पंकज भोसले

इथिओपियावर मुसोलिनी-काळातील फॅसिस्ट इटलीने केलेल्या आक्रमणाचा काळ उभारणारी ही कादंबरी अनेक कहाण्या आणि उपकहाण्या सांगते, स्त्रियांच्या कथांचा शोध घेते आणि मानवी बाजू दाखवताना संगीताचा आधार घेते.. हे सारे, लेखिका नावापुरतीच इथिओपियन असल्यामुळे साधले असावे काय?

गेल्या अनेक दशकांतील साहित्यपटलाचे निरीक्षण केले, तर एतद्देशीयांनी लिहिलेला इतिहास आणि कथात्म-इतिहास या दोहोंमध्ये काळ, घटना आणि व्यक्तींविषयीच्या शौर्यगाथा, स्तुती-सुमनांचा पसारा प्रचंड व्यापलेला दिसून येईल. अन् त्या साहित्याचे विक्रीमूल्य मर्यादित अवकाशापुरते महत्त्वाचे ठरल्याचे स्पष्ट होईल. इतिहास हा कोणत्याही भूभागावरील नागरिकांच्या उदात्त भावनांशी निगडित असून त्याचा विक्रीमूल्याशी काय संबंध, असा प्रश्न पडला, तर एतद्देशीय मुळांचा परकीय संस्कृतीत राहून शोध घेणाऱ्या इतिहासकार आणि साहित्यिकांच्या निर्मितीकडे पाहावे लागेल. ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या सलमान रश्दी यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील अर्वाचीन ऐतिहासिक दाखल्यांतून कादंबऱ्या उभारल्या. लंडनमध्ये जन्मलेल्या आणि अमेरिकी नागरिकत्व असलेल्या झुम्पा लाहिरी यांनी पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळीच्या संदर्भातून कादंबरी फुलवली. भारतीय नागरिकत्व अद्याप शाबूत असले, तरी ब्रिटनला कर्मभूमी बनविणाऱ्या नील मुखर्जी यांनी मार्क्‍सवादी विचारांनी भारलेल्या साठच्या दशकाला कादंबरीचा भाग केले. प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घेतलेल्या या लेखकांमधील समान दुवा हा त्यांची पुस्तके ‘बुकर’च्या चक्रातूनच जगभर प्रसारित होण्याबाबतचा आहे. तरी त्यांनी शोधलेल्या ऐतिहासिक संदर्भाचे जागतिक बाजारपेठेतील विक्रीमूल्य अचूक हेरल्यामुळे ते यशस्वी झालेले दिसतात.

एतद्देशीयांनी साहित्यातून उभारलेल्या इतिहास-कथनांद्वारे स्फुरणाभिमानी, स्व-अस्मितासीमित आणि अल्पाभ्यासी पिढीचे आपसूक विकसन होते. त्याऐवजी अधिक तटस्थपणे हेतूविरहित तथ्य किंवा कल्पनाविलास परकीय भूमीतील लेखक मांडू शकतात, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या सिद्धांताचे ताजे उदाहरण म्हणून यंदा बुकर लघुयादीत असलेल्या ‘द श्ॉडो किंग’ या माझा मेंगिस्टे यांच्या कादंबरीकडे पाहता येईल.

इथिओपियात १९७४ साली जन्मून देशातील क्रांतीच्या काळात आधी लगतच्याच केनियामध्ये, पुढे नायजेरियात विस्थापित व्हावे लागलेल्या आणि संपूर्ण तारुण्यपर्व अमेरिकेच्या मुक्त विचारसरणीत जगलेल्या माझा मेंगिस्टे इथिओपियासाठी आता परक्याच. येथून बालवयातच बाहेर पडल्यामुळे हिंसा, रक्तपात, राजकीय उलथापालथ, बंडखोरी यांची प्रत्यक्ष झळ त्यांना बसली नाही. तरी या घटकांच्या अभ्यासातून कादंबरी रचण्याइतपत माहितीद्रव्य त्यांच्या हाती लागले. इथिओपियातील क्रांती-खुणांच्या शोधावरची त्यांची ‘बिनीथ द लायन्स गेझ’ ही पहिली कादंबरी गेल्या दशकात आली. इथिओपिआत ग्रथित कल्पनाइतिहासाची परंपराच नसल्यामुळे या देशावर हुकमतीने लिहिणारी लेखिका म्हणून माझा मेंगिस्टे यांची ओळख बनली.

आपल्याला मातृभूमीपासून विलग करणाऱ्या इथिओपियातील ऐतिहासिक घटकांवर अमेरिकी नियतकालिकांतून निबंध, कथांद्वारे त्यांनी वेळोवेळी चिंतन केले. पण इटली-इथिओपिया यांच्यातील युद्धात लढलेल्या इथिओपियन स्त्रियांचा केवळ सांगोवांगीरूपी उरलेला इतिहास त्यांना उमजला, तेव्हा त्याच्या मागावर दहा वर्षे राबत त्यांनी ‘द श्ॉडो किंग’ या कादंबरीचा पण पूर्णत्वाला नेला. पुरुषसत्ताक युद्धभूमीवर महिलांचा इथला युद्धलढा गौरव-शौर्याच्या ओळखीच्या वाटा नाकारत स्वातंत्र्य-पारतंत्र्याच्या संकल्पनांचा नव्याने विचार करायला लावतो. युद्धाच्या क्रूर व्यवहारात संगीत शोधण्याचा प्रयत्न करतो.

आधीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी वसाहतवादी इटलीच्या बेनिटो मुसोलिनीने १९३५ साली इथिओपियावर आक्रमण केले. इटलीच्या या आक्रमक धोरणानंतर इथिओपियातील राज्यकर्ता हेल सीलासी ब्रिटनमध्ये पळून गेला. अत्यंत आधुनिक शस्त्रांसह इथिओपियात प्रवेश केलेल्या इटलीच्या सैन्यासमोर जीर्ण बंदुका आणि तुटपुंज्या (प्रत्येक सैनिकास तीन) गोळ्यांसह उभे राहिलेल्या इथिओपियन लष्कराचा टिकाव लागणेही शक्य नसताना हे युद्ध झाले आणि त्याचा अपेक्षित निकाल लागला.

माझा मेंगिस्टे यांची कादंबरी इटलीकडून झालेल्या आक्रमणाच्या महिनाभर आधी सुरू होते. यातली नायिका हिरूट ही अचानक अनाथ बनल्याने किडान नावाच्या एका श्रीमंत लष्करी अधिकाऱ्याकडे आश्रित म्हणून राहात असते. लढवय्या आई-वडिलांकडून मिळालेली बंदूक उशी म्हणून बाळगणाऱ्या हिरूटकडून हिसकावून घेतली जाते. आधीच तुटपुंजी शस्त्रास्त्रे असलेल्या सैन्यात तिचा वापर करता यावा म्हणून अधिकारी किडान बंदूक जबरदस्तीने ताब्यात घेतो. कादंबरीचा सुरुवातीचा बराचसा भाग हिरूटच्या, ही बंदूक पुन्हा हस्तगत करण्यासाठी चालणाऱ्या संघर्षांने व्यापला आहे. हिरूट आणि किडान, किडानची बायको एस्तर आणि कुक (मोलकरीण) इतक्या त्रोटक व्यक्तिरेखांच्या संवादातून देशावर युद्धाचे ढग गोळा झाल्याचा पत्ता लागतो. शंभर पानांहून अधिक काळ कादंबरी ऐतिहासिक माहिती आणि भरपूर तपशिलांचे एकत्रीकरण करीत या व्यक्तिरेखांना वाचकांच्या मनात ठसविण्याचा प्रयत्न करते. प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटल्यानंतर या व्यक्तिरेखांमध्ये होत जाणारा आमूलाग्र बदल हा कादंबरीचा गाभा आहे.

यात एक कहाणी नसून अनेक कहाण्या आणि उपकहाण्या गोळा होतात. कादंबरी हेल सीलासी, इटलीचा लष्करी अधिकारी कालरेस फुझिली, युद्धातील घटनांची कॅमेऱ्याद्वारे नोंद करण्यासाठी पाठविण्यात आलेला ज्यू सैनिक एटोरे नवोरे या सर्वाच्या नजरेतून पुढे सरकायला लागते. युद्धाच्या पारंपरिक कादंबऱ्यांप्रमाणे इथे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या उत्कंठावर्धक प्रसंगांची रेलचेल नाही. हेल सीलासी ब्रिटनमध्ये सुखासीन वास्तूत रेकॉर्ड प्लेअरवर इटालियन संगीत ऐकत आपल्या देशातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा अपराधगंड तीव्रतेने बाळगताना दिसतो. युद्धवार्ताकडे लक्ष ठेवताना शस्त्रशून्य सैन्याच्या हतबलतेचे त्याला दु:ख वाटते, पण त्यावर कोणताही उपाय त्याच्याकडे नसतो. एटोरे नवोरे हा इटलीसाठी युद्धात उतरलेला असताना देशात ज्यूविरोधी लाट सुरू झालेली असते. युद्धाची झळ बसलेल्या व्यक्तींची छायाचित्रे काढत असताना त्याच्या आई-वडिलांबाबत इटलीत काय घडते, या भीतीचे सावट त्यावर प्रचंड राहाते. त्याने काढलेल्या छायाचित्रांचे शब्दवर्णन हे कादंबरीत अनेक प्रकरणांमध्ये विभागले आहे.

कादंबरीची नायिका हिरूट आणि तिचा द्वेष करणारी एस्तर युद्धात लढणाऱ्या पुरुषांसाठी भोजन, पाणी आणि औषधांची व्यवस्था करतात. लष्कराची गरज म्हणून एस्तर इथिओपियन महिला सैनिकांची समांतर फळी उभी करते. प्रसंग बिकट होतो तेव्हा हिरूट राज्यकर्ता हेल सीलासीची चेहरेपट्टी जुळणाऱ्या व्यक्तीला शोधून काढते. तोतया सम्राट म्हणून त्याला उभा करून तुटपुंज्या साधनांत लढणाऱ्या सैनिकांच्या मनात प्राण फुंकते. इटालियन सैन्याच्या तळात थरकाप उडवून देते. आपला राजा पळाला नसून सैन्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहे, या विश्वासाच्या बळावर ही महिला आघाडी युद्धामध्ये चैतन्य निर्माण करते.

हिरूट आणि एस्तर या दोघी किडानच्या लैंगिक हिंसेच्या बळी ठरण्याचे अनेक प्रसंग आले आहेत. या महिलांचा पहिला लढा हरविलेल्या स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यापासून सुरू होतो. दारूगोळा बनविण्यापासून ते जखमी सैनिकांची देखभाल करणाऱ्या या महिलांना पुरुषांइतकेच आपणही इटालियन सैनिकांना हुसकावून लावण्यात उपयोगी ठरू शकतो, हा विश्वास एस्तर आणि हिरूट करून देतात. पुढे या दोघींना कालरेस फुझिली बंदी बनवितो आणि घटनांना वेगळे वळण लागते.

मेंगिस्टे यांनी आपल्या कादंबरीची रचना ऑपेरासारखी केली आहे. कोरस, इंटरल्यूड यांना छायाचित्रवर्णनांची जोड देत इथले मारधाडीवजा युद्धवर्णन सुरू राहते. या युद्धाचा तपशील आपल्या जागतिक इतिहासाच्या शालेय पुस्तकात ‘इटलीचा फॅस्टिस्टवाद’ या प्रकरणात केवळ काही परिच्छेदांपुरता मर्यादित असल्याने, आपल्याला विस्ताराने त्याबाबत माहीत असायचे कारण नाही. किंबहुना आपल्याच स्वातंत्र्यलढय़ाविषयी मर्यादित आस्था असण्याच्या आजच्या काळात आफ्रिका खंडातील एका राष्ट्राचा अल्पकालीन स्वातंत्र्यलढा आवर्जून जाणून घेण्याची खुमखुमी आपल्या देशात निर्माण होण्याची अपेक्षाही नाही. पण कथेच्या माध्यमातून इतिहासाचा पुनशरेध घेण्याचा या लेखिकेचा मोठा आवाका वाचकाला थक्क करू शकतो. उग्र स्त्रीवादी भूमिकेत न जाता महिलांचा अन्यायाविरुद्धचा लढा ही कादंबरी दाखवून देते.

यंदाच्या बुकर लघुयादीमधील सर्वाधिक वाचनसंयम तपासणारी ही कादंबरी आहे. पहिल्या अडीचशे पानांपर्यंत इथिओपियन नावे, परिसर, तिथली संस्कृती, दैनंदिन व्यवहार समजून घेण्याचा संघर्ष यशस्वी ठरला, तरच पुढल्या स्त्री-युद्धसंगीताचा आस्वाद घेता येऊ शकेल.

(‘द श्ॉडो किंग’ ही कादंबरी दशकभराच्या काळातील अभ्यास, संशोधन, मुलाखती यांतून कशी साकारली, याबद्दल लेखिका माझा मेंगिस्टे यांची मुलाखत : https://www.youtube.com/watch?v=GeWuGKhQUOU)

pankaj.bhosale@expressindia.com

 

Story img Loader