सागर नाईक sagarnaik4511@gmail.com
‘नीलिंग’ – सामना सुरू होताना गुडघे टेकण्याची निषेधकृती- क्विंटन डिकॉकच्या बातम्यांमुळे हल्ली पुन्हा चर्चेत आली! पण अखेर काळ्या खेळाडूंची ती कृती आणि त्यांचा विद्रोह हा खेळासारख्या विधायक प्रकारातला असल्यानं तो उत्थानाकडे नेणारा ठरतो, हे सांगणारं पुस्तक..
‘‘व्हिव रिचर्ड्स म्हणजे नुसता महान बॅट्समनच नव्हे, तर असाधारण माणूसही होता. त्याच्या जगण्यात, श्वासात, काळ्या माणसांचा वारसा होता. आम्ही कुठून आलो, आम्हांला कुठे पोहोचायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथवरचा पल्ला कसा गाठायचा याचे सुस्पष्ट भान त्याला होते. त्याची चाल, त्याचे बेदरकारपणे च्युइंगगम चघळणे आणि हेल्मेट घालायची तसदी न घेणे, या सगळ्यातून एक शब्दही न उच्चारता कृष्णवर्णीयांच्या शक्तीबद्दल त्याला जे म्हणायचे ते व्यक्त होत असे.’’ हे निरीक्षण आहे रिचर्ड्ससह वेस्ट इंडीज् क्रिकेट संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मायकल होल्डिंग यांचं.
वेस्ट इंडियन क्रिकेटर्स फक्त खेळाडू नव्हेत तर वर्णभेदविरोधी चळवळीचं, आत्मसन्मानाचं प्रतीकही होते. कॅरेबियन बेटांवर आणल्या गेलेल्या काळ्या आफ्रिकी गुलामांच्या अवकाशातून रुजलेली जी ‘कॅलिप्सो सांस्कृतिक चळवळ’ उभी राहिली, त्यात संगीत आणि क्रिकेट यांना साम्राज्यवाद आणि वर्णभेदाच्या प्रतिकाराचं माध्यम म्हणून महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं होतं. जमैका, गयाना, बार्बाडोस अशा वेगवेगळ्या कॅरेबियन राष्ट्रांची ‘वेस्ट इंडीज’ अशी सांघिक ओळख निर्माण होण्यात कॅलिप्सो संस्कृतीचे मोठे योगदान राहिले आहे. सलग १५ वर्षे आपल्या ‘साम्राज्यवादी मालकांना’ त्यांच्याच खेळात पराभूत करणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी मायकेल होल्डिंग हे आज क्रिकेट समालोचक आहेत.
‘काळ्यांच्याही जगण्याला किंमत आहे’ हे सांगणारी ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ चळवळ अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर उभी राहिली. जगभरातल्या काळ्या खेळाडूंनी वंशवादी हिंसेला विरोध आणि चळवळीला समर्थन दर्शवण्यासाठी मैदानात एक गुडघा खाली टेकवण्याची महत्त्वाची कृती केली किंवा प्रत्यक्ष भूमिका घेतल्या. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड कसोटी सामन्याचे समालोचक मायकल होल्डिंग यांनी या दरम्यान वर्णभेदावर केलेल्या भाष्याला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेल्या काळ्या खेळाडूंसोबत संवाद साधून पुढे काही महिन्यांतच त्यांनी ‘व्हाय वुइ नील, हाऊ वुइ राइझ’ हे पुस्तक लिहून वंशवाद आणि वांशिक हिंसेचा इतिहास सांगून त्याविरोधात समाज म्हणून सर्वानी जागं होण्याची गरज अधोरेखित केली. या पुस्तकाच्या निमित्तानं वर्णभेदाविरोधात सार्वजनिक विचारवंताची भूमिका मायकल होल्डिंग पार पडताना दिसतात.
अमानवीकरण
पुस्तकाच्या पहिल्या भागात होल्डिंग काळ्यांच्या अमानवीकरणाच्या ऐतिहासिक प्रक्रियांचा आढावा घेतात. जॉर्ज फ्लॉइडची हत्या ही सुटी किंवा एकमेव घटना नसून तो कसा संस्थात्मक वर्णभेदाचा बळी आहे याची विस्तृत चर्चा पहिल्या भागात आलेली आहे. गेल्या काही वर्षांतल्या, अनेक काळी माणसं हकनाक बळी गेल्याच्या उदाहरणांची नोंदही ते देतात. होल्डिंग यांचा जन्म जमैका येथे झाल्याने वर्णभेदाची तितकीशी दाहकता त्यांच्या वाटय़ाला आली नाही; कारण जमैकाचे बहुसंख्य रहिवासी काळे आहेत. म्हणून चर्चेला व्यापक स्वरूप देण्यासाठी त्यांनी इतर खेळाडूंशी संवाद साधलेला दिसतो. पुस्तकातील या भागात इब्तिहाज मुहम्मद (तलवारबाजी) आणि नाओमी ओसाका (टेनिस) यांचे अनुभव खूप बोलके आहेत. या दोघीही आपापल्या क्षेत्रातील महान खेळाडू आहेत, त्यांनी वर्णभेदविरोधी चळवळीत प्रत्यक्ष सहभागसुद्धा नोंदविला. नाओमी ओसाका हिनं तर वर्णभेदावर सार्वजनिकरीत्या लोकचर्चा व्हावी या उद्देशानंच आंदोलनात सामील होण्याची भूमिका घेतली होती. अमेरिकेत काळ्यांना दुय्यम नागरिक म्हणून दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल नाओमी सविस्तर बोलते.
जणू खरंखुरं विज्ञान असल्याचा आव आणणारं छद्मविज्ञान, युरोपकेन्द्री ज्ञानरचना आणि तत्त्वज्ञान यांनी साम्राज्यवादाच्या छत्रछायेत काळ्यांना कनिष्ठ माणसांचा दर्जा कशा प्रकारे दिला याचा आढावा लेखक घेतात. माणसांचे ‘वंश’ असल्याची निराधार कल्पनेला तथ्य म्हणून प्रतिष्ठा कशी मिळाली याचाही लेखाजोखा ते देतात. याची परिणती माणसांचे श्रेष्ठ वंश आणि कनिष्ठ वंश अशा काल्पनिक स्तररचना आणि विभागणीत झाली. स्वातंत्र्याची मनीषा बाळगणारे गुलाम हे मानसिकदृष्टय़ा आजारी आहेत असे हास्यास्पद ‘शोध’ या साम्राज्यवादी छद्मविज्ञानाने लावले.
गौरवर्णीयांच्या ठायी असलेल्या ‘आकलनातील विसंगती’चं (कॉग्निटिव्ह डिसोनन्स) – म्हणजे आकलन आणि वास्तव यांच्यातील विसंवाद, की ज्यामुळे माणसाची वागणूकही तर्कविसंगत होते- स्पष्टीकरण लेखक देतात. काळ्यांच्या जीवनाला कनिष्ठ लेखण्यातूनच गुलामगिरीपासून वसाहतवाद ते जॉर्ज फ्लॉइडची हत्या इथपर्यंतच्या हिंसेचे ‘नैसर्गिकीकरण’ केले आहे. गुलामगिरीचा औपचारिक अंत झाल्यावरही काळ्यांचा वंशसंहार अबाधित ठेवणारे कायदे अलीकडच्या काळापर्यंत सुरू राहिले. काळे लोक हे ‘निकृष्ट वंश’ मानल्यामुळे त्यांना गोऱ्यांच्या तुलनेत कमी त्रास होतो अशा गैरसमजुतीतून त्यांचे शरीर वैद्यकीय प्रयोगांसाठी वापरले गेले. काळ्यांचे गुन्हेगारीकरण करून काळ्या कैद्याचे श्रम वापरून घेण्याचा तर कायदाच होता. समकालीन हिंसासुद्धा वर्णभेदाच्या या दीर्घकालीन प्रक्रियांचाच भाग असल्याचं लेखक अशा प्रकारे दाखवून देतात. वर्णभेद ही फक्त गौरवर्णीयांचीच समस्या नाही. श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भ्रामक जाणीव काळ्या लोकांमध्येही बऱ्याच काळपासून भिनवली गेली आहे असे लेखक जाणीवपूर्वक नमूद करतात.
‘काळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्टय़ा दुय्यम क्षमतेचे असतात,’ अशा समजातून त्यांच्या वेगळ्या शाळा सत्तरच्या दशकापर्यंत ब्रिटनमध्ये सुरू होत्या. एकविसाव्या शतकातही ‘विशिष्ट समूह हे जात्याच निकृष्ट असतात,’ असं मानणारे लोक अजूनही ब्रिटनमध्ये आहेत हे अभ्यासाअंती लक्षात आलं आहे. ‘वंशानुसार क्षमता’ ही गोष्ट अशास्त्रीय असली तरी काळ्यांच्या विपन्नावस्थेला आणि परिघाबाहेर ढकलल्या जाण्याला वर्णभेदाची रचना कशी कारणीभूत आहे याबद्दल पुस्तकात सविस्तर वाचायला मिळते.
इतिहासाचे धडे
विभिन्न समूहांच्या सहअस्तित्वाचा आदर करणारा समाज निर्माण करायचा असेल तर ‘इतिहासाचं निर्वसाहतीकरण’ व्हायला हवं असं लेखक म्हणतात. शालेय अध्यापनपद्धती आणि अभ्यासक्रम हे पूर्वग्रहदूषित आणि काळ्यांच्या योगदानाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणारे आहेत असे होल्डिंग अनेक उदाहरणांद्वारे दाखवून देतात. एकीकडे वसाहतवाद्यांचं मिथ्या गौरवीकरण आणि दुसरीकडे मानवी सभ्यतेला काळ्यांनी जे योगदान दिलं त्यावर ‘रंगसफेदी’ करणारं इतिहास लेखन झालेलं आहे. हे खोडून काढण्यासाठी काळ्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक योगदानाची विपुल चर्चा पुस्तकात आली आहे. यात प्रामुख्याने वैज्ञानिक क्षेत्र, आधुनिक संगीत, लष्करी क्षेत्र आणि क्रीडाक्षेत्रात ज्यांनी अभूतपूर्व काम केलं त्याबद्दल वाचकांना विस्तृतपणे वाचायला मिळतं. कॅलिप्सो परंपरेतल्या गाण्यांची प्रासंगिकता पुस्तकात अधूनमधून अधोरेखित होत राहते. वसाहतवाद आणि गुलामांची खरेदी-विक्री करणारे व्यापारी यांच्याकडे आजही अचिकित्सकपणे पाहिल्यामुळे आपण विद्यार्थ्यांसमोर कुठला आदर्श ठेवत आहोत, असा रास्त प्रश्न होल्डिंग विचारतात. इतिहासाकडे सम्यक दृष्टीनं पाहिल्यास आपण विद्यार्थ्यांसमोर मानवीय आदर्श ठेवू शकतो. वांशिक हिंसेच्या इतिहासासोबतच काळ्यांनी मानवी संस्कृतीला जे योगदान दिलं आहे तो इतिहास समोर आणला पाहिजे अशी भूमिका लेखक वारंवार मांडतात.
जगभरातल्या क्रीडा क्षेत्रानं दक्षिण आफ्रिकेतील वंशवादी-वर्णभेदी शासनाचा निषेध म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला होता; अशात याच राजवटीला अधिमान्यता मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटचे ‘रिबेल दौरे’ खेळवले गेले. या दौऱ्यांमध्ये सहभागी झालेले तत्कालीन खेळाडू हे आज जागतिक क्रिकेटच्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. आजवर कोणीही त्यांच्या गतकालीन चुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली नाही, अशा ढोंगीपणाला लेखक ‘गौरवर्णीय विशेषाधिकार’ म्हणतात. साउथ आफ्रिकेसाठी खेळताना मखाया एन्टीनी यांच्या वाटय़ाला आलेल्या एकाकीपणा आणि भेदभावाचे अनुभव वाचताना वर्णभेदानं सगळ्याच क्षेत्रांना पोखरलेलं आहे याची प्रचीती येते. यासारख्या अनेक भेदभावग्रस्त समकालीन घटना, घडामोडी आणि अनुभव पुस्तकात वाचायला मिळतात.
‘आपल्याकडे संधी आहे’
या पुस्तकासाठी होल्डिंग यांनी उसैन बोल्ट, नाओमी ओसाका, अॅडम गुड्स, जेफ हेरीएट, तियरी ऑन्री, मायकल जॉन्सन, इब्तीहाज मुहम्मद, मखाया एन्टीनी, आणि होप पॉवेल यांच्याशी संवाद साधलेला आहे. समान संधी मिळाली तर काळे लोक आपल्या क्षमतांचा सर्वोच्च विकास करू शकतात हे या खेळाडूंनी सिद्ध केलं आहे. आपापल्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केलेल्या या खेळाडूंना आलेले वर्णभेदाचे वैयक्तिक आणि सामाजिक अनुभव या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळतात. सामाजिक बदलासाठी भूमिका घेणं आणि वर्णभेद विरोधी सामाजिक साक्षरतेसाठी सतत प्रयत्न करत राहणं हे अत्यावश्यक झाल्याचे खेळाडूंच्या अनुभवातून निदर्शनास येतं. होप पॉवेल आणि कॉलीन केपर्निकसारख्या खेळाडूंना त्यांच्या वर्णभेद- विरोधी भूमिकांमुळे प्रसंगी आपलं करिअर सोडावं लागलं; अशातही त्यांनी भूमिका ठामच ठेवल्या.
सगळ्या चर्चकांमध्ये अॅडम गुड्स हे ऑस्ट्रेलियन ‘रूल्स फुटबॉल’ खेळाडू विशेष लक्ष वेधून घेतात; कारण ऑस्ट्रेलियामधील मूळ रहिवासी लोकांचा गतकालीन वंशसंहार आणि समकालीन भेदाभेद याचा संक्षिप्त इतिहास त्यानिमित्तानं वाचायला मिळतो. या सगळ्याच खेळाडूंनी आपल्या लोकप्रियतेचा अवकाश लोकशिक्षणासाठी वापरला आहे. आपल्या लिहिण्याचं काहीतरी चीज होईल, सामान्य वाचकांपर्यंत वांशिक हिंसा, संस्थात्मक वर्णभेद आणि काळ्यांचा इतिहास पोहचल्यावर लोक विचार करू लागतील, हा लेखकाचा आशावाद पुस्तकाच्या प्रत्येक पानात जाणवतो.
‘शिक्षणात सर्व काही अंतर्बा बदलून टाकण्याची क्षमता असल्याबद्दल सर्वच खेळाडूंचं एकमत आहे. आपला इतिहास आणि वर्तमान यांचं निर्वसाहतीकरण करण्यातूनच आपण मैत्रीपूर्ण आणि प्रेममय समाज निर्माण करू शकतो’ असे निष्कर्ष शेवटी होल्डिंग काढतात. शिक्षणाच्या निमित्तानं अधिकाधिक मानवीयतेकडे जाण्याची संधी आपल्याकडे आहे. पुस्तकाच्या शेवटी माया अॅन्जेलू यांची ‘तरीही मी उभारी घेते’ ही समर्पक कविता दिलेली आहे, त्यातली एक ओळ ‘ लीव्हिंग बिहाइन्ड नाइट्स ऑफ टेरर अॅण्ड फीअर, आय राइज’- ‘दहशत आणि भीतीची रात्र मागं टाकून, मी उभारी घेते’ ही जणू लेखकाच्या आदर्शलोकाच्या स्वप्नाची अभिव्यक्ती आहे. म्हणूनच पुस्तकातील ऐतिहासिक प्रवासाचं मर्म उभारी घेण्याबद्दल आहे !
‘व्हाय वुइ नील, हाऊ वुइ राइझ ’
लेखक : मायकल होल्डिंग
प्रकाशक : सायमन अॅण्ड शूस्टर
पृष्ठे : ३२०, किंमत : ६९९ रु.
मायकल होल्डिंग : क्रिकेटपटू आणि लेखकही!
लेखक पुणे विद्यापीठात अध्ययन करतात व बास्केटबॉल खेळाडू आहेत.