पंकज भोसले
आपणही वाचायचो ना भूतकथा.. कुठे गेल्या त्या?- हा प्रश्न हिंदी, मराठीप्रमाणे इंग्रजीला पडत नाही, याचं कारण ग्रेडी हॅण्ड्रिक्स! हा अमेरिकी भूतमारी-कथांचा इतिहासकार.. पुढे स्वत:च उत्तम भयकथाकार झाला. त्याची नवी कादंबरी टाळेबंदीतही तुफान गाजतेय. तिच्या निमित्तानं तरी भूत-मारीच्या पुस्तकवेडाकडे पुन्हा लक्ष जाईल?
सत्तरच्या दशकात, म्हणजे ‘जागतिकीकरणा’च्या आधीच्या काळात, विविध देशांवर परिणाम करणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घटना अगदी भिन्नभिन्न असल्या, तरी लोकप्रिय साहित्याच्या एका प्रकाराची निर्मिती आणि विकास आश्चर्यकारकरीत्या देशोदेशी सारख्याच प्रमाणात झाला होता. या काळाआधी भय-भूतकथा लिहिल्या गेल्याच नव्हत्या असे नाही; पण या कालावधीत साध्याशा (लगदा) कागदावर पुस्तके छापणाऱ्या प्रकाशकांनी आपला सारा उद्योग ‘सैतान विक्रीकेंद्रा’त परावर्तित करायला सुरुवात केली होती. अमेरिकेत १९६७ ते १९७३ या सहा वर्षांच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या तीन सैतानी ग्रंथांनी धुमाकूळ माजवला होता. आयरा लेव्हिन यांची ‘रोझमरीज् बेबी’, टॉम ट्रायन यांची ‘द अदर’ आणि विल्यम पीटर ब्लॅटी यांची ‘द एग्झॉर्सिस्ट’ या मानव आणि सैतानाच्या लढायांच्या कादंबऱ्यांची अफाट संख्येने विक्री झाली. आज अनेकांना या कादंबऱ्यांवर बेतलेले चित्रपट माहिती असतात. पण या पुस्तकांनी एकूणच लोकप्रिय भयसाहित्याला ऊर्जितावस्था दिली, याचा तपशील अज्ञात असतो.
या पुस्तकांच्या प्रकाशनानंतर नवलेखकांची एक फळी सैतानाला विविध रंगांत आणि ढंगांत सादर करण्याच्या मागे लागली. सैतानाशी सामना करणारे लढवय्ये.. म्हणजे भूतमारी करणारे नायक-नायिका असलेली पुस्तके अमेरिकेत औषध दुकाने, सुपर मार्केट वा किराणा दुकानांमध्येही विकत मिळू लागली. महिन्याला रोचक, साहसपूर्ण, चटपटीत आणि भयभरीत कादंबऱ्यांचा वाचनीय ऐवज तयार होत होता आणि मुख्य धारेतल्या ‘साहित्या’चा वाचकही या साहित्याकडे आकर्षित होत होता. पूर्वसूरींपेक्षा अधिक धारदार आणि रंजक सैतानी कारवायांनी वाचकाला थिजवून टाकण्याचा विडा उचलणारे हे साहित्य नव्वदच्या दशकापर्यंत प्रचंड आर्थिक उलाढाल घडवत होते अन् आशिया, आफ्रिका खंडांत त्याचे प्रभाव उमटवत होते.
मराठीमध्ये ‘सैतानविक्री’चे प्रारूप बऱ्यापैकी रुजले नाही. तरी आश्चर्यकारकरीत्या अमेरिकेशी समांतर काळातच नारायण धारपांनी विणलेले सैतानविश्व सुरू झाले. त्यांचा अशोक समर्थ १९६२ च्या ‘अद्भुत’च्या दिवाळी अंकात जन्माला आला. त्यानंतर भगत, जयदेव हे अमानवीय ताकदींना लोळवणारे नायक तयार झाले. दिवाकर नेमाडे यांचे पातंजली आणि कपिंजल हे नायक १९७२ च्या दरम्यान भूत-रहस्यकथांचा नवा प्रकार सोबत घेऊन आले. सर्वाधिक रहस्यकथा लिहिण्याचा विक्रम असलेल्या गुरुनाथ नाईक यांनी डॉ. विजय खेर या नायकाला निर्माण करून सत्तरच्या दशकातच भूतकथाही लिहिल्या. त्यानंतर त्रिलोचन, योगीराज असे नायक घडवून काहींनी मराठीत सैतानी कथांना विक्रीमूल्य देण्याचा प्रयत्न केला. पण धारपांखेरीज कुणाचेही भयग्रंथ काळाच्या ओघात टिकून राहिले नाहीत. भूतकथांचा बाजारच लयाला गेला, याला मराठी मध्यमवर्गाची एकसुरी आणि फुटकळ विनोदात अधिक रमण्याची परंपरा कारणीभूत असू शकेल.
मराठीच्या बरोब्बर उलट हिंदीमध्ये भूतकथांना वाचकांनी डोक्यावर घेतले. राज भारती यांच्या भूत कादंबऱ्या, शैलेंद्र तिवारी यांची ‘मकडा’ मालिका आणि परशुराम शर्मा यांच्या ‘इन्का’, ‘आग’ या मालिकांनी सत्तरच्या दशकात संपूर्ण भारतभर किती मोठा वाचकवर्ग मिळवला याची गणतीच करता येऊ शकत नाही. रेल्वे स्थानकांवरील बुकस्टॉलपासून त्या काळी हातगाडीवजा ठेल्यांवर विक्री होणाऱ्या पुस्तक खरेदी-विक्री यंत्रणेत या नावांसह आणखी डझनभर भयलेखक सुपरिचित होते. गंमत म्हणजे, आज या पुस्तकांची अॅमेझॉनवर लिलावासारखी उच्च किमतीला विक्री होत असून किंडलवरही ती उपलब्ध आहेत. पण आपला विषय इंग्रजी पुस्तकांचा.
अमेरिकेत पुस्तकांतून सैतानविक्री करणाऱ्या यंत्रणेचा सत्तरच्या दशकापासूनचा इतिहास अगदी अलीकडच्या दशकापर्यंत ग्रंथित झालेला नव्हता. ग्रेडी हॅण्ड्रिक्स या लेखकाने या इतिहासाला तीन वर्षांपूर्वी ग्रंथरूप दिले आणि हरवलेल्या वाचनीय भूतसाहित्याचे दालन जगासाठी खुले झाले. ग्रेडी हॅण्ड्रिक्स हा पेशाने पत्रकार. दहा वर्षे तो आपल्या शहरात सांस्कृतिक बीटवरच्या बातम्या करण्यात रममाण असताना २००८ ची मंदी आली. लोप पावलेल्या रोजगारामुळे लादलेल्या रिकामपणी त्याचे लक्ष भयकथा लेखनाकडे वळले. त्यातून त्याबाबतची माहिती घेता-घेता काही वर्षे तो १९७०-८० च्या दशकातील सैतानी पुस्तकांच्या वाचनात बुडून गेला. इतका की, त्यावरच्या खासगी नोंदींतून ‘पेपरबॅक्स फ्रॉम हेल : द ट्विस्टेड हिस्टरी ऑफ सेव्हण्टीज् अॅण्ड एटीज् हॉरर फिक्शन’ हा ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ आज भयकथाप्रेमींसाठी बायबलसमान आहे. सैतानकथांचे रंजक टप्पे, गोऱ्यांच्या सैतानकथांनी प्रभावित होऊन अमेरिकेत कृष्णवंशीय सैतानकथांनी तयार केलेले वळण, ज्यू आणि रशियन लेखकांनी आपली प्रादेशिक, वांशिक तसेच धार्मिक अस्मिता आपल्या ‘जाती’ची भुते तयार करून कशी टिकवली, या रंजक बाबींसह अत्यंत वाचनीय असलेल्या शेकडो भूतपुस्तकांची माहिती या ग्रंथाद्वारे मिळते.
ग्रंथविश्वातील सैतानविक्रीची आज साऱ्या जगातील वाचकांना उपयुक्त होईल, अशी माहिती गोळा करता करता ग्रेडी हॅण्ड्रिक्समधील लेखकाच्या मनात दडलेल्या भयकथा कागदावर उतरू लागल्या. ‘हॉररस्टोअर’, ‘माय बेस्ट फ्रेण्ड्स एग्झॉर्सिझम’, ‘वी सोल्ड अवर सोल्स’ या भयकादंबऱ्यांमधून त्याचे जुन्या धाटणीच्या भूतकथांवरील प्रेम समोर आले. गेल्या वर्षी त्याच्या पटकथेवर ‘सॅटनिक पॅनिक’ हा चित्रपट आला होता. ज्यात त्याने अमेरिकी उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत घरांत चालणाऱ्या काळ्या जादूच्या प्रकाराची रंजक मांडणी केली होती.
ऐंशी-नव्वदच्या दशकांतील आजच्याइतक्या खूप सुविधांनी युक्त नसलेल्या जगाला कथेमध्ये चित्रित करणे ग्रेडी हॅण्ड्रिक्सला आवडते. अन् त्याच्या या अर्वाचीन जगात घडणाऱ्या भयसंपृक्त गोष्टींमुळे तो गेल्या दोनेक वर्षांत अधिकाधिक प्रमाणात वाचला जाणारा लेखक बनला आहे. या वर्षांरंभापासून त्याच्या ‘द सदर्न बुक क्लब्ज गाइड टू स्लेइंग व्हॅम्पायर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे भयवाचकांचे चातकडोळे लागले होते. जगभरात करोनाभयाने लागलेल्या टाळेबंदीमुळे गाजावाजा, पुस्तकाच्या प्रसिद्धी-दौऱ्याची अपेक्षित बाब टाळून गेल्या महिन्यात हे पुस्तक प्रकाशित झाले. छापील आणि ई-बुक या दोन्ही माध्यमांतून या पुस्तकाची उपलब्ध समाजमाध्यमे आणि दूरचित्रसंवादाद्वारे प्रसिद्धी होत असून, टाळेबंदीचा अडथळा पार करीत ते चर्चेतल्या ताज्या पुस्तकांत समाविष्ट झाले आहे.
‘द सदर्न बुक क्लब्ज गाइड टू स्लेइंग व्हॅम्पायर’ ही कादंबरीदेखील ग्रेडी हॅण्ड्रिक्सचे जन्मस्थान असलेल्या चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना या परिसरात १९८० ते ९० च्या दशकात घडते. या भागात सुखासीन आयुष्य जगणाऱ्या घरांतील स्त्रियांचा कटाक्ष सर्वोत्तम गृहिणी बनण्याकडे असल्याने पतीला सर्वस्व मानून त्याची सेवा, मुलांना अभ्यासात मदत करण्यापासून घरातील कपडय़ांची व्यवस्थित विभागणी, मुलांना दूरवरच्या उत्तम शाळेत आणण्या-सोडण्याचे कर्म आणि चर्चमध्ये प्रार्थना या बाबींमध्ये त्या गुंतलेल्या असत.
कादंबरीचा आरंभ होतो यातील नायिका आणि आदर्श गृहिणीची सारी तत्त्वे अंतर्भूत असलेल्या पॅट्रिशिया कॅम्पबल हिच्यापासून. १९८८ च्या नोव्हेंबर महिन्यातील त्यांच्या बुकक्लबमध्ये ‘क्राय, द बिलव्हड् कण्ट्री’ या पुस्तकावर चर्चा होणार असते. चर्चेची त्या पुस्तकापुरती सूत्रधार पॅट्रिशिया असल्यामुळे अन् तिच्या रोजच्या घरातील कामांच्या धबडग्यात एका पानापलीकडे पुस्तक वाचलेले नसल्यामुळे तिची फजिती अटळ असते. पण ती न वाचलेल्या पुस्तकात (नसलेल्या) एकापेक्षा एक गोष्टींच्या बाता मारायला लागते. पुस्तकमंडळातील इतर सदस्यांचे वाचनही पॅट्रिशियाइतकेच एकपानी (किंवा त्याहून कमी) असल्यामुळे प्रत्येक जणी चर्चेत माना डोलावू लागतात. पुस्तकमंडळाच्या प्रमुख महिलेला पॅट्रिशियासह इतरांनीही पुस्तक वाचले नसल्याचे लक्षात आल्याने ते संपूर्ण मंडळच गमतीशीर घटनांसह बरखास्त होते.
अभिजात पुस्तकांचेच वाचन करीत असल्याचे दर्शविणाऱ्या आणि दर वर्षांसाठी खूपविकी-खूप लोकप्रिय असूनही वाचायला अवघड (म्हणजे पुरस्कार वगैरे मिळालेली) पुस्तके निवडणाऱ्या बायकांच्या त्या मंडळातील एक गट फुटतो. हा गट लोकप्रिय, पल्प कागदांवरच्या चटपटीत, रंजक पुस्तकांना वाचायचे ठरवून आपले स्वतंत्र पुस्तकमंडळ तयार करतो. या पुस्तकमंडळातील सदस्य महिला अजिबातच गंभीर वाचक नसतात. पुस्तकांविषयी चर्चेसाठी एकत्र येण्याचे केवळ निमित्त असते. दररोज घरातील गोष्टींना सातत्याने दिल्या जाणाऱ्या वेळेतून दिलासा म्हणून या पुस्तकमंडळाची रचना केलेली असते. तरी या नव्या पुस्तकमंडळाने निवडलेल्या (आधीच्या मंडळाच्या निकषांत कमी दर्जाच्या) लोकप्रिय पुस्तकांचे त्यांच्याकडून जोमाने वाचन सुरू झालेले असते. व्हॅम्पायर, सैतान, रोमॅण्टिक आणि बराचसा शृंगार भरलेल्या कादंबऱ्या त्या (मम्मी पोर्नच्या धर्तीवर) चवीने वाचत असतात. वर पुस्तकमंडळ भरलेले असताना पुस्तकाऐवजी नवऱ्याचे कर्तृत्व, मुलांना शाळेतील डब्यात कोणते पदार्थ द्यावेत, अंगणातील उंदरांचा बंदोबस्त कसा करावा, यांच्या चर्चेमध्ये सारा वेळ घालवत असतात. पॅट्रिशियासह किटी, मेरिलिन, ग्रेस, स्लीक या साऱ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरावर एकाच उंचीच्या असल्यामुळे त्यांची जगण्याची, वाचण्याची आणि विचार करण्याची पातळीही भिन्न नसते.
पॅट्रिशिया ही डॉक्टर पती, दोन मुले आणि आजारी सासूसह सुखवस्तू घरात राहत असते. सारे काही खूप चांगले सुरू असताना शहरात विचित्र घटना घडू लागतात. घराघरांतील तिरसट वृद्ध आणखी विचित्र वागू लागतात. त्यात पॅट्रिशियावर हल्ला करून तिचा एक कान काही अंतरावर राहणाऱ्या वृद्धेकडून तोडला जातो. ही वृद्घा सैरभैर होऊन रुग्णालयात मृत्युमुखी पडते. या वृद्धेची देखभाल करण्यासाठी शहरात दाखल झालेल्या तिच्या नातेवाईकाच्या सांत्वनासाठी पॅट्रिशिया जाते. पहिल्या भेटीनंतर ती जेम्स हॅरिस नावाच्या या व्यक्तीला मदत करण्यास तत्पर असते. पण नंतर शहरात आणि शहराबाहेर असलेल्या कृष्णवंशीयांच्या वस्तीत दुर्घटनांची मालिका सुरू होते. तेव्हा तिची जेम्स हॅरिसबाबत असलेली धारणा पूर्णपणे बदलते. पॅट्रिशियाच्या आजारी सासूचा उंदरांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होतो. कृष्णवंशीय लहान मुले अचानक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. कुठलीशी अमानवी शक्ती या मुलांना उचलून घेऊन त्यांच्या शरीरातील रक्त शोषून घेण्याचा प्रकार करीत असल्याची कुजबुज रंगू लागते.
बुकक्लबमुळे भुतांच्या कादंबऱ्या वाचू लागलेली पॅट्रिशिया या साऱ्या प्रकाराची पाळेमुळे जेम्स हॅरिसपर्यंत नेऊ पाहते. परंतु तिच्या बुकक्लबमधील तसेच घरातील सारे सदस्य तिला मूर्खात काढतात. जेम्स हॅरिस हा हाडामांसाचा एक सभ्य गृहस्थ असून त्याच्यावर पॅट्रिशिया करीत असलेले आरोप तद्दन खोटे असल्याचे तिच्या मनावर बिंबवून हॅरिसची जाहीर माफी मागण्यास तिला भाग पाडले जाते.
काही वर्षांनी कृष्णवंशीय वस्तीत घडणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती शहरातही घडायला सुरुवात होते. तेव्हाच पॅट्रिशियाला भूत बनून येणाऱ्या सासूचा दृष्टांत होतो आणि जेम्स हॅरिस या गूढ व्यक्तीचे व्हॅम्पायरपण सिद्ध करण्यासाठी पॅट्रिशिया सक्रिय होते. आपल्या पुस्तकमंडळाला विश्वासात घेत ती शहरातील मुलांचा बळी जाऊ नये म्हणून या व्हॅम्पायरच्या उच्चाटनाचा कार्यक्रम आखते.
कादंबरी आपल्या रंजक कथानकासह एकाच वेळी गौरवर्णीय आणि कृष्णवंशीय समाजांतील दरी, नवऱ्याच्या वर्चस्वाखाली केवळ आदर्श गृहिणी बनण्याच्या नादात दबून राहणाऱ्या नव्वदच्या दशकातील महिला आणि बदलत जाणाऱ्या शहराच्या रूपाची दखल घेत पुढे सरकते.
भूत व त्याचे व्हॅम्पायर, झॉम्बी आदी उपप्रकार हे सारे काल्पनिक. तरी साहित्यातून त्यांची प्रचंड वाचनीय अशी निर्मिती सत्तरच्या दशकापासून सुरू झाली. या इतिहासाचा वेध घेणाऱ्या हॅण्ड्रिक्सच्या कादंबरीतील पात्रेही त्या इतिहासाशीच एकरूप झालेली दिसतात. इथे ड्रॅक्युलापासून सत्तरच्या दशकाने व्हॅम्पायरकथांना वळण लावलेल्या संदर्भाचे अनेक दाखले सहजपणे डोकावून जातात. मात्र, सूर्यप्रकाशात वितळणाऱ्या व्हॅम्पायरच्या पारंपरिक संकल्पनेला इथे थोडीशी बगल देण्यात आली आहे. शिवाय ‘अंगावर काटा आणणारे’ प्रसंग न रचताही भूतमारीची गोष्ट कशी रंगवली जाऊ शकते, याचे उदाहरण घालून दिले आहे. साऱ्याच भूत आणि भयकथा वाचकांच्या मनाची चांगली पकड घेणाऱ्या असतात. हॅण्ड्रिक्स ही बाब पुन्हा पुन्हा ठसवतोच. शिवाय लोकविलक्षण कादंबऱ्यांचे संदर्भ पेरून वाचकाला पुस्तकमंडळाचे सभासद करून घेतो!
pankaj.bhosale@expressindia.com