सुपरस्टार अभिनेत्यालाही लाजवील असे वैभवी वलय जपानमध्ये हारुकी मुराकामी यांना लाभले आहे. किंबहुना, लेखकांच्या कळपसंस्कृतीपासून फटकून राहूनही मुराकामी यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत कधीही मंदावलेला नाही. जागतिक साहित्यात गॅब्रियल गार्सिया माक्र्वेझ, मिलान कुंदेरा, जुझे सॅरामागो यांच्या तोडीचा साहित्यिक म्हणून मुराकामींकडे पाहिले जाते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि निस्सीम वाचकभक्त मिळविणाऱ्या लेखकांकडून आपण वर्षांनुवर्षे लिखाणाचा कसा रियाज करत असतो, हे कायमच सांगितले जाते. मुराकामी मात्र याला अपवाद आहेत. आपले लेखक बनणे, हे रियाजापेक्षा अंतप्रेरणेशी जास्त संबंधित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निदान, विविध मुलाखतींमधून तरी ते असा दावा करीत असतात. बेसबॉलची मॅच पाहत असताना त्यांना आपण लिहू शकतो याचा साक्षात्कार झाला, असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. अर्थात आपल्याला त्याचा पडताळा घेण्याच्या भानगडीत पडावयाचे नसले, तरी मुराकामी यांचा जीवनप्रवास सर्वसाधारण लेखकांचा असतो त्याप्रमाणे झालेला नाही. जाझ संगीताच्या श्रवणानंदात रममाण होणारे मुराकामी चरितार्थासाठी पब चालवायचे. किशोरवयीन काळात ज्या कोबे शहरात ते राहायचे, त्या बहुसांस्कृतिक शहराने त्यांच्यावर लेखक म्हणून प्राथमिक संस्कार केले आहेत. कोबे हे बंदराचे शहर. पाश्चात्यांच्या प्रभावाने त्याचा बाज इतर जपानी शहरांच्या तुलनेत जास्त मोकळेपणाकडे झुकणारा. बंदरात बोटी लागल्यानंतर मौजमजेसाठी कोबेमध्ये फिरणाऱ्या अमेरिकन खलाशांमुळे मुराकामी यांच्यावर संगीतापासून पुस्तकांपर्यंत पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या लेखकीय कारकिर्दीची मुळे आपण त्या संस्कृतीत शोधू शकतो. जपानी संस्कृतीचा वारसा त्यांनी नाकारलेला नसला, तर आपल्या साहित्यिक भरण-पोषणाचे काम पाश्चात्त्य लेखकांनी केल्याचा त्यांचे ठाम मत आहे. मुराकामी यांच्या लेखनप्रवासाबद्दल सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे त्यांनी किशोरावस्थेत वाचलेल्या पुस्तकांची प्रसिद्ध झालेली यादी.
जपानच्या कोबे शिम्बुन या वृत्तपत्राने हारुकी यांनी शाळकरी वयात वाचलेल्या फ्रेंच पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात फ्रेंच पत्रकार जोसेफ केसेल यांच्या ‘बेले द यूर’ या शृंगारवर्णनांनी पुरेपूर भरलेल्या कादंबरीचाही समावेश आहे. त्यामुळे जपानमध्ये वैचारिक वादळ उठले आहे. अर्थात हे वादळ मुराकामी यांनी शृंगाररसाची भरमार असलेली पुस्तके का वाचली असावीत, याबद्दल नसून त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी कशाकरिता प्रसिद्ध केली, याबद्दल आहे. अशा प्रकारे यादी प्रसिद्ध करणे, हा संबंधितांच्या खासगी आयुष्याचा भंग असल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. परंतु, ती छापणाऱ्या वृत्तपत्राच्या संपादकांनी मात्र आपल्यावरील आक्षेप नाकारले आहेत.
मुराकामी यांच्यासारख्या उच्च दर्जाच्या लेखकाने कुठल्या साहित्यकृतींचा अभ्यास केलेला आहे, हे साहित्यरसिकांना समजणे आवश्यक असल्याच्या जनहितैषी भावनेतून आपण ही यादी छापल्याचे या संपादक महाशयांचे म्हणणे आहे; परंतु ते दावा करीत असलेल्या उदात्त भावनेतून यादी छापण्यास हरकत नसली, तरी त्यासाठी संबंधिताची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यालाच वृत्तपत्रीय नैतिकता असे म्हणतात. ती काही या संपादकांनी पाळलेली दिसत नाही. आपल्या या कृतीमुळे सव्यसाची प्रतिभा लाभलेल्या लेखकाच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण झाल्याचेही त्यांना मान्य नाही. लहानपणीच बघा कशी चावट पुस्तकं वाचली, अशा मध्यमवर्गीय विचारांचे शिंतोडेदेखील त्यांच्यावर उडवले गेले असतील. पण, मुराकामी यांना त्याने फरक पडावयाचे कारण नसावे. अगदी बालपणापासूनच त्यांच्या अथांग जिज्ञासेला जपान नावाचे बेट अपुरे पडू लागले होते.
आपल्याकडील मराठी लेखकांनीदेखील त्यांच्या बालपणी केवळ ‘श्यामच्या आई’च्या संस्कारांनी आपली साहित्यिक शिदोरी भरलेली नाही. तर, ना. सी. फडकेंपासून बाबुराव अर्नाळकर-चंद्रकांत काकोडकर प्रभृतींच्या पुस्तकांचाही फडशा पाडलेला आहे. नैतिकतेच्या फूटपट्टय़ा लावून मानवी जीवनाशी संबंधित असलेला कुठलाही विषय लेखक वज्र्य करू शकत नाही. कारण, सोवळ्यात राहून वैश्विकतेचा ठाव घेता येत नाही. त्यामुळे मुराकामी यांनी कुठली पुस्तके वाचली, हे त्यांनी स्वतहून सांगितले तर या वाटेवर उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगलेच आहे. पण, त्यांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण करून जनतेचे हितसंबंध जपल्याचे सांगणे म्हणजे थोरच भंपकपण!