अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्तम प्रशिक्षक होऊ शकत नाहीत, असे आपण अनेकदा ऐकतो. पुल्लेला गोपीचंद मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी बॅडमिंटन क्षेत्रातील अखिल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले. तसेच त्यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. आपले प्रशिक्षक जर एवढय़ा अत्युच्च दर्जाची कामगिरी करीत असतील तर निश्चितपणे त्यांच्या शिष्यांनाही त्यांचा कित्ता गिरविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. गोपीचंद यांनी बॅडमिंटन अकादमी सुरू करण्यापूर्वी अखिल इंग्लंड स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी बंगळुरू येथे अकादमी सुरू केली. ती अजूनही कार्यरत आहे. या खेळात भारतीय खेळाडूंना अव्वल दर्जाचे यश मिळविता यावे यासाठी आपणही अकादमी सुरू करावी असा विचार गोपीचंद यांच्या मनात आला. हैदराबाद येथे त्यांना या अकादमीसाठी जागाही मिळाली आणि पुरस्कर्तेही मिळाले. गोपीचंद यांची या अकादमीमधील दिनचर्या खरोखरीच थक्क करणारी आहे. पहाटे साडेपाच-सहा वाजताच त्यांच्या अकादमीत खेळाडू प्रशिक्षणासाठी येतात. त्यामुळे गोपीचंद हे पहाटे चार वाजताच तेथे येतात व रात्री ११-१२ वाजता ते घरी जातात. ही अकादमी म्हणजे त्यांचे दुसरे जीवनच आहे. आपण जर सरावावर एकाग्रता दाखविली की आपोआप आपले खेळाडूही त्याप्रमाणे एकाग्रता दाखवतील ही त्यांना खात्री आहे. त्यामुळेच ते दिवसभर अकादमीत थांबून प्रत्येक खेळाडूकरिता दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे सराव सुरू आहे ना, याची खात्री करीत असतात. प्रत्येक खेळाडूची प्रत्येक मिनिटाची माहिती त्यांच्याकडे असते. अकादमीत ते अतिशय कडक शिस्तीने वागत असले तरी स्टेडियमबाहेर ते आपल्या शिष्यांबरोबर मित्रासारखेच वागतात. त्यांच्या या अकादमीतून भारताला बॅडमिंटन क्षेत्राकरिता सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा असे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू मिळाले आहेत. प्रशिक्षक व खेळाडू यांचा एकमेकांवर विश्वास व चांगला सुसंवाद असला की आपोआपच त्यांच्यातील नाते दृढ होते. गोपीसरांचा प्रत्येक शब्द हे खेळाडू मानतात. भारतीय खेळाडू शारीरिक तंदुरुस्ती व खेळातील विविधता यामध्ये कमी पडतात, हे लक्षात घेऊन गोपीचंद यांनी खेळाडूंसाठी स्वतंत्र तंदुरुस्तीतज्ज्ञ, सराव प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. सायनाकरिता अतिरिक्त परदेशी प्रशिक्षक असले तरी त्यांच्या प्रशिक्षणात ढवळाढवळ केली जाणार नाही, याची ते काळजी घेत असतात. अनेक खेळाडू त्यांना आपल्या वडिलांच्या स्थानी मानतात. गोपीचंद यांनीही या खेळाडूंवर तशीच माया केली आहे. आपला शिष्य कितीही अव्वल दर्जाचा असला तरी त्याच्याकडून बेशिस्त वर्तन घडले तर त्याला शिक्षा करण्यात ते मागेपुढे पाहत नाहीत. गोपीचंद यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चीन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आदी देशांमधील खेळाडूंचा अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. काही वर्षांपूर्वी चीनच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंवर खूपच दहशत असे. आता भारतीय खेळाडूंचाच चीनच्या खेळाडूंनी धसका घेतला आहे. हा जो बदल झाला आहे, त्याचे मुख्य श्रेय गोपीचंद यांनाच द्यावे लागेल. या अकादमीतून सायना, सिंधू, किदम्बी यांच्यासारखे अनेक विजेते घडत राहो, हीच तमाम भारतीयांची आशा आहे.

Story img Loader