पुस्तकांच्या वाचनाच्या, त्यांच्या शोधाच्या, ग्रंथसंग्रहाच्या अनेक आठवणी ग्रंथप्रेमींच्या पोतडीत जमा होत असतात. त्याही पुस्तकांइतक्याच रोचक असतात. उद्याच्या ग्रंथदिनानिमित्ताने एका ग्रंथप्रेमीने पुस्तकांसोबतच्या प्रवासाचे सांगितलेले हे अनुभव..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वि. वा. शिरवाडकरांनी लिहिलंय, त्यांची व शेक्सपिअरची पहिली भेट नाशिकला त्यांच्या मामाच्या घरात एका अडगळीच्या खोलीत झाली. जुनी पुस्तके पालथी घालण्याच्या नादात त्यांच्या हाताला शेक्सपिअरची काही नाटके लागली. ही नाटके एका मोठय़ा खंडातून फाडून वेगळी काढून बाइंड केली होती. त्यात ‘टायटस अ‍ॅन्ड्रोनिकस’ हे नाटक होते, ज्यात बरेच खून होते. त्या नाटकातला बराचसा भाग त्यांना कळला नाहीच. पण हे काहीतरी विलक्षण आहे हे त्यांना त्या लहान वयातही जाणवले. त्या प्रभावाखाली ते वाचत राहिले तशी क्वचितच एखादी ओळ त्यांना समजे. पण त्या वयात न समजणाऱ्या भाषेची व त्याच्या कर्त्यांची मोहिनी आयुष्यभर त्यांच्यावर राहिली. त्यांनी पुढे लिहिले आहे, की ते कॉलेजमध्ये गेले व नंतर शेक्सपिअरच्या नाटकांच्या वेगवेगळ्या प्रती व आवृत्त्या त्यांनी गोळा केल्या तरी हे पार पिवळे पडलेले पुस्तक त्यांनी जपून ठेवले होते व खोलीत कोणी नसताना ते ही प्रत हळूच उघडून पाहात.

माझ्याकडे अशीच एक पिवळी पडलेली ‘इम्प्रिंट’ची प्रत आहे. हे साहित्यविषयक मासिक बंद होऊन जमाना झाला आहे. पण त्याबद्दल मी ऐकून होतो. आमच्या डॉक्टरांनी त्यांचा पुस्तकसंग्रह काढून टाकला. त्या संग्रहात इम्प्रिंट मासिकाची ही जुनी प्रत होती, फेब्रुवारी १९६६ सालची. ती त्यांनी माझ्यासाठी काढून ठेवली होती. ती देताना डॉक्टरांनी ती प्रत त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून जपून ठेवल्याचे मला सांगितले. ही प्रत म्हणजे सॉमरसेट मॉमचे निधन झाल्यावर काढलेला विशेषांक आहे. त्यात मॉमच्या पुस्तकांतले काही लेख आहेत. त्यातले बरेचसे मी वाचले होते, काही माहीत होते. त्यात मॉमवर एक टीकात्मक लेखही आहे, जो मी वाचला, पण एकंदरच फारसे काही नवे नव्हते. इतर प्रांतांत जे आहे तेच साहित्यातही आहे. सारखे नवे काही हवे असते. परंतु वाचकाला एका ठरावीक वयानंतर नवीन काही हाताशी लागणे दुर्मीळ असते. मॉम ९० पेक्षा जास्त वर्षे जगला. त्याची पुस्तके अनेक वर्षे खपत होती. अजूनही मॉम वाचणारे लोक आहेत. पण आपल्या सत्तरीतच आपण मागे पडू लागल्याची जाणीव मॉमला होत होती. त्याने लिहिले आहे, ‘मी मेल्यावर टाइम्समध्ये माझ्या निधनाची बातमी येईल तेव्हा लोक म्हणतील, ‘अरे, मॉम वारले? आम्हाला वाटले होते ते केव्हाच वारले!’’ त्याने पुढे लिहिले आहे, ‘हे उद्गार ऐकले की माझे भूत गालातल्या गालात हसेल.’ लेखक कितीही प्रतिभावंत असला तरी त्याची ‘थीम’ ठरलेली असते. तो जसा प्रौढ होत जातो तसा जाणता वाचकही प्रौढ होत जातो. उथळ वाचक वैविध्याची अपेक्षा करतात, हे स्ट्राइनबर्गचे म्हणणे पटण्यासाठी ग्रंथांची व आयुष्याची बरीच पाने उलटावी लागतात. होमरच्या युलिसिसला शेवटी जीवनातल्या नावीन्याचा व आश्चर्याचा कंटाळा आला. त्याने जेव्हा परत त्याचे गाव- इथाका- पाहिले तेव्हा तो नावीन्यासाठी नाही, तर प्रेमासाठी रडू लागला. साहित्य म्हणजे केवळ नावीन्य व आश्चर्य नव्हे तर एक आसरा आहे. डॉक्टरांनी ४० वर्षे जपलेली ‘इम्प्रिंट’ची प्रत मीही जपून ठेवली आहे..

केवळ शिरवाडकरांचेच नाही तर साऱ्या पुस्तकप्रेमींचे असेच असते. कल्पना, ज्या शब्दांमधून ती जन्म घेते ते शब्द व ज्या कागदावर ते छापलेले असतात ते कागद या सर्वाचे अद्वैत वाचकाच्या मनात तयार झालेले असते. असे रसायन आपल्या मनात तयार होत नसेल तर ग्रंथप्रेम हा आपला प्रांत नव्हे. विद्वान असणे म्हणजे ग्रंथप्रेमी असणे नव्हे. बऱ्याचदा विद्वानांचे विषय ठरलेले असतात. त्या विषयाचा अभ्यास संपला व काही निष्कर्ष काढले, की त्या विषयाच्या ग्रंथांचे त्याला प्रेम उरतेच असे नाही. पट्टीच्या वाचकाचे मात्र असे नसते. तो कागदांवरच्या विषयात रमलेला असतो. कोणत्याही निष्कर्षांची त्याला घाई नसते. इतरांनी काढलेले निष्कर्ष तो काही शंका मनात ठेवून एका मर्यादेपर्यंतच स्वीकारतो. कारण त्याला कोठेच पोहोचायचे नसते. स्वत:ची ओळख जो लेखक म्हणून करून देण्यापेक्षा वाचक म्हणून करून देणे पसंद करतो, अशा बोर्जेसला तर पुस्तकाबाहेरचे जग हे केवळ पुस्तकातल्या शब्दरूपी जगाचे प्रतििबब वाटे व त्याला त्याच्याशी फारसे देणेघेणे नसे. त्याच्या लेखी सहाराचे वाळवंट हे ब्रिटानिया एनसायक्लोपीडियातले एक पान होते. स्वत:च्या घराबाहेर क्वचितच पडलेल्या एमिली डिकिन्सनने लिहिले आहे, की दूरच्या प्रवासाला जायचे असेल तर पुस्तकासारखे वाहन नाही. यात कुठे जायचे आहे याचा उल्लेखच नाही. दूरच्या प्रवासाला जायचे आहे एवढेच आहे. पुस्तकाच्या आधारे दूरच्या प्रवासाला जावे स्वत:लाच शोधायला प्रकाशाच्या वेगाने आणि परत यावे लगेच तर जुना मी आढळावा जख्ख म्हातारा!

कथा-कादंबऱ्यांवरून निघालेले सिनेमे हा काही पुस्तकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असू शकतो व चित्रपटांची तुलना संबंधित पुस्तकांशी करत राहणे हे व्यसन होऊ शकते. या संबंधाने एक व्यंगचित्र आलेलेही स्मरते, ज्यात दोन गाढवे कचराकुंडीवर फिल्मचे रोल खाताना एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणते, ‘पुस्तक बरे होते!’ दरवेळी असेच असते असे नाही. दोन्ही बाजूंनी अनेक उदाहरणे देता येतील व हा झगडा अनिर्णीत राहू शकतो. या अनिर्णयाचा परिणाम वाचनवेडय़ा माणसावर होत नाही. करेन ब्लिझेनच्या ‘आऊट ऑफ आफ्रिका’ या कादंबरीचे असेच झाले. मेरिल स्ट्रिप या प्रख्यात नटीमार्फत या कादंबरीकडे येणे झाले. करेन ब्लिझेन ही डॅनिश लेखिका १९१४ साली आफ्रिकेत केनियाला आली. ६०० एकर जागेवर कॉफीच्या बागा लावल्या. हा प्रयोग पूर्णत: यशस्वी झाला नाही. सोळा वर्षांनी परत गेल्यानंतर तिने ‘आऊट ऑफ आफ्रिका’ या पुस्तकात तिथल्या मसाई, सोमाली लोकांबद्दल, तिथल्या वन्यजीवांबद्दल तसेच डेनीस हटन या तिच्या प्रियकराबरोबर त्याच्या छोटय़ाशा विमानातून आफ्रिकेच्या विस्तीर्ण प्रदेशावर केलेल्या आकाशभराऱ्यांबद्दल एका उदासीन आसक्तीने लिहिले आहे. पुस्तक घ्यावे तर लागणार होते. पण पडून राहिले तर, ही शंका आली. एकेकाळी असे होत नसे. शिवाय करेन ब्लिझेन ही लेखिका मला नवीन होती. म्हणून वाटले तिची माहिती घ्यावी. आजकाल संगणक उघडला, की लेखक, त्याच्या इतर साहित्यकृती, त्याच्यावरच्या टीका.. सारे उलटसुलट तपासता येते. अपेक्षाभंगाची शक्यता फारच कमी. १८८५ साली डेन्मार्कमधल्या कोपनहेगनजवळ रुंग्स्टेड येथे जन्मलेली करेन १९६२ ला त्याच गावात मरण पावली होती. अनेक वेळा तिचा नोबेलसाठी विचार झाला होता, हेही समजले. पण बक्षिसे हा काही पुस्तक घेण्याचा एकमेव निकष नाही. मग रुंग्स्टेडची काही छायाचित्रे उघडली. एकात शांत, टुमदार स्टेशन दिसले. तर दुसऱ्यात सागरकिनाऱ्यावरचा कॅफे, त्यात रमलेले लोक व किनाऱ्यावर होडय़ा डुलताना दिसत होत्या. सारे टुमदार, शांत व प्रसन्न दिसत होते. लेखिका बरी असावी असे उगीचच मनाने घेतले. असा गोजिरवाणा भाग सोडून या बाई आफ्रिकेला का गेल्या व तिथे काय झाले, हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नव्हतेच. लेखिका आफ्रिकेतले अनुभवसंपन्न जीवन सोडून परत गेली व नंतर त्याच परिसरात हेमिंग्वेचे आगमन झाले. त्या अनुभवावर त्याने लिहिलेले ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ मी वाचले होते. आफ्रिकेतल्या सभ्य मुक्तपणाचे दोघांनाही आकर्षण होते. ‘आउट ऑफ आफ्रिका’ वाचताना ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ ऐकू येत होते, एवढेच नव्हे तर तद्अनुषंगाने जेन गुडालची पुस्तके, जॉन पॅटरसनचे ‘मॅनईटर्स ऑफ साव्हो’, जॉय अ‍ॅडम्सनचे ‘बॉर्न फ्री’ वा राल्फ थॉमसनचे आफ्रिकेतल्या वन्यजीवनाच्या रेखाचित्रांचे पुस्तक या साऱ्याचा मेळ जमला होता व त्याचे पाश्र्वसंगीत आफ्रिकेतल्या गवताळ प्रदेशावरून वाहत आलेल्या वाऱ्याबरोबर माझ्यापर्यंत येत होते.

पुस्तक हाती आले, की लगेच वरीलप्रमाणे लेखकाचे जीवन तपासावे वा मागचे संदर्भग्रंथ पाहावेत, म्हणजे त्या पुस्तकाचे कूळ लगेच कळते. गोविंद तळवलकर अलीकडेच गेले. त्यांच्या लेखनामधून नवनवीन ग्रंथांचा व विद्वानांचा शोध लागे व त्याचे आकर्षण जास्त असे. हे लोक तळवलकरांना कुठे भेटतात याचे कुतूहल निर्माण होई. विशेषत कोस्लर व डय़ुरांट दाम्पत्यांचे तळवलकर संपादक असताना निधन झाले हे त्या चौघा लेखकांचे भाग्य. तळवलकरांनी ज्या विद्वानांचा परिचय करून दिला तो मराठी वाचक नंतर विसरून गेले असे कधी घडले नसेल. त्या परिचयात त्या विद्वानांच्या तपस्येबद्दल आदर, त्यांच्या वैचित्र्यपूर्ण जीवनाबद्दल कुतूहल, दुसऱ्याला त्याबद्दल सांगण्याची शांत ओढ असे सारे असे. मार्च महिन्यात आलेल्या ‘ललित’ मासिकात तळवलकरांचा ‘एका वाद्याचा गहिरा इतिहास’ हा ‘ग्लास हार्मोनिका’ या वाद्यावर लेख आला आहे. ग्लास हार्मोनिका हे वाद्य शोधणाऱ्या बेंजामिन फ्रँकलिनने स्वत तळवलकरांना हे वाद्य वाजवून दाखवले असते तर ते त्यात किती रमले असते माहीत नाही (कदाचित त्या वाद्याबद्दल वाचताना त्यांना ते ऐकू येत असणार); पण ते सारे शब्दांत आले, ते कागदांवर छापले गेले.. मग तळवलकर वयाच्या नव्वदीतदेखील त्यात रमले. त्यांचे अत्यंत उतारवयातले समोर भिंग धरून वाचतानाचे छायाचित्र पाहिले आणि वाटले, हे जातीच्या वाचकाचे लक्षण होय. सध्या तळवलकर पारलौकिक जगातल्या, स्टीफन झ्वाइगच्या आवडत्या ‘कॅफे ग्लक’मध्ये समोर बसलेल्या ‘जेकब मेंडेल’ला विसाव्या शतकातल्या उत्तरार्धातल्या पुस्तकांचा परिचय करून देत असावेत.

– रवींद्र कुलकर्णी

kravindrar@gmail.com

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: V v shirwadkar william shakespeare imprint magazine marathi articles