पंकज भोसले

नायिका पर्यटनक्षेत्रात नाइलाजाने आलेली आहे, जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा भयावह नाइलाज तिला इथेही छळतो आहे. देश कुठे जाणार आहे, आपण कुठे निघालो आहोत, तिला माहिती नाही.. तरीही प्रवास सुरूच आहे आणि चांगले आयुष्य जगणे हेच ध्येय आहे. वाचकावर घट्ट पकड घेणारा, नायिकेच्या अतिशय जवळचे स्थान वाचकाला बहाल करणारा अनुभव देते ही कादंबरी!

डॉलरच्या तुलनेत नेहमीच गटांगळ्या खाताना दिसणाऱ्या आपल्या भारतीय रुपयाचे मूल्य झिम्बाब्वेच्या ‘झिम्बाब्वेअन डॉलर’ या चलनात पडताळायचे ठरविले, तर आपला एक रुपया तिथे चार रुपये ८६ पैसे इतक्या ताकदीचा दिसेल आणि तिथल्या एका ‘झिम्बाब्वेअन डॉलर’ची किंमत आपल्या २५ पैशांहूनही कमी भरेल. आपल्याप्रमाणेच ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या राष्ट्रामधील स्वातंत्र्यलढय़ाला यश आले १९८० साली. ऱ्होडेशियाचे झिम्बाब्वे हे नामकरण झाल्यानंतर येथील पहिलेवहिले राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेण्याचा एककल्ली कार्यक्रम राबविला. मुगाबेंनी गोऱ्यांच्या ताब्यातील शेतजमिनीचे कृष्णवर्णीयांमध्ये वाटप करून तिचे तुकडे केले. उद्योगधंद्यांचे वाटोळीकरण केले. नागरिकांसाठी मूलभूत सुविधा सोडाच, पण निकोप सामाजिक वातावरण पुरविण्यातही संकोच केला. दोन हजार साली या देशातील महागाईचा दर वर्षांला २३१ दशलक्ष टक्के इतका वाढला. मग २०१० साली त्यांनी १० दशलक्ष डॉलरची नवी नोट बाजारात आणली. महागाईच्या उच्चांकांमुळे इथले भुकेकंगाल लाखोपती नागरिक पारतंत्र्याहून अधिक भयावह जगण्याला सामोरे गेले. अखेर २०१५ सालात तिथे नोटाबंदी करून, नवा ‘झिम्बाब्वेअन डॉलर’ आणवला गेला. मात्र भ्रष्टाचार, बेरोजगारी, शहरांचे बकालीकरण, गुन्हेगारी यांचे अस्तित्व कोणत्याही देशापेक्षा शंभर-दोनशेपट असलेल्या झिम्बाब्वेच्या साहित्यातून उमटणारे आयुष्य नक्कीच सरळसोट असू शकत नाही. त्सित्सी दांगारेम्ब्वा या लेखिकेची यंदाच्या बुकर लघुयादीत दाखल झालेली ‘धिस मोर्नेबल बॉडी’ ही येथील सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करते. या अधोदेशीचे पर्यटन घडविते.

१९८८ साली त्सित्सी दांगारेम्ब्वा यांचे पहिले पुस्तक ‘नव्‍‌र्हस कंडिशन्स’ लंडनमध्ये प्रकाशित झाले. झिम्बाब्वेतल्या स्त्रीने लिहिलेले ते पहिले इंग्रजी पुस्तक. या एकाच कारणाकरता ते गाजले असते, तरी ते साहजिक ठरले असते. पण ते त्याच्या आशयाकरिताही नावाजले गेले. इतके, की २०१८ साली ‘बीबीसी’ने जगाला प्रभावित करणाऱ्या १०० पुस्तकांची जी यादी केली, तिच्यात या पुस्तकाचा समावेश झाला. दांगारेम्ब्वांच्या पुस्तकामुळे आणि त्यांनी चालविलेल्या राष्ट्रव्यापी लेखन कार्यशाळांमुळे या देशात आपले दु:खप्रद जगणे साहित्यातून मांडणारी लेखक/ लेखिकांची पिढी तयार झाली (२०१३ साली बुकरच्या लघुयादीत धडकलेल्या ‘वी नीड न्यू नेम्स’ कादंबरीची लेखिका नो व्हायोलेट बुलावायो ही या पिढीतीलच एक.). ‘अन्याय-शोषणाच्या पार्श्वभूमीवरील स्त्रीचा जीवनसंघर्ष’सारख्या पारंपरिक शब्दप्रयोगाला अगदीच फोकनाड ठरविणारी टणकहृदयी व्यक्तिरेखा दांगारेम्ब्वा यांनी आपल्या कादंबरीत्रयीतून उभी केली.

शिक्षणाची जबरदस्त आस असलेली टॅम्बू ऊर्फ टॅम्बुझाई ही चिमुकली त्यांच्या पहिल्या ‘नव्‍‌र्हस कंडिशन्स’ची नायिका. वसाहतोत्तर काळातील झिम्बाब्वेमधला वंशवाद (त्यातच शोना आणि एण्डेबेले जमातींचे वैर) आणि त्याच्या जोडीला गरीब, काळ्या कुटुंबातल्या स्त्रीला सामोरे जावे लागणारी क्रूरोत्तम पुरुषसत्ताक परिस्थिती यात तिचा अभ्यासगाडा पुढे सरकला. या नायिकेचे बंडखोर तारुण्य आले ‘द बुक ऑफ नॉट’ नावाच्या दुसऱ्या कादंबरीतून. देशातील भ्रष्टाचार आणि अल्पसंख्य-बहुसंख्य संघर्षांचा इतिहासत्यात डोकावतो. ‘धिस मोर्नेबल बॉडी’मध्ये टॅम्बू पुन्हा अवतरते. आता तिची तिशी ओलांडली आहे. नोकरी- नवरा या (तिथल्या पारंपरिक) जगण्याच्या घटकांऐवजी साजेसा किंवा कोणताही निवारा हा तिच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.

आपल्या कामाचा फायदा गोरे अल्पसंख्य करून घेत असल्याचे लक्षात आल्यावर टॅम्बू प्रतिष्ठित जाहिरात कंपनीतील नोकरी सोडून देते. त्यापाठोपाठ वय तसेच विचारांनी फारच मागास असलेल्या मुलींच्या वसतिगृहात राहणे तिच्याकरता अधिकाधिक कठीण होऊन बसते. एकीकडे नोकरी शोधणे, राहायला जागा शोधणे आणि पदोपदी अपमानित करत राहणाऱ्या, खचविणाऱ्या आयुष्याशी झगडत सुख मिळवायचा प्रयत्न करीत राहाणे, हा तिचा दिनक्रम. त्या दिनक्रमातही ज्याला काहीसा ‘काळा’ म्हणता येईल, असा विनोद या नायिकेला पारखा झालेला नाही, ही अत्यंत रोचक अशी बाब. वसाहतीत तिच्याबरोबरच्या मुलींची आणि टॅम्बूच्या त्यांच्यापासून कमाल अलिप्त राहण्याच्या प्रयत्नांची वर्णने ज्या प्रकारे येतात, त्यात प्रचंडतिरकसपणा आहे. कारुण्यही आहे, पण ते कमालीचे धारदार. या मुली जणू अद्याप आयुष्यापासून काही मिळवण्याची आशा करू शकतात; कारण वय त्यांच्या बाजूने आहे. पण टॅम्बूचे शरीरही उलटत्या दिवसांसह तिच्यावर सूड उगवत आहे, असा भास होत राहतो. टॅम्बू वसतिगृह सोडून ‘एका विधवेच्या बंगल्यात’ जागा मिळवते, त्यानंतर शिक्षिका म्हणून नोकरी करते. पण दर वळणावर हवा असलेला आनंद तिला हुलकावण्या देतो आणि ही हरायला नकार देणारी ही नायिका अधिकाधिक क्रूर होत, कठोर होत आयुष्याशी लढत राहते. या संघर्षांची अखेर होते ती तिच्या आईबापाच्या मुर्दाड वाडीवर. तिथे ती पर्यटन केंद्रातील नोकरी नाइलाजाने पत्करते. आयुष्यभर ज्या व्यक्तीशी कळत-नकळत झगडत राहिलो अशा व्यक्तीकडे नोकरी धरावी लागणे आणि तिथेही आफ्रिकी जगाचे वसाहतकालीन-बीभत्स म्हणावे असे काळात गोठवून ठेवलेले प्रतीक म्हणून एक ‘पारंपरिक नृत्य’ सादर करावे लागणे, हा तिच्या झगडय़ाचा परिपाक.

अत्यंत अनोखा असा निवेदनाचा प्रयोग लेखिकेने या कादंबरीत केला आहे. निवेदक जणू नायिकेशी तिला उद्देशून बोलतो आहे, अशा प्रकारचा द्वितीयपुरुषी प्रयोग पूर्ण कादंबरीभर झालेला दिसतो. त्यामुळे आपण जणू नायिका आहोत, आपले कुणी तरी भेदक नजरेने निरीक्षण करत आहे आणि आपल्याला आरपार पाहू शकणाऱ्या या तीक्ष्ण नजरेच्या निरीक्षकापासून आपली कसलीही बरीवाईट गुपिते लपूच शकत नाहीत, असा काही तरी भाव वाचकाच्या मनात सतत कळत-नकळत खेळत राहतो. त्याने जणू वाचक आणि नायिका यांच्या स्थानांची अदलाबदल होते; वाचकाचे त्रयस्थ-तटस्थ निरीक्षकाचे स्थान हिरावून घेतले जाते आणि नायिकेशी निराळ्याच प्रकारची जवळीक साधली जाऊन अगदी निराळा परिणाम जन्माला येतो. कादंबरीच्या आशयाशी पूर्णत: मिसळून गेलेला, प्रयोग वाटूच नये, असा हा निवेदनाचा प्रकार, हे या कादंबरीचे सर्वात मोठे बलस्थान आहे. अनेक काळ्या-पांढऱ्या-राखाडी स्वभावछटांचे मिश्रण असलेली टॅम्बू या निवेदनाच्या धाटणीमुळे जवळून दिसते, अधिक कळते.

वसाहतकालीन शोषणातून वर येऊ  पाहणाऱ्या दळिद्री, कंगाल आणि पुरुषसत्ताक समाजांमधले आयुष्य मुळातच प्रचंड संघर्षांचे असते. या संघर्षांमधून हट्टाने जगू पाहणाऱ्या- प्रगती करू पाहणाऱ्या स्त्रीच्या आयुष्याला शोषणाचा एक अधिकचा वळसा असतो. तिच्या शरीराने तिला दिलेला. नायिकेची गटर्र्ड नामक मैत्रीण बसच्या गर्दीत हेलपाटली जात असतानाचा एक प्रसंग कादंबरीत आला आहे. त्यात फिदीफिदी हसणारे, जमेल तसा फायदा घेणारे सर्वसामान्य पुरुष आहेत, तशाच सर्वसामान्य स्त्रियाही आहेत. त्यांच्या साध्या प्रतिक्रियांमधल्या क्रौर्याने हबकून जायला होते. नायिकेच्या प्रतिक्रियांमधल्या कोरडेपणाने या सगळ्या शोषणाधारित व्यवस्थेच्या परिपाकाला निराळाच आयाम मिळतो. अशा प्रकारचे अनेक प्रसंग कादंबरीत येतात. चिवट- महत्त्वाकांक्षी निर्धारातून इथल्या टॅम्बूच्या व्यक्तिमत्त्वाचा राखाडी पोत घडला आहे. तिची जबर जीवनासक्ती थक्क करणारी आहे.

लेखिकेची भाषा हे या कादंबरीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़. म्हटले तर हे त्रयस्थ-तटस्थ निवेदकाने केलेले वस्तुनिष्ठ वर्णन आहे. पण त्या निवेदनात अनेक वाक्ये आपल्या मिताक्षरी काव्यगुणांनी लख्खकन चमकून जातात. वाचकाला थबकायला लावतात. पुन्हा वाचायला लावतात. गद्यप्रेमीलाही एखाद्या समर्थ कवीच्या रचनाप्रयोगांची आठवण येत राहावी, अशा धाटणीची ही भाषा आहे.

हे पुस्तक वाचणे हा आनंददायी, सुखद अनुभव नाही. पण वाचकावर घट्ट पकड घेणारा, नायिकेच्या अतिशय जवळचे स्थान वाचकाला बहाल करून त्याला नायिकेला जोखणे अशक्य करणारा आणि त्याच वेळी निर्मम धारदारपणे वास्तवाचे भयावहपण दाखवत राहणारा हा काहीसा आवेगी वाचनप्रवास आहे. स्त्रीचे शरीर हे या अनुभवाच्या केंद्रस्थानी आहे. निवेदकाची वर्णने पुन:पुन्हा वाचकाला शरीराकडे आणि त्याच्या भोगांकडे खेचून आणत राहतात. त्यामुळे कादंबरीचे शीर्षक अतिशय अर्थवाही झाले आहे.

गोष्टीच्या पार्श्वभूमीला दिसत राहणारे अस्ताव्यस्त, उखीरवाखीर हरारे शहर हेही गोष्टीतले एक पात्रच. टॅम्बूसारख्या अनेक माणसांची गोष्ट म्हणजेच जणू ते शहर आहे. शोषून घेतलेले, भ्रष्ट अराजकी व्यवस्थेपायी खुरडणारे, पण तरीही हार न मानणारे. बकाल आणि गबाळ्या भवतालात तसेच आरंभी उल्लेख केलेल्या अर्थस्थितीच्या पाताळटोकात पैशाला किंमत नसली, तरी त्या कारणांतूनच उमटलेल्या साहित्याच्या उंचीचे मोल फार मोठे आहे, हे ‘धिस मोर्नेबल बॉडी’चे वाचन स्पष्ट करते.

(‘बुकरायण’मधील या सहाव्या लेखाबरोबर, हे नैमित्तिक सदर यंदापुरते विराम घेते आहे. ‘बुकर’च्या लघुयादीतील सहा पुस्तकांपैकी कोणाची निवड होणार, हे

१९ नोव्हेंबर रोजी ठरेल.)

pankaj.bhosale@expressindia.com

 

Story img Loader