अभिजीत रणदिवे

१९४० मधलं पर्यायी वास्तव मांडणारी २००४ ची एखादी कादंबरी वाचून ‘तेव्हा असंही घडू शकलं असतं’ असं वाटलं तर ती यशस्वी म्हणता येईलच; पण १९४० च्या वास्तवाचं २००४ च्या वास्तवाशी साधर्म्य ती दाखवून देत असेल तर? आणि २०२० मध्येही जर आताचं वास्तव त्यात दिसू लागलं तर?

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

८ मे २०२० ला दोन वेगवेगळ्या बातम्या आल्या. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी नाझींचा पाडाव केला त्याला ७५ वर्ष झाली म्हणून (जर्मनीसह) युरोप तो प्रसंग साजरा करत होता. दुसरी बातमी संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांची होती : करोनासोबतच जगभरात द्वेषाची त्सुनामी आली आहे; कुणाला तरी बळीचा बकरा बनवून, त्यांच्याविषयी द्वेष आणि भय उत्पन्न करून समाजात तेढ पसरवली जाते आहे; हे थांबवायला हवं, असं ते म्हणाले.

सद्य परिस्थिती समजून घेण्यासाठी इतिहासातल्या घटनांकडे नव्यानं पाहणं कधी कधी चांगलं असतं. दर वेळी तो प्रत्यक्षातला इतिहासच हवा असं मात्र नाही. ‘असं घडलं असतं तर?’ असं विचारत पर्यायी इतिहास मांडणाऱ्या कथाकादंबऱ्याही (अल्टरनेटिव्ह हिस्टॉरिकल फिक्शन) त्यासाठी उपयोगी पडू शकतात. वास्तव आणि कल्पिताची बेमालूम सरमिसळ करत असं साहित्य तत्कालीन वास्तवाचे वेगळे पदर उलगडून दाखवू शकतं. उदाहरणार्थ, १९४० मधलं पर्यायी वास्तव मांडणारी २००४ ची एखादी कादंबरी वाचून ‘तेव्हा असंही घडू शकलं असतं’ असं वाटलं तर ती यशस्वी म्हणता येईलच; पण १९४० च्या वास्तवाचं २००४ च्या वास्तवाशी साधर्म्य ती दाखवून देत असेल तर? आणि २०२० मध्येही जर आताचं वास्तव त्यात दिसू लागलं (आणि लेखक मात्र कधीच मरून गेलाय!) तर त्याला काय म्हणावं?

विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या अमेरिकी लेखकांपैकी एक फिलिप रॉथ याच्या ‘द प्लॉट अगेन्स्ट अमेरिका’ (२००४) या कादंबरीबाबत सध्या असं होताना दिसतंय. कादंबरीत लहानगा फिलिप रॉथ १९४० च्या अमेरिकेतल्या आपल्या बालपणीची गोष्ट सांगतो. न्यू जर्सीमधल्या न्यूअर्क शहरातल्या ज्यू वस्तीतले आपल्या लहानपणाचे खरे तपशील रॉथनं त्यात भरले आहेत. त्याचे आई-वडील-भाऊ यांचीही खरी नावं वापरून तो जणू आपल्याच कुटुंबाची गोष्ट सांगतो.

एकीकडे महायुद्ध सुरू आहे. दोस्त राष्ट्रांच्या बाजूनं अमेरिकेनं युद्धात उतरावं असं राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट म्हणताहेत. मात्र, सगळ्या अमेरिकनांना हे मान्य नाही. चार्ल्स लिंडबर्ग हा विख्यात वैमानिक त्यांपैकी एक आहे. युद्धात ब्रिटिश आणि ज्यू होरपळताहेत. अशा वेळी रूझवेल्ट त्यांचं लांगूलचालन करण्याच्या नादात, अमेरिकेच्या हिताविरुद्ध आपल्याला युद्धात लोटतोय, अशा अर्थाचं भाषण लिंडबर्ग करतो.

लिंडबर्ग मुळात कोण होता? १९२७ साली विमानप्रवासावर अनेक तांत्रिक मर्यादा असण्याच्या काळात न्यू यॉर्क-पॅरिस एकल विमानप्रवास करून तो मोठा हिरो झाला होता. सेलेब्रिटी असल्यामुळे त्याचं वक्तव्य गाजलं. पण त्यामागे वेगळे संदर्भही होते. लिंडबर्ग नाझींचा पाठीराखा (कदाचित हस्तकही) होता अशी कुजबुज होती. त्यामागे कारणही तसंच होतं : हिटलरच्या वायुसेनेचा तत्कालीन प्रमुख कुख्यात मार्शल गोअिरगच्या हस्ते १९३८ मध्ये लिंडबर्गनं एक पुरस्कार स्वीकारला होता. ज्यूंवरचे अत्याचार आणि महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिंडबर्गनं अवॉर्डवापसी करावी असा सूर अमेरिकेत उमटत होता, पण लिंडबर्गनं त्याला नकार दिला. ‘आपण आपलं पाहावं; उर्वरित जगाच्या फंदात पडू नये’ अशा विचारांचा (आयसोलेशनिस्ट) तो होता. आपण एका वेगळ्या खंडात राहतो; आपला युरोपशी संबंध नाही; आपण आपलं भविष्य स्वतंत्रपणे घडवावं; जगाची आपल्याला गरज नाही- असा तर्क त्यामागे होता. विशेषत: पर्ल हार्बरवरच्या जपानी हल्ल्याआधी असा विचार करणारा लिंडबर्ग एकटा निश्चितच नव्हता.

हा झाला ऐतिहासिक तपशील. इथून कादंबरी पर्यायी इतिहासात उडी घेते. दोनदा राष्ट्राध्यक्ष झालेले डेमोक्रॅट रूझवेल्ट १९४० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा उभे राहिले आणि निवडून आले हा इतिहास आहे; पण रॉथच्या पर्यायी इतिहासात रिपब्लिकन पक्षातर्फे लिंडबर्ग उभा राहतो आणि निवडूनही येतो. राष्ट्राध्यक्ष लिंडबर्गच्या अमेरिकेत रॉथ कुटुंबाच्या आणि अमेरिकी ज्यूंच्या नशिबी काय भोग येतात, हा कादंबरीचा मुख्य कथाभाग आहे.

रॉथ कुटुंब सश्रद्ध आहे, पण कडवं नाही. ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी मागणारे त्या वेळी अस्तित्वात होते; पण दहा वर्षांच्या फिलिपच्या आईवडिलांच्या मनाला अमेरिका सोडून जाण्याचा विचारही शिवलेला नाही. आपली स्वतंत्र ओळख टिकवत मिश्र वंशाच्या आणि संस्कृतीच्या ‘अमेरिकेच्या कल्पने’शी एकरूप झालेलं हे कुटुंब आहे. विमा कंपनीत नोकरी करत स्वत:चं घर घ्यायचं ही वडिलांची आकांक्षा आहे. झटून काम करण्याची आणि चांगल्या उद्यासाठी आज कळ सोसण्याची तयारी असेल तर अमेरिकेत तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे, या ‘अमेरिकी स्वप्ना’चा त्यांनी स्वीकार केलेला आहे. परंतु अमेरिका त्यांच्याकडे कशी पाहते आहे?

१९४० मधल्या अमेरिकी जनतेसाठी ज्यू ‘बाहेरचे’ होते. एक तर ते नुकतेच ‘नव्या जगा’त आले होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला युरोपमध्ये ज्यूविद्वेष वाढू लागला तेव्हा अमेरिकेत येणाऱ्या ज्यूंचं प्रमाण वाढत गेलं. कादंबरीतल्या (आणि प्रत्यक्षातल्याही) फिलिप रॉथचे आजी-आजोबा अमेरिकेबाहेरून आले होते. अमेरिकी लोकांसाठी त्यांची भाषा, वंश, अन्न आणि देव वेगळे होते. फिलिपचे आईवडील अमेरिकेत जन्मलेल्या पहिल्या पिढीतले होते. ज्यूंचे लोंढे थांबवण्यासाठी १९२४ ला इमिग्रेशन कायदा बदलण्यात आला. त्यामुळे ज्यू अमेरिकेत येण्याचं प्रमाण आधीपेक्षा अंदाजे ८०-९० टक्के घटलं. हिटलरच्या न्यूरेंबर्ग कायद्यांनुसार (१९३५) ज्यूविद्वेषाला जर्मनीत सरकारमान्यता मिळाल्यावरही अमेरिकी कायदा तसाच राहिला.

लिंडबर्गला विरोध करावा की नियतीचा असाही एक डाव म्हणून मान्य करावं, याविषयी अमेरिकी ज्यूंमध्ये संभ्रम असल्याचं रॉथ दाखवतो. त्यासाठी वेगवेगळ्या छटांच्या व्यक्तिरेखा तो रंगवतो. उदा. सश्रद्ध-अश्रद्ध, शांत-चिडखोर, कायदे पाळणारे-न पाळणारे, घरातल्या घरात वादविवाद घालणारे-प्रत्यक्ष कृती करणारे. यातले बरेचसे भांडवलशाही अमेरिकी व्यवस्थेचा आधार घेत जगणारे आहेत. ‘जोवर माझ्या धंद्यात बरकत आहे, तोवर मला काय फरक पडतो?’ असा पवित्रा घेऊन कित्येक अ-राजकीय आहेत. लिंडबर्ग येईपर्यंत किरकोळ वंशभेद वगळता अमेरिका त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असते, पण लिंडबर्गची अमेरिका तापू लागते. ‘कम्युनिस्ट’/ ‘देशद्रोही’ अशी लेबलं ज्यूंवर लादली जातात. आता तुम्ही कोणत्याही छटेचे ज्यू असा- ‘आम्ही आधी अमेरिकी आहोत आणि मग ज्यू’ हे म्हणण्याची शक्यताच तुमच्यासाठी अस्तित्वात नाही, हे हळूहळू रॉथ कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिलं जातं.

आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेत तुम्ही समूहापासून वेगळं, एक व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे उभं राहणं अपेक्षित असतं. मात्र, आपण एका अल्पसंख्य समाजाचाही भाग आहोत ही अस्मिता (जाज्ज्वल्य अभिमान नव्हे) जपणं आणि व्यक्ती म्हणून उभं राहणं यांत एक द्वंद्व आहे. आपल्याच कुटुंबाची गोष्ट सांगतोय, असं भासवत रॉथ हे द्वंद्व उत्तम प्रकारे दाखवतो.

मुख्य प्रवाहातले (गोरे ख्रिस्ती) अमेरिकीही वेगवेगळ्या छटेत रॉथ रंगवतो. हेन्री फोर्ड हे त्यातलं ऐतिहासिक उदाहरण. प्रयोगशील उद्योजक म्हणून फोर्ड जगविख्यात आहे; तो ज्यूद्वेष्टाही होता हा तपशील मात्र कित्येकांना माहीत नसतो. कादंबरीत तो अमेरिकेचा गृहमंत्री होतो. पुढे, म्हणजे १९५० च्या दशकात, डाव्या विचारांचे लोक देशद्रोही असण्याच्या संशयापोटी चार्ली चॅप्लिनसारख्यांवर पाळत ठेवल्यामुळे कुप्रसिद्ध झालेला आणि नंतर मार्टिन ल्यूथर किंगपासून कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेकांना त्रास देणारा जे. एडगर हूव्हर तर तेव्हा खरोखरीचाच एफबीआयप्रमुख होता.

लहानग्या फिलिपच्या बापाचीही ‘अमेरिकी स्वप्ना’वर श्रद्धा असते आणि फोर्डसारखा बलाढय़ भांडवलदाराचीही; पण ‘गण’राज्यात दोघांनाही सन्मानानं जगता येण्यासाठी समता, बंधुभाव आणि सर्वसमावेशकताही गरजेची असते. लिंडबर्ग- फोर्ड- हूव्हरसारख्यांचा मात्र अशा मूल्यांवर विश्वास नसतो. त्यामुळे ते जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा गणराज्यासमोरच एक भयस्वप्न उभं ठाकतं. (अर्थात, रॉथरचित भयस्वप्नात माणुसकीवर विश्वास असलेले काही गोरेही भेटतात आणि आशावाद जागा ठेवला जातो.)

लोकशाहीचे सगळे स्तंभ जागच्या जागी दिसत असले तरीही लोकशाही नाजूक अवस्थेत असू शकते; तिला आपण गृहीत धरून चालत नाही. लोकमताचा आदर ठेवत राज्यघटनेतली मूल्यं अबाधित ठेवण्याची काळजी लोकशाहीच्या सर्व स्तंभांना रोजच्या रोज घ्यावी लागते. एकदा स्वातंत्र्य मिळवून किंवा निवडणुका जिंकून थांबता येत नाही. थोडं बेसावध राहताच लोकशाहीचे शत्रू वरचढ ठरू शकतात. आपण सगळे समान आहोत आणि आपल्याहून वेगळ्या ‘इतरां’विषयीही आपण बंधुभावच बाळगतो अशी शपथ घेणं पुरेसं नसतं. राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ते रोजच्या रोज अमलात आणावं लागतं. तसं होण्यासाठी राष्ट्रप्रमुखानंही आपण ती मूल्यं पाळतो हे आपल्या उक्तीतून आणि कृतीतून दाखवून देण्याची गरज असते. सरकारमध्ये सहभागी इतर घटकांकडून जर त्यापेक्षा वेगळं वर्तन होत असेल तर त्यांनाही तंबी देण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. ‘कायद्याचं राज्य’ असं म्हणताना त्यात हे अभिप्रेत असतं, की कायदा अमलात आणणारी यंत्रणा राज्यघटनेनं नागरिकांना दिलेले हक्क मान्य करते. कायदा आणि सुव्यवस्था राखणारे, न्यायप्रदान करणारे लोक ज्यांच्याविरोधात असतात, त्यांच्यासाठी ते राज्य कायद्याचं राहत नाही.

रॉथ कादंबरीत हळूहळू लोकशाहीचा असा ऱ्हास घडताना दाखवतो. बहुसंख्याकांतले अतिरेकी विचारांचे लोक नेहमीच संख्येनं थोडे असतात; पण जेव्हा राज्याकडूनच असहिष्णुतेला चिथावणी दिली जात असल्याची त्यांची खात्री पटते, तेव्हा ते त्या परिस्थितीचा गैरफायदा उठवू लागतात. बघता बघता कादंबरीत याचा प्रत्यय येऊ लागतो आणि जाळपोळ, हिंसा आणि दंगली होऊ लागतात. इतिहास घडत असतो आणि उकळू लागलेल्या पाण्यातल्या बेडकाप्रमाणे परिस्थितीपोटी तुम्ही त्यात असता, तेव्हा काही तरी कृती करूनच तुम्ही आधी आपली प्रतिष्ठा आणि मग आपलं अस्तित्व टिकवू शकता. कादंबरी संपते तेव्हा हे तुमच्या मनावर बिंबवून रॉथ तुम्हाला भयस्वप्नातून जागं झाल्याचा अनुभव देतो.

लोकशाही नेहमीच नाजूक असते आणि ती जपावी लागते हे रॉथ २००४ साली सांगू पाहत होता. आणि आताची परिस्थिती कशी आहे? आता काही महायुद्ध चालू नाही, पण अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्षही अमेरिकेला इतर जगापासून वेगळं पाडत आहेत. पॅरिसचा हवामानविषयक करार नाकारणं असो की ताज्या करोनासंकटात जागतिक आरोग्य संघटनेतून अंग काढणं असो; जगाशी अमेरिकेला देणंघेणं नाही, असंच ट्रम्प सातत्यानं दाखवत आहेत. शिवाय, ‘बाहेरच्या’ किंवा ‘इतर’ लोकांविरोधात बहुसंख्यांचं जनमत पद्धतशीरपणे तयार करूनच ट्रम्प यांनी आपला जनाधार मिळवला आणि राखला आहे. गोऱ्या, अल्पशिक्षित, निम्न आर्थिक गटातल्या मतदाराच्या मनातला वंशविद्वेष आणि बाहेरच्यांविषयीची भीती चोंबाळत त्यांनी २०१६ ची निवडणूक जिंकली. रॉथच्या कादंबरीच्या अखेरीला अनपेक्षित कलाटणी मिळून मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जातात. २०२० तर निवडणुकांचं वर्षच आहे.

कदाचित त्या मुहूर्तावरच काही महिन्यांपूर्वी ‘द प्लॉट अगेन्स्ट अमेरिका’वर आधारित एक मालिका प्रदर्शित झाली. (भारतातही ती उपलब्ध आहे.) २०२० साली मालिका पाहताना अमेरिकेतल्या सध्याच्या परिस्थितीची आठवण यावी अशीच तिची मांडणी आहे. हे हेतुपुरस्सरच असेल, पण मालिकेच्या निर्मात्यांना स्वप्नातही वाटलं नसेल अशा घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूवरून जो जनक्षोभ उसळला, त्यामागे शेकडो वर्षांचा वंशविद्वेषाचा इतिहास आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही ट्रम्प मतांचं राजकारण करताहेत आणि ध्रुवीकरणातून आपल्या मतदाराला घट्ट धरून ठेवू पाहत आहेत. जणू कादंबरीतला पर्यायी इतिहास प्रत्यक्षातही येतोय असं वाटू लागलं आहे. यातून एक भयस्वप्न खरं ठरणार की गणराज्य अधिक बळकट होणार ते काळच ठरवेल.

rabhijeet@gmail.com

 

Story img Loader