दहीहंडीच्या वरच्या थरांवर १२ वर्षांखालील मुलांना बंदी घातल्यास दहीहंडी उत्सवावरच बहिष्कार घालण्याचा गोविंदा पथकांचा इशारा म्हणजे राज्य सरकारला वेठीला धरण्याचाच प्रकार आहे. मुळात, दहीहंडी हा ‘खेळ’ नव्हे आणि ‘इव्हेन्ट’ तर मुळीच नाही. लहानथोरांनी एकत्रितपणे उत्साहात साजरा करण्याचा तो एक पारंपरिक ‘उत्सव’ आहे, पण गेल्या काही वर्षांपासून राजाश्रय आणि बडय़ा उद्योगांचा ‘धनाश्रय’ मिळू लागल्यापासून या उत्सवाला ‘इव्हेन्ट’चे रूप आले आणि गोपाळकाल्याचा हा सण बघता बघता धंदेवाईक होऊन गेला. उंचावर बांधलेल्या पारंपरिक दहीहंडीपेक्षा, बाजूच्या दोरावर लटकलेल्या नोटांच्या माळा आणि पैशाच्या थैल्यांवर गोविंदा पथकांच्या नजरा लागल्या आणि थरावर थर रचून हंडय़ा फोडण्यासाठी लहान मुलांच्या कौशल्याची बाजी लावण्यास सुरुवात झाली. अलीकडे गोविंदाच्या अर्थकारणाने एवढी मजल मारली आहे, की विदेशातील काही व्यावसायिक पथकेही मुंबईच्या परिसरात दाखल होऊन आपले कौशल्य पणाला लावत या थैल्या पटकावण्यास सरसावत आहेत, पण विदेशी पथकांत वरच्या थरांवर सहजपणे चढणारी लहान मुले प्रशिक्षित आणि शारीरिक कसरतींमध्ये तरबेज असतात. वर्षभराच्या प्रशिक्षणातून त्यांनी साधलेले कौशल्य आणि आपल्या मुलांचा नारळी पौर्णिमेपासून गोकुळाष्टमीपर्यंतच्या तोकडय़ा दिवसांतील जेमतेम सराव यांची तुलनाच होऊ शकत नाही. या पाश्र्वभूमीवर, मुंबई-ठाण्यासारख्या शहरांत सात-आठ थरांचे मनोरे रचून त्याच्या वरच्या थरांवर बालकांना चढविण्याचा प्रकार धोकादायक आहे हे स्पष्ट असतानादेखील सरकारी बंधनांना आव्हान देत बहिष्काराचे अस्त्र उपसण्याचे इशारे देण्यातील मानसिकता अनाकलनीय आहे. मुंबईतील आठव्या थराची एक दहीहंडी फोडून विक्रम आणि पराक्रम नोंदविणाऱ्या एका बालिकेचे कौतुक करण्याऐवजी तिला कसरतबाजीचे प्रशिक्षण देण्याचा सल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या मुलीच्या पित्याला दिला होता. त्यामुळे आज त्या मुलीला कसरतींच्या खेळात कमालीचे कौशल्य प्राप्त झाले. गोविंदा पथकांमधील अनेक जण ती आठवण सांगतात. तरीदेखील, लाखांच्या हंडय़ा बांधून गोविंदा पथकांना झुंजविण्यामागील धंदेवाईक डाव लक्षात घेण्याऐवजी बहिष्काराचे इशारे देत सरकारलाच वेठीला धरण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. गोविंदा पथके आणि गोविंदांच्या हिताची काळजी घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी गोविंदा उत्सव समन्वय समिती स्थापन झाली, पण त्यातही मतभेदांची बीजे शिरली. दहा वर्षांपूर्वीच्या एका दहीहंडी उत्सवात उंच थरावरून कोसळून जायबंदी झालेल्या दिनेश पाटील नावाच्या युवकाच्या अकाली जाण्याने गोविंदा पथकांवर दाटलेले शोकाचे सावट अजूनही विरलेले नाही. त्या आठवणींनी अजूनही अनेक जण हळहळतात आणि बाळगोपाळांच्या उत्साहाचा हा सण संकट ठरू नये, अशी अपेक्षाही व्यक्त करतात. मनाच्या एका कोपऱ्यात या सदिच्छा असतानादेखील, संकटांच्या सावलीत लहान मुलांना ढकलण्यामागील मानसिकताही जपली जावी, हा तर विरोधाभासच आहे. बारा वर्षांखालील बालकांना दहीहंडीच्या थरावर चढविण्यास बाल हक्कसंरक्षण आयोगाने घातलेल्या बंदीनंतर बहिष्काराचे इशारे देण्यापेक्षा, यातून तोडगा काढण्याचा समंजस प्रयत्न झाला, तर खरे म्हणजे पालकवर्गातही समाधानच व्यक्त होईल आणि सणाचे इव्हेन्टीकरण करण्याच्या मानसिकतेलाही माफकसा धक्का बसेल. केवळ बहिष्काराचे अस्त्र उपसूनच बैठकांमध्ये बसले, तर सकारात्मक निष्पत्तीची शक्यता कमी होते. अशा इशाऱ्यांपुढे सरकार झुकणार का, हाही प्रश्न आहेच.. कारण उत्सवाचा आनंद उत्साहाच्या मापदंडाने मोजावयाचा असतो, थैल्यांमधील नोटांच्या आणि नाण्यांच्या वजनाशी तोलून नव्हे..

Story img Loader