इंग्रजी पुस्तकांना वाहिलेलं अख्खं पान, म्हणून ‘लोकसत्ता-बुकमार्क’ नं सरत्या वर्षांत कायकाय केलं याचा हा अगदी थोडा वानवळा! २०२१ मध्ये सुसान सोन्टाग, अमर्त्य सेन ते अगदी किम जाँग उनपर्यंतच्या अनेकांची चरित्रं/आत्मचरित्रं या पानावरून चर्चिली गेली, तसंच अनेक पुस्तकांची चर्चा पहिल्यांदा इथंच झाली! ‘बुकबातमी’ किंवा परिचय याही सदरांना वाचक प्रतिसाद मिळाला. त्यातून इथं निवड केलेले हे काही वेचे, ‘बुकमार्क’चं
२०२१ मधलं वैविध्य दाखवणारे..
जेरी पिंटो हे इंग्रजीतले कवी, बालकथाकार आणि अलीकडच्या काळात मराठी पुस्तकं इंग्रजीत आणणारे खंदे अनुवादक. ‘बलुतं’, ‘रणांगण’, ‘कोबाल्ट ब्लू’, ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय्’ आदी मराठी पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केले आहेत. २३ एप्रिल या जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने, २४ एप्रिल २०२१ च्या शनिवारी बुकमार्क पानावर त्यांचा अनुवादकाचं
वाचन हा लेख होता. त्यातला हा अंश :
अनुवादकाचं वाचन हे नेहमी भीतीच्या सावटाखाली आणि आनंदाच्या छत्रछायेखाली होत असतं. या सावल्या इतक्या मिसळून गेलेल्या असतात एकमेकींमध्ये की, त्या वेगळय़ा नाहीच काढता येत. अशानं वाचण्याची क्रियाच बदलते, तोल सांभाळण्याच्या जीवघेण्या कसरतीसारखी होऊन जाते. एका बाजूला असतात अर्थ- शाब्दिक, मृतवत् अर्थ. या वाच्यार्थाच्या दुसऱ्या बाजूला असते ती लक्ष्यार्थाची, रूपकांची, त्यामागल्या संस्कृतीची विशाल भूमी. या भूमीवर कुठल्याही शब्दाला ‘एक आणि एकच’ अर्थछटा असत नाही कधीच.
वाचनाची क्रिया ही अशीच असते. अंदाज बांधत-बांधत आपण आपले रस्ते शोधत असतो. आपल्याला वाटत असतं आपण समोरचा मजकूर वाचतोय, पण आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या मोठय़ा प्रमाणात आपण आपल्यालाच त्या मजकुरात आणतो. हे प्रत्येक वाचक करतोच. होतंच ते. मजकुराचं मूळचं आतलं काय आणि वाचकानं वाचताना मिसळलेलं बाहेरचं कायकाय, हे नाही सांगता येत. पण अनुवादकाला या आतलेपणा-बाहेरचेपणाची निराळी पातळी गाठावी लागते. अनुवादकांनी स्वत:च्या वाचनक्रियेला करडेपणानं वाचायचं आणि समोरच्या पुस्तकाच्या, मजकुराच्या प्रेमातही पडायचं. कारण भारतात तरी, एखादं पुस्तक आवडलं- त्याच्या प्रेमात पडलात, म्हणूनच तुम्ही त्याचा अनुवाद हाती घेता. त्यावर कामबीम करता- करावंच लागतं- आणि मगच तुमच्या प्रेमाचं फळ तुम्हाला मिळतं. अशा वेळी तुम्ही ते पुस्तक इतक्यांदा वाचलेलं असतं व त्या पुस्तकाच्या इतके जवळ तुम्ही गेलेले असता की, कंटाळाच येतो जवळपास. तुम्ही काम करत असता, कधी एखादा क्षण असा येतो की, बास झाला हा काच आणि आता नवं, निराळं वाचावं काहीतरी, असं होऊन जातं तुम्हाला. तरीही तुम्ही पुन्हा त्याच कामाला लागता, कारण तुम्ही एक निष्ठावंत अनुवादक असताच आणि घेतलेलं काम आहे म्हणून तुम्ही पूर्ण करताच, पण तुमची काहीएक कर्तव्यभावनाही असते त्यामागे. शिवाय अनुवाद करत राहणं, ही आत्ताच्यासारख्या काळात आपल्यासारख्या देशाचीही गरज असते.
यापुढे कधीही, एखाद्या अनुवादकापुढं ‘‘पण किती नुकसान होतं नाही, अनुवाद करतानाङ्घ’’ ही तुमची लाडकी तक्रार मांडण्याआधी याद राखाङ्घ म्हणजे खरंच, ध्यानात राहू दे तुमच्याङ्घ की, नुकसान किती किती आणि कुठे कुठे होतं ते त्या अनुवादकालाच सर्वापेक्षा जास्त माहीत असतं.
हवामान बदलाच्या भानाची बिकट वाट..
हवामान बदल व कर्बउत्सर्जनाचा काही संबंध नाही,’ हे सतत ठसवण्याकरिता शिकागो येथील हार्टलॅण्ड इन्स्टिटय़मूटचा वापर केला गेला आणि याची कबुली दस्तुरखुद्द या संस्थेतील वैज्ञानिक पीटर ग्लिक यांनीच २०१२ साली दिली होती. आता मात्र, २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश करताच जगातील दुसऱ्या क्रमांकाचे धनिक व ‘मायक्रोसॉफ्ट’चे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना चक्क हवामान बदलाविषयी पुस्तक लिहावेसे वाटले. काळाची महती! तर. गेट्स यांनी ‘हाऊ टु अव्हॉइड अ क्लायमेट डिझास्टर : द सोल्युशन्स वी हॅव अँड ब्रेकथ्रूज् वी नीड’ या पुस्तकातून हवामान बदल रोखण्यासाठी ‘युक्तीच्या गोष्टी’ सांगितल्या आहेत. गेट्स यांचे पुस्तक बाजारात दाखल होण्याच्या महिनाभर आधी प्रा. मान यांचे ‘द न्यू क्लायमेट वॉर : द फाइट टु टेक बॅक अवर प्लॅनेट’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात प्रा. मान म्हणतात, ‘कर्बउत्सर्जन रोखणारे व ते वाढवत नेणारे अशा दोन गटांमध्ये ‘हवामान युद्ध’ चालू आहे.’ २०१६ साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट सामना होता. क्लिंटन यांनी पर्यावरणसंवादी भूमिका जाहीर केली. त्याआधीचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात अमेरिकेने रशियावर लादलेल्या आर्थिक र्निबधांमुळे रशियातील ‘रोजनेफ्ट’ या तेलकंपनीचा अमेरिकेतील ‘एग्जॉनमोबिल’ कंपनीशी दीड लाख कोटी डॉलर्सचा करार अडचणीत आला असता. त्यामुळे रशियातून ‘रोजनेफ्ट’ने ‘सायबर युद्ध’ चालू केले. किंवा २०१८ साली फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कर्बउत्सर्जन रोखण्यासाठी आणि पर्यावरण जपण्यासाठी निधी मिळावा, याकरिता कार्बन कर लावला आणि पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले. तेव्हा ‘हा सामान्यांवर अन्यायकारक कर आहे’ असे म्हणणारे ईमेल रशियातूनच फ्रान्समधील रहिवाशांना पाठवले गेले. अशा अनेक बाबींचा विस्ताराने उल्लेख मान यांनी केला आहे. अखेरीस प्रा. मान यांनी- ‘कर्बकेंद्री अर्थव्यवस्था बदलण्यासाठी यंत्रणांतही बदल करावा लागेल आणि यापुढील पिढय़मंना वास्तव वेळीच समजावे यासाठी शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण हाच मार्ग आहे,’ हे स्पष्टपणे सांगितले आहे.
मतदार वर्तनाचा अभ्यास
देशभर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय बनलेली होती. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. प्रत्यक्षात पश्चिम बंगालच्या विधानसभेत ‘दोनशे पार’ झाला, तो तृणमूल काँग्रेस. पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकीच्या महिनाभर आधीच ‘जगरनॉट’ने प्रकाशित केलेले ‘हाऊ इंडिया व्होट्स अँड व्हॉट इट मीन्स’ हे पुस्तक, मतदार असे का वागले, का वागतात, हे समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. भारतातील प्रथितयश ‘सेफॉलॉजिस्ट’ (निवडणूक वा मतदानाचा विश्लेषणात्मक अन्वय लावणारे तज्ज्ञ) प्रदीप गुप्ता हे या पुस्तकाचे लेखक. हे गुप्ता (आणि त्यांची ‘अॅक्सिस माय इंडिया’ ही सर्वेक्षण कंपनी) निवडणुकांचे ‘एग्झिट पोल’ अर्थात मतदानोत्तर जनमत चाचण्या देण्यासाठीही ओळखले जातात. मागील एका दशकात ४७ हून अधिक जनमत चाचण्या देणाऱ्या या संस्थेने वर्तवलेले अंदाज ९५ टक्के इतके अचूक राहिलेले आहेत, असा दावा खुद्द लेखकानेच या पुस्तकात केला आहे. या अनुभवातूनच- भारतीय मतदार मतदान करताना नेमका काय विचार करतो, त्यासाठी त्याच्या कोणत्या प्रेरणा असतात, कोणत्या धारणा असतात, याचा विचार या पुस्तकात लेखकाने नऊ गृहीतकांच्या आधारे केलेला आहे. या गृहीतकांना लेखकाने वेळोवेळी जमा केलेला माहितीचा आधार आहे. या पुस्तकात लेखकाने मांडलेले ‘मतदानासाठीचे मतदारांचे निकष’ महत्त्वाचे असले, तरी तेवढेच पुरेसे आहेत असे मात्र नाही. मागील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रभावी ठरलेला पुलवामा हल्ला, त्यानंतरचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि त्यातून निर्माण झालेली भाजपपूरक राष्ट्रभक्तीची भावना, यावर लेखकाने भाष्य केलेले नाही. त्याबरोबरच राहुल गांधींनी आरोप केलेल्या ‘राफेल घोटाळय़ा’बाबत सामान्य मतदार काय विचार करत होता, की या आरोपांचा परिणाम मतदारांवर झालाच नाही, या संदर्भातील विश्लेषण या पुस्तकात आढळत नाही.
अस्मितेचे राजकारण
लोकसभेच्या १४ जागा असणाऱ्या आसाम राज्यातील विधानसभेच्या १२६ जागांचे राजकारण विलक्षण गुंतागुंतीचे आहे. तसे हे राज्य छोटे, मात्र या राज्याच्या राजकारणाचा प्रभाव शेजारील राज्यांवरही पडतो. राज्यातील संख्येने अल्प- परंतु त्या त्या विभागात प्रभावी असलेले वांशिक समूह, त्यांची अस्मिता, शेजारील बांगलादेशातून स्थलांतरितांच्या मुद्दय़ाभोवती केंद्रित झालेले राजकारण, या सगळय़ाचा वेध संध्या गोस्वामी यांनी ‘आसाम पॉलिटिक्स इन पोस्ट-काँग्रेस इरा : १९८५ अॅण्ड बियॉण्ड’ या पुस्तकात घेतला आहे. प्रस्थापितविरोधी, केंद्रविरोधी प्रादेशिक राजकारणातून ‘आसाम गण परिषद’ या पक्षाचा उदय होण्यापासून सत्ताकेंद्र भाजपकडे सरकण्यापर्यंतचा मागोवा या पुस्तकात येतो. या सुमारे ३५ वर्षांच्या काळात सत्तापालट अनेकदा झाले, तरी स्थलांतरितांशी संबंधित समस्या असो किंवा जमिनीचा किंवा आदिवासी समुदायाची स्वतंत्र ओळख झ्र् या समस्या स्वातंर्त्यपूर्व काळापासून तशाच आहेत. सर्वच राजकीय पक्ष राज्यातील जातीय-धार्मिक समीकरणे पाहता ध्रुवीकरणाच्या राजकारणावर भर देऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा लेखिकेचा निष्कर्ष आहे. ध्रुवीकरणाचे राजकारण सर्वच पक्षांना मतपेढी राखण्यासाठी सोयीचे वाटते त्यामुळे विकासाच्या मुद्दय़ापेक्षा अस्मितेचे टोकदार राजकारण जोरात आहे. ते कसे, याचे बारकाईने निरीक्षण केल्याचे समाधान हे पुस्तक देते. सुहास पळशीकर हे प्रमुख संपादक असलेल्या ‘सेज सीरिज ऑन पॉलिटिक्स इन इंडियन स्टेट्स’ या मालिकेतील हे पाचवे पुस्तक आहे.
अश्वसंस्कृतीची कल्पनातीत समृद्धी
लंडन विद्यापीठातून इतिहासात पीएच. डी. केलेल्या डॉ. यशस्विनी चंद्र यांच्या ‘द टेल ऑफ द हॉर्स : अ हिस्टरी ऑफ इंडिया ऑन हॉर्सबॅक’ या पुस्तकाचा बराच मोठा भाग राजस्थानातील अश्वसंस्कृती व पर्यावरण यांच्या तपशीलवार विवेचनाने व्यापला आहे. मात्र भारतीय उपखंडाच्या विविध भागांत आढळणाऱ्या घोडय़ांची व अश्वसंस्कृतीची तपशीलवार माहितीही डॉ. चंद्र यांनी दिली आहे. विशेषत: मणिपूर आणि आधुनिक पोलो खेळाचा परस्परसंबंध मुळातूनच वाचण्याजोगा आहे. काठेवाड, सिंध, राजस्थान, पंजाबचा काही भाग आणि तराई प्रदेश, तिबेट, झंस्कार आणि मणिपूर या बऱ्याच मोठय़ा प्रदेशांत विविध प्रकारचे घोडे आढळतात. सद्य:काळात या प्रदेशांतील महत्त्वाच्या अश्वजाती अजूनही टिकून आहेत. परंतु ज्या देशी भीमथडी घोडय़ांच्या पाठीवरून मराठय़ांनी पेशावर ते तंजावर आणि गुजरात ते बंगाल इतक्या मोठय़ा भूभागावर लीलया संचार केला, ज्या घोडय़ांवर आधारित अनेक म्हणी व वाक्प्रचार आजही मराठीत रूढ आहेत, जी घोडी मराठेशाहीचा एक मोठा आधारस्तंभच होती- ती भीमथडी दख्खनी घोडय़ांची जात आज नामशेष झालेली आहे. अन्य जातींप्रमाणे भीमथडीची नेमकी वैशिष्टय़े आज सांगता येत नाहीत हे दु:खद सत्य डॉ. चंद्र मांडतात. मराठय़ांचा राज्यविस्तार आणि त्यातील घोडय़ांचे महत्त्वाचे स्थान, पुरुषच नव्हे तर बायजाबाई शिंद्यांसारख्या स्त्रियांनाही असणारी घोडय़ांची उत्तम जाण आणि मराठय़ांच्या अश्वारूढ युद्धपद्धतीची उर्वरित भारताने घेतलेली दखल इत्यादींची त्रोटक, परंतु रोचक चर्चा लेखिका करतात. मराठय़ांच्या घोडदळाबद्दल खूप सखोल संशोधन व्हायला हवे, हे त्यातून स्पष्टच दिसते. अश्वसंस्कृतीचा विचार करताना घोडय़ांचे मोतद्दार, नालबंद, खिदमतगार इत्यादी निम्नवर्गीयांचे एक वेगळेच चित्र पुस्तकातून उभे राहते. त्याखेरीज भाट, चारण, बंजारे आणि अफगाण पोविंदा या समाजगटांच्या सामाजिक स्थित्यंतरांबद्दलही लेखिकेचे विचार मननीय आहेत. राजस्थानातील अनेक जातींचे लोक घोडय़ांच्या व्यापारात भाग घेत आणि समाजात त्याद्वारे आपले महत्त्व टिकवीत. परंतु ब्रिटिश प्रभावाखाली कैक राजपूत राज्यांनी या घटकांना चोर-दरोडेखोर ठरवले, त्यांच्या उपजीविकेची साधने त्यांच्यापासून हिरावून घेतली. अश्वशर्यती आणि मोजक्या हौशी धनिकांचा अपवाद वगळता अश्वसंस्कृती आजमितीस झपाटय़ाने लयाला चालली आहे. या सद्य:स्थितीत लुप्तप्राय, परंतु परवा-परवापर्यंत आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या संस्कृतीच्या कल्पनातीत समृद्धीची काहीएक कल्पना हे पुस्तक वाचून येते, यातच या पुस्तकाचे यश सामावलेले आहे.
भारतीय इस्लामचा वस्तुनिष्ठ वेध..
जगातल्या कुठल्याही समाजात एका मोठय़ा वर्गाला आपण दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत असे वाटणे दुर्दैवी आहे. गेली काही वर्षे देशातील राजकारणाने याबाबतीत जे धोक्याचे वळण घेतलेले आहे, त्याचा परिणाम जनमानसात ठळकपणे दिसून येतो आणि समाजमाध्यमांतून त्याचे घातक प्रतिबिंब पडत असते. या विषयावर दीर्घकालीन विचार करणे जरुरी आहे, अन्यथा भारत नेहमी समस्याग्रस्त राहील; परिणामी देश आणि समाज यांची प्रगती खुंटेल. भारतीय मुस्लीम समाज हा जगासाठी मार्गदर्शक ठरू शकतो आणि त्यासाठी राज्यकर्त्यांनी व विचारवंतांनी प्रामाणिक प्रयत्न करून सामान्य माणसाच्या मनातील तेढ दूर करणे निकडीचे आहे. हिंदू-मुस्लीम संबंध हा देशासमोरील कळीचा प्रश्न आहे आणि त्यावर दोन्ही पक्षांतील विचारवंतांनी समज-गैरसमज यांचा आढावा घेऊन मतभेद दूर होण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे. त्या दिशेने घझाला वहाब यांनी लिहिलेले ‘बॉर्न ए मुस्लीम : सम ट्रुथ्स अबाउट इस्लाम इन इंडिया’ हे पुस्तक निश्चितच एक प्रशंसनीय पाऊल आहे.
भारतात मुस्लीम असण्याचा अर्थ काय ? किंबहुना भारतीयांना- मुस्लीम व मुस्लिमेतर दोघांनाही- इस्लाम कसा भासतो? मुस्लीम प्रतिनिधी सांगतात तसा इस्लाम हा शांतता, सहिष्णुता आणि सहअस्तित्व मानणारा धर्म आहे की हा एक अपवादात्मक, जुनाट व ताठर मान्यता धरून बसलेला धर्म आहे ?- या प्रश्नांना भिडत वहाब यांनी पुस्तकात या विषयाची शोधपूर्ण आणि मुळापासून मांडणी केली आहे. म्हणूनच हे पुस्तक प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ झाले आहे.
शीर्षकाचा पहिला भाग- ‘बॉर्न ए मुस्लीम’- पारंपरिक मुस्लीम घरात जन्मलेल्या लेखिकेचे अनुभव अधोरेखित करणारा आहे. घझाला वहाब या प्रथितयश पत्रकार असून ‘फोर्बस’ नियतकालिकाच्या संपादक आहेत. देशाच्या सुरक्षानीती आणि सामरिक समस्यांविषयी त्यांनी भरपूर लेखन केले आहे. पत्रकारितेच्या या अनुभवाची प्रचीती या पुस्तकात येते.