चित्रकार वासुदेव संतु गायतोंडे यांना आकळून घेण्याचा प्रयत्न मराठीत यापूर्वी झालाच; पण इंग्रजीतही प्रचंड स्रोतसामग्री आणि मुलाखती/अभ्यास अशा अंगांनी गायतोंडे यांच्याबद्दलच्या ग्रंथनिर्मितीचा प्रकल्प गेली काही र्वष सुरू होता. या प्रकल्पात तीन पुस्तकं आणि गायतोंडे यांच्यावरला नवा लघुपट यांचा समावेश आहे. त्यापैकी पहिलं पुस्तक कालच (१५ एप्रिल) प्रकाशित झालं, त्याची ही अंतस्थ ओळख..
कलावंताच्या कलंदरपणाचे किस्से चवीचवीनं पसरवणं हा त्याच्याभोवती रोमॅन्टिक वलय निर्माण करण्याचा एक मार्ग असतो. याउलट, बाजारपेठेत त्याच्या चित्रांना किती भाव मिळतो याविषयी चर्चा करणं हे पैशाविषयीच्या आकर्षणगंडाचं लक्षण असतं. या दोन गोष्टींमागच्या प्रेरणा जरी वेगवेगळ्या असल्या तरीही त्यामुळे एक समान परिणाम होतो – कलावंताभोवती एक धुकं निर्माण होतं आणि मग त्याची कला त्या धुक्यात हरवून जाण्याची शक्यता बळावते. अशा एखाद्या कलावंताला नीट समजून घ्यायचं झालं तर हे धुकं बाजूला सारून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागतो. वासुदेव संतू गायतोंडे हे आधुनिक भारतातले एक प्रतिभावंत चित्रकारही अशा धुक्यात अनेक र्वष हरवले आहेत. त्यांची भणंग वृत्ती, माणूसघाणा स्वभाव किंवा विक्षिप्तपणा यांविषयीच्या किश्शांमुळे ते जीनियस कलाकाराच्या रोमॅन्टिक साच्यात फिट्ट बसले. त्यातच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कलेला गेल्या काही वर्षांत जी सूज अनुभवायला मिळाली तिचा परिणाम म्हणून गायतोंडेंच्या चित्रांना विश्वविक्रमी किमती मिळू लागल्या. भारतातला सर्वश्रेष्ठ अमूर्त चित्रकार आपल्यात होऊन गेला याचा त्या निमित्तानं अनेकांना अचानक शोध लागला.
हे सगळं बाजूला ठेवून जर कुणी गायतोंडेंची चित्रं पाहू लागला, तर मात्र तो हरखून जाणं अगदीच शक्य आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यांचे रंग आणि कॅनव्हासवर ते लावण्याची पद्धत अद्भुत होती. त्यातून त्यांच्या चित्रांना येणारी झळाळी विलक्षण होती. कधी कॅलिग्राफीसारखे आकार, तर कधी पाणी, दगड, क्षितिज अशांचा भास करून देणारे आणि त्यामुळे परिचित भासणारे आकार जरी त्यांच्या काही चित्रांत आढळत असले, तरी त्या चित्रांचा समग्र अनुभव मात्र काहीतरी पूर्णपणे अपरिचित आणि अनोखं पाहिल्याचा असतो. तो काव्यात्म असतो आणि पुष्कळ लोकांसाठी शब्दातीतही असतो. एकाच वेळी पराकोटीचा आत्मानंद आणि निर्मम शांतता त्यात अनुभवता येते. मग ‘हे सर्व कोठून येते?’ असा प्रश्न काही जिज्ञासूंना पडणं स्वाभाविक असतं. पण, कलाबाह्य़ घटकांनाच अतोनात प्रसिद्धी मिळाल्यामुळे गायतोंडेंची निर्मिती आणि त्यामागच्या प्रेरणा समजून घेण्यासाठी गायतोंडेंविषयी अधिक काही जाणून घेऊ पाहणाऱ्यांची परिस्थिती मात्र बिकट होते.
अशा सगळ्या वातावरणात गायतोंडेंमधल्या कलाकाराविषयीच्या आणि माणसाविषयीच्या निखळ प्रेमापोटी आणि त्यांना खऱ्या रूपात जगासमोर पोहोचवण्याच्या असोशीपोटी मुंबईतल्या ‘बोधना’ या संस्थेनं आणि संस्थेच्या सर्वेसर्वा जेसल ठक्कर यांनी ‘रझा फाउंडेशन’च्या साहाय्यानं एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. कोणत्याही विषयात सघन आणि सखोल काम करायचं असलं तर त्याला एक शिस्त आणि चिकाटी लागते. त्याचा प्रत्यय गायतोंडेंवरच्या या प्रकल्पात मिळतो. गायतोंडेंची अनेक दुर्मिळ छायाचित्रं, त्यांच्या जुन्या प्रदर्शनांचे कॅटलॉग्ज, त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा पत्रव्यवहार, त्यांच्याविषयी विविध भाषांत वेळोवेळी लिहून आलेला मजकूर, त्यांनी दिलेल्या मुलाखती अशी, म्हणजे गायतोंडेंना आकळून घेण्यासाठी उपयोगी पडेल अशी प्रचंड सामग्री मोठय़ा कष्टानं ‘बोधना’नं मिळवली. गायतोंडेंच्या संपर्कात आलेल्या कित्येक माणसांना जेसल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाठलं आणि त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. प्रकल्प इंग्रजीत असल्यामुळे मराठी किंवा हिंदी साहित्याची त्यांनी भाषांतरं करून घेतली. प्रकल्पाची ही पूर्वतयारीच कित्येक र्वष चालली होती. त्यानंतर पुस्तकांचे तीन खंड आणि एक माहितीपट असं प्रकल्पाचं स्वरूप निश्चित झालं. त्यांपैकी ‘वासुदेव संतू गायतोंडे : सोनाटा ऑफ सॉलिटय़ूड’ हा पहिला खंड नुकताच प्रकाशित झाला आहे. जेसल यांच्या संकल्पनेनुसार आणि ‘बोधना’नं उपलब्ध करून दिलेल्या स्रोतसामग्रीचा पुरेपूर वापर करून नामवंत कलासमीक्षक मीरा मेनेझिस यांनी या खंडाचं मुख्य लेखन केलं आहे.
पुस्तकाचं स्वरूप चरित्रात्मक आहे; मात्र हे चरित्र गायतोंडेंचा निव्वळ जीवनपट उलगडणारं नाही, तर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचा त्यांच्या कलाप्रवासाशी कसा संबंध लागतो हे समजून घेण्याच्या हेतूनंच त्याची मांडणी केलेली आहे. गोव्यात लहानपणी एका नातेवाईकाला देवळाची भिंत रंगवताना गायतोंडेंनी पाहिलं आणि तेव्हापासून त्यांना चित्रकलेविषयी आकर्षण वाटू लागलं. नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी चित्रकारच व्हायचं ठरवलं. तापट वडिलांनी त्यांना विरोध केला. त्याविरोधात गायतोंडेंनी बंड केलं. पुढे शंकर पळशीकर आणि अहिवासी यांच्यासारख्या शिक्षकांमुळे आणि देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये काही मंतरलेले दिवस त्यांना अनुभवता आले. मग ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’शी त्यांचा संबंध आला. अशा अनेक वळणांमधून हे चरित्र गायतोंडेंचा चित्रकलेचा ध्यास आणि प्रवास दाखवून देतं.
हा इतिहास केवळ गायतोंडेंचा नाही, तर आधुनिक भारतीय चित्रकलेतल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचं ते दस्तावेजीकरणही आहे. जगाला तोंडात बोट घालायला लावेल असा समृद्ध कलावारसा भारताकडे अगोदरपासूनच होता. ब्रिटिशांनी स्थापलेल्या जेजेसारख्या संस्थांमुळे कलाशिक्षणाला एक शिस्तबद्ध चौकट लाभली. पाश्चात्त्य कलापरंपरेतल्या श्रीमंतीचीही ओळख त्यामुळे भारतीयांना होऊ लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्याप्रमाणे राष्ट्रउभारणीसाठी विज्ञान-तंत्रज्ञान-उद्योग अशा क्षेत्रांत भारताला आपलं स्थान बळकट करायचं होतं त्याप्रमाणे आधुनिक कलाविश्वातही भारताची एक नवी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं. आदर्शवादानं भारलेल्या अशा काळात ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन झाला. गटातल्या प्रत्येक चित्रकारानं एखादी पूर्वपरंपरा किंवा विचारसरणी जशीच्या तशी अंगीकारण्याचं नाकारलं. नव्या शैलीचं एखादं घराणं निर्माण करण्यातही त्यांना रस नव्हता. त्यापेक्षा आपापली व्यक्तिगत चित्रभाषा शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे हे कलाकार खऱ्या अर्थानं आधुनिक ठरले.
गायतोंडेंनी या गटासोबत काही काळ घालवला. यथावकाश त्यांनीही आपला एक नवा मार्ग शोधला आणि त्यातून आपली अमिट छाप भारतीय चित्रकलेवर उमटवली. त्या वाटचालीत लघुचित्रासारख्या भारतीय परंपरेतून त्यांनी प्रेरणा घेतली, पण ती आशयाच्या किंवा कथनाच्या पातळीवर नव्हे; त्या परंपरेतली रंग एकमेकांशेजारी ठेवण्याची पद्धत किंवा त्यातल्या घाटांची विशुद्धता आणि प्रमाणबद्धता त्यांना भावली. त्याच वेळी आधुनिक पाश्चात्त्य चित्रकारांपैकी पॉल क्लीच्या लयतालतत्त्वविचारांनी ते मोहून गेले. चित्रकलेतले हे प्रभाव एकीकडे त्यांना नवनवे प्रयोग करून पाहायला प्रेरणा देत होते, तर दुसरीकडे भारतीय तत्त्वज्ञान आणि झेन बौद्ध विचारांद्वारे त्यांचं निर्मोही मन एका विलक्षण पातळीवरच्या स्वातंत्र्याकडे झेपावत होतं. चित्रकार म्हणून झालेल्या गायतोंडेंच्या प्रवासावर या सगळ्याचा गहिरा परिणाम झाला. तरीही, ते आवडत्या चित्रशैलीची केवळ नक्कल करण्यात समाधान मानणारे नव्हते, मग ती भारतीय लघुचित्रं असोत, पॉल क्ली असो किंवा झेन तत्त्वविचारांच्या प्रभावाखालची जपानी मिनिमलिस्ट चित्रशैली असो. मात्र, ‘माझी चित्रं अमूर्त नसून नॉन-ऑब्जेक्टिव्ह आहेत’ असे काही निवडक उद्गार वगळता स्वत:च्या चित्रांबद्दल, त्यातल्या प्रयोगांबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल फारसं भाष्य करण्याची गायतोंडेंची वृत्ती नव्हती. चित्राला शीर्षक देणंही अनेकदा त्यांना पसंत नसे. त्यामुळे सामान्य रसिकाला किंवा गायतोंडेंच्या अभ्यासकालाही तिथपर्यंत पोहोचणं अतिशय अवघड होऊन बसतं. मग एकीकडे ‘आधुनिक कला म्हणजे काय ते काही कळत नाही बुवा’ म्हणणारा अनभिज्ञ आणि दुसरीकडे गायतोंडेंच्या प्रतिभेनं मोहून गेलेले त्यांचे चाहते अशी दोन टोकं निर्माण होतात. ‘सोनाटा ऑफ सॉलिटय़ूड’ त्यांच्यामधली पोकळी भरून काढतं. ही अवघड जबाबदारी पेलणं हे पुस्तकाचं खरं यश आहे. सुटय़ा सुटय़ा मूळ स्रोतांमधून गायतोंडेंविषयीचं एक सुसंगत कथन त्यात निर्माण केलेलं आहे. गायतोंडेंचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्यावरचे प्रभाव आणि एखाद्या योग्यासारखा त्यांचा जीवनप्रवास याचा रसदार आढावा घेत घेत त्यांची चित्रं समजून घेण्यासाठी आवश्यक भूमी तयार करण्याचं महत्त्वाचं काम हे चरित्र करतं.
गायतोंडेंच्या कलात्मक परिसराला समजून घेण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकतेकडे प्रवास करू पाहणाऱ्या भारतातलं कलाविश्व कशा प्रकारे बहरत होतं याचंही एक अनोखं चित्र पुस्तकात उभं राहतं. गिरगावातल्या चाळीत राहणाऱ्या गायतोंडेंना उमेदवारीच्या काळात मुंबईत स्वत:चा स्टुडिओ परवडणं शक्यच नव्हतं. गायतोंडे, हुसेन किंवा प्रफुल्ला डहाणूकर अशा नंतर विख्यात झालेल्या चित्रकारांना कारकीर्दीच्या सुरुवातीला हा अवकाश पुरवणाऱ्या मुंबईतल्या ‘भुलाभाई इन्स्टिटय़ूट’चा त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा होता. कलावंतांना आश्वासक वाटेल अशा खेळीमेळीच्या वातावरणात तिथे अनेक कलाप्रकारांमध्ये विधायक आदानप्रदान होत होतं. एकीकडे इब्राहीम अल्काझी आणि सत्यदेव दुबेंची नाटकं तिथे होत असत, मार्सेल मासरेसारख्या जगविख्यात कलाकारांचे प्रयोगही तिथे होत असत, आणि हुसेन आणि गायतोंडेंसारखे चित्रकारही तिथे काम करत असत. या घुसळणीतून मुंबईतलं आणि पर्यायानं भारतीय कलाविश्व समृद्ध झालं. (मुंबईतल्या प्रायोगिक नाटय़विश्वाचा मौखिक इतिहास मांडणारं शांता गोखले यांचं ‘द सीन्स वी मेड’ हे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आणि ‘सोनाटा ऑफ सॉलिटय़ूड’ ही वरवर पाहता दोन वेगळ्या विषयांवरची पुस्तकं असूनही ‘भुलाभाई इन्स्टिटय़ूट’मधलं वातावरण या समान दुव्यामुळे परस्परपूरक ठरावीत.)
माणूस म्हणून गायतोंडे कसे होते याचं अत्यंत हृद्य चित्रण पुस्तकात आहे. चित्रं विकली जात नसल्यामुळे भणंग राहणारे गायतोंडे थोडे पैसे हाती येताच उत्तम जेवण, संगीत, कपडे आणि मित्रमैत्रिणींवर ते उदारहस्ते खर्च करत. झेन तत्त्वज्ञानानुसार एखादा सामुराई आणि त्याच्या हातातला धनुष्यबाण हे वेगळे राहू नयेत, तर धनुष्यबाण त्याच्या शरीराचाच एक अविभाज्य भाग व्हायला हवा. गायतोंडेंच्या कलेचा त्या दिशेनं झालेला प्रवास पुस्तकात वाचायला मिळतो. रसिकता आणि निरीच्छपणा यांचा हा संयोग आणि झेन किंवा भारतीय तत्त्वविचारांशी जुळलेले गायतोंडेंचे बंध यांच्यामधली संगती पुस्तकात उलगडली आहे. तासन्तास एक शब्दही न बोलता समुद्राचं अवलोकन करत जे आपल्यासोबत बसू शकतील अशा लोकांशी मैत्र जुळणारे गायतोंडे इथे आपल्याला भेटतात. अँथनी क्वीनचा नाच आवडतो म्हणून अनेकदा ‘झोर्बा द ग्रीक’ पाहणारे गायतोंडेही इथे भेटतात. ‘चित्र काढताना [मी इतका आनंदात असतो की] मला नाचावंसं वाटतं’ आणि ‘संगीत ऐकलं किंवा कविता वाचली की नाचावंसं वाटणं साहजिक आहे’ हे म्हणणारे गायतोंडे आणि झोर्बा यांच्यातला हा आणि असे अनेक बंध पुस्तकात हळूहळू उलगडत जातात तेव्हा गायतोंडे आपल्याला खरेखुरे आणि समग्र आकळू लागतात.
गेली काही र्वष सातत्यानं भारतीय दृश्यकलांविषयीच्या प्रकाशनांद्वारे ‘बोधना’नं आपलं एक विशिष्ट स्थान राखलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट निर्मितिमूल्यं असलेलं हे देखणं पुस्तकही त्या परंपरेला साजेसं आहे. गायतोंडेंची अनेक चित्रं आणि दुर्मिळ छायाचित्रं तर पुस्तकात आहेतच; शिवाय, जुन्या प्रदर्शनांच्या कॅटलॉगमधली पानं, पत्रव्यवहार अशा साहित्याचीही सुयोग्य पखरण त्यात आहे. अशा सगळ्या घटकांच्या समावेशामुळे पुस्तकाचं संदर्भमूल्य वाढलं आहे. गायतोंडेंची जीवनदृष्टी, त्यांची कला, त्यांचं आवडतं संगीत यांमधून गायतोंडे कसे कळू शकतात याची एक समर्पक झलक नामवंत चित्रकार आणि गायतोंडेंचे दिल्लीकर स्नेही क्रिशन खन्ना यांनी आपल्या छोटेखानी प्रस्तावनेत दाखवली आहे, आणि पुस्तकाचं शीर्षक किती सुयोग्य आहे याचंही एक दर्शन घडवलेलं आहे. ‘बोधना’च्या गायतोंडे प्रकल्पातलं हे केवळ पहिलं पुस्तक आहे. त्याचा एकंदर दर्जा पाहता आगामी दोन पुस्तकं आणि गायतोंडेंवरचा माहितीपट या प्रकल्पातल्या नियोजित गोष्टींची रसिक चाहत्यांना आणि अभ्यासकांना नक्कीच आतुरतेनं प्रतीक्षा करावीशी वाटेल.
वासुदेव संतु गायतोंडे – सोनाटा ऑफ सॉलिटय़ूड लेखिका : मीरा मेनेझिस
संकल्पना : जेसल ठक्कर
प्रकाशक : बोधना आर्ट्स अॅण्ड रिसर्च फाउंडेशन, रझा फाउंडेशन
पृष्ठे : २४८ (मोठा आकार), किंमत: ५,५०० रु.
अभिजीत रणदिवे
लेखक अनेक कलाविषयक प्रकल्पांप्रमाणेच ‘बोधना’च्या पुस्तक-प्रकल्पाशीही संबंधित आहेत. मात्र लेखातील त्यांची मते पूर्णत वैयक्तिक. ईमेल : rabhijeet@gmail.com