बँड ही कल्पना आपण भारतीय चित्रपटसंगीतात बेमालूमपणे मिसळली, तरीही कार्यक्रमांच्या पातळीवर ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही. अनेक दिग्गजांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रतिभांचा अवकाश मिसळत एका नव्या स्वरध्वनीची उभारणी करणं शक्य असतानाही आपल्याकडे ते घडू शकलेलं नाही.
बँड या शब्दाशी भारतीयांचं नातं शुभकार्याशी निगडित आहे. लग्नाच्या वराती काढण्याच्या काळात घोडय़ावर बसलेल्या नवरदेवाच्या पुढे झगमगीत पोशाख परिधान केलेले आणि हाती चकाकणारी विविध वाद्यं असलेल्यांचा समूह म्हणजे बँड अशी आपली सार्वत्रिक समजूत. ब्रिटिशांच्या आगमनामुळे हे बँड प्रकरण आपल्या संस्कृतीत हळूहळू रुजायला लागलं, पण त्या बँडवाल्यांच्या हाती असलेल्या विदेशी वाद्यांवर जे वाजवलं जातं, ते मात्र आपल्या चित्रपटातलं संगीत. त्या त्या काळात ठरलेली किंवा विवाहाशी निगडित अशी गाणी वाजवणं एवढंच त्यांचं काम. क्लॅरोनेट, की बोर्ड यांसारख्या वाद्यांवर ‘मेरी प्यारी बहनियाँ, बनेगी दुल्हनियाँ’ हे ऐंशीच्या दशकातलं गाणं अजूनही वाजवणं या बँडपथकांना आवश्यक असतं. मराठी भावगीतं किंवा त्या त्या काळातील लोकप्रिय जनसंगीत बँडवर वाजवण्याची कसरत करणाऱ्या या सगळ्या बँडपथकांना एका अर्थानं सलामच करायला हवा. याचं कारण जे संगीत पाश्चात्त्य वाद्यांवर वाजवणं फार अवघड असतं बँडपथकांना ते सहजसुलभ करून दाखवावं लागतं. गेल्या दशकभराच्या काळात सार्वजनिक ठिकाणी बँडपथकांना मिळणारी निमंत्रणंही कमी होत चालली आहेत आणि त्यामुळे त्यांचं जगणंही मुश्कील बनत चाललं आहे. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वीपासून आपल्या शुभकार्याच्या प्रसंगी वाजंत्री आणि चौघडा या वाद्यांनी आपलं बस्तान बसवलं होतं. ‘वाजवा रे वाजवा’ ही हाळी या वादकांसाठी असे आणि लग्न लागलं रे लागलं की त्यांना हा संदेश जायचा आणि लग्न लागल्याचा संदेश गावभर आपोआप पोहोचला जायचा. वाजंत्री आणि चौघडय़ानं अशा कामापुरताच आपला व्याप ठेवल्यानं, या वाद्यांना भारतीय संगीताच्या परंपरेत मानाचं स्थान मिळू शकलं नाही. (याच काळात बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या शहनाई या अस्सल भारतीय वाद्यानं मंगलतेशी आपलं नातं असं काही घट्ट केलं, की त्याशिवाय असं कोणतंही कार्य पुरं होऊ शकत नाही!)
अनेक वाद्यवादकांनी एकत्र येऊन संगीतरचना सादर करणारे बँड्स पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवून आहेत. संगीताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेनं संगीताच्या क्षेत्रात बदल घडत गेले. बँड्सना मिळणारी प्रतिष्ठा हे त्याचं एक मुख्य कारण. नवनव्या रचना तयार करून त्या सामूहिक पद्धतीनं सादर करताना, प्रत्येक वाद्याचं बलस्थान लक्षात घेणं आवश्यक असतं. एकाच वेळी अनेक वाद्यांमधून निघणाऱ्या स्वरमेळातून बाहेर पडणाऱ्या स्वरसमूहाच्या परिणामाचाही विचार करणं आवश्यक असतं. बँड या संकल्पनेत वाद्यमेळाला प्राधान्य असतं आणि तेच या संगीतप्रकाराचं खास वैशिष्टय़ ठरलं आहे. गेल्या शतकभरात जगातील अनेक देशांमध्ये या संकल्पनेला मोठय़ा प्रमाणात लोकप्रियता मिळाली आणि जनसंगीतात मानाचं स्थानही मिळालं. एखाद्या बँडशी संबंधित असणं हेही प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. त्यामुळे एखाद्या वाद्यावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या आणि स्वतंत्रपणे त्या वाद्यावर कमालीची हुकमत असणाऱ्या कलावंतांना अशा बँड्समध्ये सहभागी होण्यात कमीपणा वाटेनासा झाला. हेही पाश्चात्त्य संगीतसंस्कृतीचं खास वैशिष्टय़. याचं एक कारण चर्च संगीत असू शकेल. सामूहिक आविष्कार हे तेथील समाजसंस्कृतीचं वेगळंपण, नृत्य आणि संगीत या दोन्ही कलाप्रकारांत स्पष्टपणे दिसतं. सामूहिक नृत्यापाठोपाठ तेथील संगीतसंस्कृतीनं समूह संगीतालाही सामोरं जाण्याचं ठरवलं आणि परिणामी तेथील कलासंस्कृतीमध्ये बदल घडू लागले. त्यामुळे अर्थातच एकल (सोलो) संगीताचं महत्त्व कमी झालं नाही आणि तेही त्याच्या गतीनं बहरत राहिलं. अभिजात संगीतामध्ये बदल घडून येण्यास आजूबाजूची सामाजिक परिस्थिती जशी कारणीभूत असते, तशीच कलासंस्कृतीही महत्त्वाची असते. वैचारिक क्रांतीचा परिणाम जगण्याशी संबंधित असलेल्या सगळ्या मितींवर (डायमेन्शन्स) होतो, तसा तो कलासंस्कृतीमध्येही होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील घडामोडीही यासाठी अतिशय उपकारक ठरल्या.
भारतीय कलासंस्कृतीमध्ये हा बदल घडून येण्यास मात्र बराच कालावधी लागला. त्याचा थेट परिणाम संगीतावर झाला. आपल्यावर ब्रिटिशांनी आक्रमण केलंच नसतं तर अभिजात समूह संगीताच्या आगमनासाठी संपर्क क्षेत्रातील वैज्ञानिक क्रांतीपर्यंत थांबावंच लागलं असतं. इंटरनेटसारख्या तंत्रक्रांतीनं जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांत होणारे बदल अपरिहार्य ठरले. संगीताचा पोहोच अतिरेकी गतीनं वाढला. त्यासाठी संगणकावर संगीत साठवून ठेवण्याचं तंत्रज्ञान आधीच विकसित झालं होतं. डिजिटायझेशन या प्रक्रियेमुळे संगीताला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं अधिक सुकर झालं. संगणकाबरोबरच तंत्रज्ञानामुळे आता मोबाइलवरूनही संगीत देशोदेशी पोहोचणं हा बोटांचा खेळ बनला. जगाच्या वेगवेगळ्या भागांत बहरत असलेल्या संगीताला त्यामुळे पाय फुटले आणि ते अक्षरश: वायुवेगानं पोहोचू लागलं. या क्रांतीचा परिणाम जगातल्या सगळ्याच संगीताला जाणवणं स्वाभाविक होतं. भारतीय संगीतावर हा परिणाम खूप आधीपासूनच व्हायला सुरुवात झाली. पाश्चात्त्यांनी इथं आणलेल्या विविध वाद्यांशी आधीपासूनच झालेली ओळख दोस्तीत रूपांतरित होण्यासाठी भारतीय जनसंगीतातील कलावंतांनी बाहय़ा सरसावल्या आणि त्यामुळे अभिजात संगीताची जनसंगीताशी असलेली नाळही तुटू लागली. तोवरच्या काळात समूहानं सादर होणारं लोकसंगीत आणि अभिजात संगीत एकमेकांना समांतर राहिलं, तरी त्यात वैचारिक फारकत नव्हती. ते सारं ‘मेलडी’चंच संगीत होतं. पाश्चात्त्य संगीताशी झालेल्या ओळखीतून भारतीयांनी त्यांच्या व्हायोलिन, पियानो, हार्मोनिका, गिटार यांसारख्या वाद्यांशी जवळीक वाढवायला सुरुवात केली आणि भारतीय संगीतपरंपरेत सहज विरघळू शकतील अशा वाद्यांवर तर प्रभुत्वही मिळवलं. व्हायोलिन हे त्याचं जबरदस्त उदाहरण. या वाद्यावर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतातील अभिजातता प्रकट करता येऊ लागल्यावर ही वाद्यं आपल्या कलासंस्कृतीची अविभाज्य घटक बनली. त्या वाद्यांच्या एकलवादनाला आपल्या अभिजात परंपरेत मानाचं स्थान मिळालं. अन्य वाद्यांनी भारतीय जनसंगीतात जम बसवायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्यांचंही भारतीयीकरण होऊ लागलं.
लोकसंगीतातून अभिजात संगीताची निर्मिती होणं हे क्रमप्राप्त होतं. पण त्या काळातील कलावंतांच्या प्रतिभेमुळे जनसंगीतावरही याच दोन संगीतप्रवाहांचा पगडा राहिला. याचं थेट उदाहरण चित्रपटसंगीतात पाहायला मिळतं. सुरुवातीच्या काळातील सगळ्या चित्रपटसंगीतावर अभिजात संगीताचाच वरचष्मा होता. अगदी साठच्या दशकापर्यंत म्हणजे चित्रपट गाऊ लागल्यानंतर तीस र्वष अभिजात संगीतानंच तिथं अधिकार गाजवला. पाश्चात्त्यांनी इथं आणलेल्या आणि रुजवलेल्या संगीताला चित्रपटातून व्यक्त व्हायला सुरुवात झाली आणि एका अर्थानं भारतीय संगीतात बँड प्रस्थापित होऊ लागला. चित्रपटसंगीतातील अ‍ॅकॉर्डियन, चेलो, ड्रम्स अशा वाद्यांच्या मेळानं हे संगीत मूळ भारतीयता टिकवतही वेगळ्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करू लागलं. मेलडी आणि हार्मनी यांच्या सुरेख संगमाची कल्पना चित्रपटसंगीतातून लोकप्रिय होऊ लागली. सार्वजनिक स्तरावर बँड ही कल्पना भारतात फारशी रुजली नाही, मात्र चित्रपटसंगीतातून ‘बँड म्युझिक’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे पुढे येऊ लागली. अनेक दिग्गज कलावंतांना एकत्र आणून एका नव्या ‘स्वरध्वनी’ (साऊंड)चा शोध घेणाऱ्या या संगीतकारांनी केवढं प्रचंड काम केलं आहे! संगणकयुग अवतरेपर्यंत सतत नव्याचा शोध घेणाऱ्या संगीतकारांनी आपल्या स्वप्रतिभेनं नवं संगीत जन्माला घातलं. पाश्चात्त्यांच्या सांगीतिक कल्पनांवर भारतीयत्वाचं कलम करीत त्या संगीताला लोकप्रिय करण्यात त्यांनी जे अपार यश मिळवलं आहे, त्याला खरोखरच तोड नाही.
बँड ही कल्पना आपण भारतीय चित्रपटसंगीतात बेमालूमपणे मिसळली, तरीही कार्यक्रमांच्या पातळीवर ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही, हे खरंच. अनेक दिग्गजांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रतिभांचा अवकाश मिसळत एका नव्या स्वरध्वनीची उभारणी करणं शक्य असतानाही आपल्याकडे ते घडू शकलेलं नाही. १९६७ मध्ये शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रीजभूषण काब्रा यांनी एकत्र येऊन निर्माण केलेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम ऐकल्यानंतर त्यातील सर्जक शक्यतांच्या अजमावणीनं स्तिमित व्हायला होतं. तेव्हा हे सगळेच कलावंत तिशीत होते आणि काहीतरी नवं करण्याच्या प्रयत्नात होते. शंकर जयकिशन यांनी १९६८ मध्ये पाश्चात्त्य वाद्यांवर भारतीय रागसंगीताच्या धून तयार केल्या आणि ‘रागा : झ्ॉझ स्टाइल’ या नावानं प्रसिद्ध केल्या. हा आणखी एक वेगळा प्रयोग. अभिजात भारतीय संगीताच्या बँडचं ते मूळ प्रारूप होतं. नंतरच्या काळात तसे प्रयत्न झाले, आजही होत आहेत. पण त्या प्रयोगांना सार्वजनिक पातळीवर प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मात्र मिळत नाही.
भारतीय अभिजात संगीतात कलाकारांना एकलवादनात अधिक रस आहे. आपलं आजवरचं संगीतच त्या पद्धतीनं विकसित झालं. त्यातून कलावंतांचा अहंकार तयार झाला. एकमेकांच्या प्रतिभेबद्दलचा आदरभाव एकत्रित वादनात प्रकट होताना त्यालाही याच अहंकारानं ग्रासलं. तसंही असेल कदाचित. पण आज देशातील सगळ्या दिग्गज कलावंतांनी असे एकत्र येऊन अभिजात संगीतात बँडचा प्रयोग करण्यास काय हरकत आहे?

Story img Loader