यंदा डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा दक्षिण भारतात झाला. डेंग्यूच्या मृतांची आकडेवारी बघितली तर त्यात तामिळनाडूत ६० आणि त्याखालोखाल महाराष्ट्रात ५९ लोक दगावले आहेत. डेंग्यूचे प्रमाण वाढण्यात ‘आशियन टायगर’ या डासाच्या नवीन जातीचा मोठा वाटा असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या रोगावर सध्यातरी जगात कुठेच लस उपलब्ध नाही ,परंतु ‘सनोफी पाश्चर’ या फ्रेंच औषध कंपनीने हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले आहे. त्यांनी डेंग्यूवरील लशीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.  डेंग्यू हा शहरी गरिबांमध्ये जास्त प्रमाणात होणारा रोग असल्याने ही लस तयार झाली तरी ती किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान ठरणार आहे..
अगदी काही वर्षांपूर्वी मलेरिया आणि चिकुनगुनिया रोगांनी भारतात सर्वानाच मेटाकुटीस आणले होते, आता त्याची जागा डेंग्यूने घेतली आहे. हे सगळे रोग डासांमुळे पसरणारे आहेत. २००९ मध्ये भारतात मलेरियाने ११४४ मृत्यू झाले होते यावर्षी ते ३०९ आहेत. २००९ चिकुनगुनियाने ७३,२८८ जणांना ग्रासले होते आता ही संख्या १४२२७ इतकी आहे. डेंग्यू मात्र यावर्षी वाढतो आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे डेंग्यूचा प्रसार आहे. तिथे गरीब-श्रीमंत असा भेद नाही. डेंग्यूचा प्रसार होण्याचा संबंध हा जागतिक हवामान बदलांशी आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या मते गेल्या १०० वर्षांत तापमान ०.७५ अंश सेल्सियसने वाढले व गेल्या २५ वर्षांतील तापमान वाढ ही जास्त म्हणजे दशकाला ०.१८ अंश सेल्सियस होती. डेंग्यू हा हवामान बदलांशी निगडित असल्याने त्याची दखल घेणे या संघटनेलाही भाग पडले आहे.
डेंग्यूचा विषाणू हा डेन १, डेन २, डेन ३ व डेन ४ अशा चार प्रकारांत असतो. आशियात त्यातील डेन-२ व डेन -३ हे विषाणू जास्त आढळतात. फ्लॅविव्हायरस प्रकारातील ते विषाणू आहेत. १९४३ मध्ये जपानमध्ये रक्ताचे नमुने तपासत असताना रेन किमुरा व सुसुमू होटा या दोघांनी प्रथम डेंग्यूचे विषाणू वेगळे केले. त्यानंतर अल्बर्ट साबिन व वॉल्टर  शेलसिंगर यांनी आणखी विषाणू वेगळे केले. एखाद्या व्यक्तीला डेंग्यूचे विषाणू असलेला डास चावला तर त्या व्यक्तीच्या शरीरात डेंग्यूचे विषाणू असतात. त्यामुळे ती व्यक्ती या विषाणूंची वाहक बनते. हे विषाणू पुन्हा डासांमार्फतच इतर व्यक्तीत पसरतात. डेंग्यूचा विषाणू साधारण दोन ते सात दिवस रक्तात फिरत राहतो. साधारण एवढय़ाच कालावधीत काहीवेळा बारा दिवसांनी बाधित व्यक्तीला ताप येतो. एका प्रकारचा डेंग्यूचा विषाणू रक्तात आला, त्या व्यक्तीला डेंग्यू झाला व ती व्यक्ती बरी झाली तर त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला त्याच प्रकारच्या विषाणूची बाधा होत नाही .कारण त्याच्या शरीरात त्या विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते. पण इतर प्रकारचे डेंग्यूचे विषाणू पुन्हा आले तर परत डेंग्यू होऊ शकतो. डेंग्यूचा विषाणू एकदा पेशीच्या अंतर्भागात शिरला की, तो यजमान पेशीतील यंत्रणा वापरून  विषाणूच्या आरएनए जिनोमच्या आवृत्त्या तयार करत जातो. त्यामुळे इतर पेशींवरही हे विषाणू हल्लाबोल करतात. परिणामी मानवी प्रतिकारशक्ती कमी पडून डेंग्यूचा आजार होतो.
 मानवी पेशी का फसतात?
डेंग्यू या प्राणघातक रोगाचा विषाणू माणसाच्या पेशीत शिरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संग्राहकांचे दोन प्रकार वैज्ञानिकांनी शोधले आहेत, त्यामुळे या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येणार आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावातील पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेचे आकलन होण्यास यामुळे मदत होणार आहे. पेशींच्या सुनियंत्रित मृत्यूच्या प्रक्रियेतील जैविक कार्यपद्धतीची नक्कल करून या विषाणूच्या पेशीतील प्रवेशाच्या पद्धतीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. इनसर्म व सीएनआरएस-पॅरिस विद्यापीठाचे अली आमरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात जनुकीय छाननी करण्यात आली असून त्यात या विषाणूकडून पेशीत प्रवेश करताना वापरले जाणारे पेशीवरील संग्राहक नेमके कोणते आहेत याची निश्चिती करण्यात यश आले आहे. विषाणू व हे संग्राहक यांच्यातील बंध रोखले तर त्याचा प्रादुर्भाव संबंधित पेशीत होतच नाही, त्यामुळे विषाणूविरोधी नवीन उपचारपद्धती तयार करणे शक्य होणार आहे. टिम व टॅम या संग्राहकांमुळे डेंग्यूच्या विषाणूंना पेशीत प्रवेश मिळतो. हे संग्राहक आविष्कृत होतात त्यामुळे विषाणूचा संसर्ग होतो. जे आरएनए किंवा प्रतिपिंड टिम व टॅम संग्राहकांना लक्ष्य करतात ,त्यांच्यात फेरफार केल्यास पेशींना होणारा संसर्ग फारच कमी असतो. टिम व टॅम हे संग्राहक रेणू दोन वेगळय़ा समूहातील आहेत व ते पारपटलाशी संबंधित असे संग्राहक असून ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फॉस्फॅटिडायलसेरिन या घटकाशी संवाद साधतात व ‘मला खा’ (इट मी) असा संदेश पाठवतात. त्याचा परिणाम म्हणून फॅगोसायटोसिस व अ‍ॅपॉपटॉपिक पेशींना नष्ट करण्यास मोकळे रान मिळते. संशोधकांनी फॉस्फॅटिडायलसेरिन हे विषाणूंच्या पृष्ठभागावर मोठय़ा प्रमाणात आविष्कृत होतात. टिम व टॅम संग्राहक त्यांची ओळख पटताच त्यांना पेशींच्या आत प्रवेश देतात व तीच डेंग्यूच्या प्रादुर्भावाची पहिली पायरी असते. डेंग्यू होण्यास टिम व टॅम हे पेशींवरील संग्राहक रेणू कारणीभूत ठरतात. ते डेंग्यूच्या विषाणूला ओळखीचा समजून पेशीच्या आत प्रवेश देतात व नंतर त्याचा प्रादुर्भाव वाढतच जातो.  या नवीन संग्राहकांच्या शोधामुळे आता डेंग्यूचा विषाणू व टिम-टॅम रेणू यांचे बंध तोडणारी नवी उपचार पद्धती विकसित करता येणार आहे. सेल होस्ट अँड मायक्रोब या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
जगात दरवर्षी १५ हजार बळी
 डेंग्यू हा दरवर्षी जगात पंधरा हजार मृत्यू घडवतो तर  शंभर देशात पाच कोटी लोकांना त्याची लागण होते. डेंग्यूचा ताप हा फ्लूसारखा असतो. डेंग्यू हा रोग एडिस एजिप्ती या डासामुळे होतो परंतु आता दिल्लीत जी डासाची जात सापडली आहे ती वेगळी आहे. तिचे नाव आहे ‘आशियन टायगर’. त्यालाच एडिस अल्बोपिक्टस असे म्हणतात. एडिस एजिप्तीप्रमाणे याला वाढण्यासाठी पाणथळ जागाच लागतात अशातला भाग नाही, तर तो घरातील कोरडय़ा जागेतही वाढतो . एजिप्ती ही घरात वाढणारी जात असल्याने तिचा बंदोबस्त साधारण उपायांनी करता येतो, मात्र एडिस अल्बोपिक्टस ही बाहेर वाढणारी जात असल्याने फवारणी किंवा इतर उपायांना ते दाद देत नाहीत. या ‘आशियन टायगर’मुळेही डेंग्यू होतो व सध्या डेंग्यू वाढण्याचे कारण हाच डास आहे. चार प्रकारचे जे विषाणू डेंग्यूची लागण करतात, त्यांचे वाहक म्हणून ते काम करतात. घरात लावलेली छोटी शोभेची व इतर झाडे, टायर किंवा इतर कारणांमुळे भारतात डासांचा प्रसार वाढत आहे, असे काही पाहण्यांचे निष्कर्ष आहेत. ‘आशियन टायगर’चे मूळ स्थान हे उष्णकटिबंधीय प्रदेश हे आहे. आग्नेय आशियातून तो आता अनेक देशांत पसरला आहे. जपानमधून आलेल्या टायरमुळे तो १९८५ मध्ये अमेरिकेतही पसरला असे सांगितले जाते. या डासाची मादी अतिशय आक्रमक असते. ती उदरनिर्वाहासाठी नव्हे तर अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेले प्रथिन मिळवण्यासाठी माणसाचे रक्त शोषत असते. पुरेसे रक्त शोषले जात नाही तोपर्यंत ती चावत राहते व विशेष म्हणजे ती दिवसा चावते. मादी जिथे अंडी घालते तेथून ती अर्धा मैलापेक्षा जास्त लांब जात नाही. आता दिवसा जर डास चावत असतील तर मच्छरदाणीचा काहीच उपयोग नाही हे स्पष्ट आहे आणि डासांपासून बचावाचा तोच एक विश्वासार्ह मार्ग आहे. हा डास किमान ३० विषाणूंचा वाहक असतो, पण त्या सगळ्याच विषाणूंमुळे रोग होतात असे नाही. या डासाच्या अंगावर काळे-पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला ‘आशियन टायगर’ हे नाव पडले.
वाढत्या तपमानाशी संबंध
फ्लोरिडा विद्यापीठातील विद्यार्थी बॅरी अल्टो यांनी त्यांच्या डॉक्टरेटसाठीच्या प्रयोगात ‘आशियन टायगर’ डासांवर तापमानाचा परिणाम अभ्यासला असता जास्त तापमानाला त्यांची संख्या वाढलेली दिसून आली. तापमानातील वाढ ही या डासांना फायद्याची असली तरी त्याच्या जोडीला त्यांना ओलावाही लागतो. अमेरिकेतील टेक्सास टेक विद्यापीठात कॅथरिन हेहाउ यांनी केलेल्या संशोधनानुसार हवामान बदलांमुळे या डासांची पैदास जास्त तर होतेच शिवाय त्यांचा प्रसारही वाढतो.
बेडकांची घटती संख्या डासांना फायद्याची
काही वैज्ञानिकांच्या मते बेडकांची घटत चाललेली संख्या हे डासांच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. भारतातील एक निसर्गवैज्ञानिक रझा तहसीन यांनी अलीकडेच हा मुद्दा उपस्थित करताना असे म्हटले आहे की, भारतात बेडकांची संख्या कमी झाल्याने डासांचे प्रमाण वाढते आहे व त्यामुळे होणारे रोगही वाढत आहेत. बेडूक हे डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे त्यांची पैदास कमी होते. असे असताना भारतीय उपखंडात बेडकांचे प्रमाण कमी होत चालले आहे. पूर्वीच्या काळी पाणथळ जागी हमखास बेडकांचे अस्तित्व असायचे. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. बेडकांच्या पायांची तस्करीही मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्यासाठी बेडूक मारले जातात, ते रोखण्याची गरज आहे. बेडकांच्या २३७ प्रजाती या भारतात सापडतात. जागतिक पातळीवर बेडकांची संख्या १९५० पासून घटत गेली तसेच १९८० पासून १२० प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भातशेतीत मोठय़ा प्रमाणावर असणारे बेडूक पिकांचे कीटकांपासून संरक्षण करीत असतात. गप्पी मासेही अशाच प्रकारे डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे डासांची संख्या खूपच नियंत्रित राहते. केवळ एका कारणाने डास वाढत आहेत अशातला भाग नाही, त्याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. प्रत्येक देशानुसार त्यांची कारणे वेगळी असू शकतात. कारण तेथील हवामान व पर्यावरणाची स्थिती ही वेगळी असणार आहे.
डेंग्यूवरील लस
सॅनोफी पाश्चर या कंपनीने डेंग्यूवर जी लस तयार केली आहे ती थायलंडमध्ये चार हजार मुलांवर यशस्वी ठरली असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने जरी ७० टक्क्यांहून जास्त यशस्वीतेचा दावा केला असला तरी मान्यवर संशोधन संस्थांनी या लशीची कामगिरी ३० टक्के यशाची आहे असे म्हटले आहे. ही लस बनवण्यासाठी फ्रान्समध्ये ४५ कोटी डॉलरचा प्रकल्प उभा राहत असून दरवर्षी त्यांना एक अब्ज डॉलरची विक्री अपेक्षित आहे. लॅन्सेट नियतकालिकात या लशीच्या प्रयोगाचे डॉ. नादिया टॉर्नीपोर्थ यांनी स्वागत केले आहे. या लशीमुळे डेन-२ विषाणूपासून संरक्षण मिळत नाही असे म्हटले जाते. जिवंत विषाणूंपासून ही लस बनवली असून तिचे दुष्परिणाम नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. टेट्राव्हॅलन्ट प्रकारातील ही लस असून ती चारही प्रकारच्या डेंग्यू विषाणूंवर परिणामकारक असल्याचा  दावा काही अभ्यासकांनी केला आहे.
डेंग्यूची लक्षणे
शरीराचे तपमान ४० अंश सेल्सियस किंवा १०४ अंश फॅरनहीट होते.
 तीव्र डोकेदुखी जाणवते मळमळ, उलटय़ा अंगावर चट्टे येतात.
तीव्र डेंग्यूची लक्षणे
खूप ताप येतो
पोटात वेदना होतात
श्वास जोरात चालतो
हिरडय़ातून रक्त येते
रक्ताच्या उलटय़ा होतात
अविश्रांत वाटते
डासांचे नियंत्रण कसे करणार?
दारे व खिडक्या यांना जाळ्या लावाव्यात.
पेरमेथ्रिन, अ‍ॅलेथ्रिन या कीटकनाशकांचा वापर करावा.
दिवसभर लांबबाहीचे शर्ट, लांब पँट, पायमोजे, हातमोजे, बूट वापरावेत.
तुमच्या कपडय़ांवर डीइइटी( एन, एन डायएथिल -एम- टोल्युअमाइड) किंवा पिकार्डिन कपडय़ांवर व शरीराच्या उघडय़ा भागावर लावा.     (आधार-  www.cdc.gov)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा