अमेरिकेतील कृष्णवर्णीय- आफ्रो अमेरिकी वंशाच्या एकेकाळच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहरच पुसले जाणे, ते पुन्हा वसवताना श्वेतवर्णीयांना ‘खालची’ वागणूक देण्याचा आटोकाट प्रयत्न होणे, असे अचाट कथानक असलेली ही मोठय़ा आकाराची कादंबरी वर्णभेद, वंशभेदांचेच यशस्वी विडंबन करते!
हजारो वर्षे समाजातून हद्दपार ठरविण्यात आलेल्या जगभरातील नागरिकांसाठी १९६०चे ‘चळवळींचे दशक’ महत्त्वपूर्ण होते. केवळ आपल्या मराठी साहित्याच्याच दृष्टीने विचार केला, तर प्रस्थापित साहित्यधारेत जगण्यातील बेगडी अत्याचारांना झुगारून देणारा दलित साहित्याचा झेंडा याच दशकानंतर तळपू लागला. आत्मकथन आणि कथन साहित्यातून जातिभेदमूलक अनुभवांच्या दाहक गाथा समोर येऊ लागल्या. मात्र एका टप्प्यानंतर यात लोकप्रिय होण्याचा सुलभ मार्ग सापडल्यासारख्या अन्यायग्रस्तांची एकसुरी गर्दी वाढत गेली. साठोत्तरी १९९० पर्यंतच्या आणि एकविसाव्या शतकातल्या आत्तापर्यंतच्या, या दोन्ही काळांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक बाबींमध्ये भिन्नता असूनही समाजमनात साचलेले भेदाचे मोहोळ कमी झाले नाही, हे आजही सर्वच घटनांतून आणि साहित्यघटकांतून स्पष्ट होत आहे. आजच्या भारतीय भवतालाकडे सजग दृष्टिक्षेप टाकल्यास ‘समानता’ शब्दाची पोकळताच अधिक स्पष्ट होऊ शकेल. हाच पोकळपणा प्रगत महासत्ता वगैरे मानल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये आपल्याहून अधिक तीव्र स्वरूपात असल्याचे अनेकदा दिसत असतेच. कृष्ण आणि श्वेत वंशीयांतील भेद १९६४ साली कायद्याद्वारे संपविण्यात आला. तरीही दोन्ही समाजांच्या मनांत साचलेल्या वांशिक भिन्नतेची खदखद संपलेली नाही. साहित्य, संगीत, चित्रपट आणि समाजव्यवहार यांतून ती सातत्याने उघड किंवा छुप्या स्वरूपात दिसतेच. आमिरी बराका, टोनी मॉरिसन, अॅलिस वॉकर आदींचा, समान नागरी हक्क लढय़ापासून लिहिता झालेला आफ्रो-अमेरिकी लेखकांचा जथा आणि स्पाइक लीपासून ली डॅनियल्सपर्यंत कृष्णवंशीय चित्रपटकार यांनी आपापल्या कलाकृतीतून गोऱ्यांच्या दुटप्पी वागण्याचे, त्यांच्या ढोंगीपणाचे वाभाडे काढले. पण तरीही समाजातील दिखाऊ समानतेत आजपावेतो बदल झाला नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपद गुणवत्तेच्या बळावर असले, तरी त्यामागे कृष्णवंशीयतेची झालर तेथील इतर सर्व वंशीयांच्या जाणिवे-नेणिवेतून जात नाही. वंशभेद किंवा विद्वेषाची पणती श्वेतवंशीयांच्याही साहित्य, चित्रपट आणि संगीतामधून उघड वा छुपेपणे तेवत आहे. या साऱ्या वंशजाणिवांचे तटस्थपणे विडंबन पॉल बेट्टी यांची ‘सेलआऊट’ यांची मोठेखानी कादंबरी करते.
हे विडंबन साधेसुधे नाही. पूर्वसुरींच्या एकसुरी बाण्याला चकवून त्यात श्वेतवर्णीयांइतक्याच प्रमाणात कृष्णवंशीयांची दांभिकताही समोर आणली गेली आहे. ज्याचा मागमूसही आत्तापर्यंत कादंबऱ्यांमध्ये नव्हता इतक्या धारदार कोटय़ा आणि टिप्पण्यांनी ही कादंबरी भरली आहे. उत्तराधुनिक अमेरिकेतील उत्तराधुनिक वांशिकतेचा सूक्ष्मलक्ष्यी शोध घेताना यात १९७०च्या दशकापासूनचे ‘पॉप्युलर कल्चर’, सामाजिक – सांस्कृतिक चळवळी, राजकीय उलथापालथ आली आहे. या सर्व घटकांशी संबंधित कृष्णवंशीयांची नामावळ आणि तत्त्वज्ञान, चित्रपट आणि साहित्यातील संदर्भाचे निवेदनाच्या तीव्रतेसाठी उपयोजितीकरण झाले आहे.
कादंबरीला भलीमोठी पूर्वपीठिका आहे. यात निनावी कृष्णवंशीय निवेदक हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर अमली पदार्थाच्या नशेखाली आपण इथवर येण्यापर्यंत कोणते गुन्हे केले नाहीत, याचे पाढे वाचताना दिसतो. कृष्णवंशीयांना गोवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या त्या गुन्ह्य़ांचा पाढा संपवताना तो ‘वंशवादा’चा उच्चार करतो आणि ‘गुलामगिरी राबविल्यामुळे समाज म्हणून आपण येथवर पोहोचलो,’ अशी कबुली देतो. गुलामगिरी संपलेली असणाऱ्या आणि वंशवादाला कायद्याने तिलांजली देणाऱ्या अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाशी आपल्या मुद्दय़ांवर नशेच्या अमलात लढणारा हा निवेदक त्या ‘अधिकृत’ कबुलीच्या नंतर मात्र, अत्यंत तिकडम शैलीत त्याची वंशवादी कहाणी सुरू करतो.
डिकन्स नावाच्या लॉस एंजलिसच्या सीमेवरील खेडेगावात कलिंगडे पिकवण्याच्या नावाखाली अफू-गांजाची मुख्य शेती करणारा निवेदक आपल्या लहानपणातील चुकीच्या संस्काराची आठवण काढतो. आई नसल्यामुळे स्वघोषित समाज संशोधक आणि पुराणमतवादी वडिलांकडून कृष्णवंशीय आणि चमत्कृतीपूर्ण शिक्षण त्याला लाभते. त्याच्या वडिलांसाठी तो त्यांच्या संशोधनासाठी ‘गिनिपिग’ बनतो. परिणामी गोष्टीची पुस्तके वाचण्याच्या साताठ वर्षे वयात त्याच्या हातात वैचारिक ‘इकॉनॉमिस्ट’ हे साप्ताहिक दिले जाते. त्याच्यासमोर काळ्या रंगात रंगविलेली बार्बी ठेवली जाते आणि रीतसर आपल्या वंशीय, पंथीय गटासोबत राहण्याची संथा दिली जाते! या सगळ्यात मनाची जडणघडण झालेला निवेदक आपल्या वडिलांचा पोलिसांच्या धुमश्चक्रीत चुकीने खून झाल्यानंतर त्यांच्या विचारांना पुढे सरकविण्यासाठी सज्ज होतो.
मात्र नेमक्या याच कालावधीत शहराच्या आणि देशाच्या नकाशावरून त्याचे डिकन्स नावाचे शहर जाणीवपूर्वक पुसले जाते. हे शहर आता नाहीच, अशी परिस्थिती उद्भवते. तेव्हा पुसल्या गेलेल्या नकाशात डिकन्सला पुन्हा समाविष्ट करण्यासाठी तो आघाडी उघडतो. ‘मूळचा डिकन्सचा’ म्हणून डिकन्सवासींना कौतुक असलेला पूर्वाश्रमीचा सेलिब्रेटी अभिनेता होम्नी जेनकिन्स हासुद्धा शहराचे अस्तित्व हरविल्याने बिथरतो आणि निवेदकाकडे गुलामगिरी स्वीकारतो. हे दोघे मग आपल्या शहराचे अस्तित्व टिकविण्यासाठी स्वत:च सीमारेषा तयार करतात, त्यावर शहराचे नाव असलेले फलक लावतात. हेही कमी म्हणून सार्वजनिक ठिकाणी ‘फक्त कृष्णवंशीयांकरिता’, ‘श्वेतवर्णीयांना मनाई’ असल्या फलकांची पखरण करतात. हे फलकही लोकप्रिय होतात. त्यांच्या या फलकबाजी आणि द्वेषपूर्ण लढाईमुळे विचित्रपणे शहरात सारे काही सुरळीततेकडे झुकू लागते. कधी नव्हे ते गुलामगिरीच्या आणि वंशविद्वेषाच्या चर्चेत ते स्वत:मधले स्वातंत्र्य शोधू लागतात.
यातला ‘मी’ म्हणून समोर येणारा निनावी निवेदक तत्त्वज्ञानापासून संगीत, साहित्य, राजकारण, चित्रपट आणि क्रीडा प्रकारांमधील लोकप्रिय कृष्णवंशीयांचे दाखलेच्या दाखले समोर उभे करतो. माईक टायसनपासून माल्कम एक्सपर्यंत आणि सॅमी डेव्हिस ज्युनिअरपासून टोनी मॉरिसनपर्यंत लोकप्रिय कृष्णवंशीयांची यादीच आपल्यासमोर येते. पण नुसत्या कृष्णवंशीयांचाच इथे संबंध येतो असे नाही, तर जागतिक राजकारणाची, सिनेमाची, चीन आणि आशियाई नागरिकांच्या वाढत्या वर्चस्वाची माहिती येते. अमेरिकेतील इतर वंशीयांच्या तुलनेत कृष्णवंशीयांच्या आर्थिक दु:स्थितीची व त्याला कारणीभूत झालेल्या परात्पर आणि आत्मपर गोष्टींची चर्चा निवेदक करतो. या सद्य:स्थितीतून उत्तर आधुनिक अमेरिकी मानसिकतेची, अमेरिकी संविधानाची, नागरी हक्क कायद्याची एकगठ्ठा खिल्ली उडविण्याचे एककलमी काम पॉल बेट्टी यांनी साधले आहे. त्यांच्या निवेदकाच्या विडंबनातून शेक्सपिअरही सुटत नाही तसेच अब्राहम लिंकन यांनाही पळवाट काढता येत नाही. मार्क ट्वेन यांची ‘अॅडव्हेन्चर ऑफ हकलबरी फिन’ ही कादंबरी इथला निवेदक नव्याने त्यातील कृष्णवंशीय पात्र जिम याला केंद्रस्थानी लिहून सादर करतो.
‘आम्ही कसे पिचतच राहिलो’ हा एककल्ली सूर बदलून ‘आम्ही का पिचलो’ याचा शोध या कादंबरीतून घेणाऱ्या पॉल बेट्टीचे वैशिष्टय़ म्हणजे, तो टीका करताना कोणताही भेद करीत नाही. जितकी टीका श्वेतवर्णीयांवर केली जाते, तितक्याच प्रमाणात कृष्णवंशीयांच्या मानसिकतेवर जराही कड न घेता आसूड ओढला जातो. इथे देव्हाऱ्यात कुणीच नाही. सारेच दांभिकतेच्या मार्गावरचे प्रवासी म्हणून समोर येतात. यातून निवेदक स्वत:लासुद्धा वेगळे काढत नाही.
कादंबरी मोठेखानी आहेच आणि तिची भाषा सोपी नाही. दर दोन वाक्यांमध्ये विनोदाचा अट्टहास केलेला आहे. अन् प्रत्येक वेळी तो योग्यरीत्या साधण्यातही आला आहे. विडंबनासाठी गेल्या दोन-तीन शतकांतील अमेरिकेचे, साठोत्तरीपासून विविध मार्गामुळे ग्लोबल होत जाणाऱ्या जगाचे अनेक संदर्भ वापरले गेले आहेत. त्यामुळे त्यातील विनोदाचे ठोसे पकडल्यासच पूर्णाशाने कादंबरीचा आस्वाद घेता येणे सोपे आहे. कवी, कथाकार असलेल्या बेट्टी यांच्या यापूर्वीच्याही कादंबऱ्या विनोदी म्हणून ओळखल्या जातात. मात्र वंशविडंबन करणाऱ्या ‘सेलआऊट’ कादंबरीने अमेरिकेमध्ये कृष्ण-श्वेतवंशीयांची अनेकार्थानी पंचाईत करून टाकली आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तिच्यावर टीका करावी की बाजू घ्यावी या पेचातच कादंबरी लोकप्रिय झाली. अर्थात, वाचणाऱ्यांमध्ये वंशभेदांच्या खरोखरच पलीकडे गेलेले अनेक जण आहेत, हेही सिद्धच झाले. कादंबरीमुळे देव्हाऱ्याबाहेर असल्याची जाणीव झालेल्या कृष्णवर्णीयांनीदेखील कसलाही आक्षेप घेतला नाही आणि श्वेतवर्णीयदेखील कादंबरीच्या भलामणीच्या स्पर्धेत उतरलेले दिसतात. या पाश्र्वभूमीवर बुकरच्या स्पर्धेत या पुस्तकाचे असणे महत्त्वपूर्ण ठरले आहे.
गेल्या वर्षी या प्रकारचे आणखी एक पुस्तक लोकप्रिय झाले होते. आफ्रो अमेरिकन लेखक ता नहासी कोट्स यांचे ‘बिट्वीन द वर्ल्ड अॅण्ड मी’ नावाचे पुस्तक. कृष्णवंशीय म्हणून अमेरिकेतील जगण्याचे आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्राच्या स्वरूपातील हे पुस्तक अमेरिकेतील नॅशनल अॅवॉर्ड पटकावून पुलित्झरच्या दारापर्यंत धडकले होते. ‘सेलआऊट’ पुस्तकाला बुकर मिळाल्यास ‘बिटविन द वर्ल्ड अॅण्ड मी’चे सध्यापर्यंत असलेले बेस्टसेलरत्व आपोआप बदलून जाणार आहे.
आपल्याकडील तळागाळातील खूप अन्यायग्रस्त एकसुरी गाथा लिहिण्या-वाचणाऱ्यांसाठी ‘सेलआऊट’ ही कादंबरी म्हणजे जणू मार्गदर्शिका ठरू शकेल. देव्हारेबद्ध मानसिकता असलेल्या आणि राजकीय कह्य़ात असलेल्या आजच्या स्थितीत ही अपेक्षा जरा मोठी आहे. तरीदेखील, साहित्यात मोठय़ा अपेक्षांची पूर्ती होणे ही काही अशक्यप्राय गोष्ट नाही.
द सेलआउट
- लेखक : पॉल बेट्टी
- प्रकाशक : वनवर्ल्ड (पॅन मॅकमिलन)
- पृष्ठे : २८८, किंमत : ३९९ रु.
pankaj.bhosale@expressindia.com