पंकज भोसले
देशी मुळांना कवटाळण्याच्या सर्वपरिचित वाटेचा स्वीकार या संग्रहातील कथा करीत नाहीत. त्यामुळेच त्या विविध खंडांत, विविध देशांत घडतात अन् त्या-त्या प्रांताचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान आपल्याबरोबर आणतात…
भारतीय कथासंसाराची सुमारे शतकापूर्वी जगाच्या पातळीवर पहिल्यांदा मोठी दखल घेतली गेली, ती आर. के. नारायण यांनी उभ्या केलेल्या काल्पनिक मालगुडी प्रदेशावरच्या लेखनाला ब्रिटिश लेखक ग्रॅहम ग्रीन यांनी प्रकाशक मिळवून दिल्यानंतर. जादूटोण्यांच्या-सर्प-भूतांच्या अंधश्रद्ध तरी अज्ञात अशा गोष्टींचा भारत या निर्विष लेखनातून जगाला उमजला. आर. के. नारायण, मुल्कराज आनंद किंवा राजा राव या भारतीय इंग्रजी लेखकांची पहिली फळी देशातील ‘सुरस आणि चमत्कारिक’ घटकांना वैश्विक पातळीवर पोहोचविण्याचे काम करीत होती. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इंग्रजी लेखकांच्या पिढीने मात्र देशातील जाती-धर्मांतून आलेल्या कुप्रथांमुळे मागास बनलेले सामान्यांचे जगणे दूरदेशी बसून चित्रित करण्यावर भर दिला. अ-निर्विष असलेल्या या लेखनप्रकारातून जागतिक बाजारपेठेत लोकप्रियतेच्या शिड्यांवर आरूढ होण्याचा मार्गच मुक्रर झाला. त्यामुळे देशातील वैगुण्यांना अधिकाधिक वादग्रस्त छटेत लिहिण्याची परंपराच मधल्या दशकांत तयार झाली. भारतात अशा काही लेखकांच्या ‘कथात्म टीका-स्वयंवरां’वर निर्बंधही लादले गेले. नव्वदोत्तरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत देशी आंग्लभाषिक ग्रंथविक्रीची बाजारपेठ बहरली. तेव्हा भारतीय नावे प्रतिष्ठित ‘बुुकर’ पारितोषिकांत मिरवू लागली. परदेशी विद्यापीठांत कथात्म साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या (एमएफए) आणि तेथेच वास्तव्य करून भारतीय मुळांना वगैरे आकर्षक शब्दांत कुरवाळणाऱ्या डझनांवर नवसाहित्यिकांनी ‘राष्ट्रकुल’ कथापारितोषिके गेल्या दशकभरात गाजवली. या काळात ‘सुलभ, सोप्या भगतसंप्रदायी’ साहित्यिकांनी तळागाळातील इंग्रजी वाचनेच्छुक जनतेचा आत्मविश्वास दुणावला. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने देशी आंग्ल साहित्याचा ‘ग्लोबल’ऐवजी ‘ग्लोकल’ प्रवास सुरू झाला. मग फक्त इथल्याच वाचनपेठेचा विचार करूनच कथा किंवा मिथककथांचा ‘बेस्टसेलर्स’ घाणा शिजू लागला.
‘नेटफ्लिक्स’ माध्यमातून किंवा अंगभूत स्वप्रेरणेने देशाटनाच्या प्रक्रियेशी सहज सूर जुळलेल्या आजच्या वाचकपिढीला ‘देशीवादा’ची कास धरणारे साहित्य फार काळ रिझवू शकणार नाही, हे पटवून देणाऱ्या कथा अमेय प्रभू यांच्या ‘द रॉक बाबाज् अॅण्ड अदर स्टोरीज्’ या ताज्या संग्रहात वाचायला मिळतात. ‘वेस्टलॅण्ड’ या प्रकाशनसंस्थेने काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशनापूर्वी आठ दिवस आधीच नोंदणीद्वारे संपली. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत तब्बल १५ देशांमध्ये हा संग्रह खपतोय, तो केवळ भारतीय (किंवा मराठी) नावाच्या बळावर नाही, तर त्यातील वाचनप्र्रवाही जगकथांच्या जोरावर. भाषिक क्षमता आणि अनुभवांच्या ताकदीमुळे कथात्मनिर्मितीचा हा पहिला प्रयत्न असल्याचे जाणवणार नाही, असा या लेखनाचा पैस आहे.
अमेय प्रभू यांना भारतीयांत दडलेल्या ‘सुरस आणि चमत्कारिक’ घटकांमध्ये रस नाही, तसेच इथल्या धर्म-जातीपातींच्या संस्थांनी तयार केलेल्या दुष्प्रवृत्तींना कच्चा माल म्हणून वापरण्यात स्वारस्य वाटत नाही. देशी मुळांना कवटाळण्याच्या सर्वपरिचित वाटेचा त्यांची कथा स्वीकार करीत नाही. त्यामुळेच त्या विविध खंडांत, विविध देशांत भारतीय लेखकचष्म्यातूून (किंवा निवेदकाच्याही) घडत नाहीत. तर त्या-त्या प्रांताचा इतिहास-भूगोल आणि वर्तमान आपल्याबरोबर आणतात. या कथांमध्ये जपानमधील कार्यमग्न उद्योजक आहे. हॉलीवूडमधील निष्णात अभिनेता आहे. लंडनमधील कॅथोलिक धर्मगुरू आहे. हिमालय सर करण्यास आलेला युरोपीय पर्यटक आहे. आखाती राष्ट्रात लोकशाही रुजवू पाहणारा राजकुमार आहे. कल्पित आफ्रिकी राष्ट्रातील आपल्या कृत्यांचे समर्थन करणारा हुकूमशहा आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सत्याची कास धरणारा काळा पोलीस अधिकारी आहे. हिंदी सिनेसृष्टीत साठच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावरून पायथ्यापर्यंत पोहोचलेल्या गायिकेचा काल्पनिक इतिहास आहे (ही लेखकाचे भारतीयत्व दर्शविणारी एकमेव कथाही पारंपरिक आराखड्यासारखी नाही). दक्षिण अमेरिकेतल्या देशातील आपल्याला पूर्णपणे अज्ञात असलेल्या उद्योग जगताची दखल घेणारा पर्यटन-पत्रकार आहे. प्रथमपुरुषी निवेदनात थोड्या कथा आहेत, तर बऱ्याच कथा तृतीयपुरुषी निवेदनाचा आधार घेताना दिसतात. भारतात गेल्या वर्षी टाळेबंदी सुरू झाल्यानंतर अडकलेल्या अवस्थेत या कथा लिहिल्या गेल्याचे लेखकाने पुस्तकाला लिहिलेल्या अल्प-प्रस्तावनेत म्हटले आहे. पत्रकारिता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेशी संलग्न असल्यामुळे या कथांना प्रभू यांच्या मुक्त जगप्रवासात घेतलेल्या अनुभवांचा, अभ्यासाचा आणि निरीक्षणांचा आधार आहे. प्रत्येक कथा साधारणत: २८ ते ३० पानांचा भरगच्च तपशील ऐवज पुरवते. डॉली नायक (‘द ब्रोकन नाइटिंगेल’) या स्वातंत्र्योत्तर काळात अवतरलेल्या गायिकेचा समांतर कल्पना-इतिहास उभारताना भारतीयांच्या नसानसांत, जाणिवेत असलेल्या सिनेसंगीताच्या माहितीला धक्का दिला जात नाही. या काळापासून चित्रगीतांवर आरूढ झालेले घराणेही यात ललिता मांडगावकर आणि आलेखा कदम या गमतीशीर नावांद्वारे खुबीने सूचित करण्यात आले आहे. पण आताच्या बांगलादेशातून तेव्हाच्या मायानगरी मुंबईत रुजलेल्या कलावंतिणीची ही शोकांतिका शहराच्या भौगोलिक नकाशासह सादर होते. यात लेखकाचे भारतीयत्व ठळक होत असले, तरी इतर कथांत ते शून्यासम अवस्थेत जाणवते. प्रत्येक देशातील जीवनव्यवहारांचे, भाषिक लकबींचे आणि आर्थिक परिस्थितीचे सूक्ष्मदर्शी वर्णन कथांमध्ये झिरपताना दिसते. उदाहरणार्थ, पहिल्याच ‘द अॅक्सिडेंटल फिलांथ्रॉपिस्ट’ या कथेच्या ताकाहाशी वतनबे या वृद्ध आणि गडगंज श्रीमंत नायकाविषयी सांगताना लेखकाचा तृतीयपुरुषी निवेदक जपानमधील विविध जिल्ह््यांचा आणि प्रांतांचा फेरफटका वाचकांना करून देतो. आयुष्याच्या उत्तरकाळात सारे आप्त दूर गेले असताना ताकाहाशी वतनबे याला दुर्धर आजाराची वर्दी मिळते. उरलेले आयुष्य सुखात घालविण्यासाठी तो संबंध तोडून टाकलेल्या मुलीशी पुन्हा संपर्क साधतो. नातीशी मैत्री करतो. आपल्या अवाढव्य संपत्तीतील मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी देण्याचे जाहीर करून जागतिक लोकप्रियता मिळवितो. काही दिवसांनी त्याला आपल्या आजाराचा डॉक्टरी अहवाल हा चुकून आल्याचे कळते. धडधाकट असल्याचे आणि बरीच वर्षे जगणार असल्याचे उमजल्यावर जाहीर केलेल्या सामाजिक औदार्याच्या हेतूंपासून तो लांब जाऊ लागतो आणि त्यामुळे त्याला नव्या बदलाला सामोरे जावे लागते, याची ही कथा.
यात जपानमधील स्थळ-काळाविषयी वापरलेल्या तपशिलांमुळे लेखकाची रचनात्मक ताकद लक्षात येते. ही क्षमता सगळ्याच कथांमध्ये डोकावत राहते. काल्पनिक आखाती राष्ट्रात पाश्चात्त्य विद्याविभूषित राजकुमार दाखल झाल्यानंतर तिथल्या मरुद्यानातील, वाळवंटातील वर्णने ‘द रेन्बो प्रिन्स’ कथेमध्ये आकर्षक वाटतात. पिढ्यान्पिढ्या राजेशाही अनुभवलेल्या राष्ट्रात विरोध-बंड मोडून लोकशाही रुजविण्याची प्रिन्स हमादान याची कळकळ जागतिक राजकारणाच्या संदर्भांनी फुलविण्यात आली आहे. ‘द मॅन विथ द बिअर्ड’ या कथेत ‘नेटफ्लिक्स’च्या सुपरिचित ‘नार्कोस’ या मालिकेमुळे जगाला समजलेल्या कोलंबिया या राष्ट्राशी संबंधित अपरिचित अशा केळी लागवडीच्या अर्थव्यवस्थेचा भाग येतो. केळी उत्पादनात जगात पाचव्या स्थानी असलेल्या या राष्ट्रात या फळाभोवती फिरणाऱ्या राजकारण-समाजकारण-अर्थकारणाचा पत्रकाराला अपघाताने भेटलेल्या विलक्षण व्यक्तीच्या आधारे वेध घेण्यात आला आहे. ज्यात स्थानिक बिअरच्या नावापासून उच्चारल्या जाणाऱ्या कैक तपशिलांनी निनावी निवेदकाची पर्यटनकथा सजली आहे.
शीर्षककथा ‘रॉक बाबाज्’ हिमालयातील कांचनजुंगा शिखरामध्ये घडते. स्वीत्झर्लंडमधील हेलमुट कॉफमन इतर अनेक गिर्यारोहकांसह नेपाळमधून मोहिमेवर निघालेला असताना हीमकडे कोसळून झालेल्या अपघातात सापडतो. काही दिवसांच्या मूच्र्छावस्थेतून जाणीव-जागृती झाल्यानंतर तो लामा आणि सन्याशांच्या जगासाठी अज्ञात असलेल्या आधुनिक जगात असल्याचे त्याला समजते. या सन्याशांचे गिटार-ड्रम्सवर ‘एसी-डीसी’ बॅण्डचे ‘हायवे टु हेल’, डीप पर्पलचे ‘स्मोक ऑन द वॉटर’ आणि लेड झेप्लिनचे ‘स्टेअरवे टु हेवन’ या गीतांचे सादरीकरण आणि नृत्य पाहून तो हरखून जातो. पौर्वात्य विचार आणि पाश्चिमात्य आचार यांच्यासह तत्त्वज्ञान-जीवन-मरण आणि मोक्षाच्या संकल्पनांवर सविस्तर चर्चा करणारी ही कथा यातील नायकासह वाचकालाही विलक्षण अनुभव देते. प्रेमात पडून आपल्या धर्मगुरूपदाला त्यागण्याची तयारी करणाऱ्या ब्रिटनमधील नायकाला ताळ्यावर आणणारा साक्षात्कार घडविणारी ‘द शेफर्ड’, अमेरिकेतील मूलवासीयांच्या ध्यानधारणेच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून हॉलीवूडमध्ये यश मिळविणाऱ्या कलाकाराची शोकांतिका रंगविणारी ‘मॅनिफेस्टेशन्स ऑफ अनपाओ’ आणि आफ्रिकी अमेरिकी पोलिसाकडून एका कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येची उकल करताना ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या मोहिमेच्या संदर्भांना परिघात वापरणारी ‘एजण्ट होल्डर’ या कथा पकडून ठेवतात. चमत्कृतीपूर्ण शेवट, प्रयोगांचा सोस लेखकाकडे अजिबातच नाही. मात्र समकालीन तरुण इंग्रजी लेखकांहून अधिक पातळीवर कमावलेली भाषाशैली या सर्व कथांमध्ये ठळकपणे जाणवते. ती साधी-सोपी नाही. पण कथेच्या भौगोलिक परिसराला संलग्न म्हणून शोभणारी आहे. पूर्वसुरी लेखक आणि लेखनाच्या मार्गांशी फारकत घेऊन आजच्या ‘नेटफ्लिक्स’विश्वाशी समांतर अनुभव मिळवून देणाऱ्या जगकथा वेगळ्यातही चांगले शोधणाऱ्यांना प्रचंड समाधान देऊन जातील.
pankaj.bhosale@expressindia.com