ग्रंथप्रेमींना वर्षांअखेर प्राप्त होणाऱ्या ‘टॉप टेन’ पुस्तक याद्या वाचन मर्यादेमुळे निराश करू शकतात तशा वाचनऊर्जाही मिळवून देऊ शकतात. त्यांच्याकडून मग संपूर्ण वर्षभरात न ऐकलेले अथवा न पाहिलेले पुस्तक पुढल्या वर्षीच्या वाचननियोजनात बसविले जाते. संगणकाची कळ दाबताच गोंधळून टाकणाऱ्या अनंत याद्यांच्या आजच्या धबडग्यात ‘बुकमार्कनिष्ठ’ वाचकांसाठी ही २०१५तील निवडक ललित पुस्तकांची ही सटीप यादी..
पुस्तकांच्या खपाला गृहीत धरून १२ ऑक्टोबर १९३१ पासून अगदी आजतागायत, ‘न्यू यॉर्क टाइम्स’ हे वृत्तपत्र आठवडी ग्रंथयाद्या करीत असते. ग्रंथयाद्यांची परंपरा चालविणाऱ्या आणि त्याचा प्रवाह वाचक-लेखक-प्रकाशन विश्वात रुजविणाऱ्या त्या दैनिकांच्या अनुकर्त्यांमुळे सामान्य वाचक पुस्तकयाद्यांच्या विश्वात हरवून जाईल, इतक्या परस्परविरोधी ‘टॉप टेन’ ते ‘टॉप फिफ्टी’ पुस्तकांच्या वार्षिक याद्या सापडतात. या याद्यांची प्यादी सरकविणाऱ्या यंत्रणा आणि तिच्यात सहभागी असलेल्या ग्रंथचिकित्सकांच्या वकुबानुरूप निवडीमध्ये भिन्नता असते, मात्र ग्रंथांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होऊ नये, इतक्या कौशल्याने त्यांची निर्मिती करण्यात येते.
सुबुद्ध वाचकाची कितीही असोशी असली तरी त्याच्याकडे एका वाचनवर्षांमध्ये वाचल्या जाणाऱ्या पुस्तकाऐवजी न वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांचीच संख्या जास्त असते. वार्षिक याद्यांतील मतांतरांमुळे किमान आपल्या वाचनकक्षेत आलेल्या पुस्तकांशी ही यादी पडताळून पाहता येते. एखाद्या यादीतून चटकन लक्षात न आलेल्या परंतु महत्त्वपूर्ण पुस्तकाचा परिचय घडू शकतो. त्यातून पुढल्या काही दिवसांसाठीचा वाचनउपसा करता येणे शक्य होते. यंदा काझुओ इशिगुरूच्या ‘बरिड जायंट’पासून ते हार्पर लीच्या ‘गो सेट ए वॉचमन’पर्यंत आणि पॉला हॉकिन्सच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’पासून ते रचेल कस्कच्या ‘आऊटलाइन’पर्यंत ललित पुस्तके विभिन्न स्तरांच्या याद्यांमध्ये मानाचे स्थान टिकवून आहेत. अमेरिकी, ब्रिटिश दिग्गज वृत्तपत्रांच्या याद्या पाहिल्या तर त्यांतील निवडीतील साम्य आणि क्रमवारीतील भिन्नता चटकन लक्षात येईल. ‘गार्डियन’ वृत्तपत्राने पुस्तकाच्या कथात्मक/ अकथनात्मक स्वरूपानुसार व त्याच्या उपविभागानुसार मास्टर्स लिस्ट (पुस्तक पंडितांची) आणि रीडर्स लिस्ट (पुस्तक प्रेमिकांची) देऊन आपल्या यादी (योग)दानाला समृद्ध केले आहे. गेल्या वर्षांतील उत्तम कथात्मक आणि अकथनात्मक पुस्तकांची अचूक सर्वोत्तम यादी करता येणे अवघड असले, तरी खपापेक्षा वाचनीयतेच्या मुद्दय़ावर ग्रंथांमधील दहा रत्नांचा शोध सहज करता येऊ शकेल. ही दहा रत्ने कुठल्याशा यादीत असतील किंवा नसतीलही, पण मुरलेल्या वाचकांना टाळता न येण्याजोग्या यादीत टाकावी लागतील हे खरे आहे.
१. माय स्ट्रगल : बुक फोर
कार्ल ऊव्ह क्नॉसगार्ड (इंग्रजीतील ‘नाइफ’प्रमाणे याच्या नावाचाही रूढ उच्चार ‘क’ अनुच्चारित ठेवणारा वाटेल, पण तसा तो नाही!) या नॉर्वेमधील लेखकाने आत्मचरित्रात्मक कादंबरीसमूहाचा तिरपागडा घाट यशस्वी करून आधी नॉर्वे नंतर अमेरिकेच्या वाटेने जगभरात आपली पुस्तके विक्रीच्या उच्चांकावर नेली. नॉर्वेमधील सर्वात खपलेल्या या कादंबऱ्यांत त्याने अवतीभवतीचे जग आणि आप्त या सगळ्यांशी असलेल्या संबंधांची चिरफाड करीत ‘जसे आहे तसे’ स्पष्ट आणि खूपच रंजकसूक्ष्म वर्णन केले आहे. एकंदर सहा पुस्तकांच्या यादीतील चौथे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झाले आणि आधीच्या तीन पुस्तकांइतकेच गाजले. या चौथ्या भागात नायक एका लहान गावात शिक्षकाची नोकरी धरतो, पण लंपट ठरवला जातो आणि त्याच्याच एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमही करू लागतो.
२. मेक समथिंग अप : चक पाल्हानिक
कनौसगार्डइतकाच सूक्ष्मवर्णनी परंतु व्यसन आणि उपभोगी संस्कृतीमधील दलदल फाइट क्लब- चोकमधून दाखवून देणाऱ्या चक पाल्हानिकचा पहिला कथासंग्रह या वर्षी दाखल झाला. यापूर्वी त्याने कथाकथांची मिळून एक कादंबरी लिहिली होती, पण जगद्विख्यात नियतकालिकांमध्ये वेळोवेळी आलेल्या स्वतंत्र कथांचा हा संग्रह आहे. ड्रग्जच्या व्यसनाची टोकाची अवस्था, रांगडा विनोद, भाषिक उचापत्या आणि पाल्हानिकच्या ठेवणीतील चिजा येथे पाहायला मिळतील. झॉम्बीपासून ते जागतिक उपभोगी मनोवृत्तीचे येथे विचित्र दर्शन होते. साहित्य प्रवाहाशी वाकडय़ात जाऊन केलेली अचूक वर्णने हामखास आवडून जाणारी.
३. द फर्स्ट बॅड मॅन : मिरांडा जुलै
अभिनेत्री, चित्रपट दिग्दर्शिका, गायिका आदी खणखणीत गुणांसह ‘न्यू यॉर्कर’सारख्या साप्ताहिकातून दिग्गज कथालेखकांना मागे टाकेल, अशा तोडीच्या चलाख वर्णनी कथा लिहिणाऱ्या मिरांडा जुलैचा ‘नो वन बिलाँग्ज हिअर मोअर दॅन यू’ हा संग्रह खूपविका झाला होता. यंदा तिची ‘द फर्स्ट बॅड मॅन’ ही कादंबरी प्रकाशित झाली. नव स्त्रीवादी विचार, काव्यमय तरी टोकदार शैली आणि या सगळ्यांमध्ये एक जख्ख पकडून ठेवणारी एकटय़ा नायिकेची भूत आणि वर्तमानकाळाची नोंद, असे या छोटेखानी कादंबरीचे स्वरूप आहे.
४. मॉर्डन रोमान्स : अझीझ अन्सारी
भारतीय नावाच्या, पण अमेरिकेत स्टॅण्ड अप कॉमेडियन हा पेशा पत्करलेल्या या कलाकाराने विनोदाच्या जोरावर बऱ्याच सिनेमा आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पटकावल्या. समाजशास्त्रज्ञ एरिक क्लिनेनबर्ग यांच्यासोबत त्याने लिहिलेल्या या पुस्तकात त्याने आजच्या डिजिटल साधनांनी युक्त जगात प्रेमाच्या, संबंधांच्या बदललेल्या व्याख्यांचा शोध घेतला आहे. विनोदकाराचे गंभीर पुस्तक म्हणून याची नुसती दखल घेणे महत्त्वाचे नाही, त्यातील मांडलेल्या मुद्दय़ांची जगाशी तुलना करताना माणसाच्या प्रेम भावनेतील उत्क्रांतीची कल्पना येते.
५. फॉच्र्युन स्माइल : अ‍ॅडम जॉन्सन
पुलित्झर पारितोषिक मिळविणाऱ्या अ‍ॅडम जॉन्सन यांना यंदाचे ‘(अमेरिकेतील) नॅशनल बुक अवॉर्ड’ फॉच्र्युन स्माइल या कथासंग्रहासाठी मिळाले आहे. दीर्घ आणि चपखल लिहिणाऱ्या जॉन्सन यांची ‘निर्वाणा’ कथा एकाच वेळी शोकात्मता आणि विनोद यांचा आधार घेते. कथेत विज्ञानही आहे आणि संगणकातील किडा असलेली महत्त्वाची भारतीय व्यक्तिरेखा देखील. ‘हरिकेन अ‍ॅनॉनिमस’ ही अमेरिकेतील वादळावर आणि त्यानंतरच्या मानवी पडझडीवर बेतलेली सर्वोत्तम कथा आहे. इतर कथा जॉन्सन आजच्या सर्वोत्तम कथाकारांत का आहेत, हे दाखवितात.
६. ग्रोनअप : गिलियन फ्लिन
किंडल सिंगल हा प्रकार बऱ्यापैकी रूढ होतोय. यात एका लेखक/ लेखिकेच्या एखाद्यात कथा, दीर्घकथेला ई-पुस्तकरूपात सादर केले जाते. ‘गॉन गर्ल’ या जगप्रसिद्ध कादंबरीची रहस्यवर्धक लेखिका गिलियन फ्लिन हीची एक दीर्घकथा ‘ग्रोनअप’ याद्वारेच सादर झाली आहे. तिच्या कसदार कादंबऱ्यांप्रमाणेच इथले वातावरण आजवर अपरिचित असलेल्या घटकात वावरणाऱ्या नायिकेचे आहे. ही निनावी नायिका पहिल्या वाक्यात वाचकाला पकडते, ती चौसष्ट पाने संपल्यानंतरच पुस्तक खाली ठेवण्यासाठी.
७. सेव्हनीव्हज : नील स्टीव्हन्सन
विज्ञान काल्पनिकांना इंग्रजी लिखाणात कमतरता नाही, इतक्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पुस्तकांची उपलब्धता आहे. नील स्टीव्हन्सन यांच्या कादंबरीच्या कथानकात, चंद्र नष्ट झाल्यानंतर पृथ्वीवर मरणसत्र सुरू होते. त्यातून परग्रहाशी संधान साधत मानव आपला बचाव करून घेते. पुढे पाच हजार वर्षांच्या अंतरानंतर बचावलेली सात वंशांची माणसे पृथ्वी बदलण्यासाठी पुन्हा दाखल होतात, असा अद्भुतरम्य प्रवास आहे. अद्याप त्यावर चित्रपटाची घोषणा झाली नसली, तरी भव्य चित्रपटाचा अनुभव कादंबरी नक्की देते.
८. गेट इन ट्रबल : केली लिंक
सेलफोन ते लॅपटॉपच्या आधुनिक जगातील परिकथा तयार करणाऱ्या केली लिंकचे कथासाहित्य कुठल्याच गटात मावत नाही. कधी ते विज्ञानकथांशी साधम्र्य सांगते, तर कधी गूढ, कूट फॅण्टसीशी. रिअ‍ॅलिटी शोपासून ते व्हॅम्पायपर्यंत काहीही अचानक कथेत दाखल होणाऱ्या विचित्र विनोदी परिस्थितीचा या नव्या कथासंग्रहात समावेश आहे. या सगळ्या कथांची एकत्रित वैशिष्टय़े म्हणजे समांतर गाजत असलेल्या बहुतांश लेखकांची शैली घेऊन तयार करण्यात आलेले असाधारण वातावरण. त्याचसाठी ती लोकप्रिय आहे.
९. ग्रे : ई. एल. जेम्स
आधी फॅन फिक्शन म्हणून तयार झालेल्या आणि नंतर मम्मी पोर्न बनत खपाचे विक्रम मोडणाऱ्या ई. एल. जेम्स यांच्या फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे या मालिकेचा हा पुढला भाग. पुस्तकाच्या शीर्षकावर सांगितल्याप्रमाणे ख्रिश्चन ग्रे या व्यक्तिरेखेने सांगितलेली सुमारे पाचशे पानांची अगडबंब दीर्घकथा यात आली आहे. आधीच्या कादंबऱ्यांमध्ये या पात्राबाबत न उलगडा झालेल्या माहितीसोबत बरेच काही नवे यात आहे. नायकाचा भूतकाळ आणि त्याच्या ‘काम’गिरीविषयी कुतूहल असलेल्या (विशेषत: महिला-) वाचकांमुळे ती खूपविकी बनली आहे.
१०. ब्रिम गिव्ह्ज मी हिकप : जेस आयझेनबर्ग
सोशल नेटवर्क या चित्रपटात मार्क झकरबर्ग वठवणाऱ्या चिकन्या चुपडय़ा कलाकाराने माँटुकल्या शोभणाऱ्या वयात दोन नाटके लिहिली होती. त्याच्या कथा न्यूयॉर्करमध्येही प्रसिद्ध होतात, हेही त्याच्या स्टारपदाला न शोभणारे रूप आहे (पालो अल्टो कथासंग्रह लिहिलेल्या जेम्स फ्रँकोबाबतही हेच म्हणता येईल.). आयझेनबर्ग याचा पहिला कथासंग्रह तो हॉलीवूडमधील चकचकत्या दुनियेचा सदेह साक्षीदार असल्याने अत्यंत महत्त्वाचा आहे. अभिनेता म्हणून लहान वयात बरेच नाव कमावलेल्या व्यक्तीचा हा कलात्मक आविष्कार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा