मोहम्मद अझरुद्दीन याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लादलेल्या आजन्म बंदीच्या शिक्षेला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या निर्णयाचे स्वागत करण्यास कुणीही तयार होणार नसले तरी त्यामुळे एक हळवा कोपरा मात्र नक्कीच सुखावणार आहे. २००० साली मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीकांडाने भारतीय क्रिकेटप्रमाणेच जागतिक क्रिकेटही नखशिखांत ढवळून गेले होते. सभ्य गृहस्थांचा खेळ असे बिरुद मिळविणाऱ्या क्रिकेटची प्रतिमा मनोज प्रभाकर, अजय शर्मा, हॅन्सी क्रोनिए अशा अनेक क्रिकेटपटूंनी मातीमोल केली. अनेक भारतीय क्रिकेटला सोनेरी दिवस दाखविणारा यशस्वी कर्णधार अझरुद्दीन असे पाप करील, याबाबत कुणीही कल्पना केली नव्हती. अझर म्हणजे हैदराबादची शान होता. अझरला जसा क्रिकेटचा छंद तसाच मनगटी घडय़ाळांचाही. त्याच्या मनगटी फटक्यांची नजाकत डोळ्यांचे पारणे फेडायची. १५ वर्षांच्या कारकीर्दीत अझरने ३३४ एकदिवसीय आणि ९९ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. अझरुद्दीनने १९९० मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. आकडय़ांचा विचार केला तर अझर हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हणावा लागेल. अझरच्या कप्तानपदाखाली भारताने १०३ एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवला आहे, हा विक्रम अद्यापही अबाधित आहे. १४ कसोटी सामन्यांत विजय मिळविण्याचा पराक्रमही अझरच्याच नेतृत्वाखाली भारताने साध्य केला. त्यानंतर सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी हा विक्रम मोडला. पण भारताचा पहिला यशस्वी नायक हे बिरुद अझरचेच. कोलकात्याचे ईडन गार्डन्स हे अझरचे लाडके मैदान. या मैदानावर अझरने सात कसोटी सामन्यांत १०७.५०ची सरासरी राखली, तसेच पाच शतकेही झळकावली. २०००साली क्रिकेटमधील भ्रष्टाचारामुळे सर्वत्र संशयाचे धुके पसरले होते. त्यापासून कुणीही सुटू शकले नाही. ए. सी. मुथय्या यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या समितीने मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची सखोल चौकशी करून अझरच्या क्रिकेट कारकीर्दीवर पूर्णविराम दिला. त्यामुळे मानाची शंभरावी कसोटी खेळण्याचे सुख अझरला लाभले नाही. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळालेला अझर ४९ वर्षांचा झाला आहे आणि राजकारणातही बऱ्यापैकी स्थिरावला आहे. अझरुद्दीनवरील आजीवन क्रिकेटची बंदी ही बेकायदाच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पुराव्यांअभावी अझरची बंदी उठवण्यात येत असल्याचे निकालात म्हटले आहे; पण मग मुथय्या समितीने जी काही चौकशी केली ती इतकी वष्रे का खपवून घेतली गेली? बीसीसीआयने आता मात्र सावध पवित्रा घेत आम्ही निर्णयाचा सखोल अभ्यास करून मग भूमिका ठरवू, असे म्हटले आहे. तथापि, अझरनेही आपण बीसीसीआयच्या निकालाविरोधात कायदेशीर दाद मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला हे काँग्रेसचेच मंत्री; तर अझर हाही सध्या काँग्रेसचाच खासदार आहे. एकंदर भारतीय क्रिकेटवरील हा राजकीय प्रभाव पाहता आता अझर-बीसीसीआय झगडा फार काळ टिकेल असे वाटत नाही. पण पैशासाठी देशाची इभ्रत बाजारात मांडणाऱ्या अझरला या देशातील क्रिकेटरसिक तरी इतक्या सहजासहजी माफ करणार नाहीत, मग
तो भले कायद्याच्या नजरेतून सुटलेला  का असेना!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा