भारतीय मध्यमवर्गाचा वसाहतकाळापासूनचा उदय, त्यात जन्मजात असलेले उच्चवर्णीयपणापासून आर्थिक अवलंबित्वापर्यंतचे प्रश्न, या वर्गातून ‘नागरी समाज’ बनण्याची प्रक्रिया असा विविधांगी अभ्यास करणाऱ्या ग्रंथाचे परिशीलनही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन भागांत येथे करीत आहोत. त्यापैकी हा पहिला भाग..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नव्वदीच्या दशकानंतर आणि विशेषत: जागतिकीकरणाच्या स्थिरीकरणानंतर मध्यमवर्गाची, त्यातील बदलांची चर्चा आपल्या विचारविश्वात सातत्याने चालू आहे. मध्यमवर्गाचे नेतृत्व, सामाजिक स्थान, राजकीय-सामाजिक भूमिका, मध्यमवर्गात होणारे बदल या मुद्दय़ांवर ही चर्चा सामान्यत: असते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उपलब्ध झालेल्या संधीमुळे मध्यमवर्गाचा आकार वाढला आहे. त्याचबरोबर या वर्गाची जीवनशैलीही डोळ्यांत भरण्याइतकी बदलली आहे, ही बाबदेखील चर्चेच्या मुळाशी आहे. याच्या जोडीला गेल्या चार-पाच वर्षांत मध्यमवर्ग राजकीयदृष्टय़ाही आक्रमक होताना दिसतो आहे. अण्णा हजारेंचे आंदोलन, निर्भया प्रकरण यात या वर्गाचा उद्दामपणाही प्रत्ययास आला. राज्यसंस्थेची जागा घेऊ पाहणारा ‘नागरी समाज’ हे त्याचे आक्रमक स्वरूपही त्या वेळी लक्षात आले. या साऱ्याच बाबी मध्यमवर्गाविषयीच्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या आहेत. सामाजिकशास्त्राच्या अभ्यासकांनीही या संदर्भात अलीकडे विशेष लेखन केलेले आहे. दीपंकर गुप्ता, आशुतोष वाष्र्णे, लीला फर्नाडिस, अविजीत पाठक, प्रणय बर्धन, सतीश देशपांडे, नीरज हातेकर ही यातील काही ठळक नावे. मराठीतही याविषयी डॉ. सुधा काळदाते, सुहास पळशीकर, वसंत पळशीकर आदींनी लिहिले आहेच. त्यात आता मोलाची भर पडली आहे ती सुरिंदर एस. जोधका व असीम प्रकाश या अभ्यासकांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या ‘द इंडियन मिडल क्लास’ या पुस्तकामुळे.

दोन कालखंड

वासाहतिक काळापासून ते आतापर्यंत- म्हणजे जवळजवळ २०० वर्षांतील- मध्यमवर्गाच्या प्रवासाचा चिकित्सक अभ्यास यानिमित्ताने लिहिला गेलेला आहे. हा केवळ इतिहास नाही, तर मध्यमवर्गातील स्थित्यंतराचा, बदलत्या भूमिकेचा हा लेखाजोखा आहे. एकूण सात प्रकरणांत विभागल्या गेलेल्या या पुस्तकात मध्यमवर्गाची व्याख्या, त्याची आरंभीची जडणघडण, राष्ट्रबांधणीतला त्याचा सहभाग – नेतृत्व, बदलत्या मध्यमवर्गाची नवी दृष्टी, मध्यमवर्गाचे स्वरूप, त्यातील वैविध्य, माध्यमांनी घडवलेले त्याचे विश्व, त्याच्यातील आंतर्विरोध, विस्कळीत तरीही वर्चस्ववादी असणारे त्याचे स्वरूप – या साऱ्याचा आढावा या चिकित्सक पुस्तकात विस्ताराने, संख्याशास्त्रीय पुराव्याने उभय लेखकांनी सादर केला आहे. समाजशास्त्रीयदृष्टय़ा या संदर्भात झालेल्या अभ्यासांचा व अहवालांचा वापरही या चिकित्सेसाठी लेखकद्वयांनी केला आहे. मध्यमवर्गाची चिकित्सा करताना या लेखकांनी दोन कालखंडांत त्याची विभागणी केली आहे. वासाहतिक काळापासून ते १९९० पर्यंतचा एक कालखंड आणि १९९० ते आजपर्यंतचा एक कालखंड. याचाच अर्थ जागतिकीकरणापूर्वीचा कालखंड व त्यानंतरचा कालखंड अशी विभागणी दिसते. वास्तविक ही विभागणी वासाहतिक काळ ते १९४७, १९४७ ते १९९० आणि १९९० नंतर अशी असायला हवी. तरीही लेखकांनी ‘सातत्य’ ही भूमिका ठेवून विभागणी दोन कालखंडांत केली आहे. १९९० पूर्वीचा व नंतरचा मध्यमवर्ग यात स्वरूपदृष्टय़ा आमूलाग्र फरक लेखकांना अधोरेखित करावयाचा असल्याने, तसेच वसाहतकाळ ते १९९० पर्यंतच्या मध्यमवर्गाच्या स्वरूपाचे ‘सातत्य’ही अधोरेखित करावयाचे असल्याने ही विभागणी त्यांनी दोन कालखंडांत केली आहे.

‘मध्यमवर्गा’ची व्याख्या

मध्यमवर्गाचे निकष कोणते? किंवा मध्यमवर्गीय कोणास म्हणावे याच्यावर  उभय लेखकांनी एक पूर्ण प्रकरण खर्च केले आहे. मध्यमवर्गाबाबत विचार करताना पडणारा कूटप्रश्न आहे तो ‘मध्यमवर्ग’ या संज्ञेचा काटेकोर अर्थ लावण्याचा. म्हटले तर वसंत पळशीकरांनी (१९९३) म्हटल्याप्रमाणे मध्यमवर्ग ही संज्ञा संदिग्ध आहे, पण समाजशास्त्रीय मांडणी करावयाची तर या संज्ञेचा काटेकोरपणे विचार करावाच लागतो. या पुस्तकात या दृष्टीतून मध्यमवर्ग ही संज्ञा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकद्वयांचे एक विधान फार मार्मिक आहे. भारतीय समाजात मध्यमवर्गीय असण्याला एक विशिष्ट अर्थ आहे व महत्त्वही आहे. या वर्गात न मोडणाऱ्या लोकांनाही आपण मध्यमवर्गीयांसारखे असावे असे वाटते व त्यांची धडपडही त्यासाठीच असते. यासाठी लेखकांनी एक निरीक्षणही नोंदवले आहे. मध्यमवर्गाच्या बाहेर असणाऱ्या समुदायाचे उत्पन्न जेमतेम असतानाही त्यांना आपली मुले महागडय़ा इंग्रजी शाळांत घालाविशी वाटतात, तसेच त्यांच्या राहणीमानातही मध्यमवर्गीयांचे अनुकरण दिसते. यातून या गटांची मध्यमवर्गीय होण्याची आकांक्षा प्रकट होते. मध्यमवर्गीय असणे वा म्हणवून घेणे हेही अनेकांना अर्थपूर्ण वाटते. अगदी पंडित नेहरूही यातून सुटले नाहीत. ‘I am, of course, a middle – class person’ असे नेहरूंचे उद्गार लेखकांनी यात नोंदवले आहेत. त्याचबरोबर लेखक हेही आवर्जून नोंदवतात, की १९५०-६० च्या काळात मध्यमवर्गीय असण्याला एक विशिष्ट अर्थ होता. आधुनिकतेकडे कल, औद्योगिक कामगार, शेतकरी वा जमीनदार यांच्यापेक्षा वेगळी मानसिक – बौद्धिक ठेवण, व्यापक व प्रामाणिक मनोवृत्ती, आर्थिकदृष्टय़ा प्रगल्भ विचार करणारा, स्वार्थाने प्रेरित न होणारा, अंथरूण पाहून पाय पसरणारा, जात-जमात-पुराणमतवाद यांच्यापासून बाजूला जाऊन सार्वजनिक जीवनामध्ये विवेक व वैज्ञानिक दृष्टीने वावरणारा, गुणवत्तेचा आदर करणारा- आग्रह धरणारा असा अर्थ मध्यमवर्ग या संज्ञेत अभिप्रेत होता. याचा अर्थ, ही एक व्याख्या लेखकांच्या मनामध्ये दिसते. परंतु या व्याख्येशिवाय मध्यमवर्ग या संज्ञेचे अनेक वेगळे पैलूही लेखकांनी मांडले आहेत. आर्थिक उत्पन्न, राहणीमान, सामाजिक प्रतिष्ठा या अंगांनीही लेखकांनी विस्तृत विचार केला आहे.

मार्क्‍स, वेबर व बोर्डियू

सैद्धांतिकदृष्टय़ा याबाबतचे विवेचन करताना लेखकांनी कार्ल मार्क्‍स, मॅक्स वेबर, अल्विन गोल्डनर, पोलरोज, राइट, अ‍ॅन्थनी गिडन्स आदींच्या भूमिकेचा विस्ताराने विचार केला आहे; पण लेखकांच्या एकंदर मांडणीवर मार्क्‍स व वेबर यांच्या भूमिकेचा प्रभाव आहे. याच ओघात त्यांनी मार्क्‍स व वेबर यांच्या याबाबतच्या मांडणीतील साम्य व भेदही दाखविला आहे. मार्क्‍स व वेबर या दोघांनाही मध्यमवर्ग ही औद्योगिक भांडवलशाही व मुक्त – बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था यांची निर्मिती आहे व त्या अर्थाने मध्यमवर्ग ही एक आर्थिक कोटी (कॅटॅगरी) आहे असे वाटते. मार्क्‍स मध्यमवर्गाच्या बहुविधतेला मान्य करतो, पण द्विवर्गीय रचनेवर भर देतो. वेबरचा ‘शिक्षित वर्ग’ (एज्युकेटेड क्लास) व मार्क्‍सचा ‘आयडियोलॉजिकल क्लास’ यांच्यात इथे साम्य दिसते. मॅक्स वेबरच्या विश्लेषणात ‘क्लास’ व ‘स्टेटस ग्रुप’ अशी विभागणी आहे. यांतील ‘वर्ग’ हा उत्पादन व्यवस्थेतून ठरतो, तर स्टेटस ग्रुप हे उपभोगाच्या पातळीवरून स्पष्ट होतात. शिवाय वेबर मार्क्‍सप्रमाणे समाजाची द्विध्रुवी विभागणीही मान्य करत नाही. म्हणूनच वेबरच्या म्हणण्याप्रमाणे, भांडवलशाहीच्या विकासाबरोबर पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारत जाईल व मार्क्‍सच्या म्हणण्याप्रमाणे, तो नाहीसा होणार नाही. हे सारे लक्षात घेता मध्यमवर्गही मार्क्‍स म्हणतो त्याप्रमाणे केवळ आर्थिक कोटी नाही तर त्याहून अधिक काही तरी आहे, ही वेबरची भूमिका लेखकांच्या पुढील विवेचनात गृहीत धरलेली दिसते व त्याच अंगाने मध्यमवर्ग या संज्ञेचा उलगडा लेखकांनी केला आहे. पिअर्स बोर्डियू या अभ्यासकाने ‘वर्ग’ या संज्ञेचे केलेले वेगळे विवेचनही लेखकांनी लक्षात घेतले आहे. म्हणूनच मार्क्‍स, वेबर व बोर्डियू या तिघांच्या विवेचनाचे संदर्भ या पुस्तकात दिसतात. मध्यमवर्ग या संज्ञेचा उलगडा करताना आर्थिक उत्पन्न, व्यवसाय, सामाजिक दर्जा, शिक्षण, जीवनशैली या साऱ्या घटकांबरोबरच उपभोग क्षमतेची पातळी हाही एक महत्त्वाचा निकष आहे व या निकषावरही नव्वदोत्तर मध्यमवर्गाचा विस्तार होतो आहे व स्वरूपही बदलते आहे, असे अलीकडे काही अभ्यासकांनी नोंदवले आहे. या ग्रंथाच्या लेखकांनीही उपभोग प्रमाणाचा तपशीलवार विचार करून हा एक प्रमुख निकष असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यामुळेच मध्यमवर्गाच्या व्याख्येचे कोडे सुटायला मदत झाली आहे.

मध्यमवर्गाचा उदय

मध्यमवर्गाच्या व्याख्येचा प्रश्न सोडवल्यावर लेखकद्वय मध्यमवर्गाच्या निर्मितीचा, उगमाचाही विस्तृत शोध घेतात. हा शोध घेताना युरोपातील व भारतीय मध्यमवर्गाच्या निर्मितीची प्रक्रिया याचा तुलनात्मक आढावाही घेतात. १७ व्या शतकापासून युरोपात झालेल्या स्थित्यंतरातून व्यक्ती सामाजिक श्रेणीबद्धतेतून व जाचातून मोकळी होत होती. करारात्मक संबंधाद्वारा बाजारपेठेवर आधारित भांडवली समाजाची ती घटक होऊ लागली होती. या प्रक्रियेत जे तीन स्तर निर्माण झाले, त्यातील सर्वात वरती स्वत:ची स्वतंत्र उत्पन्न साधने असणारे व तळाशी गरीब अशी विभागणी झाली. या विभागणीत मधल्या स्तरात मध्यमवर्ग निर्माण होत होता. इंग्लंडमधील १८३२ च्या सुधारणा कायद्याने तेथील मध्यमवर्गाला राजकीय प्रतिनिधित्व व राज्यसत्तेबाहेरील सार्वजनिक विश्वातही (नागरी समाजात) पुढारपण मिळाले. पब्लिक स्कूलचा विस्तार, औद्योगिकीकरण या गोष्टीही मध्यमवर्गाच्या विस्ताराला पूरक ठरल्या. या वर्गाचे उत्पन्न जसजसे वाढले तसतशी त्याची आर्थिक ताकदही वाढली. यातून आर्थिक उन्नती, सार्वजनिक जीवनातली नवी नैतिक मूल्ये, रीतीभाती व नवी जीवनशैली या आधारे हा मध्यमवर्ग ओळखला जाऊ लागला व तेथून पुढे याच निकषांवर सर्वत्रच मध्यमवर्ग ओळखला जाऊ लागला. विसाव्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धात युरोपात ‘कल्याणकारी राज्या’ची संकल्पना प्रसृत झाल्यावर शिक्षण, आरोग्य या सेवांचा विस्तार झाला, राज्यावलंबी रोजगार पद्धतीमुळे नोकरशाहीची वाढ, स्वतंत्र व्यावसायिकांचा उदय यांमुळे मध्यमवर्गाचे महत्त्व व विस्तार वाढला. या वर्गातून राजकीय नेतृत्वही पुढे येऊ लागले. कल्याणकारी राज्याचा व मध्यमवर्गनिर्मितीचा ऊहापोह करताना लेखकांनी नोंदवलेली दोन निरीक्षणे मार्मिक आहेत. एक म्हणजे, हा मध्यमवर्ग बाजारपेठेशिवाय राज्याच्या साहाय्याने विकसित होत होता. नागरिकत्वाचे वाढते हक्क त्याला सक्षम करत होते. दुसरे म्हणजे, या गटाचे रूपांतर नागरी समाजात होत होते. लेखकांच्या म्हणण्याप्रमाणे, जवळपास ९० % मध्यमवर्गाचे रूपांतर नागरी समाजात झाले होते आणि तेही बाजारपेठेच्या कक्षेबाहेर राहून कल्याणकारी राज्याच्या आधारे. या संदर्भात लेखकांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे (व तो भारतालाही लागू पडेल), की बाजारपेठेवर आधारित समाजाकडे या देशांची जेवढी वेगाने वाटचाल होईल त्या प्रमाणात मध्यमवर्गाची वाढ/आकार कमी होण्याचीही शक्यता आहे. इथे महत्त्वाचे हे लक्षात ठेवले पाहिजे, की युरोपीय देशांतील ही स्थित्यंतरे बव्हंशी स्वतंत्र देशांतील होती. लेखकांनी हे म्हटले नसले तरी ते गृहीत धरावे लागते. त्याशिवाय भारतीय मध्यमवर्गाच्या निर्मितीचे नीट विश्लेषण करता येणार नाही.

भारतीय मध्यमवर्ग

भारतीय मध्यमवर्गाची निर्मिती ही वसाहतकाळापासून सुरू होते. १९ व्या शतकात जवळपास सगळा भारत इंग्रजी राजवटीखाली आला व सर्वाना म्हणून काही समान गोष्टी होऊ लागल्या. भारतीय समाजात (वासाहतिक, खंडित) आधुनिकतेचा प्रवेश झाला व आधुनिकीकरणाचे नवे पर्व सुरू झाले. या संदर्भात, ब्रिटिश राजवट सरसकट प्रागतिक होती अशी आपल्याकडच्या काही विचारवंतांची धारणा होती, ती सरसकट खरी नव्हती अशी मीमांसा या पुस्तकात आली आहे आणि ती रास्तही आहे. अनेकदा ब्रिटिशांनी प्रचलित तत्कालीन समाजव्यवस्था व तिच्या संस्था कायम ठेवण्यासाठीही प्रोत्साहन दिले. कारण ब्रिटिश दुहेरी खेळ खेळत होते. सर्वच सामाजिक वर्ग एकाच वेळेला ब्रिटिशांविरोधात उभे राहणार नाहीत यासाठी ती घेतलेली काळजी होती; पण त्याचबरोबर ब्रिटिश राजवटीच्या भक्कम आधाराचीही गरज होती. ही गरज भागवण्यासाठी ‘मेकॉले’ उपयोगी पडला. रंगाने, रक्ताने, हाडामांसाने ‘भारतीय’ पण दृष्टिकोनाने ‘ब्रिटिश’ असा भारतीयांचा वर्ग नव्या इंग्रजी शिक्षणाने उभा केला. लेखकांनी दिलेल्या आकडेवारीप्रमाणे १८८० साली इंग्रजीशिक्षित भारतीयांची संख्या ५०,००० एवढी होती. यावरून आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा अंदाज यावा. इंग्रजी ही आता केवळ संपर्कभाषा नव्हती, ती ‘स्टेट्स’चीही भाषा झाली. ब्रिटिश राजवट आधीच्या सर्व राजवटींपेक्षा मूलत: वेगळी होती. एकाच वेळी तिने नवे ऐहिक (इंग्रजी) शिक्षण, नवे प्रशासन व नवी कायदेपद्धती लागू केली. त्याच वेळी शेतीव्यवस्था बाजारपेठेशी जोडणे, इथली पारंपरिक उद्योगव्यवस्था निकालात काढणे, औद्योगिकीकरणाला कमीत कमी प्रोत्साहन याही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या. यातील इंग्रजी शिक्षणाचा परिणाम मूलगामी झाला. वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, न्यायालये यांसारख्या गोष्टींच्या प्रसारातून एक नवी दृष्टीही निर्माण होत होती. परंपरेची चिकित्सा व नव्या व्यवस्थेचा विचारही सुरू झाला.

लेखकद्वयांनी न मांडलेली एक गोष्ट इथे विचारात घेतली पाहिजे, ती ही की, १८५७ च्या बंडाला इथल्या सुशिक्षित गटांचा पाठिंबा नव्हता, कारण त्यांचे हितसंबंध जुन्या राज्यव्यवस्थेत नव्हते, तर ते नव्या व्यवस्थेत होते. म्हणूनच या गटांना शिक्षण – प्रशासन यांत विशेष रस होता. जी नवे दालने भारतीयांना वसाहतकाळात उपलब्ध झाली, त्यातून नवे व्यवसाय व व्यावसायिकांचा जन्म झाला. वकील, शिक्षक, प्राध्यापक, कारकून, डॉक्टर, अभियंते, सल्लागार, व्यवस्थापक, प्रशासक अशा अनेक रूपांनी भारतीय मध्यमवर्ग ठळक होऊ लागला. हा वर्ग प्राय: उच्चवर्णीय होता याची लेखकांनी नोंद घेतली आहे. हा वर्ग पूर्वीच्या कारागीर, व्यापारी यांच्यापेक्षा वेगळा होता. त्याचे स्थान वेगळे होते. पूर्वीच्या मध्यमवर्गीय मानल्या जाणाऱ्या कारागीर, व्यापारी व इतर सेवा पुरवणाऱ्या गटांचे सामाजिक ‘रोल’ हे श्रेणीबद्ध व्यवस्थेशी जोडलेले होते. त्या संदर्भात या नव्या गटांचे रोल वेगळे तर होतेच, पण सत्ता- संपत्ती- प्रतिष्ठा या निकषांवर सक्षम करणारे होते. लेखकांनी म्हटल्याप्रमाणे, ‘मध्यमवर्गीय’ असण्याच्या प्रक्रियेची ही सुरुवात होती. हा मध्यमवर्ग एकसंध नव्हता. तो उच्चवर्णीय होता, पण त्यातील काही गट परंपरावादी होते. (ते क्षीण होते व राहिले) त्यातील धार्मिक – सामाजिक – राजकीय सुधारणावादी गटांचा सामान्यत: वरचष्मा राजकारण – समाजकारण – प्रशासनावर राहिला. या गटांनी निर्मिलेल्या नव्या संस्था, संघटना, सभा, परिषदा यांतून ‘अखिल भारतीयत्वा’चा आरंभ झाला. त्यातून भारत या प्राचीन संस्कृतीचे राष्ट्रात रूपांतरण सुरू झाले व ही प्रक्रिया जात-धर्मनिरपेक्ष पद्धतीने झाली. याचाच अर्थ, भारताच्या राष्ट्रीयत्वाची सुरुवात लोकशाही व धर्मनिरपेक्ष पायावर झाली होती आणि मध्यमवर्गाने ती पुढे नेली. लेखकांनी म्हटल्याप्रमाणे, आधुनिक ‘भारताची कल्पना’ (आयडिया ऑफ इंडिया) त्यातूनच निर्माण झाली. याच वर्गातून राजकीय नेतृत्व निर्माण झाले व स्वातंत्र्याची चळवळही मूळ धरू लागली. या साऱ्या बाबींच्या मुळाशी असणाऱ्या प्रबोधनाची व त्यातून सुरू झालेल्या नव्या संस्था – समाजांची दखलही लेखकांनी उचित अशी घेतली आहे. इथे अजून एका प्रक्रियेचा उल्लेख केला पाहिजे. भारतीय समाजात खासगी – सार्वजनिक अशा भेदांना सुरुवात झाली होती. त्यामुळे व्यक्तींचे खासगी विश्व वेगळे व सार्वजनिक वेगळे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात प्रागतिक असणारे अनेक जण खासगी विश्वात तडजोडवादी राहिले. नव्याने निर्माण झालेल्या या वर्गात एक दुभंगलेपण राहिले. या वर्गाची कोंडी स्त्री प्रश्न व अस्पृश्यता या मुद्दय़ांवर जास्त झाली. असे असूनही या वर्गाचा एकंदर दृष्टिकोन, धोरण हे पुढे नेणारेच राहिले. इंग्रजांच्या औद्योगिकीकरणविरोधी दृष्टिकोन व धोरणांमुळे उत्तरोत्तर या वर्गाची कुचंबणा होऊ लागली. त्यातच शेतीच्या दुरवस्थेमुळे शेतकरी समुदाय असंतुष्ट होता, त्याला आपल्या वासाहतिक शोषणाची जाणीव होत होती. यातूनच मध्यमवर्गाच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ मूळ धरू लागली. या साऱ्याचा आढावा घेताना लेखकद्वयांनी या मध्यमवर्गाने केलेल्या कामगिरीची दखल घेतली आहेच, शिवाय त्याच्या मर्यादाही अधोरेखित केल्या आहेत. या वर्गात दलित, आदिवासी, मुस्लीम, स्त्रिया या गटांची उपस्थिती अगदीच नगण्य होती याचीही नोंद केली आहे.

‘द इंडियन मिडल क्लास’

लेखक : सुरिंदर एस. जोधका / असीम प्रकाश

प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस

पृष्ठे : २३२, किंमत : २९५ रुपये

किशोर बेडकिहाळ kishorbedkihal@gmail.com