|| विबुधप्रिया दास

निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा असताना एखाद्या नेत्याचा प्रचार करण्यासाठी पुस्तक लिहिण्या-प्रकाशित करण्याची प्रथा मुळात अमेरिकी. ही अभारतीय प्रथा अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीची भुरळ पडलेल्यांस शोभते, असेच राजीव गांधी आदींच्या काळात मानले जाई. परंतु २०१२-१३ पासून तिचे अनुकरण भारतातही होऊ लागले आणि मग ही ‘प्रचारग्रंथां’ची प्रथा भारतातही गेले दशकभर सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांच्याविषयीचे ‘द मंक हू ट्रान्स्फॉर्मड उत्तर प्रदेश’ हे शंतनु गुप्ता लिखित दुसरे पुस्तक डिसेंबर २०२१ मध्ये प्रकाशित झाले. गुप्ता यांनीच यापूर्वी (२०१७ मध्ये) योगींवर लिहिलेल्या पुस्तकाचे नाव ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ असे होते. ‘द मंक हू सोल्ड हिज फेरारी’ या रॉबिन शर्मालिखित पुस्तकाच्या नावावर बेतलेल्या शीर्षकांची जी दोन्ही पुस्तके गुप्ता यांनी लिहिली, त्यांचा भर योगी कसे साधे आहेत आणि म्हणून प्रामाणिकसुद्धा आहेत, त्यांचे कुटुंबीय आजही मध्यमवर्गीय आहेत, १९९८ पासून सलग पाच वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या योगींच्या अनुपस्थितीतही गोरखपूरच्या मठामध्ये त्यांचे कार्यकर्ते ‘जनता दरबार’ भरवतात आणि सरकार कोणाचेही असो, योगींकडून आलेल्या एका फोनवर जिल्ह्यातल्या लोकांची कामे होतात, आदी माहिती देण्यावर तर आहेच. पण भाजपच्या प्रचारतंत्रात ‘आमचे दोष हे आमच्या आधीच्यांचेही दोष होतेच’ आणि ‘आधीच्यांनी भ्रष्टाचार केला, आम्ही स्वच्छ आहोत’ हे जे दोन पवित्रे महत्त्वाचे ठरतात, त्यांचाही पुरेपूर अवलंब गुप्ता यांच्या ताज्या पुस्तकात तरी नक्कीच दिसून येतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

एकंदर दहा प्रकरणे पुस्तकात आहेत, त्यापैकी पहिले गुप्ता यांच्या आधीच्या पुस्तकावर आधारलेले आहे. योगींच्या राज्यात गुन्हेगारांना जरब बसली, अंधकारमय उत्तर प्रदेशात वीज खेळू लागली, उत्तर प्रदेश हे ‘द्रुतमार्गाचे (एक्स्प्रेसवे) राज्य’ ठरले, योगींच्या मार्गदर्शनाखाली राज्यात उद्योग आले, नोकऱ्या आल्या आणि समृद्धीही परतली, शिक्षणातील ‘अखिलेश यांची फसवणुकीवर आधारित व्यवस्था’ बंद करून योगींनी गुण-आधारित व्यवस्था आणली, योगींच्या राज्यातील आरोग्यव्यवस्थेचे कौतुक जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने केले, योगींच्या सरकारमुळे अखेर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला, योगींच्या सरकारने उत्तर प्रदेशात सांस्कृतिक प्रबोधन (कल्चरल रेनेसाँ) घडवल्यामुळे आता उत्तर प्रदेश केवळ ताजमहालसाठी ओळखला जात नाही, असा बोध पहिल्या नऊ प्रकरणांतून करून देण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे, तर अखेरच्या ‘डबल इंजिन की सरकार’ या प्रकरणात, मोदी व योगी यांनी एकत्रितपणे उत्तर प्रदेशाचा विकास केला, अशी कबुली आहे. ‘कबुली’ अशासाठी म्हणायचे की, त्याआधीच्या प्रकरणांमध्ये मोदींचा अथवा केंद्र सरकारचा उल्लेख अत्यंत अभावानेच आहे. उदाहरणार्थ, योगींमुळे आरोग्यव्यवस्था कशी सुधारली हे सांगताना १४ जिल्ह्यांमधील रुग्णालयांना (‘जिल्हा रुग्णालये’ शासकीयच असावी लागतात. पुस्तकात ‘जिल्ह्यांमधील रुग्णालये’ असे म्हटले आहे) योगींच्या कारकीर्दीत गती मिळाल्याचा उल्लेख जरूर येतो, परंतु गोरखपूरच्या ‘एम्स’चा उल्लेख नाही. किंवा, गुन्हेगारीसंदर्भातील प्रकरणामध्ये, केंद्रीय तपास यंत्रणांनी उत्तर प्रदेशात केलेल्या कारवायांचा स्पष्ट उल्लेख जवळपास नाहीच.

वृत्तपत्रीय बातम्यांचा आधार लेखकाने पुस्तकभर अनेक ठिकाणी घेतला आहे. जरी पुस्तकाच्या सुरुवातीला आभारप्रदर्शनातच लेखकाने, सर्व जिल्ह्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी माहिती उपलब्ध केली, अशी कृतज्ञता व्यक्त केली असली, तरीही पुस्तकातील संदर्भ मात्र वेळोवेळच्या बातम्यांचेच दिसतात. ‘योगींच्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा’ असे पुस्तकाचे स्वरूप लेखकाने वर्णिले आहे. जेव्हा बातम्यांचा आधार घेण्याची वेळ येते, तेव्हा त्या-त्या विषयावरील सर्वात ताजी आणि सर्वाधिक सकारात्मक सुराची बातमी लेखक प्राधान्याने आधारासाठी निवडतो, असे काही संदर्भाची आणि त्या अनुषंगाने त्याच विषयावरील अन्य बातम्यांची चाचपणी केल्यास आढळेल. उदाहरणार्थ,  नऊ आणि मग १४ अशा एकंदर २३ वैद्यकीय महाविद्यालयांना योगींमुळे गती मिळाल्याचे पुस्तकात सांगण्यात येते. पण २०१७ च्या एप्रिलमध्ये योगी यांची घोषणा २५ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची होती, तशी बातमी ‘प्रेस ट्रस्ट’ या वृत्तसंस्थेचीच असल्याने ती अनेक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर आजही सापडते. कोणत्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांना गती मिळाली नाही, हे सांगण्यात पुस्तकाने वाचकांचा वेळ वाया घालवलेला नाही. योगी हे यशस्वीच आहेत, असे सांगण्याचे काम हे पुस्तक इमानेइतबारे करते, म्हणूनच हा आढावा की प्रचार असा प्रश्न पडतो आणि ‘प्रचारग्रंथां’चे निकष मात्र इथे लागू होतात!