निखिल बेल्लारीकर nikhil.bellarykar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्य असण्याबद्दलचे अनेक सिद्धांत व अनेकपदरी निष्कर्ष यांच्या गुंत्यातून तर्कशुद्ध विचारापर्यंत आणणाऱ्या पुस्तकाविषयी..

आर्य लोक नक्की कोण होते? ते मूळचे भारतातले की भारताबाहेरचे? हे वरकरणी पाहता अतिशय साधे प्रश्न आहेत. पण यांनी गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून युरोप, भारत आणि अमेरिकेतील विचारविश्वात अभूतपूर्व खळबळ उडवून दिलेली आहे. पण या प्रश्नांबद्दलची चर्चा ही जवळपास कधीच शुद्ध ज्ञानकेंद्री नसते. आजही या विषयावर सार्वजनिक चर्चाविश्वात ऊहापोह होत असतो, तेव्हा नवनवीन संशोधनांचा वापर आपापल्या राजकीय धारणा बळकट करण्यासाठीच केला जातो. मजेची गोष्ट म्हणजे, या धारणा मात्र वासाहतिक काळातील सिद्धांतांवरच आधारित असतात! तेव्हा भारतीय इतिहासाच्या या सर्वात विवादित आणि पायाभूत मुद्दय़ाचे ‘निके सत्त्व’ जाणून घ्यायचे, तर या विषयाची पूर्वपीठिका आणि आवाका जाणून घेणे अतिशय आवश्यक ठरते. ‘व्हिच ऑफ अस आर आर्यन्स?’ या पुस्तकाने हे अतिशय अवघड काम उत्तमरीत्या पार पाडलेले आहे. प्रख्यात संस्कृतज्ञ मायकेल विट्झेल, प्राचीन भारताच्या सुप्रसिद्ध संशोधक रोमिला थापर या जुन्याजाणत्यांसोबतच पुरातत्त्ववेत्त्या जया मेनन, जनुकशास्त्रज्ञ काइ फ्रिस आणि राझिब खान या ताज्या दमाच्या संशोधकांचेही यात योगदान आहे.

या प्रश्नाची सुरुवात होते ती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून. या काळात भारतीय उपखंडाशी युरोपचा खोलवर संबंध आला आणि भारताच्या इतिहास संशोधनाची सुरुवात झाली. राजकीय इतिहासासोबतच भाषिक-सांस्कृतिक इतिहासाचाही ऊहापोह जोमाने सुरू झाला. या एकूण संशोधनाच्या व त्याला मिळालेल्या प्रतिसादांच्या अनुषंगाने आर्य असण्याच्या विभिन्न सिद्धांतांचा परामर्श रोमिला थापरकृत विस्तृत प्रकरणात घेतलेला आहे.

सुरुवातीला सरधोपटपणे चालणाऱ्या या अभ्यासाला विल्यम जोन्स आणि फ्रान्झ बॉप यांच्या संशोधनामुळे वेगळीच दिशा मिळाली. ग्रीक, लॅटिन या युरोपातील अतिप्राचीन भाषांचे संस्कृतशी जवळचे साम्य असून ते यादृच्छिक नाही, हे विल्यम जोन्सने दाखवून दिले. पुढे त्या पायावर आधारित इंडो-युरोपीय भाषाकुळाची संकल्पना मांडून एकूणच तौलनिक भाषाशास्त्राची मांडणी केली गेली. त्यामुळे हे सिद्ध झाले की, युरोप आणि भारतातील बहुसंख्य लोकांच्या भाषा सद्य:स्थितीत एकमेकांपासून खूप वेगळ्या असूनही त्यांचे मूळ एकच आहे.

तत्कालीन युरोपात भाषाधारित राष्ट्रवादाची चलती असल्यामुळे भाषेशी ‘वंश’ जोडणे हेही क्रमप्राप्तच होते. यातूनच ‘आर्यन वंश’सारखी तद्दन चुकीची परिभाषा उदयाला आली. तत्कालीन जर्मन संशोधकांचा असा ठाम विश्वास होता, की युरोपमधील सर्वात शुद्ध रक्त त्यांचे असून ते मूळचे प्राचीन आर्यच आहेत. यातूनच कुप्रसिद्ध ‘आर्यन इन्व्हेजन थिअरी’ उगम पावली. त्यानुसार- ‘वैदिक धर्मीय, वैदिक संस्कृत बोलणारे आर्य भारतात बाहेरून आले, त्यांनी भारतातील स्थानिक लोकांचा लढाईत पराभव केला आणि आपली भाषा, संस्कृती व धर्म भारतीयांवर लादले; त्यांचे वंशज म्हणजे सवर्ण हिंदू होत’ अशी मांडणी झाली. माक्स् म्युलर हा प्रसिद्ध जर्मन संस्कृतज्ञ या सिद्धांताच्या सर्वदूर प्रसिद्धीस कारणीभूत ठरला. तत्कालीन युरोपीय वैचारिक प्रभावामुळे त्याने लावलेले काही अन्वयार्थ दूषित झालेले आहेत. उदा. सायणाचार्यकृत ऋग्वेदभाष्याचा आधार घेऊन ही मुळात नसलेली वंशाची संकल्पना वापरली आहे. त्यामुळे आर्य-अनार्य संघर्षांला मुळात नसलेले वांशिक परिमाण लाभले. युरोपीय वंशवादी विचारसरणीमुळे वेदग्रंथांचे, पर्यायाने भारतीय संस्कृतीचे आकलन कसे दूषित झाले व ते दूषित आकलन भारतीयांवर कसे लादले गेले, हे थापर आवर्जून सांगतात.

या सिद्धांताला तत्कालीन भारतातून अनेकपदरी प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळकांनी मुख्यत: काही वेदमंत्रांच्या आधारे उत्तर ध्रुव हेच आर्याचे मूलस्थान होते असा सिद्धांत मांडला. तत्कालीन राज्यकत्रे इंग्रज आणि भारतातील उच्चवर्णीय हिंदू हे मुळात एकच असल्याचा सिद्धांत मान्य केला, तर आपला दर्जा उंचावेल या आशेने कैक सवर्ण हिंदू विचारवंतांनी याची तळी उचलून धरली. याचीच दुसरी बाजू म्हणजे महात्मा फुलेकृत सिद्धांत. त्यांच्या मते, आर्य- त्यातही ब्राह्मण हे मूळचे अभारतीय असून येथील बहुजनांवर त्यांनी वर्चस्व स्थापन केले आणि त्याची परिणती जात्याधारित भेदभाव व अत्याचारात झाली. याखेरीज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अशी होती की, आर्य मूळचे भारतातलेच असून सर्व हिंदू त्यांचे वंशज होत. ती भूमिका आजही हिंदुत्ववादी विचारसरणीचा एक महत्त्वाचा आधार आहे.

या अशा अनेक मतांच्या गलबल्यात भारतातले समाजमानस ढवळून निघत असतानाच पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजो-दारो येथे झालेल्या उत्खननांत आजवर पूर्ण अज्ञात असलेल्या संस्कृतीचा शोध लागला. यालाच पुढे ‘हडप्पा/ सिंधू संस्कृती’ असे नाव मिळाले. सप्तसिंधूच्या खोऱ्यातील खूप विस्तीर्ण भूभागावर ही संस्कृती पसरलेली होती. बुचकळ्यात टाकणारी गोष्ट म्हणजे, सर्वात प्राचीन हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदातील कुठल्याच वर्णनाशी या संस्कृतीचा मेळ बसत नव्हता. विशेषत: संस्कृतीचे ग्रामीण वा शहरी स्वरूप, घोडय़ाचा वापर आणि कालानुक्रम हे महत्त्वाचे निकष पाहता सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीमधील भिन्नत्व उठून दिसते. साहजिकच नव्या सिद्धांतांची मांडणी करण्यात आली. उदा. ऋग्वेदामधील अनार्याच्या वस्त्यांच्या विध्वंसाची वर्णने ही सिंधू संस्कृतीच्या विनाशाशी जोडली गेली. सिंधू संस्कृतीतील लिपीचेही काही पुरावे सापडले असून त्या लिपीचा तमिळ लिपीशी संबंध लावला गेला. आर्य असण्याचे अनेक सिद्धांत अशा कैक संशोधनांतून कसे उगम पावले, याचे आकलन रोमिला थापरकृत प्रकरणातून वाचकाला होते.

यासंबंधीच्या भाषिक पुराव्यांचा परामर्श घेताना मायकेल विट्झेल म्हणतात : ‘वैदिक संस्कृत आणि अवेस्तन या दोन्ही भाषांचे एकमेकींशी असलेले घनिष्ठ साम्य आश्चर्यकारक नसले, तरी शेकडो किलोमीटर पश्चिमेला इ.स.पू. १४०० च्या सुमारास मितानी साम्राज्याच्या एका तहनाम्यात वैदिक देवांची नावे येतात. त्याच सुमारास हिटाईट भाषेतील एका ग्रंथात काही संस्कृतासारखी शब्दरूपे येतात. भाषाशास्त्रदृष्टय़ा वैदिक संस्कृतापेक्षा ती रूपे जास्त प्राचीन असल्यामुळे ऋग्वेदाचा रचनाकाल हा इ.स.पू. १४०० पेक्षा प्राचीन नसावा.’ याखेरीज ऋग्वेदातील भौगोलिक संदर्भामध्ये पंजाब आणि जवळचे उत्तरेकडील प्रदेश यांचाच भरणा प्रामुख्याने आहे. वैदिक आणि वेदोत्तर पाणिनीय संस्कृतातील अनेक शब्द मूळ द्रविडी, ऑस्ट्रो-एशियाटिक असून ते स्पष्टपणे भाषिक देवाणघेवाण दर्शवतात. तसेच संस्कृतातील शेतीविषयक आणि खास भारतीय प्राणी-वनस्पती दर्शविणाऱ्या शब्दसंपदेचे विश्लेषण केल्यास कैक शब्द मूळ इंडो-युरोपीय नाहीत, हे दिसून येते. मध्य आशियातील पुरातत्त्वीय उत्खनने, फिनो-उग्रिक भाषा यांचे दाखले देऊन विट्झेल असा तर्क मांडतात की, इंडो-इराणी भाषक समाजगट हे मध्य आशिया, दक्षिण रशिया आदी भागांतून भारतीय उपखंडात आले असावेत.

याशिवाय पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट होणारे चित्रही बरेच गुंतागुंतीचे आहे. याचा अन्वयार्थ कसा लावावा, याची एक उत्तम झलक जया मेनन दाखवून देतात. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीनंतर विकसित नागर सिंधू संस्कृती साधारणपणे इ.स.पू. २६०० ते इ.स.पू. १९०० या काळात दिसते. त्यानंतर या नागर संस्कृतीचा अज्ञात कारणांमुळे लय होऊन ग्रामीण वा अर्धनागर संस्कृतींचे प्राबल्य दिसते. पुढे इ.स.पू. १५०० पासून लोहयुगाची सुरुवात होते. असे असले तरी इ.स.पू. १९०० ते इ.स.पू. १००० या जवळपास हजारेक वर्षांच्या कालावधीतील सप्तसिंधूच्या खोऱ्यातील चित्र इतके एकसुरी नक्कीच नाही. या अफाट भूभागातील पुरातत्त्वीय पुराव्यांची व्यामिश्रता व संमिश्रता अधोरेखित करून मेनन आवर्जून सांगतात की, फक्त एकाच थाटाच्या पुराव्यावर लक्ष केंद्रित करू नये. सिंधूच्या खोऱ्यात नागर संस्कृतीचा लय होताना दिसतो हे खरेच; परंतु त्याच वेळेस गंगा खोऱ्यात मात्र तुलनेने छोटय़ा वसाहतींची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसते. सोबत आढळणारी खापरे वगैरे पाहिली, तर पेंटेड ग्रे वेअरसारखी नवीन, वैशिष्टय़पूर्ण खापरेही दिसतात व हडप्पापूर्वकालीन पद्धतीची खापरेही आढळतात. त्यामुळे हे स्थित्यंतर म्हणजे लय की स्थलांतर हे तपासले पाहिजे, असे मेनन आवर्जून सांगतात.

पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र यांसोबतच गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक कोडय़ांच्या उकलीसाठी जनुकशास्त्राचाही आधार घेतला जातो आहे. यात मुख्यत: उत्खननात सापडलेल्या सांगाडय़ांपासून डीएनए मिळवून त्याआधारे संबंधित जनुके बलवत्तर असलेला लोकसमूह त्या-त्या ठिकाणी किती वर्षांपूर्वी आला, याचे निर्णयन केले जाते. या शास्त्राचा आणि त्यासंबंधीच्या काही वादग्रस्त गोष्टींचा परिचय राझिब खान आणि काइ फ्रिस यांनी सुगमपणे करून दिलेला आहे. अर्थात, प्रस्थापित इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञांनी या नवीन शास्त्राचे सावधपणेच स्वागत केले आहे. मुळात भारतातील उष्ण व दमट हवामानात डीएनए टिकून राहण्याची शक्यता कमी असल्याने या प्रकारच्या विश्लेषणावर मर्यादा येतात. तरीही उदाहरणे आहेत : हरयाणातील राखीगढीमधील एका सांगाडय़ाचा डीएनए तपासला असता त्याचे दक्षिण भारतीयांशी जनुकीय साम्य जास्त आढळले. हिंदू सवर्णात आणि युरोप व इराणमध्ये बलवत्तर असलेल्या फ1ं1 या जनुकाचा त्यात पूर्ण अभाव होता. यावरून प्राचीन सिंधू संस्कृतीतील लोकांचे सद्य:कालीन बहुसंख्य भारतीयांशी जनुकीय साम्य अधिक दिसते. अर्थात, निव्वळ एका सांगाडय़ाच्या विश्लेषणावर आधारित इतके मोठे निष्कर्ष काढणे तर्कदुष्ट आहे.

पुरातत्त्वीय उत्खनने, लिखित व जनुकीय पुरावे यांची तर्कशुद्धपणे सांगड घातल्याशिवाय या प्रश्नाची उकल संभवत नाही. विशिष्ट ज्ञानशाखेऐवजी आंतरशाखीय साकल्य आणि सारासार विवेकावर भिस्त ठेवल्यास या क्षेत्रातील आकलनही पुढे जाईल व सामान्य वाचकही भूलथापांना बळी पडणार नाही, हे उपसंहारात थापर कळकळीने सुचवतात. आर्य असण्याबद्दलचे अनेक सिद्धांत, त्या सिद्धांतांची पाश्र्वभूमी, त्यांना समाजात मिळालेला प्रतिसाद व अभ्यासांतीचे अनेकपदरी निष्कर्ष या विस्तृत पटाचा घेतलेला आढावा हा या पुस्तकाचा गाभा आहे.

प्रत्येक ज्ञानशाखेतील गुंतागुंतीची एक किमान पातळी दर्शवूनही पुस्तक फारसे कुठे विद्वज्जड होत नाही, हे त्याचे मोठेच बलस्थान मानावे लागेल. आर्याच्या प्रश्नाबद्दल कोणताही एक निष्कर्ष काढण्यापेक्षा त्याबद्दल सखोल, तर्कशुद्ध विचार कसा करावा, याची कल्पना हे पुस्तक देते.

‘व्हिच ऑफ अस आर आर्यन्स? : रिथिंकिंग द कन्सेप्ट ऑफ अवर ओरिजिन्स’

लेखक : रोमिला थापर, मायकेल विट्झेल, जया मेनन, काइ फ्रिस, राझिब खान.

प्रकाशक : आलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली

पृष्ठे: २२४, किंमत : २४९ रुपये