अभ्यासू, संशोधकवृत्तीने लिहिलेले व एकही चित्र नसलेले हे पुस्तक ‘पोनरेग्राफी उद्योगा’ची साद्यंत माहिती देतेच, शिवाय पोनरेग्राफीच्या आहारी गेलेल्या प्रेक्षकांच्या ‘व्यसनी’ मानसिकतेची चिकित्साही करते..

ज्या गोष्टी सारेच सहज जाणतात आणि ज्या जाणिवेची जाहीर वाच्यता अशिष्ट आणि अश्लाघ्य मानली जाते, त्या ‘पोर्नोग्राफी’बाबत या उद्योगाची आकडे-अहवालांची अ-चित्र माहिती का वाचायची, असा प्रश्न ‘द पोर्नोग्राफी इण्डस्ट्री : व्हॉट एव्हरीवन नीड्स टू नो’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून कुणालाही पडू शकतो. कारण केवळ भारताच्या दृष्टीने पाहायला गेलो तर अमेरिका-युरोपातून तयार झालेल्या अर्वाचीन पोर्नोग्राफीचा प्रचार आणि प्रसार भूमिगत मार्गाने ८०च्या दशकात झाला. जागतिकीकरणानंतर परदेशी गोष्टी सर्वाधिक उघड मिळू लागल्या. पण त्याआधीच व्हीएचएसद्वारे पोर्नोग्राफी व्हिडीओ पार्लर्समधून भारतात सुखाने नांदत होती.  १९८०-९०च्या दशकांत घरात व्हीसीपी-व्हीसीआर असणे हे भूषणावह होतेच, पण ते छुपी पोर्नमौज पुरविण्यासाठी महत्त्वाचे वाटत होते. जागतिकीकरण, संगणकीकरण आणि नंतर इंटरनेटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकेतील फर्नाडो व्हॅलीमध्ये घडणाऱ्या उद्योगाचा नजरभोक्तावर्ग भारतामध्येच सर्वाधिक आहे. इंटरनेटचे एक तृतीयांश वापरकर्ते पोर्नध्यास घेतात. बीबीसी, सीएनएन या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाहून अधिक ‘व्हिजिटर्स’ संख्या काही कामस्थळांना असते. भारत हा असा देश आहे, जेथील अधिक जाणकार लोकांत वात्स्यायनाने लिहिलेल्या ‘कामसूत्रा’बद्दल अभिमान आहे आणि त्याचबरोबर पोर्नसाइट्सवर लादलेल्या बंदीला सर्व स्तरांतून विरोध करून ती मागे घेण्यास लावण्याची धमक आहे. भारतीय सिनेमाला सोज्वळतेचा इतिहास असला, तरी ‘सनी लिओनी’सारखी पोर्न कलाकार भारतीय फिल्मस्टार म्हणून आबालवृद्धांकडून खपवून घेतली जाऊ शकते. विधानसभेतील लोकप्रतिनिधी कामकाज सुरू असताना पोर्न पाहण्यामुळे निलंबित होतात आणि शहर-गावांची सीमा पोर्न पाहण्याबाबत मोबाइल इंटरनेटमुळे पुसली गेली आहे. अहवाल आकडेवारीनुसार यच्चयावत पोर्नस्थळांच्या वापरकर्त्यां राष्ट्रांत भारत आघाडीवर आहे. पोर्न पाहण्यासाठी डाऊनलोडिंग, स्ट्रिमिंगमध्ये मध्यमवयीन, तरुणतुर्क, वयोवृद्ध स्त्री-पुरुष समानता सारखीच आढळते. मायाजालामुळे माहितीचा स्फोट वगैरे आणि ज्ञानाची कवाडे वगैरे अल्पांश वर्गासाठीच उपलब्ध झाली. पण वैषयिक ज्ञानाचा दृक्श्राव्य स्फोट सर्व आर्थिक-सामाजिक स्तरांनी आवर्जून अजमावून पाहिला. तर अशा पोर्नस्मार्ट भारतीयांना ‘द पोर्नोग्राफी इण्डस्ट्री : व्हॉट एव्हरीवन नीड्स टू नो’ हे शीरा टॅरण्ट लिखित पुस्तक भलामोठा माहितीऐवज देऊ शकेल; कारण उघड दांभिकतेचा अंगरखा चढवून छुपेपणाने या क्षेत्राच्या अवलोकनात रमणाऱ्या बहुतांशांसाठी या वैश्विक उद्योगातील यच्चयावत सर्वच बाबींवर प्रकाश पाडला आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग

अत्यंत गंभीर आणि गडदपणे या क्षेत्राचे सामाजिक, आर्थिक निकषांवर संशोधन या पुस्तकात आहे. वृत्तपत्र, शोध पत्रकारिता, संस्थांचे अहवाल, अनेक खटले, स्त्रीवादी चळवळ, आर्थिक मंदीच्या काळातील घटना, मानवी वर्तणुकीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मानवी इतिहासातील दाखले आणि किती तरी बाजूंनी या विदुषीने ‘पोर्नोग्राफी’चा सूक्ष्मलक्ष्यी अभ्यास केला आहे. यातल्या नोंदींतून लेखिकेने अमेरिका या देशापुरत्या मानवी वर्तणुकीची विस्तृत माहिती समोर आणली असली, तरी या उद्योगाची पाळेमुळे ग्राहक अथवा नजरभोक्त्यांच्या स्वरूपात साऱ्याच खंडांत पसरली असल्याने ती जगासाठी लागू होणारी आहे.

पुस्तकाला सुरुवात होते, एका खटल्यामुळे ‘पोर्नोग्राफी’ची व्याख्या तयार होण्यातून. पाहणाऱ्याला कामोद्दिपीत करणाऱ्या छायाचित्र, मजकूर, मासिक आणि दृश्यीय घटकांना पोर्नोग्राफीमध्ये सामावले गेले. ग्रीकांकडून ‘पोर्नो’ म्हणजे वारांगना आणि ‘ग्राफोस’ म्हणजे वर्णन हे प्राचीन काळात वापरले जाणारे शब्द मध्ययुगात वेगळ्या अर्थाने वापरले गेले आणि आज त्याची व्याप्ती खूपच भिन्न स्वरूपात दिसते, यावर लेखिकेने मधल्या काळात त्याच्या वापरावर झालेला खल आणि खटल्यांचा आधार घेतला आहे. ‘पोर्नोग्राफी सुरू कधी झाली’ इथपासून तंत्रज्ञानाने तिचा विकास कसा केला, विसाव्या शतकात चित्रपट उद्योगाला समांतर भूमिगतरीत्या या उद्योगाची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली. त्यास युद्ध, गरिबी आणि मानवी गरज कशी कारणीभूत ठरली याचा धावता आढावा आहे.

संगणक आल्यानंतर पोर्नपूर आला. जपानमध्ये १९७५ साली होम व्हिडीओ आणि सोनी बीटामॅक्स तंत्रज्ञान आले. कॅमकॉर्डरच्या साहाय्याने व्हीएचएस (व्हिडीओ कॅसेटवर) काहीही सहजपणे चित्रित करण्याची मुभा मिळाली. त्यानंतर पोर्न सिनेमांचा सुळसुळाट झाला, असा आपल्यासोबत जगभरात एक चुकीचा समज आहे. या पुस्तकातील ‘गोल्डन एरा ऑफ पोर्न’ असे स्वतंत्र प्रकरण आपल्या अपसमजांना उधळून लावते. १९६० साली अमेरिकेच्या पश्चिम प्रांतात २० अ‍ॅडल्ट थिएटर्स उभारली गेली. त्यानंतर या थिएटर्सचे लोण देशभरात पसरले. राजरोसपणे तिन्ही-त्रिकाळ पोर्न सिनेमा दाखविण्यासाठी त्याची हॉलीवूड-समांतरनिर्मिती होत होती. ‘मोना : द व्हर्जिन निम्फ’ हा पहिला ‘अ‍ॅडल्ट मूव्ही’ सर्व थिएटर्समधून गाजल्याचे दाखले इथे मिळतात. पोर्नजगत सामाजिक आणि राजकीय विषयही तेव्हा हाताळत होते. वॉटरगेट प्रकरणाच्या लोकप्रियतेचाही वापर पोर्नउद्योगाने १९७०च्या दशकात केल्याचे पुस्तकात म्हटले आहे.

या उद्योगाने पाहिलेले चढ-उतार आणि तंत्रज्ञानाला कवेत घेऊन गाठलेले यशोशिखर यांचा तपशील मांडणारे हे पुस्तक आहे. फेसबुक, गुगल, अमेझॉन या साऱ्या कंपन्यांच्या एकत्रित बॅण्डविड्थ असलेल्या ‘माईंडगीक’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा पोर्नउद्योगावरील नियंत्रणाची स्थिती लेखिका स्पष्ट करते आणि वाचकाला, पोर्नोग्राफी सुलभरीत्या सुरू राहण्यातील या कंपनीचा वाटा कळतो. लेखिका पोर्न उद्योगात काम करणाऱ्या व्यक्ती किती कमावतात याचा शोध घेताना लोकांमध्ये याबाबत असलेल्या आणखी एका समजाला तोडून टाकते. २० हजारांहून अधिक पोर्न कलाकार असलेल्या फर्नाडो व्हॅलीमध्ये या व्यवसायात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष दोघांना कोणत्या स्पर्धेला सामोरे जावे लागले, स्वाभिमानाची पूर्वअट असलेल्या आत्मसन्मानालाही तिलांजली देऊन खासगी व्यवहार चव्हाटय़ावर मांडल्यावरही हाती काय लागते, याचा सोदाहरण आलेख मांडला आहे. काही वर्षांपूर्वी जेना जेम्सन ही पोर्न अभिनेत्री फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत पोहोचली होती. या अभिनेत्रीने उभारलेली संपत्ती निव्वळ या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून नाही, तर त्याला पूरक उद्योगातून निर्माण केल्याचा दावा इथे करण्यात आला आहे. इथे आर्थिक गोष्टींची गोपनीयता, त्याला वाढवून-चढवून सांगण्याची हातोटी आणि त्यातून ‘आयजीच्या जिवावर बायजीला फायदा’ छापाची गंमत एका प्रकरणातून ‘स्टोया’ या अभिनेत्रीबाबत विशद करण्यात आली आहे. या आर्थिक स्पर्धेत शरीर जपण्यासाठी करावे लागणारे सोस, त्याचा मानसिक-शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम, दर चौदा दिवसांनी शरीराच्या आरोग्य चाचण्या. रोग, संसर्गाची सर्वाधिक शक्यता असल्याने कराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी थकविणारी आहे. पोर्नस्टार्सच्या वाटेला येणारा नफा आणि आर्थिक अडचणींमुळे नवख्यांची येथे होणारी पिळवणूक यांचेही भीषण सत्य वाचायला मिळते.

पुस्तकाचा पुढला भाग या व्यवहार दर्शनाचे व्यसन तरुणांमध्ये किती प्रमाणात झाले आहे, ते व्यसन कोणत्या प्रकारे सक्रिय राहते, त्याला ‘व्यसन’ म्हणावे का? त्यातून सुटणे कठीण आहे की सोपे याची चर्चा करताना दिसतो. सहज उपलब्धतेमुळे कार्यालयीन वेळांतही पोर्न पाहिले जाते किंवा शाळा-कॉलेजातील मुले पोर्नअधीन होतात. विविध अहवालांनी पोर्नोग्राफिक व्यसनाला ड्रग्जसमान म्हटले आहे. पण युवक आणि व्यक्तींना प्रत्यक्षात पोर्नोग्राफी व्यसनातून बाहेर काढण्यासाठी मोजक्याच देशांमध्ये पावले उचलली गेली आहेत, या गोष्टीही पुस्तकात नमूद आहेत. पोर्न कलाकार घेत असलेला आनंद पाहणाऱ्याच्या डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा असला, तरी ते पाहण्याचा अतिरेक कोणत्या थराला नेऊ शकतो, याकडे लेखिकेने वाचकाला नेण्याचा प्रयत्न केला आहे.

आज पोर्न जगतातील छोटय़ा-छोटय़ा संकल्पना, त्यात वाढत चाललेल्या ‘कॅटेगरीज’ म्हणजे विद्यमान मानवी विकृतीचे दर्शन आहे. पण या साऱ्याकडे सूक्ष्म तटस्थ नजरेतून पाहण्याची लेखिकेची तयारी जागोजागी दिसते. पुस्तकाची भाषा रंगवण्याची गरज नसलेला हा विषय असल्याचा लेखिकेला फायदा झालेला आहे. परिणामी एखाद्या गोष्टीमध्ये शिरल्यानंतर त्या विषयी वाचकांना काय प्रश्न पडू शकतील, याचा अंदाज घेऊनच त्याचे शमन करण्याचा यशस्वी प्रकार येथे पाहायला मिळतो.

पोर्नजगताशी संबंधित कैक अज्ञात संकल्पना, पारिभाषिक शब्दावली खोऱ्याने देऊन भविष्यातील पोर्नस्थितीविषयी येथे भाष्य आहे. लैंगिक शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि विरोधक यांची आजच्या पोर्नमुळे इतकी मोठी पंचाईत झाली आहे, की पुढील काळात पोर्नशिक्षण समाजाला देण्याची गरज भासेल का, अशी सध्या परिस्थिती आल्याचे लेखिकेचे म्हणणे आहे.

अमेरिकेतल्या स्पेलमन, इंडियाना, टेक्सास ए अ‍ॅण्ड एम, रटगर्स आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठांनी ‘सेक्शुअल इकॉनॉमिक्स’, ‘सेक्शुअलिटी अ‍ॅण्ड रेस’, ‘हिप-हॉप फेमिनिझम’ आणि ‘पॉलिटिक्स ऑफ पोर्नोग्राफी’ हे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट केल्याची माहितीही तिने दिली आहे. या पुस्तकात येथील पुरस्कारांपासून ते पोर्न कलाकारांच्या दैनंदिन व्यवहारापर्यंत आणि लोकांच्या दांभिकतेमुळे प्रत्यक्ष जागतिक आकडेवारी उभी करण्यात येणाऱ्या अडचणींपर्यंत अनंत गोष्टींचा ऊहापोह आला आहे. येथील संदर्भ आणि सुचविलेल्या वाचनाचा तपशीलही वाचकांना थक्क करू शकतो.

गेल्या दहा-पंधरा वर्षांत पोर्नस्टार हे सेलेब्रिटीसारखे साऱ्या जगाला ज्ञात आहेत. हॉलीवूडने ‘बुगी नाईट्स’, ‘गर्लफ्रेण्ड एक्सपिरिअन्स’सारखे चित्रपट काढून या उद्योगाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. याविषयी शेकडो माहितीपट सध्या उपलब्ध असून विविध मुख्य प्रवाहातील साप्ताहिके, मासिके त्यावर सदर चालवून या जगताची माहिती सामान्य वाचकांसाठी अद्ययावत करीत आहेत. चक पाल्हानिक याची ‘स्नफ’ ही कादंबरी, जेना जेम्सनपासून डझनावरी लोकप्रिय पोर्न कलाकारांनी आपल्या लोकप्रियता काळात मांडलेली आत्मचरित्रे आणि या विषयाने निर्माण केलेल्या जागतिक व्यसनाच्या समस्येतून दाखल होणारे कथनात्मक आणि अकथनात्मक साहित्य यांचा पसारा फोफावत चालला आहे. या धर्तीवर पोर्न उद्योगासंदर्भात कोणतीही बाब वज्र्य न ठेवणारे हे पुस्तक या जगताच्या माहितीचे प्रवेशद्वार ठरेल. दांभिकांच्या मांदियाळीतून स्वत:ला बाहेर काढण्याची हिंमत ठेवल्यास हे अ-चित्र पुस्तक कुणाही अठरा वर्षांवरील व्यक्तीसाठी उद्बोधकतेचे सारे निकष पाळणारेच आहे. मौजेखातर सहज-सुलभ दिसणाऱ्या  दुनियेतली काळोखी स्पष्ट होण्याची आज आपल्याकडे खरी गरज आहे.

  • द पोर्नोग्राफी इण्डस्ट्री- व्हॉट एव्हरीवन निड्स टू नो लेखिका : शीरा टॅरण्ट
  • प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
  • पृष्ठे : १९६, किंमत : ४९५ रु.

 

पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com