मोदीमय निवडणुकीचे विश्लेषण दोन वर्षांनीही महत्त्वाचे का, याची उत्तरे या पुस्तकातच आहे. निवडणुकीतील यशासाठी कोणती तंत्रे मोदींनी वापरली, याचे विवेचन आजही महत्त्वाचे आहेच..
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर आता सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन सुरू झाले आहे. मात्र २०१४च्या निवडणुकीत मोदींनी मिळवलेल्या बहुमताचे विश्लेषण अजूनही संपलेले नाही. मोदींनी एकहाती कसा विजय मिळवला, त्याची कारणे, त्यासाठी अनुकूल ठरलेले घटक या सगळ्यात मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू ‘विनिंग द मॅण्डेट- द इंडियन एक्सपिरियन्स’ या पुस्तकातून विद्युत चक्रवर्ती आणि सुगत हाजरा यांनी उलगडले आहेत. तटस्थ पद्धतीने २०१४च्या मोदीमय निवडणुकीचे विश्लेषण त्यांनी केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीप्रमाणे मोदींनी पक्षाच्या पेक्षा स्वत:च्या नावावर मते मिळवली. विशेषत: त्यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपमधील बेदिली व दुसऱ्या फळीतील नेत्यांमधील संघर्ष या पाश्र्वभूमीवर मोदींच्या नेतृत्वाने चैतन्य आले. काँग्रेसला पराभूत करता येऊ शकते असा विश्वास मोदींनी दिला. एप्रिल २०१३ पूर्वी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब व्हायचे होते. मात्र मोदींनी, गुजरातमध्ये २०१२ मध्ये विजय मिळवल्यावर लगोलगच दिल्लीच्या दिशेने कूच केले होते. मात्र गुजरातमधील दंगली व त्यानंतरचे वातावरण पाहता प्रसारमाध्यमे मोदींच्या विरोधात होती. हे ध्यानात घेऊन समाजमाध्यमांचा मोदींनी अतिशय चतुराईने वापर करत विरोधकांना निष्प्रभ केले. तसेच वक्तृत्व मोदींसाठी फायदेशीर ठरले. त्याचा उपयोग करत संवाद साधून नेतृत्व भक्कम केले.
सर्वेक्षणाचे महत्त्व
सध्या कुठलीही निवडणूक असो ती खर्चीकच आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यापूर्वी राजकीय पक्ष, उमेदवारांचे सर्वेक्षण करतात. ते कसे चालते, त्यात कशी यंत्रणा काम करते, मतदारांवर प्रभाव टाकणारे घटक कोणते, या साऱ्याची पुस्तकात तपशीलवार माहिती आहे. निवडणूक म्हणजे केवळ प्रचार, सभा आणि मतदान इतकेच नसून त्यासाठीचे नियोजन, माध्यमांचा वापर, सभांची आखणी, भौगोलिक आणि राजकीय स्थितीनुसार बोलण्याचे विषय कसे ठरवायचे यासाठी एक चमू काम करतो. मोदी किंवा बिहारमध्ये नितीशकुमारांचे यश इतकेच काय दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांच्या यशातही पडद्यामागे काम करणाऱ्या नियोजनकारांचा महत्त्वाचा वाटा होता. याखेरीज भविष्यात निवडणुका लढवताना विकासकामांबरोबच समाजमाध्यमांमधील पक्षाची, संबंधित नेत्याची उपस्थिती, मतदारांचा विकास योजनांमधील सहभाग महत्त्वाचा असल्याचे विश्लेषण या निमित्ताने लेखकाने केले आहे. त्यामुळे भावी उमेदवार व त्यांचे रणनीतीकार त्यांच्यासाठी हे शिकण्यासारखे आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना आजपर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आढावा लेखकांनी घेतला आहे. अगदी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वातावरण कसे होते. त्या वेळी पंडित नेहरूंचे नेतृत्व, त्यांच्या पुढे देशात लोकशाही रुजवण्याचे असलेले आव्हान, तसेच काँग्रेस पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचे त्यांचे प्रयत्न. पंडित नेहरूंप्रमाणेच त्यांची कन्या इंदिरा गांधी यांचा काँग्रेसवर कसा पगडा होता याचे दाखले दिले आहेत. आणीबाणी, प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलातून सरकारविरोधी रोष, त्याचा मोदींना मिळालेला फायदा. या घडामोडी राज्यशास्त्राचे अभ्यासक या नात्याने लेखकांनी टिपल्या आहेत. मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून नियोजनबद्धपणे पंतप्रधानपदापर्यंत वाटचाल केली; त्यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागली. अर्थात यात मोदींचे जसे चाहते आहेत तितकेच द्वेष करणारेही होते. तरीही गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा प्रचार करत ‘देशाला अच्छे दिन’चे स्वप्न मोदींनी दाखवले. त्याला त्यांच्या वक्तृत्वाची जोड मिळाली. देशभर झंझावाती प्रचारदौरे केले. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, माध्यमांनाही मोदींना दुर्लक्षित करणे कठीण होऊ लागले.
मोदींना माध्यमांचा वापर कसा करायचा याची उत्तम जाण होती. त्याचा नमुना म्हणजे लोकसभा निवडणुकीत चार टप्प्यांतील मतदान झाल्यावर मोदींनी प्रचारादरम्यान पहिली मुलाखत दिली त्यासाठी निवडली ‘एएनआय’ ही वृत्तसंस्था. म्हणजे ही मुलाखत कुणाही एकाच वृत्तवाहिनीची न होता सर्व ठिकाणी जाईल याची काळजी घेतली. त्याला प्रचारातील विविध कल्पनांची जोड मिळाली. यात ‘चाय पे चर्चा’ किंवा एकाच वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक ठिकाणी सभांचे प्रक्षेपण. तसेच शेवटच्या काही टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील जातीय समीकरणे ध्यानात घेता स्वत:चा जातीचा उल्लेख करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांचा उपहास करण्याचे तंत्र मोदींनी कसे वापरले, याचे बारकावे लेखकांनी टिपले आहेत. उदा ‘माँ-बेटेका सरकार’ असे म्हणत राहुल गांधी व सोनिया यांच्यावर टीका करायचे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अशाच पद्धतीने टीकेची झोड असायची. त्यातून मी पंतप्रधानपदासाठी कसा योग्य आहे हे ठसवले. आपल्याकडे भावनिक मुद्दय़ावर मतदान करणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे लहाणपणी परिस्थितीमुळे रेल्वेत चहा कसा विकावा लागला याच्या कहाण्या सांगितल्या. पुन्हा चहावाला पंतप्रधान होणे विरोधकांना सहन होत नाही, असे सांगत गरिबीशी जोडण्याचाही प्रयत्न केला. याचा परिणाम सकारात्मक झाला. त्या तुलनेत काँग्रेसची प्रचारमोहीम विशेष प्रभावी नव्हती. त्याला कारणीभूत दहा वर्षांमध्ये निर्माण झालेली सत्ताविरोधी लाट, सरकारवरचे आरोप व नेतृत्वाची पोकळी.
पुस्तकात केवळ मोदींचे कौतुक किंवा त्यांच्या प्रचाराचा हेतू नाही. मोदी गुजरातमध्ये असताना त्यांचा केशुभाई पटेल किंवा संजय जोशी यांच्याशी झालेला संघर्ष, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मोदींना गुजरातमध्ये आणण्याची अपरिहार्यता याचे बारीकसारीक तपशील आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतभाजप फार तर दोनशेपर्यंत मजल मारेल, असे भाकीत वर्तवले जात होते. मोदींची जादू फार चाललीच तर सव्वादोनशे. मात्र निकालांनी धक्का दिला. मोदींनी उत्तर प्रदेशची जबाबदारी विश्वासू अमित शहा यांच्याकडे सोपवली. त्या राज्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल यांच्या दोन जागा व समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबीयांच्या उर्वरित पाच जागा वगळता ८० पैकी ७३ जागा जिंकणे हा भाजपचा विक्रम ठरला. अशातच मोदी वाराणसीतून लढले. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनाही अर्ज दाखल करताना गंगा आरतीसारख्या प्रतीकाचा वापर करावा लागला, अशा लहानसहान गोष्टी लेखकांनी नमूद केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अकाली दल, शिवसेना हे जुने मित्र सोडले तर भाजपबरोबर जाण्यास कोणी तयार नव्हते. संयुक्त जनता दल हा मोदींकडे नेतृत्व आल्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडलेला मित्र वगळता भाजपला नवे मित्र मिळाले. हे मोदींच्या प्रचारातून झाले. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मोट बांधली. तामिळनाडूत तर दोन आकडी संख्येत छोटय़ा पक्षांची आघाडी होती. ईशान्येकडील राज्यांमध्येही मित्रपक्ष मिळाले. निवडणुकीत भाजपला ३१ टक्के व ‘रालोआ’तील अन्य पक्षांना एकंदर सात टक्क्यांच्या आसपास मते मिळवली. खर्चाच्या दृष्टीने या निवडणुकीत उच्चांक झाले. सर्व राष्ट्रीय पक्षांनी १३०८ कोटी रुपये खर्च केले. त्यात भाजपचाच वाटा ५४ टक्के होता. केवळ मोदींच्या सभांवर ८९ कोटी खर्च केले. या निवडणुकीने प्रचारसभा व मेळावे या पारंपरिक मार्गाच्या पलीकडे समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, हे सिद्ध केले. इथून पुढे तर वाढते शहरीकरण पाहता याचा वापर अधिकाधिक होणार असल्याने राजकीय पक्षांना व्यूहरचना बदलावी लागत आहे.
भाजपविरोधक एकवटले
लोकसभा निवडणुकीतून पुढे आलेली गोष्ट म्हणजे प्रादेशिक पक्ष पूर्वी काँग्रेसविरोध या मुद्दय़ावर एकत्र येत. आता ती जागा भाजपने घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या महाआघाडीने भाजपप्रणीत आघाडीचा दणदणीत पराभव केला. लालूप्रसाद-नितीशकुमार यांच्यासारखे एकमेकांचे विरोधकही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात एकत्र आले. दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपला धूळ चारली. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या आघाडीला पराभूत करत पुन्हा सत्ता मिळवली. त्यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा (भाजपविरोधी) आघाडीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे २०१४च्या लोकसभेतील जनादेशाचे अर्थ अनेक आहेत. त्याचे विश्लेषण सुरूच आहे, राजकीय पक्ष व निवडणूक विश्लेषकांना त्यातून नवे तंत्र शिकायला मिळाले हाच याचा मथितार्थ असल्याचा बोध पुस्तकातून होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा