|| प्रसाद मोकाशी

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशातील सर्व समाजघटकांना सुशिक्षित करून त्यांना प्रस्थापित शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधात उभे करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी या देशातील समाजधुरीणांनी शैक्षणिक संस्था उभारल्या. समाजातल्या प्रत्येक धर्मातील व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शिक्षणसंस्था अधिक जोमाने कार्य करत होत्या. त्याचाच फायदा या देशातील स्वातंत्र्य चळवळीला झालाच, पण स्वातंत्र्यानंतर या देशाच्या जडणघडणीमध्ये या संस्थांमधून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षितांचा महत्त्वाचा हातभार लागला. प्रत्येक क्षेत्रामध्ये या संस्थांमधील उच्चशिक्षितांचा सहभाग राहिला. मात्र काळ बदलला आणि कावीळ झालेल्यांना या देशातील शिक्षणसंस्था या धार्मिक राजकारणाचे अड्डे वाटू लागल्या. त्यांना या संस्थांच्या आणि प्रामुख्याने अल्पसंख्याक संस्थांच्या चहूबाजूने संशयाचे जाळे निर्माण केले. अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीही त्याला अपवाद राहिलेली नाही. एके काळी राजकारणात, समाजकारणात अग्रेसर असलेले हे विद्यापीठ आज मात्र सत्ताधाऱ्यांच्या संशयी वृत्तीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

या देशातील विविध जाती, धर्म, प्रांत यांना एकत्र आणून सर्वाना योग्य शिक्षण मिळाले तरच स्वातंत्र्याचा लढा यशस्वी होऊ शकतो याची जाणीव असलेल्या पुढाऱ्यांनी धर्माच्या आधारावर विद्यापीठे सुरू केली. बनारस हिंदूू विद्यापीठ असो की अलीगढ मुस्लीम विद्यापीठ असो. त्या त्या धर्माच्या मंडळींना योग्य कालानुरूप शिक्षण मिळावे आणि त्यातून देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या उभारणीला पर्याय उभा राहावा, ही अपेक्षा होती. अर्थात ही अपेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पूर्ण झालीच, पण स्वातंत्र्यानंतरच्या देश उभारणीच्या काळामध्येही या विद्यापीठातून बाहेर पडलेल्या उच्चविद्याविभूषित मंडळींचा हातभार लागला. मुस्लीम धर्मीयांना चांगले शिक्षण मिळावे, ते या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावेत आणि त्यातूनच धर्मनिरपेक्ष देश उभा राहावा, हे या देशाच्या निर्मात्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी संदर्भामध्ये पत्रकार आणि या संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या मोहम्मद वाजिहुद्दीन यांनी लिहिलेले पुस्तक.

डिसेंबर २०२० मध्ये शंभर वर्षे पूर्ण केलेले हे विद्यापीठ नेमके कसे आहे, याचा शोध या पुस्तकाद्वारे पत्रकार वाजिहुद्दीन यांनी घेतला आहे. सर सय्यद अहमद खान यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या ‘मोहमेडन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’चे रूपांतर १९२० मध्ये अलीगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये करण्यात आले. या आशिया खंडातील मुस्लिमांना आधुनिक जगाची ओळख व्हावी आणि त्यांनी त्या नव्या जगामध्ये सामील व्हावे अशी सर सय्यद यांची कल्पना होती. त्यासाठी त्यांनी ‘ऑल इंडिया मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स’ स्थापन केली. यामुळे १८५७ च्या बंडानंतर काहीशा विस्कळीत झालेल्या मुस्लीम समाजाला एकवटत पुन्हा नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत झाली.

कालौघात आधुनिक भारतीय मुस्लिमांना घडविण्यामध्ये, त्यांच्यामध्ये वैचारिक बदल घडविण्यामध्ये अलीगढ मुस्लीम विद्यापीठाची भूमिका वादातीत राहिली. ‘भारताच्या राष्ट्रीय प्रवाहाच्या प्रत्येक टप्प्यावर या देशातील मुस्लीम समाजाची भूमिका महत्त्वाची असेलच, पण त्याबरोबरच त्यांची भूमिका ठरविण्यामध्ये अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील शैक्षणिक संस्कारांचा सहभाग असेल,’ असे भारताचे माजी राष्ट्रपती आणि या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या झाकीर हुसेन यांनी ५० वर्षांपूर्वी म्हटले होते. ‘भारताच्या जडणघडणीमध्ये मुस्लीम समाज व त्यातील धुरीण हा प्रमुख घटक असेल.’ हे त्यांचे म्हणणे खरेच ठरले आहे. या विद्यापीठामध्ये आधुनिक जगाची, नव्या भारताच्या उभारणीची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. येथे जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही शिक्षण दिले जात नाही, किंबहुना असे शिक्षण देणाऱ्यांना येथे प्रवेशच मिळत नाही. या संदर्भात येथील व्यवस्थापन आणि शिक्षकवर्ग प्रचंड सजग राहिला असल्याचे लेखकाने यात नमूद केले आहे. आपल्या देशाच्या विविधतेमधील मुस्लीम समाज एक प्रमुख घटक राहिला आहे. मात्र काही वर्षांपासून या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होऊ लागला आणि आता तर प्रत्येक घटनेला जातीयतेचे लेबल लावून या समाजाला संशयाच्या घेऱ्यात अडकविण्यात आले आहे. करोनाकाळात या समाजाच्या ‘तबलिगी जमात’ला जबाबदार धरून संपूर्ण समाजामुळेच भारतात करोनाचा फैलाव झाला असे सांगण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली होती. यातील तथ्यांश शोधण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही, परंतु नंतर त्यातील खोटेपणा उघड झाला. 

उत्तर भारतातील विविध विद्यापीठे आणि अनेक शिक्षणसंस्था या राजकीयदृष्टय़ा अतिशय संवेदनशील आणि तितक्याच राष्ट्रउभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आहेत. बनारस विश्व हिंदूू विद्यालय असो, दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो की अलीगढचे मुस्लीम विद्यापीठ असो. राजकारणासंदर्भात येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड सजगता असते. त्यांनी घेतलेली भूमिका ही वैचारिक असतेच, पण त्यांनी अनेकदा या देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा दिलेली आहे. अलीगढ विद्यापीठाचे हे योगदान विसरता येणार नाही. या विद्यापीठाने स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात अनेक चांगले राजकीय, सामाजिक नेतृत्व दिले आहे. आता मात्र त्या नावातील मुस्लीम या शब्दामुळे या विद्यापीठाला आधुनिक मदरसा असे सत्ताधाऱ्यांकडून संबोधण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी तबलिगींच्या प्रार्थना सभेमधून करोनाचा प्रसार झाला असे सांगणाऱ्या आणि त्यातूनच धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांनीच या विद्यापीठावरही धर्माधतेचा शिक्का मारला आहे. या पुस्तकामध्ये या विद्यापीठातील या संदर्भातील किस्सा सांगितला आहे. ते शिकत असताना एकदा काही धर्मप्रसारक मुस्लीम कुराणातील आयते बोलत विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना काही काळ त्यात यश येण्याची लक्षणे दिसत होती. मात्र विद्यापीठामध्ये आधुनिकतेची ओळख झालेल्या विद्यार्थ्यांनी या गटाला लवकरात लवकर आपला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर या विद्यापीठामध्ये असे धार्मिक शिक्षण देण्यास प्रतिबंध झाला आहे. अत्यंत पोशाखी गणवेशाच्या (जुन्या चित्रपटांमध्ये दिसणारे शेरवानी, डोक्यावर फरची टोपी आणि सलवार कमीज) वातावरणामध्ये मुस्लिमांना आधुनिकतेची ओळख करून देणाऱ्या या विद्यापीठाच्या वातावरणाची ओळख करून घ्यायची असेल तर हे पुस्तक निश्चितच त्यासाठी मदतगार ठरेल.