सुकुमार शिदोरे sukumarshidore@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तीन वर्षांपूर्वी- कारगिल युद्धात शहीद झालेल्या आपल्या वडिलांना ‘पाकिस्तानने मारलेले नसून युद्धाने मारले’ अशी शांततावादी भूमिका घेऊन वादात अडकलेल्या गुरमेहर कौरने गतवर्षी आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले, तेही चर्चिले गेले. गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेले तिचे नवे पुस्तक मात्र ‘ट्रोलबाजी’च्या पलीकडे जाणाऱ्या आश्वासक नवनेतृत्वाची ओळख करून देणारे आहे..
गुरमेहर कौरचे ‘पुरोगामी कार्य’ ती दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना सुरू झाले. भारत-पाकिस्तानच्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन मनजीत सिंग यांच्या या मुलीने- ‘माझ्या वडिलांना पाकिस्तानने मारलेले नसून युद्धाने मारले’ असे संतुलित मत तीन वर्षांपूर्वी समाजमाध्यमांतून व्यक्त केले. तिच्या शांतता- मोहिमेशी तिचे म्हणणे अर्थातच सुसंगत होते. मात्र, या तिच्या व्यापक दृष्टिकोनामुळे द्वेषपूर्ण व आक्रमक ट्रोलबाजीला तिला सामोरे जावे लागले. त्या जाचातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या गुरमेहरची खुली विचारसरणी त्यानंतर अधिकाधिक उभारी घेत आहे. भाजपच्या वा इतर कोणत्याही सांप्रदायिक कट्टरवादाला गुरमेहरचा अर्थातच ठाम विरोध आहे. ती जशी ‘कार्यकर्ती’ (अॅक्टिव्हिस्ट) आहे, तशीच नवोदित लेखिकाही आहे. तिचे पहिले आत्मचरित्रात्मक पुस्तक (‘स्मॉल अॅक्ट्स ऑफ फ्रीडम’) गेल्या वर्षी प्रकाशित झाले. केवळ २३ वर्षे वयाची ही युवा लेखिका दिल्ली विद्यापीठातील आपले शिक्षण यंदा (२०१९ साली) पूर्ण करीत आहे आणि तेवढय़ात तिचे हे दुसरे पुस्तक वाचकांसमोर आले आहे.
गुरमेहरने हे पुस्तक सध्याच्या पाश्र्वभूमीवर लिहिले आहे. सुमारे ६० टक्के युवा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचे बहुतांश नेते मात्र वृद्ध आहेत. ही बाब तिला खटकल्यामुळे देशातील होतकरू युवा नेत्यांचा शोध घेण्याचे तिने ठरवले. तूर्त तिने आठ युवा नेत्यांवर आपले लक्ष- व हे पुस्तक – केंद्रित केले आहे. कमी वयाव्यतिरिक्त इतरही काही निकष तिने महत्त्वाचे मानले आहेत. सध्याचे बहुतांश प्रस्थापित नेते जुनाट व प्रतिगामी विचारांनी पछाडलेले, उद्दाम, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील आहेत, असे गुरमेहरचे निरीक्षण आहे. मात्र पुस्तकासाठी निवडलेले आठही नेते अशा सगळ्या अवगुणांपासून मुक्त आहेत, असे ती आवर्जून सांगते. हे नेते म्हणजे : ओमर अब्दुल्ला, सचिन पायलट, सौम्या रेड्डी, जिग्नेश मेवानी, शेहला रशीद, आदित्य ठाकरे, मधुकेश्वर देसाई आणि राघव चड्ढा! गुरमेहरने तिच्या दृष्टिकोनातून या नेत्यांचे कार्य व व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर सादर केले आहे. त्यासाठी त्यांच्या खास मुलाखतीही तिने घेतल्या आहेत.
राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी या सर्वच नेत्यांच्या ठायी समाजसुधारणेची तीव्र तळमळ आहे, असे दिसून येते. हे सगळेच नेते आपापल्या क्षेत्रात काम करून समाजातील उपेक्षित विषयांना किंवा वर्गाना प्राधान्य देऊ इच्छितात. पुस्तकात प्रत्येक नेत्यावर एकेक स्वतंत्र प्रकरण आहे. तथापि, प्रत्येक नेत्याच्या कर्तबगारीचा केवळ रूक्ष परामर्श वाचायला मिळेल असा पूर्वग्रह कोणीही बाळगू नये. गुरमेहरने समग्र पुस्तक एखाद्या कादंबरीकाराच्या लोभस लेखनशैलीत लिहिले आहे. शिवाय, स्वत:चे विचार व अनुभव जागोजागी आकर्षकपणे गुंफले आहेत. त्यामुळे विविध युवा नेत्यांच्या व्यक्तिरेखांना उठाव आला आहे आणि शिवाय पुस्तकाच्या व्याप्तीत व रोचकतेत भर पडली आहे.
अनेक गंभीर विषयांना पुस्तकात आपसूकच स्थान मिळाले आहे आणि त्यांचा कमी-अधिक प्रमाणात ऊहापोह झाला आहे. उदाहरणार्थ, काश्मीरचा युवा नेते ओमर अब्दुल्ला यांची अनुभवसंपन्न मते महत्त्वाची ठरतात. या संघर्षक्षेत्रात (कॉन्फ्लिक्ट झोन) लहानाचे मोठे झालेल्या युवकांच्या मानसिकतेचे विश्लेषण ओमर यांच्याकडून जाणून घेणे आवश्यक ठरते. दिल्लीचा आम आदमी पक्षाचे एक प्रमुख नेते राघव चड्ढा सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण संस्थांचा दर्जा वाढवण्यावर भर देताना दिसतात. गुजरातमधील जिग्नेश मेवानी हे दलित आणि तमाम पीडितांवरील अन्याय व अत्याचारांविरुद्ध एल्गार पुकारतात, तर कर्नाटकातल्या युवा आमदार सौम्या रेड्डी पर्यावरण व प्राण्यांचे हक्क आदी क्षेत्रांत सामाजिक जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करतात, स्त्रियांमध्ये मासिक पाळीसाठी ‘मेन्स्ट्रअल कप्स’च्या वापराचा प्रसार करतात. राजस्थानमधील काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट धर्मनिरपेक्षतेचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा नेटाने प्रयत्न करताना दिसतात. तर भाजपचे युवा नेते मधुकेश्वर देसाई पक्षाचे कार्य निष्ठापूर्वक पार पाडण्यात मश्गूल दिसतात. भाजपवरील सांप्रदायिकतेचे आरोप नाकारताना धर्मनिरपेक्षतेचा पोकळ दावा करणाऱ्या काँग्रेसच्या सांप्रदायिक करतुतींवर बोट ठेवण्यासही ते विसरत नाहीत. माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंचे मधुकेश्वर हे पणतू आहेत; पण स्वत:चे वजन वापरून सुरतच्या विमानतळाला मोरारजींचे नाव देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, असा अनेकांचा आग्रह ते निकराने नाकारतात. शेहला रशीद या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या डाव्या चळवळीतून पुढे आलेल्या काश्मिरी कार्यकर्त्यां असून प्रस्थापित साचेबंद राजकारणाच्या पलीकडे जाणारी परिवर्तनशील जनआंदोलने त्यांच्यासारख्या नेतृत्वाकडून अपेक्षित आहेत. गुरमेहरच्या त्या आदर्श आहेत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचा पारंपरिक वारसा पुढे नेणारे युवा नेते असले; तरी त्यांची मते काळाशी किती सुसंगत आहेत, हे गुरमेहरने त्यांच्याशी केलेल्या वार्तालापावरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ, मुंबईत ठरावीक भागातली उपाहारगृहे, दुकाने इत्यादी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्याचे फायदे, प्लास्टिकबंदीची निकड, सर्वोच्च न्यायालयाचा कलम-३७७ बाबतचा स्वागतार्ह निर्णय, गोमांसबंदीपासून उद्भवणारे ‘लिंचिंग’चे अत्याचार, महिलांचे अधिकार, हिंदुत्व.. अशा विविध मुद्दय़ांवरचे आदित्य यांचे खुले व उदार (लिबरल) विचार त्यांच्या परिपक्व नेतृत्वगुणांना पुरेसे प्रकाशात आणतात.
बहुतेक नेत्यांची जडणघडण होण्याच्या प्रक्रियेत जी वेगवेगळी परिस्थिती वा जे प्रसंग प्रभावशील ठरतात, त्यांची वर्णने पुस्तकात आढळतात. उदाहरणार्थ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काश्मीरला एकदा भेट दिली, तेव्हा तेथे इंटरनेट, मोबाइल इत्यादी सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्या प्रसंगामुळे विद्यार्थिदशेतील शेहला रशिदला पहिल्यांदाच दळणवळण बंदीमुळे होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनांची जाणीव झाली. मधुकेश्वर देसाई यांना सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या एकाही व्यक्तीने त्या पक्षाची विचारसरणी समजावून सांगितली नाही. मात्र, भाजपच्या लालकृष्ण अडवाणींनी त्यांना पद्धतशीर मार्गदर्शन केले. दोन पक्षांतील हा फरक मधुकेश्वर यांना जाणवला आणि म्हणून आज ते भाजपचे अनुभवी व सुविद्य असे युवा नेता आहेत. जिग्नेश मेवानी तळागाळातील शिक्षण‘व्यवस्थे’तून पुढे आलेले आहेत. मेवानी जेव्हा जातिव्यवस्थेबद्दल बोलतात आणि त्यांच्या विद्यार्थिदशेतील विदारक अनुभव सांगतात, तेव्हा त्या संदर्भात गुरमेहरला तिच्या स्वत:च्या उच्चभ्रू शाळेतील शिक्षिकेकडून अख्ख्या वर्गाला त्याच विषयावर किती चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले, ते आठवते. त्या प्रसंगाचे खुमासदार व उपरोधिक वर्णन ती वाचकांपुढे पेश करते.
गुरमेहर देशातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीबाबत चिंतित आहे. सरकारी गोटातून ज्यांना सतत हिणवले जाते, अशा प्रागतिक विचारवंतांच्या विस्कळीत व असंघटित समुदायाच्या ती वैचारिकदृष्टय़ा जवळ आहे, असे सोयीकरिता म्हणता येईल. अशा अनेक विचारवंतांच्या मतानुसार, देशातील प्रमुख राजकीय पक्ष हिंसाचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्यात वर्षांनुवर्षे असमर्थ ठरले आहेत. आजदेखील दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत. धर्मनिरपेक्षतावाद आणि भारताच्या सर्वसमावेशक परंपरेची कुचेष्टा केली जात आहे. हिंदुत्ववाद व राष्ट्रवाद यांच्या नावाखाली निरपराध नागरिकांना वेठीला धरले जात आहे. एकीकडे अशा अनेक बाबींना बलवान उजव्या गटांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे प्रस्थापित विरोधी पक्ष त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ दिसत आहेत. परंतु एक उल्लेखनीय पैलू म्हणजे, अलीकडच्या काळात जेएनयू व हैदराबाद विद्यापीठ येथे उदयाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या रास्त चळवळींमुळे सर्वच प्रस्थापित राजकारण्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दृश्य दिसून आले. त्यावरून आदर्शवादी व गतिमान (डायनॅमिक) नेतृत्वाचे महत्त्व पुरेसे अधोरेखित झाले आहे. ही अशी भूमिका प्रस्थापित राजकारण्यांना मानवणारी नसली व तिचे भवितव्यही अगम्य असले, तरी तिचे आपल्या लोकशाहीच्या उत्क्रांतीतील स्थान सहजासहजी नाकारता येणार नाही.
कट्टर उजव्या शक्तींच्या आक्रमणाविरुद्ध गुरमेहरने जो संघर्ष केला, त्याचा भावनिक ताण तिला सहन करावा लागला. तिच्यावरील बौद्धिक व मानसिक हल्ल्यांचा तिच्या परीने प्रतिकार करणे तिला भाग होते. एका अर्थी तिचे पहिले पुस्तक त्या प्रतिकाराचाच परिपाक होता. आता हे दुसरे पुस्तकही तिच्या जीवनातील व्यापक संघर्षांचाच एक भाग म्हणून लेखायला हरकत नाही. अर्थात, पुस्तकाचा विषय जाणीवपूर्वक योजलेला आहे आणि मांडणी त्यानुसारच आहे. पुस्तकात अधिक महिला कार्यकर्त्यांना किंवा पूर्वोत्तर राज्यांतील नेत्यांना समाविष्ट करता आले नाही, याची गुरमेहरला खंत आहे. पण तरीही नव्या नेत्यांचा जो काही अल्पसा शोध ती घेऊ शकली, त्यावरून यापुढील नव-नेतृत्व देशाकरिता आश्वासक असणार आहे, असा तिला विश्वास वाटतो आहे. या विषयावर वाचकांची वेगवेगळी मते असू शकतात. मात्र हे पुस्तक दखलपात्र व वाचनीय आहे, हे निश्चित!
‘द यंग अॅण्ड द रेस्टलेस : यूथ अॅण्ड पॉलिटिक्स इन इंडिया’
लेखिका : गुरमेहर कौर
प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस, इंडिया
पृष्ठे: २७२, किंमत : २९९ रुपये