|| देवेंद्र गावंडे

शहरी नक्षलवाद व जंगलातील नक्षलवाद अशी विभाजित स्वरूपाची मांडणी जेव्हा जेव्हा होते तेव्हा हे दोन्ही वाद वेगळे आहेत, क्रांतीचे दोन स्वतंत्र चेहरे आहेत, असा अनेकांचा समज होतो. प्रत्यक्षात तसे नसून हे दोन्ही वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांनी एकाच मुशीतून जन्म घेतलेला आहे, हे अचूकपणे मांडणारा चित्रपट ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम’ काही वर्षांपूर्वी आला होता. शहरी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नक्षलवादी डावपेच रचत असतात. या चळवळीसाठी आडून काम करणारे अनेक कथित शहरी विचारवंत हे डावपेच राबवत असतात. या चित्रपटातील प्राध्यापक असलेला रंजन बटकी (कलाकार : अनुपम खेर) व्यवस्थेविरोधातील तरुण हेरण्यासाठी ‘भ्रष्टाचार कसा चांगला..’ अशी व्याख्याने देत असतो. आणि यामुळे चिडलेले, मतभेद व्यक्त करणारे तरुण जवळ आले, की त्यांना नक्षलींच्या जाळ्यात पाठवत असतो. केवळ तरुणच नाही, तर जमिनीशी संबंध नसलेल्या कथित बुद्धिवंतांनाही नक्षलींशी जोडण्याचे काम कसे केले जाते, हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. ‘बुद्ध’ म्हणजे विचार आणि तोच कसा कोंडीत अडकला आहे, हे सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री लिखित ‘अर्बन नक्सल्स : द मेकिंग ऑफ बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम’ हे पुस्तक मात्र नक्षलवादाच्या मुद्दय़ावर निराश करणारे आहे.

Car bike accident bike hit the car brutal accident video viral on social media
“अरे, झोपला होता काय?”, भरवेगात आला अन् जोरात कारवर आदळला, अपघाताचा थरारक VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Pimpri Municipal Corporation, Cycle Track ,
पिंपरी : महापालिकेचा सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

देशात उजव्या विचारांची सत्ता असणे आणि शहरी नक्षलवादाचे कंबरडे मोडून काढण्याच्या नावावर ठिकठिकाणी पोलीस कारवाई होणे, या पाश्र्वभूमीवर बाजारात आलेले हे पुस्तक मात्र विषयाला खोलवर हात घालत नाही. लेखकाने या पुस्तकात या चित्रपटाच्या निर्मितीची कथा, तो तयार झाल्यानंतर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) केलेली अडवणूक, तिथून सुटका झाल्यावर त्याचे वितरण करताना झालेली दमछाक, शेवटी चित्रपट मोठय़ा पडद्यावर येऊ शकणार नाही हे लक्षात आल्यावर विविध विद्यापीठांत तो दाखवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यास झालेला विरोध, त्या वेळी उजव्या आणि डाव्या विचारगटांत झालेला संघर्ष.. हा सारा प्रवास अतिशय रंजक शैलीत मांडला आहे. खास शहरी वाचकांना नजरेसमोर ठेवून लिहिलेल्या या पुस्तकातील भाषा रसाळ आहे आणि सध्या प्रचलित असलेल्या आधुनिक इंग्रजी पुस्तकांच्या पद्धतीनुसार निवेदन एका सरळ रेषेत पुढे जात नसल्याने पुस्तकातील मांडणी अधिक खुमासदार झाली आहे. मात्र, हा चित्रपट करताना किंवा हे पुस्तक लिहिताना ‘नक्षलवाद आपण कोळून प्यालेलो आहे’ असा लेखकाने आणलेला आव किती पोकळ आहे, हे पूर्ण पुस्तक वाचल्यावर सहज ध्यानात येते. एखादी उत्तम व बंदिस्त पटकथा एखाद्या दिग्दर्शकाला मिळाली तर तो संधीचे सोने करू शकतो. परंतु असे सोने केल्यावर तोच दिग्दर्शक स्वत:ला पटकथेतील विषयाचा तज्ज्ञ समजायला लागला तर कठीण होऊन बसते! अग्निहोत्री यांच्या बाबतीत नेमके तेच झाले आहे हे पुस्तक वाचताना वारंवार जाणवते.

अग्निहोत्री यांच्यावर उजव्या विचारांचा प्रभाव आहे आणि तो ते नाकारतही नाहीत. परंतु त्यांचा चित्रपट निर्दोष कलाकृती असतानासुद्धा त्यांना डाव्यांकडून झालेला विरोध असमर्थनीय ठरतो. या पुस्तकात मात्र लेखक अशा प्रत्येक विरोधकांना अप्रत्यक्षपणे नक्षल ठरवून मोकळा होतो. यासाठी अग्निहोत्री यांनी त्यांच्या चित्रपटाच्या साहाय्यक दिग्दर्शिकेचा आधार घेतला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणाऱ्याचा संबंध नक्षलींशी आहे, असा संशय ही साहाय्यक प्रत्येक वेळी व्यक्त करते आणि अग्निहोत्रीही त्यास दुजोरा देत राहतात. नक्षलवाद आणि त्यातून होणारा हिंसाचार वाईटच; त्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. परंतु यामागे एक राजकीय विचार आहे, तसेच या वादाचा संबंध असंख्य शोषितांच्या सामाजिक आणि आर्थिक पाश्र्वभूमीशी जोडला गेला आहे. त्यातील बहुसंख्य आदिवासी आहेत. त्यांच्या वतीने बोलणे किंवा सरकार अथवा उजव्या विचारांचा प्रतिवाद करणे यास ‘नक्षलसमर्थन’ कसे म्हणता येईल? परंतु या मुद्दय़ाकडे हे पुस्तक पूर्णपणे दुर्लक्ष करते. अग्निहोत्री त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जेएनयू (दिल्ली), नालसार (हैदराबाद), यादवपूर (कोलकाता) यांसारख्या विद्यापीठांत गेले तेव्हा तिथे त्यांना कडाडून विरोध झाला. या विरोधकांना हे पुस्तक सरळ सरळ नक्षल ठरवते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अग्निहोत्री यांना झालेला विरोध अजिबात समर्थनीय नाही; परंतु केवळ या एका कारणासाठी साऱ्यांनाच डावे वा थेट ‘नक्षलसमर्थक’ ठरवणे योग्य नाही. या पुस्तकात नेमके तेच जागोजागी दिसते.

पुस्तकात अग्निहोत्री नक्षलवादाशी संबंधित अनेक घटनांचा उल्लेख करतात. तो करताना त्यांनी काही ठिकाणी ‘वनबाला’ हे नाव प्रतीक म्हणून वापरले आहे. अग्निहोत्री यांच्या वडिलांनी एका अबोध आदिवासी मुलीवर केलेल्या कवितेतील नायिकेचे हे नाव आहे. नक्षलींच्या हिंसाचारामुळे ही वनबाला कशी व्यथित होते, हे अग्निहोत्री सांगतात; मात्र या हिंसाचाराच्या मुळाशी जात नाहीत. ‘छत्तीसगडमध्ये फिरलो, सलवा जुडूमच्या नेत्यांसह अनेकांना भेटलो..’ असा दावा अग्निहोत्री सातत्याने करतात, परंतु कुणाचेही नाव नमूद करत नाहीत. इंग्रजीत या विषयावर आजवर अनेकांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. ते मांडताना संदर्भ दिले जातात. स्थळ-काळाचा उल्लेख स्पष्टपणे केला जातो. मात्र, अग्निहोत्री या भानगडीत पडत नाहीत. नक्षलग्रस्त भागांचा केवळ उल्लेख करून ते भाष्य करतात. एखाद्या समस्येच्या मुळाशी न जाता त्याला ओझरता स्पर्श करण्याचे कसब त्यांनी चांगलेच आत्मसात केल्याचे या पुस्तकात ठायी ठायी दिसते.

अग्निहोत्री एकदा अमेरिकेत एका संगीतकार मित्राशी गप्पा मारत असतात. तेव्हा या मित्राची पत्नी ‘अमेरिका आता नरक झाली आहे’ असे उद्वेगाने म्हणते. त्याला प्रत्युत्तर देताना अग्निहोत्री आदिवासी भागाचा नक्षलींमुळे कसा नरक झाला आहे, याचा पाढा वाचतात. मात्र हे कशामुळे झाले, त्याला आर्थिक व सामाजिक स्थिती जबाबदार होती का, यावर भाष्य करत नाहीत. सारेच आदिवासी नक्षलींच्या बाजूने नाहीत याचेही भान अग्निहोत्री या पुस्तकात ठेवत नाहीत. आदिवासी समाज हा लढाऊ होता व आहे. त्याने ब्रिटिशांविरुद्ध ११८ लढाया लढल्या. मात्र या इतिहासाचे विस्मरण अग्निहोत्री यांनी सोयीस्करपणे होऊ दिले आहे.

शहरी नक्षलवादाच्या संदर्भातही त्यांच्यापुढे असाच पेच निर्माण झाला आहे. नक्षली विचारांचे समर्थन करणाऱ्या अनेक बुद्धिवंतांवर अग्निहोत्री चांगलेच कोरडे ओढतात. परंतु या साऱ्यांचा ‘पुरोगामित्वाचा बुरखा फाडण्याची’ चांगली संधी त्यांनी वाया घालवली आहे. शहरी भागात विस्तार करण्याविषयी नक्षलींनी आजवर अनेक पुस्तिका व दस्तावेज तयार केले आहेत. अनेक संकेतस्थळांवर ते उपलब्धही आहेत. ‘शहरी काम के बारे में’ हे नक्षलींचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यातील मजकूर लेखकाने थोडाफार फिरवून या पुस्तकात बिनदिक्कतपणे वापरला आहे. सविस्तर विवेचनासाठी असा मजकूर वापरण्यात गैरही काही नाही, परंतु तशी नोंद पुस्तकात देणे गरजेचे असते. ती तसदी इथे घेतलेली दिसत नाही. सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नक्षलवादी जी. एल. साईबाबाकडून पोलिसांनी शेकडो कागदपत्रे जप्त केली. नक्षलींना शहरांत काम करण्यासाठी आखलेली ‘ए-१ ते ए-७’ ही थिअरी  व जप्त कागदपत्रांतील मजकूर अग्निहोत्री यांनी या पुस्तकात जसाच्या तसा वापरला आहे. मात्र, या थेअरीच्या अनुषंगाने प्रत्यक्षातील व्यवहार, ए-१ ते ए-७ या साखळीत नेमका कोण कुठे असतो, आजवर या साखळीत काम केलेले व पोलीस कारवाई झालेले लोक कोण आहेत, त्यांचे लागेबांधे कुणाशी आहेत, नक्षलींनी शहरात काम करण्यासाठी स्थापन केलेले वेगवेगळे गट, संघटना, बंदी आलेल्या संघटना, त्यांचा इतर राजकीय व सामाजिक संघटनांशी येणारा संबंध, यंत्रणांच्या डोळ्यात धूळ झोकून चालणारा त्यांचा कारभार.. अशा मुद्दय़ांना मात्र अग्निहोत्री अजिबात स्पर्श करत नाहीत. ‘उजव्या विचारांना विरोध करणारे ते सर्वच डावे आणि सारे डावे म्हणजे नक्षलसमर्थक’ अशा उजव्यांनी स्वीकारलेली सुलभ, सरधोपट मांडणीच हे पुस्तक अप्रत्यक्षपणे पुढे नेताना दिसते.

आपला चित्रपट अरविंद केजरीवालांनी बघावा म्हणून अग्निहोत्रींनी त्यांना पत्र लिहिले. परंतु केजरीवालांनी त्यास उत्तर दिले नाही. या घटनेचा अन्वयार्थ लावताना अग्निहोत्रींनी ‘आप’ व केजरीवाल यांना अप्रत्यक्षपणे नक्षलसमर्थकांच्या रांगेत उभे करून ठेवले आहे. मात्र, आपने नक्षली असल्याचा आरोप असणाऱ्या सोनी सोरींना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बस्तरमधून उमेदवारी दिली होती, हा संदर्भ अग्निहोत्रींकडून टाळला गेला आहे! नक्षली हे देशस्तरावरील व राज्यांतीलही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या यंत्रणांकडून आजवर झालेल्या कारवाईत नक्षली व इंडियन मुजाहिदीनचा संबंध आहे असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. रा. स्व. संघाचे नेते इंद्रेशकुमार मात्र अनेकदा अशा संबंधाची मांडणी करतात. अग्निहोत्री यांनी पुस्तकात याचीच री ओढली आहे. त्यामुळे एका विशिष्ट हेतूने आणि विरोधकांना देशद्रोही ठरवण्यासाठी तर हे पुस्तक लिहिले नाही ना, अशी शंका वाचताना सतत येते. थेट आरोप करायचे नाहीत, परंतु सारे विरोधक नक्षलसमर्थक असे सुचवणारे हे पुस्तक आहे. अग्निहोत्री यांनी या क्लिष्ट, पण महत्त्वाच्या विषयाला सखोल व चिकित्सक पद्धतीने हाताळण्याची चांगली संधी गमावली आहे, असे वाटते. त्यामुळे पुस्तकाच्या शीर्षकात ‘अर्बन नक्सल्स’ हा शब्दप्रयोग योजण्यामागे केवळ पुस्तकाकडे वाचकांचे लक्ष वेधून घेणे एवढेच कारण दिसते.

‘अर्बन नक्सल्स : द मेकिंग ऑफ बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम’

लेखक : विवेक अग्निहोत्री

प्रकाशक :  गरुडा प्रकाशन

पृष्ठे : २०८, किंमत : ३९९ रुपये

devendra.gawande@expressindia.com

Story img Loader