दिवस स्वातंत्र्यदिनाच्या उत्साही वातावरणाचे आहेत; पण त्या दिवसानंतर अवघ्या पाच दिवसांनी विवेकाचा आवाज दाबण्यासाठी तीन वर्षांपूर्वी एक हत्या झाली होती आणि अशा आणखी हत्या हाही आपला इतिहास आहे. अशा वेळी, आपापल्या पातळीवरला स्वातंत्र्यलढा अभिव्यक्तीचाच असतो, हे सांगणारे पुस्तक..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यक्त होण्याची ऊर्मी ही आपल्यात- मनुष्यप्राण्यात असतेच, तशीच ती व्यक्तींच्या समाजप्रियतेतून तयार झालेल्या संस्था, चळवळी, पक्ष यांच्यातही असते. ही ऊर्मी या सर्वाच्या जिवंतपणाची खूणच. पण हे असे वाटण्याच्या पुढे एक थांबा आहे. तो म्हणजे, व्यक्त होण्याच्या ऊर्मीला मूर्तरूप देण्याचा. अनेकांचा प्रवास या थांब्यावरच आटोपतो. इथपर्यंत कोणाचेही काही म्हणणे नसते. पण काही जण हा थांबा पार करून आपल्यातील ‘अभिव्यक्तीच्या ऊमरला शब्द/ दृश्य रूप देतात. त्यानंतर मात्र गडबड होते. कारण या निर्मातीकडे तिचे वाचक/ प्रेक्षक त्यांच्यावर झालेले विशिष्ट संकेतांचे संस्कार घेऊनच पाहात असतात. नवनिर्मितीकडे खुलेपणाने पाहण्याच्या कामी संस्कार हे मर्यादा ठरतात. या मर्यादांतून येणारा न्यूनगंड टाळण्यासाठी ‘अस्मिते’चा आधारही मग शोधला जातो. अशा प्रकारे अस्मितावाद जपणं म्हणजे ‘आम्ही बदलणार नाहीच’ असं म्हणणं. या स्थिती-वादी अस्मितांची एकजूट होते, एकजुटीची झुंड व्हायलाही वेळ लागत नाही आणि हे एकदा झालं की मग नाटकं-चित्रपट बंद पाडले जातात, पुस्तकांवर बंदी येते, चित्रप्रदर्शनांतली चित्रं पडद्याखाली झाकली जातात.. इतकंच नव्हे तर मतभेदाला थेट ‘देशद्रोह’ म्हणण्यापर्यंत मजल जाते. या सर्व प्रकारांत ज्यांनी विधायक आणि विवेकी दिशा देण्याचे काम करणे अपेक्षित असते, ते मात्र ‘गप्प’ राहतात. भवतालात माजलेल्या कोलाहलापेक्षाही ही ‘बीभत्स शांतता’ मग जाचक ठरू लागते. अशा वेळी या शांततेतले उद्गार समाजासमोर आणून, खुल्या अभिव्यक्तीचे मूल्य पुन्हा रुजवावे लागते. मल्याळम् कवी-समीक्षक के. सत्चिदानंदन यांनी संपादित केलेले ‘वर्ड्स मॅटर – रायटिंग अगेन्स्ट सायलेन्स’ हे पुस्तकही तेच मूल्य पुन्हा रुजवू पाहात आहे..

सत्चिदानंदन यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच या पुस्तकाच्या जन्माची व त्याच्या उद्देशाची ठोस कल्पना ते मांडतात. देशभरात सन २०१५ पासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा होत चाललेला संकोच आणि त्याबाबतीत ज्यांना जबाबदार धरावे अशांचे (जाणीवपूर्वक?) मौन अशा पाश्र्वभूमीवर हे पुस्तक आले आहे. हे मौन सुटण्यासाठी जे विवेकी आवाज उच्चारले गेले त्यांची संहिता होणे आवश्यकच होते. ‘वर्ड्स मॅटर’ने तशी संहिता दिली आहे. संवैधानिक मूल्यांची चाड एकीकडे दुर्लभ होत असताना त्या मूल्यांसाठीच (दुर्मीळ अशा) निर्भीडपणाने पुढे आलेल्या देशभरच्या लेखक, प्राध्यापक, पत्रकार आणि विचारवंतांचे लेखन यात वाचायला मिळते.

कलबुर्गीची अभ्यासपद्धती

पुस्तकाचे एकूण तीन विभाग आहेत. ‘फेअरवेल टु रीझन’ या शीर्षकाच्या पहिल्या विभागात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व कर्नाटकातील अभ्यासक-विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या वैचारिक कार्याची ओळख करून देणारे लेख आणि प्रत्यक्ष या तिघांच्या लेखनातील काही उताऱ्यांचा (इंग्रजी अनुवादरूपात) समावेश आहे. या तीनही विचारवंतांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांची ओळख करून देणाऱ्या लेखांत झालेच आहे. त्यांचे कार्यक्षेत्र परस्परांहून भिन्न असले तरी, त्यांच्या लिखाणात एक समान धागा जाणवेल, तो म्हणजे श्रद्धेची चिकित्सा. अशी चिकित्सा या तिघांनी केलीच; परंतु श्रद्धेला विवेकाची जोड देण्याचा आग्रह देखील त्यांनी आयुष्यभर धरला. यापैकी डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या लेखनाशी मराठी वाचक परिचित आहेत. परंतु, कलबुर्गीच्या विचारांचा परिचय महाराष्ट्रात फारच त्रोटक, अगदी विद्यापीठीय वर्तुळातही फारसा नव्हता. कन्नड कवी विक्रम विसाजी यांच्या ‘एम. एम. कलबुर्गी : द टायरलेस स्कॉलर अँड फिअरलेस क्रिटिक’ या लेखातून कलबुर्गीच्या विचारांची ओळख होते. याच लेखाच्या पुढे कलबुर्गीच्या साहित्यातील निवडक उतारे दिले आहेत. लिंगायत पंथाचे मूल्यमापन करणारे त्यांचे हे लेखन जितके माहितीपूर्ण तितकेच परखड असे आहे. लिंगायत चळवळीत आताच्या काळात शिरलेल्या अपप्रवृत्तींवर हे लेखन नेमके बोट ठेवते. ते वाचल्यावर आपल्याकडील वारकरी संप्रदायासारख्या निखळ आध्यात्मिक म्हणवल्या जाणाऱ्या संप्रदायांमध्ये ‘काळानुसार झालेल्या बदलां’चीही चाचपणी करणे आवश्यक वाटू लागेल, इतके कलबुर्गीची अभ्यासपद्धती प्रेरक आहे. यातच पुढे बसवेश्वराच्या जीवनावर आधारित ‘फॉल ऑफ कल्याणा’ या नाटकातील काही भागही वाचायला मिळतो.

पुस्तकाच्या ‘डायग्नोसिंग द मॅलडी’ या दुसऱ्या विभागात दहा लेख आहेत. यात ए. आर. व्यंकटचलपती, अनन्या वाजपेयी, गीता हरिहरन, गोपाळ गुरु, मानश भट्टाचारजी, मीरा नंदा, पंकज मिश्रा, राम पुनियानी, सलील त्रिपाठी व रोमिला थापर यांचा समावेश आहे. यापैकी अनन्या वाजपेयी यांचा ‘हिंद स्वराज व्हर्सेस हिंदू राष्ट्र’ हा लेख भारतातील डाव्या-उदारमतवादी विचारांची पीछेहाट व त्याच सुमारास भारतीय जनता पक्षाच्या भरारीची कारणमीमांसा करणारा आहे. या अनुषंगाने लेखिकेने ‘हिंदुत्व’ आणि हिंदू तत्त्वज्ञान यांचाही विचार केला आहे.  विविधता मान्य करण्याची हिंदू तत्त्वज्ञानातील लवचिकता आणि सहिष्णुता यांनाच आजचे राजकीय रंगांचे ‘हिंदुत्त्व’ नख लावत असल्याचे अनन्या वाजपेयी यांनी साधार मांडले आहे.

ज्या अस्वस्थ काळाच्या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक आले आहे, त्या काळाची रोजनिशीच गीता हरिहरन यांच्या ‘अ‍ॅन इनकम्प्लीट डायरी- फ्रॅग्मेंटस ऑफ अ‍ॅन ऑफ सीज’ (वेढय़ातल्या वर्षांच्या तुकडय़ांची अपूर्ण रोजनिशी) या लेखातून समोर येते. यात पेरुमल मुरुगन यांनी जाहीर केलेल्या त्यांच्यातील ‘लेखकाच्या मृत्यू’पासून ते दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांचे संदर्भ किंवा त्याहीपुढे लेखक-कलावंतांकडून पुरस्कार परत देण्याची लाट आणि त्याची झालेली ‘पुरस्कार वापसी’ अशी संभावना, गोवंशहत्याबंदी आदी अनेक घटनांचा उल्लेख येतो. उण्यापुऱ्या वर्षभराच्या काळात इतक्या नकारात्मक घटनांची मालिकाच तयार होते, ही बाब थिजवणारीच असल्याचे लेखिकेचे म्हणणे आहे.

निवडकपणाआरोपाचा समाचार

तरीही, अशा साऱ्या घटनांच्या निषेधाचे आवाजही त्या-त्या वेळी उमटलेच आणि आजही उमटत आहेत. पण अशा प्रकारच्या निषेधाच्या सुरांवर ‘निवडकपणा’चा शिक्का मारून ते निकालात काढले जातात.. हे असे का होते, याची प्रा. गोपाळ गुरु यांनी ‘फॉर दलित हिस्टरी इज नॉट पास्ट बट प्रेझेंट’ या लेखातून कारणमीमांसा केली आहे. त्यांचे म्हणणे असे की, निषेध करणारे व त्यांचे विरोधक यांची चर्चा ही इतिहास, सामाजिक शोकात्मिका आणि असहिष्णुता यांच्याभोवतीच फिरत राहते.

वैचारिक स्वातंत्र्यावर येणाऱ्या मर्यादांचा, सरकारी पुरस्कार परत करून निषेध करणारे असोत किंवा काश्मिरी पंडितांना कराव्या लागणाऱ्या स्थलांतराचा निषेध करणारे असतो. सर्वाची चर्चा याच मुद्दय़ांभोवती घोटाळताना दिसते. दादरीत घडलेल्या घटनेचा निषेध करणाऱ्यांना, तुम्ही काश्मिरी पंडितांना कराव्या लागत असलेल्या स्थलांतराचा का निषेध करत नाही, असा प्रतिप्रश्न विचारला जातो. त्यातूनच ‘निषेधाच्या निवडकपणा’चा शिक्का मारला जातो. प्रा. गुरु म्हणतात की, येथे या दोन्ही घटना निसंशय सामाजिक शोकात्मिका आहेत. आणि अशा वेगवेगळय़ा शोकात्मिका एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात. परंतु निषेधाच्या आवाजांवर निवडकपणाचा आरोप करणारे या शोकात्मिकांचाही प्राधान्यक्रम/ उतरंड मांडू लागतात.. अशी उतरंड मांडणाऱ्यांच्या हाती जेव्हा सत्ता येते तेव्हा मात्र मोठीच गफलत होऊन बसते.

ही गफलत कोणती, हे मानश भट्टाचारजी यांच्या ‘द फोर्स ऑफ डिसेंट’ या लेखात त्यांनी नेमके दाखविले आहे. निषेधाचे आणि मतभेदांचे आवाज हे सत्तेसाठी- मग ती डावी असो वा उजवी- नेहमीच त्रासदायक ठरतात. अशा वेळी मतभेद व्यक्त करणारे ‘शत्रू’ ठरू लागतात. त्यातूनच पुढे ‘शत्रू-मित्र’ हे राजकारण उभे राहाते. अशा राजकारणावर डाव्या वा उजव्या, दोन्ही विचारसरणींचे एकमत झाल्याचे निरीक्षणही भट्टाचारजी नोंदवतात. हे असे राजकारण करणारे मग सत्तेचा वापर करून मतभेदांना दाबू पाहतात. अशा वेळी निषेध व्यक्त करू पाहणाऱ्यांनी काय करावे? याचेही उत्तर या लेखात आहे. ते म्हणजे- निषेध व्यक्त करावा; कारण ‘ज्यांच्याकडे सत्ता नसते, त्यांच्यासाठी मतभेद हीच सत्ता असते’ , हे चेक  विचारवंत व राजकीय नेते वाक्लाव हावेल यांचे मत. त्याची आठवण भट्टाचारजी करून देतात.

याच भागात पुढे रोमिला थापर यांनी ‘धर्मनिरपेक्षता’ या मूल्याची भारतीय संदर्भात केलेली चिकित्सा ‘इंडियन सोसायटी अँड द सेक्युलर’ या लेखात वाचायला मिळते. तर सलील त्रिपाठी यांनी सहिष्णुतेबाबत ‘इन सर्च ऑफ टॉलरन्स’ या लेखात आढावा घेतला आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात देशभर झालेल्या वादंगात ‘धर्मनिरपेक्षता’ व ‘सहिष्णुता’ हे दोन मुद्दे परवलीचे बनले होते. त्या दृष्टीने या दोन्ही शब्दांचे, त्यामागच्या संकल्पनांच्या भारतीय अर्थाचे व्यावहारिक मूल्य तपासण्याचे काम या दोन्ही लेखांतून घडले आहे.

पुस्तकाचा तिसरा आणि शेवटचा भाग ‘बेअरिंग विटनेस’ या शीर्षकाचा असू त्यात वेगवेगळय़ा घटनांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांतून किंवा अ-नियतकालिकांतून करण्यात आलेली भाष्ये वाचायला मिळतात. अमृत लाल, अनीश अहलुवालिया, केकी दारुवाला, मरकडेय काटजू, माया कृष्ण राव, मीना कंदासामी, नयनतारा सहगल व श्याम सरन यांचे लेख यात आहेत. या लेखांना, वाल्मिकी रामायणावर भाष्य करणाऱ्या एम. एम. बशीर यांना त्यांचे लिखाण थांबवावे लागणे, सिद्धार्थ करवाल या चित्रकाराला त्याची कलाकृती मागे घ्यायला लागणे , यांसारख्या अनेक घटनांचे संदर्भ आसेत. हे संदर्भ वाचताना अभिव्यक्तीचा होत असलेला संकोच नक्कीच जाणवणारा आहे.

‘आधीच्या सत्ताधाऱ्यांच्याही काळातच हेच होत होते, तेव्हा तुम्ही गप्प होतात’ असा आरोप मोठय़ा आवाजात करणे..  बुद्धिवादी, बुद्धिजीवी, पत्रकार, पुरोगामी यांना शिव्यांचे रूप देऊन (उदा.- प्रेस्टिटय़ूट) किंवा शिव्यांप्रमाणेच हे शब्द वापरणे..  ‘लोक आमच्याच बाजूने आहेत’ अशी भलामण करीत  विचारांऐवजी बहुसंख्यावादाचा मुद्दा पुढे काढणे..  किंवा विचार पटले नाहीत म्हणून चारित्र्यावर आरोप करणे, विचार पटले नाहीत म्हणून (आमीर खानसारख्यांची) कंत्राटे रद्द करविणे आणि त्यावर मंत्र्यांनी आनंद व्यक्त करणे, आदी मार्गानी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचे गेल्या दोन वर्षांत दिसले आहे.

अर्थात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही मुस्कटदाबी या पुस्तकातील लेख जेव्हा लिहिले गेले तेव्हाही होत होती आणि त्यानंतरही होत आहेच. त्यामुळे विवेकाचे आवाज उमटत राहणे आवश्यक ठरते. या पुस्तकातील सारे लेख हे त्या आवाजाचेच काही अंश आहेत. किमान हे आवाज ऐकण्यासाठी तरी हे पुस्तक वाचावेच असे आहे.. विशेषत आपल्याकडील विद्यापीठीय विद्वानांनी! कारण अवतरणांचेच उत्सव साजरे करण्याच्या या काळात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा कुठेतरी तळटीपेसारखी असायला नको, यासाठी.

  • वर्ड्स मॅटर- रायटिंग्ज अगेन्स्ट सायलेन्स
  • संपादन : के. सत्चिदानंदन
  • प्रकाशक : पेंग्विन बुक्स लि.
  • पृष्ठे : २७२ (पुठ्ठाबांधणी), किंमत : २७९ रुपये.

 

– प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com

 

 

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Words matter writings against silence