खुल्या होऊ लागतात. यादरम्यान, भूतप्रेत उतरविणाऱ्या मांत्रिकापासून ते सतत गायब होऊन अचानक प्रगटणाऱ्या व्यक्ती, भूत की माणूस याची शंका यावी असे घटक आणि असल्याच प्रचंड अंधश्रद्ध समजुतींनी घेरलेल्या अमेरिकी खेडेगावातील क्रूर प्रथा-परंपरांचा परिचय व्हायला लागतो. सनशाइन या घरातल्या भुतांवर मात करता करता एका नव्याच रहस्याचा उलगडाही करण्याची किमया साधते.

एका बाजूला संशोधन आणि विज्ञान आणि एकूणच प्रगतीत पुढे असलेल्या अमेरिकेमध्ये अद्याप सर्व प्रकारच्या कथासाहित्याला योग्य प्रमाणात मान आहे. भूत, रहस्य आणि गुन्हे कथा खुपविकी पुस्तके बनून समोर येतात. अन् या खपाबाबत अन् त्यातील अंधश्रद्ध व्यक्तिरेखांबाबत, क्रूर प्रथांबाबत वाचताना कसलीही खडखड होताना दिसत नाही. सनशाइनमधील अतिमानवी शक्तींना पळविण्यासाठी वा त्यांच्या अस्तित्वावर चर्चा करण्यासाठी योजलेल्या सर्वच अंधश्रद्ध पात्रांना देखील त्यामुळे फॅण्टसीच्या ठोकताळ्यावर बसवता येते. यातील भूत-झपाटलेपण, भुताची झाडाझडती यांचे प्रसंग आज आपल्याकडे आदिम जमातींमध्येही कमी प्रमाणात होतील, असे आहेत. तरी या सगळ्यात सनशाइनचे पकडून ठेवणारे निवेदन आणि कथेचा रहस्योत्कट प्रवास या साऱ्या प्रकाराला स्वीकारत वाचनप्रवास अबाधित ठेवतो.

‘हॉण्टिंग ऑफ सनशाइन गर्ल’ कादंबरीवर नव्वदोत्तरी साहित्य आणि नव्या भयचित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. १९९९ साली ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ नामक चित्रपट आला होता. त्यात पडद्यावर प्रत्यक्ष भुताचे दर्शन न घडविता, न दिसणाऱ्या गोष्टींतून प्रेक्षकाच्या मनातील भयाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न प्रचंड यशस्वी झाला होता. तोच प्रकार पेज मॅकेन्झीने आपली व्हिडीओ मालिका सुरू करताना केलेला दिसतो. मात्र पुढे त्याला मिळणारा प्रतिसाद या एकूणच व्हिडीओ मालिकेला चांगल्या वळणावर नेऊन ठेवणारा होता. अन् त्याचे कादंबरीस्वरूप घडवताना पुन्हा पेज मॅकेन्झी आणि तिच्या सहकारी लेखकांनी नवकल्पनांची कसरत साधली आहे.

आजच्या घडीला लोकप्रिय असलेल्या रेन्बो रोवेल ते जॉन ग्रीन यांच्या यंग अ‍ॅडल्ट फिक्शनमध्ये येणाऱ्या चलाख भाषेचा येथे अंतर्भाव आहे. येथील नायिका जेन ऑस्टिनच्या प्राइड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस या कादंबरीची अट्टल भक्त आहे! जेन ऑस्टिनची गेल्या शतकातील संयत आणि ऐसपैस कथनशैली आणि आजच्या कादंबऱ्यांतील वेगवान घटनांचा अट्टहास या दोहोंचे मिश्रण या कादंबरीमध्ये झालेले आहे. यातील भूत-प्रेतांना पळविण्यासाठी केले जाणारे सोपस्कार, घरातील भूतबाधेचे प्रसंग वाचकाला प्रचंड भयरंजकता देणारे आहेत.

कोणताही ‘यशस्वी प्रयत्न’ हा पहिलेपणामुळे कौतुकास्पद ठरतो. यू-टय़ूबचे व्हायरल स्टार तयार करणारे सुगीचे दिवस असताना आलेल्या प्रत्येक नवकल्पनेला लोकांनी यू-टय़ूबवरून अक्षरश: उचलून धरले. कोलावरी डी या किंवा गंग्नम स्टाइल गीताची भाषा त्यांच्या देशाच्या सीमा ओलांडण्यामध्ये आड आली नाही; कारण ते तशा प्रकारचे पहिलेच प्रयत्न होते. त्यानंतर आज यू-टय़ूब चॅनल तयार करून जगभरात वकूब असूनही कित्येक गुणवंत हे प्रसिद्धी कफल्लक म्हणून केवळ नावापुरते यू-टय़ूबच्या संग्रहात उपलब्ध आहेत.

‘हॉण्टिंग ऑफ सनशाइन गर्ल’ हा यू-टय़ूबवरून पुस्तकरूपात आलेला निव्वळ पहिला प्रयत्न म्हणून कौतुकास्पद ठरत नाही. यू-टय़ूबवरील लोकप्रियतेच्या आधारावर पुस्तक हातोहात खपले नाही. त्यातील सशक्त भयमांडणी त्याला माध्यमांतरातून आल्याचे ठसे उमटवू देत नाही. ते स्वतंत्रपणे अभिजात भयकथांच्या पंगतीत शिरण्यासाठी उत्सुक असल्याच्या ताकदीने वाचकावर परिणाम करते. म्हणून नवकल्पनेच्या या प्रकाराची दोन्ही माध्यमरूपं ताडून पाहिल्यास ‘आनंददायी भीती’ हा अनुभव मात्र सारखाच असेल.

 

  • हॉण्टिंग ऑफ सनशाईन गर्ल
  • लेखिका : पेज मॅकेन्झी
  • प्रकाशक : वेन्स्टाईन बुक्स
  • पृष्ठे : २९६, किंमत : ८१० रुपये

 

– पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com

 

 

Story img Loader