पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुस्तकांवरची पुस्तके ग्रंथप्रेमाला ‘वेडा’त रूपांतरित करण्याची भूमिका बजावतात आणि समाजात अधिकाधिक प्रमाणात असलेल्या पुस्तकघाण्या व्यक्तींपासून (चांगल्या अर्थी) तुटलेला समूह घडवतात. या समूहाचे प्रमाण ज्या प्रांतात जास्त, तिथे ‘ग्रंथसंस्कृतीला घरघर’, ‘वाचनालयांची परवड’, ‘पुस्तकांची दुकाने ओस’ आदी शब्दसमूह वृत्तमथळे होत नाहीत. अलीकडच्या काही दशकांत मराठीत पुस्तकांवरच्या पुस्तकांना जसे बरे दिवस आले, तशी समाजमाध्यमांत पुस्तकप्रेमाचा कैवार सजवून सांगण्याची थोडी चूष दिसू लागली. राज्याच्या कानाकोपऱ्यांत वाचणारा मूठभर का होईना असलेला वर्ग त्यामुळे एका साखळीत गुंफला गेला. दुर्लक्षित चांगल्या पुस्तकाची चर्चा झडून त्याला बऱ्यापैकी ‘लक्षित’ करण्यास हातभार लागला. हयातीत नाव न मिळालेल्या लेखकांची यथोचित वाचकांना कालपश्चात का होईना ओळख होऊ लागली. आंतरजालीय ग्रंथदालने सुरू झाली. या अपारंपरिक विक्रीकेंद्रांनी पुस्तक व्यवहारात घुसळण घडविली असली, तरी आपल्या राज्यातील सांप्रतकालीन वाचनस्थिती मूळच्या पुस्तकघाण्या मानसिकतेला फारशी बदलू शकली नाही. टाळेबंदीच्या वाचनसुपीक काळात ग्रंथ खरेदी-विक्री व्यवहारावर आलेल्या निर्बंधांनी नव्या पुस्तकांची वाट अडवून धरली आणि जुन्या पुस्तकांची जतनस्थळे असलेल्या वाचनालयांपर्यंत पोहोचण्याचे मार्गही बंद झाले. या दु:स्थितीत, ‘बुक्स ऑन बुक्स’ची उच्चभ्रू संकल्पना ज्या मुख्य धारेतील साहित्य, लेखक आणि वाचकांच्या कक्षेत येते त्यापलीकडच्या पुस्तकांविषयी समजून घेणे जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने उचित ठरेल.

इंग्रजी रहस्यकथेचा प्रांत हा समृद्ध असला, तरी त्यातील डझनभर नावे घेता येतील इतक्यांनाच लेखनकाळात पैसा व जागतिक प्रतिष्ठा मिळाली. इतर ढीगभर लेखकांना प्रसिद्धी व्यवसायातील राजकारणापासून अनेक अडचणींमुळे स्थानिक-प्रांतिक सीमांच्याच मर्यादा पडल्या. १९२० ते ५० पर्यंत अमेरिकी आणि ब्रिटिश पल्प मासिकांचा प्रसार साऱ्याच खंडांत सारखा होता. साठोत्तरीत ही मासिके आक्रसली, तरी हेर (डिटेक्टिव्ह), भय आणि चोर-पोलीसकथांची त्यातील निर्मिती ही अत्युच्च दर्जाची होती. विशेष म्हणजे, या कथांमध्येही पुस्तकप्रेमाचे वेडात रूपांतर होणाऱ्या व्यक्तिरेखाही दाखविण्यात आल्या होत्या. पण ‘बुक्स ऑन बुक्स’ लिहिणाऱ्या व वाचणाऱ्यांच्या पिढीने या कथांचा आस्वाद घेऊनही त्यांना केवळ रहस्यकथा म्हणून उल्लेखनीय दर्जा कधी दिला नाही. उदाहरणार्थ, लॉरेन्स ब्लॉक हा खूपविक्या लेखक म्हणून ओळखला जात असल्याने त्याच्या प्रसिद्ध मालिकेतील ‘द बर्गलर इन द लायब्ररी’ हे पुस्तक ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारात सुचविण्यास कुणी धजावले नाही. आपल्याकडील नारायण धारप यांच्या तुफान गाजलेल्या ‘अशोक समर्थ’चा ब्रिटिश पूर्वज असलेल्या ‘ल्युशियस लेफिंग’च्या कथांचा वाचक आजही मर्यादित आहे. जोसेफ पाईन ब्रेनन या अमेरिकी लेखकाची ही कल्पनानिर्मिती. शेरलॉक होम्ससारखा लंडनच्या काल्पनिक ‘सेव्हन ऑटम स्ट्रीट’वर राहणाऱ्या या अवलियाच्या कथा ‘द केसबुक ऑफ ल्युशियस लेफिंग’ नावाने संग्रहित झाल्या आहेत. यात भूतबाधेला नष्ट करणारा डिटेक्टिव्ह हा कथेचा मुख्य गाभा असला, तरी त्यात दुर्मीळ पुस्तकविक्री व्यवहाराच्या आणि ती मिळविण्याच्या धडपडीचा विस्ताराने समावेश आहे. ब्रेननच्या बऱ्याच भयकथा जगप्रसिद्ध आहेत. पण त्याचे हे पुस्तक कट्टर भयवाचकांतही गौरवाने मिरविले जात नाही.

या दोन उदाहरणांखेरीज, फक्त ग्रंथ व त्याचे जतनकेंद्र असलेल्या वाचनालयाला रहस्यकथांचा विषय बनविणाऱ्या जेम्स होल्डिंग याच्या ‘द लायब्ररी फझ’ या पुस्तक पोलिसाच्या कथा अगदी अलीकडच्या काळापर्यंत संग्रहित झाल्या नव्हत्या. हाल जॉन्सन हा यातला शेरलॉकीय गुणवैशिष्ट्ये असलेला पुस्तक-पोलीस त्यामुळे लेखकाच्या हयातीत (१९०७-१९९७) एलरी क्वीन्स मिस्ट्री मॅगझिन, माइक शाइन मिस्ट्री मॅगझिन, आल्फ्रेड हिचकॉक मिस्ट्री मॅगझिन आदी पल्प प्रकाशन उद्योगाच्या वाचकांमध्येच ज्ञात होता. गेल्या शतकातील रहस्यकथांमधील गुण हेरणाऱ्या प्रकाशकांनी अगदी पाच-सहा वर्षांपूर्वी या कथांना नवसंजीवनी दिली, त्यामुळे आज त्या एकत्रित वाचण्याची संधी निर्माण झाली आहे. ‘फझ’ ही संकल्पना आंग्लजगतात पोलिसांना शिवी म्हणून वापरली जाते. भेकड (वा अधिक स्पष्ट ‘पादरा पोलीस’) या अर्थाने ती ओळखली जाते. जेम्स होल्डिंग यांनी या शिवीचाच वापर करून ‘लायब्ररी फझ’ हे काल्पनिक पद तयार केले. आधी पोलीस दलात काम करताना भेदरट स्वभावामुळे तिथून उचलबांगडी झालेला व सार्वजनिक ग्रंथालयात पुस्तक-पोलीस म्हणून चिकटलेला होल्डिंगचा नायक हाल जॉन्सन याचे मुख्य काम वाचनालयातून घरी नेऊन बरेच दिवस थकविलेली पुस्तके परत आणण्याचे. स्मरणपत्रे आणि दूरध्वनी करूनही पुस्तक परत करण्याची तसदी न घेणाऱ्या चिकट वाचकांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारण्याचे. त्यासह विलंब शुल्क आकारून ते वाचनालयाच्या निधीत जमा करण्याचे. पुस्तकांचा प्रतिदिन विलंब शुल्क काही सेंट्समध्ये दिसत असला, तरी या विलंबित वेगातील वाचकांकडून कित्येक हजार डॉलर्स निधी वाचनालयाला मिळतो, असा हाल जॉन्सनचा दावा यात वाचायला मिळतो.

लोक पुस्तक घरी नेऊन वाचनालयात परत करायला विसरण्याची नमुनेदार उदाहरणे या कथांमधून झिरपलेली दिसतात. तसेच हाल जॉन्सनच्या वाचक-निरीक्षणांनी पानोपानी सर्वकाळात देशोदेशी वाचकांच्या सारख्याच विचित्र सवयी असल्याचे समोर यायला लागते. इथली लोकप्रिय पुस्तके हाही निव्वळ कल्पनाविलास आहे. ऐकलेल्याही न नावांच्या लेखक व ग्रंथांवर वाचकांच्या उड्या पडलेल्या दिसतात. पण पुस्तक आणि ते घरात दडपून वाचनालयाला कित्येक दिवस तोंड न दाखवणाऱ्यांमुळे हाल जॉन्सनसमोर उद््भवणारे प्रसंग एखाद्या रहस्यकारी गुन्ह््याला वाचा फोडतात. आपल्या वाचनालयातील पुुस्तकप्रेमी वाचकांची विभागणी त्याने विविध गटांत केलेली दिसते. ताज्या लोकप्रिय पुस्तकांना सतत पहिल्यांदा वाचण्याची इच्छा बाळगणारे वाचक, वाचनालयातून नेलेले दुर्मीळ पुस्तक हरविल्याचे सांगून आपले खासगी ग्रंथदालन सुसज्ज करणारे महाभाग, शृंगारिक पुस्तकांसाठीच वाचनालयाचा आधार घेणारे कामपिसाट, घराऐवजी दुकानात वा कामाच्या ठिकाणचा रिकामवेळ वाचनासाठी वापरणारे वेळसाधू या २० कथांमधून डोकावताना दिसतात. ‘लायब्ररी फझ’, ‘मोअर दॅन ए मीअर स्टोरीबुक’, ‘ए बुकमार्क’, ‘हीरो विथ हेडेक’, ‘स्टिल ए कॉप’, ‘द म्युटिलेटेड स्कॉलर’, ‘द बुक क्लू’, ‘द व्हेपर क्लू’, ‘द रिवॉर्ड’ अशी यातील काही कथांची शीर्षके. यातील एका गोष्टीत नायक हाल जॉन्सन थकलेले पुस्तक घेण्यासाठी श्रीमंताच्या घराच्या द्वारात एका सकाळी हजर होतो. तेथे तातडीने त्याला पुस्तके आणि विलंब शुल्क प्राप्त होतात. परतताना आपली यादी पडताळताना एक पुस्तक घरातच राहिल्याचे समजते. तो पुन्हा त्या घराचा दरवाजा ठोठावतो. तेव्हा एक बंदूकधारी दार उघडून त्याला बेशुद्ध करतो. थोड्या वेळाने जाग आल्यावर घरातील कत्र्या पुरुषाचे अपहरण झाल्याचे त्याला उमजते. हा कर्ता पुरुष बँकेतील अधिकारी असल्याचे लक्षात येताच संभाव्य दरोड्याची शक्यता तो पोलीस अधिकाऱ्याला फोन करून कळवतो. त्याच्या आडाख्यानुसार पोलीस गुन्हा घडण्यापूर्वीच दरोडेखोरांना ताब्यात घेतात आणि हाल जॉन्सनवर कौतुकाचा वर्षाव होतो. एका घरात पुस्तक मिळविण्यासाठी पोहोचेपर्यंत दरोडा घडून गेला असतो आणि पुस्तकाच्या आधारे हाल जॉन्सन पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. पुस्तकांच्या आत कप्पे कोरून विविध दुकानांतून मौल्यवान वस्तूंची चोरी करणारी टोळी या पुस्तक-पोलिसाची तीक्ष्ण नजर पकडून देते.

त्याच्या चाणाक्षपणाचा कळस कधी इतका होतो की, पुस्तकावर नोंदवून ठेवलेल्या सांकेतिक भाषेचा उलगडा होऊन अमली पदार्थांची शहरातील तस्करी उघड होते. वाचनालयातील अश्लील पुस्तके समाजातील सर्व स्तरांतील वाचक वाचत असल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होत असल्याचा दावा करत एक शास्त्रज्ञ या पुस्तकांच्या चोरीचा धडाकाच लावतो. हाल जॉन्सन जिवावर उदार होऊन या विक्षिप्त आणि स्वयंघोषित अश्लीलमार्तंडाशी सामना कसा करतो, अशी अनेक प्रकरणे जेम्स होल्डिंगच्या लेखन-कर्तुकीचा नमुना दर्शवितात. एका कथेत, हत्येपूर्वी तरुणाने पुस्तकाच्या आत दडवून ठेवलेल्या रहस्याच्या छोट्या तुकड्यातून खुन्याचा मागोवा घेतला जातो.

प्रत्येक कथेत चढ्या भाजणीचे रहस्य आहे, अन् उकलीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पुस्तक कारणीभूत ठरले आहे. एलन थॉमस या वाचनालयात काम करणाऱ्या तरुणीला हाल जॉन्सनचा लग्नाचा पाक्षिक प्रस्ताव आणि रॅण्डल या खरोखरच्या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी घेऊन हाल याचे गुन्हे उकलणीचे प्रयोग चालतात. या रॅण्डलच्या हाताखालीच हालने पूर्वी पोलीस दलात काम केलेले असते. पण त्याच्या धाडसाला खरी धार पुस्तक-पोलीस बनल्यानंतरच पाहायला मिळते. रहस्य आणि ग्रंथ या घटकांचे हे अनोखे व एकमेव उदाहरण आहे. ज्याचे वाचन पुस्तकांवरची पुस्तके अनुभवत वरच्या स्तरावर असल्याच्या सामूहिक भ्रमाला जराही बाधा आणत नाही.

pankaj.bhosale@expressindia.com