एकंदर २६ प्रकरणे आणि १८ परिशिष्टे असा या पुस्तकाचा पसारा आहे. यापैकी पहिली काही प्रकरणे (सुमारे १४५ पाने) ही डॉ. आंबेडकर आणि जेफरसन यांची वैयक्तिक आयुष्ये, त्यातील साम्य/भेद, पुस्तके अथवा वास्तुकला याविषयी दोघांच्या समान आवडीनिवडी, असा पट मांडून वाचकांचे कुतूहल जागे करतात. जेफरसन व डॉ. आंबेडकर या दोघांची ‘विचारतुला’ टाळून, त्यांचा समांतर प्रवास मांडतात. शिक्षण, राजकारण, प्रशासन, धर्म, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्याकांचे हक्क, राज्यघटना, गुलामगिरी व अस्पृश्यता अशा विषयांवरील दोघांचीही मते सविस्तर नोंदवून येथे लेखक डॉ. धाकतोडे यांनी वाचकालाच तुलना करण्यास सक्षम बनविले आहे. डॉ. धाकतोडे हे सामाजिक शास्त्रांचे विद्यापीठीय अभ्यासक नाहीत. त्यांची पाश्र्वभूमी अणुभौतिकीची असली, तरी अभ्यासपूर्वक त्यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. तसे करताना, आपल्या अभ्यासात जे-जे टप्पे आले, संकल्पनांचा व इतिहासाचा जो विस्तीर्ण प्रदेश पाहता आला, तो अनुभव वाचकालाही देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
पुस्तक कसे लिहिले आहे, लेखकाची पद्धत काय, अभ्यास किती, लेखनामागची प्रेरणा काय असावी, या पुस्तकाचा अपेक्षित वाचकवर्ग कोणता, या प्रश्नांची उत्तरे ‘गुलामगिरी व अस्पृश्यता’ या दीर्घ (सुमारे ७० पानी) प्रकरणातून शोधता येतील. म्हणून त्याचा धावता ऊहापोह तरी आवश्यक आहे. गुलामगिरी ही कुप्रथा आहे, जीवित हक्क, (व्यक्ति)स्वातंत्र्य आणि सुखासाठी प्रयत्नरत राहण्याचा (उपजीविकेचा) हक्क हे वैश्विक पातळीवर अबाधित असले पाहिजेत, असे विचार जेफरसन यांच्या लिखाणात तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘अमेरिकी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्या’त असूनही स्वत: जेफरसन हे जमीनदार शेतकरी असल्याने त्यांच्याकडे गुलाम होतेच. याउलट डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचा अन्याय स्वत: पाहिला होता. समानतेची तत्त्वे व्यवहारात आणण्याचा (उदा. सर्वाना मतदान हक्क) आग्रह डॉ. आंबेडकर वेळोवेळी धरत होते, हे या प्रकरणातून उमगते. मात्र केवळ जेफरसन काय म्हणतात हे सांगण्यावर न थांबता गुलामगिरी म्हणजे काय, अमेरिकेत गुलामगिरी कशी फोफावली, ब्रिटन वा फ्रान्समध्ये गुलामगिरीला विरोध कसा झाला, ल्यूथर मार्टिन, विल्यम स्कॉट, लिसँडर स्पूनर, मॉन्टेस्क्यू, अब्राहम लिंकन आदींचे गुलामगिरीविषयक विचार काय आहेत, अमेरिकन यादवी आणि १८६३ ची गुलाम-मुक्ती सनद, त्यापुढल्या अमेरिकी घटनादुरुस्त्या, ब्रिटन/लिबिया व अमेरिकेचे व्हर्जिनिया राज्य (हे जेफरसन यांचे राज्य, येथेच आफ्रिकी गुलामांना १६१९ मध्ये प्रथम आणल्याने गुलाम-प्रथा सुरू झाली होती), यांनी मागितलेली माफी, इथवरचा सारा तपशील लेखक देतात. तसेच अस्पृश्यतेबद्दल केवळ डॉ. आंबेडकरांचे विचार न देता अस्पृश्यता म्हणजे काय, मनुस्मृती ते ‘भक्ती चळवळ’ – अस्पृश्यतेबाबत बदलते विचार, स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात अस्पृश्यतेविषयी बदलती मते, गुजरातसारख्या राज्यात सरकारी रुग्णालयांच्या शवागारांत दलितांनाच नोकऱ्या देण्याचे समर्थन तेथील सरकारी डॉक्टर करतात यांसारख्या उदाहरणांतून अस्पृश्यतामूलक जातिभेद कसा दिसतो, अस्पृश्यता, गुलामगिरी आणि वर्णभेदी कप्पेबंदी (अपार्थाइड) या त्रिदोषांतील साम्य आणि भेद, या प्रश्नाविषयीचे समकालीन ठरणारे विश्लेषण इथवरचा तपशील लेखक देतात. अनेक प्रश्न मनात असलेली, अभ्यासू कुतूहल जागे ठेवणारी आणि प्रश्न विचारायला न कचरणारी तरुणाई हाच आपला अपेक्षित वाचक, त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिलीच पाहिजेत, अशा प्रकारे हे लिखाण झाले आहे. याच प्रकरणाच्या अखेरीस ‘डिक्लरेशन ऑफ एम्पथी’चा सविस्तर तपशील येतो. अमेरिकी कृष्णवर्णीय, भारतीय दलित आणि जगातील अन्य भेदपीडित यांना जोडणारा या २०१४ सालच्या ‘डिक्लरेशन’चा दुवा लेखक महत्त्वाचाच मानतात, हे तर पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत ‘कंदर हिस्टॉरिकल सोसायटी’ ही संस्था आणि तिचे संस्थापक व ‘डिक्लरेशन ऑफ एम्पथी’चे एक प्रणेते डॉ. रोहुलअमीन कंदर यांचे नाव अग्रस्थानी असल्याने लक्षात आलेलेच असते; किंबहुना दोन्ही देशांतील तरुणांना जोडणारे एखादे पुस्तक हवे, या प्रेरणेतूनच हे लिखाण झाले असावे.
पुस्तकात राज्यशास्त्रातील संकल्पनादेखील अशाच तपशीलवार समजावून दिल्यासारख्या येतात. आंबेडकर किंवा जेफरसनच काय – स्वत:ची परिस्थिती समजून घेण्यासाठी असा तपशील अनेकांना उपयुक्तच ठरेल. परंतु राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हा भाग फार आकर्षित करणार नाही, कारण त्यांना या संकल्पनांच्या चर्चेचे पुढले पदरही माहीत असतील. सामाजिक शास्त्रांची पाश्र्वभूमी असलेल्या वाचकांना या पुस्तकातील मांडणी ज्या तपशिलांमुळे पसरट वाटू शकते, तीच मांडणी- साध्या भाषेतील त्या तपशिलांमुळेच- अनेकांना उपकारकही ठरणारी आहे.
तरीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेफरसनच्या अमेरिकेत वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या अध्यक्षीय राज्यपद्धतीविषयी कोणते विचार वेळोवेळी व्यक्त केले, डॉ. आंबेडकरांनी संसदश्रेष्ठत्वाची राज्यपद्धतीच का निवडली, याहीविषयी स्पष्ट-साध्या तपशिलांत एखादे प्रकरण असते तर पुस्तकाची सार्वकालिकता वाढली असती.
- थॉमस जेफरसन अँड डॉ. बी. आर. आंबडेकर:अ कम्पॅरेटिव्ह स्टडी
- लेखक : डॉ. एस. एस. धाकतोडे,
- प्रकाशक : भाष्य प्रकाशन
- पृष्ठे : ७२०; किंमत : ८९९ रु.
अभिजीत ताम्हणे
abhijit.tamhane@expressindia.com