वीरेंद्र तळेगावकर
महिंद्रा समूहाच्या, त्यांच्या उपकंपन्यांच्या उपक्रम, उत्पादन घोषणेसंबंधीची पत्रकार परिषद मुंबईतील वरळीच्या महिंद्रा टॉवरमध्ये असली, की वाहनविषयक वार्ताकन करणाऱ्यांचा छोटय़ाशा सभागृहातही मेळाच भरतो. अगदी दिल्लीनजीकच्या द्वैवार्षिक ऑटो शोसारखा! त्यातील आदिल म्हणजे केवळ याच- वाहन क्षेत्रात गेली तब्बल ४४ वर्ष पत्रकारिता करणारा अवलिया. बातमीदारीच्या पल्याड जात त्या विषयातील सांख्यिकी, तांत्रिक सखोल माहितीसह त्यातील गुण-अवगुण टिपणाऱ्या आदिलसाठी एखाद्या वाहनावरील विशेषांक काढणं तसं सोपंच. पण महिंद्रा समूहाच्या गेल्या ७५ वर्षांचा प्रवास छाया-लेखन रूपात मांडणं म्हणजे एक आव्हानच. कारण कुणाहीसाठी काळात मागं जाणं जेवढं औत्सुक्याचं, तेवढंच ते अपुऱ्या साधनपर्यायाने अवघडही. ६४ वर्षीय आदिलने मात्र ते सहज पेललं. ‘टाइमलेस महिंद्रा’ हे त्याचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं पुस्तक नुसतं चाळलं तरी ते प्रकर्षांनं जाणवतं.
भारतीय वाहन क्षेत्रात जुळवणी ते निर्मिती असा स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर प्रवास करताना एका आघाडीच्या उद्योग समूहाची पायाभरणी बहुपयोगी वाहनाद्वारे झाली. कंपनीची स्थापना, तिची सुरुवात, तिचे संस्थापक, तिची उत्पादनं, तिच्या निर्मितीचा दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई प्रवास वगैरे सारेच एखाद्या रहस्यमय पात्रासमान असून ते पुस्तकातून त्याच आशयानं मांडलं गेलं आहे. तब्बल दोन किलो वजनी गटातील या पुस्तकात एकूण २० प्रकरणं आहेत. महिंद्राच्या वाहन व्यवसाय वाटचालीची तीन कालखंडांत विभागणी केली असून संशोधन व विकास विभाग निर्मिती, साहसी खेळ विभाग टप्पे हे समूहातील मैलाचे दगडही सचित्र रोवण्यात आले आहेत. कालनिहाय छायाचित्रांद्वारे महिंद्राच्या विविध गटांतील वाहनांचे कृषी, सरकार-प्रशासन, सैन्य, सिनेमा, खेळ असं क्षेत्रनिहाय वर्चस्व अधोरेखित करण्यात आलंय. खुद्द महिंद्रा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही मनोगतात महिंद्रा जीपचं गारूड कोणत्याच क्षेत्राला सुटलं नसल्याचं म्हटलं आहे. महिंद्रा समूहात अधिकारी ते वाहन विभागाचे अध्यक्ष अशी कारकीर्द भूषविणारे, आनंद यांचे गेली दोन दशकं सुहृद राहिलेले डॉ. पवन गोएंका हे या पुस्तकाची प्रेरणा ठरल्याचेही लेखक कबूल करतो.
दशकापूर्वी जन्म घेतलेल्या महिंद्राच्या ‘थार’च्या नव्या अवताराचं कौतुक पुस्तकाच्या निम्म्या पानांपुढं सुरू होतं. जुन्या ‘थार’ आतापर्यंत संख्येत ६१ हजारहून अधिक विकल्या गेल्या आहेत. तर अमृतमहोत्सवी वर्षांच्या सादरीकरणापासून उपलब्ध झालेल्या नव्या ‘थार’च्या खरेदीच्छुकांना कमाल आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेलच. ७५ वर्षांतील ४० हून अधिक प्रकारच्या गाडय़ांची निर्मिती करणाऱ्या महिंद्राची नवी ‘थार’ समूहासाठी विशेष आहे.
महिंद्राच्या ‘थार’ वाहनासारखंच देखणं मुखपृष्ठ समूहाच्या गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात डोकावण्यासाठी प्रवृत्त करतं. तर पुस्तकाच्या शेवटाकडे असलेली समूहातील विविध गटांतील वाहनांची आरेखनं २१ व्या शतकातील महिंद्राच्या पुढील प्रवासाविषयीची उत्कंठाही शाबूत ठेवतात. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणापासून सुरू झालेला समूहाच्या उभारणीचा स्वातंत्र्यपूर्व काळपडदा पुस्तकातील दुर्मीळ छायाचित्रांद्वारे डोळ्यांसमोरून सरकतो. पुस्तकात ७०० हून अधिक छायाचित्रे आहेत. अर्थात त्यातील बव्हंशी ‘इस्टमन-कलर’पूर्वीच्या कालखंडातील आहेत. तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी, सिने कलाकार हे त्यांच्या महिंद्रा वाहन ताफ्यासह त्यात दिसतात. नव्याबरोबरच जुनी छायाचित्रे, महिंद्राची वाहने यांबाबतची माहिती घेण्यासाठी लेखकाला कराव्या लागलेल्या यत्नांची जाणीव आभारप्रदर्शनाला वाहिलेल्या पानातून होते. त्यासाठी लागलेल्या साहाय्य श्रेयनामावलीत कंपनीच्या आजी-माजी अधिकाऱ्यांसह वाहनसंग्राहक, माजी सैन्याधिकारी, माध्यममित्र यांनाही स्थान देण्यात आलं आहे. यात ‘लोकसत्ता’च्या पालक ‘द एक्स्प्रेस’ समूहाचाही समावेश आहे.
महिंद्राच्या जीप वाहनाच्या त्या काळात प्रसिद्ध झालेल्या कृष्णधवल जाहिराती पुस्तकात दिल्या आहेत. जोडीला महिंद्रा समूहातील जवळपास दोन शतकी उपकंपन्यांची नावं, गेल्या सात दशकांतील देशातील विविध कंपन्यांच्या एकूण प्रवासी वाहनांचे विक्रीअंक, विक्रम नंदवानीची ताजी व्यंगचित्रं यांची पुरवणी आहेच.
महिंद्राच्या विविध गटांतील अनेक वाहनांवर चालक/मालकांनी भरभरून प्रेम केलंय. त्या जोरावरच अव्वल स्थान कंपनीने मिळविले आहे. विलिज्, जीप, व्हॉएजर, आरमाडा, स्कॉर्पिओ, पिक-अप, एक्सयूव्ही ३०० अशा भिन्न वाहन प्रकारांतही महिंद्राने आपले अस्तित्व राखून ठेवले आहे. समूहाच्या सुरुवातीच्या काळातील अन्य कंपन्यांबरोबरच्या भागीदारीचा, त्यातून तयार करण्यात आलेल्या वाहनाचा पुस्तकात उल्लेख आहे. मात्र २००० च्या दशकातील ‘कायनेटिक’ तसेच ‘रेनो’बरोबरची महिंद्राची अयशस्वी वाटचाल नोंदवणे टाळल्याचे पुस्तक वाचताना ठळकपणे जाणवते.
veerendra.talegaonkar@expressindia.com