संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी उपमहासचिव पदावर मराठमोळ्या अतुल खरे यांची नेमणूक करून भारतीय परराष्ट्र सेवेतील एका कर्तबगार अधिकाऱ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. अतुल खरे यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. ते १९८४ च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी असून त्यांनी उद्योग व्यवस्थापनात दक्षिण क्वीन्सलँड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून त्यांनी एमबीबीएस ही पदवीही मिळविली आहे. विशेष म्हणजे, परराष्ट्र सचिव ज्योतिंद्रनाथ दीक्षित यांच्या परराष्ट्र सचिवपदाच्या काळात ते त्यांचे सहायक होते व दीक्षित यांच्या जन्मदिनीच त्यांना संयुक्त राष्ट्राने एक महत्त्वाचे पद देऊन गौरवले आहे.
खरे यांनी २०११ ते १२ या काळात संयुक्त राष्ट्रांचे सहायक महासचिव म्हणून काम केले. त्या आधी २०१०-११ दरम्यान ते शांतिसेना मोहिमांचे सहायक महासचिव होते. महासचिवांचे उप विशेष प्रतिनिधी, दिल्लीच्या नेहरू केंद्राचे संचालक व इतर अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. २००२ ते २००५ या काळात पूर्व तिमोरमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत त्यांनी विशेष काम केले. मॉरिशसमध्ये भारताचे उपउच्चायुक्त, संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी मोहिमेत सल्लागार, सेनेगलमध्ये ‘चार्ज द अफेअर्स’ तसेच माली, मॉरिटानिया, गांबिया, गिनीया बिसाउ या देशांतही त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे २०११ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणा कार्यक्रमासाठी उपाययोजना सुचवणाऱ्या बदल व्यवस्थापन गटात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आताच्या नियुक्तीने ते विजय नंबियार यांच्याबरोबर संयुक्त राष्ट्रांतील सर्वोच्च दर्जाचे भारतीय अधिकारी ठरले आहेत. सरचिटणीस बान की मून यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू व जगात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असे खरे यांनी म्हटले आहे. त्यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द आर्डर ऑफ इनफॅन्ट डॉन हेन्रिक ऑफ पोर्तुगाल ’ व ‘ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ट’ हे सन्मान मिळालेले आहेत. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या ज्या मोहिमा राबवल्या जातात, त्यात ते आता उपमहासचिव म्हणून काम करणार आहेत. थोडक्यात, अशा मोहिमांसाठी रसद पुरवठय़ाच्या व्यवस्थापनावर त्यांची देखरेख असणार आहे. भारताचा एक चांगला अधिकारी शांततेसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उच्च पदावर असणे ही आपल्यासाठी गौरवास्पद बाब आहे, यात शंका नाही. शेवटी एक महत्त्वाचे- लेखिका वंदना खरे या त्यांच्या आयुष्याच्या जोडीदार आहेत.
अतुल खरे
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी उपमहासचिव पदावर मराठमोळ्या अतुल खरे यांची नेमणूक करून भारतीय परराष्ट्र सेवेतील एका कर्तबगार अधिकाऱ्यावर मोठा विश्वास टाकला आहे.
First published on: 10-01-2015 at 12:41 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul khare oppointed head of un department of field support