परिणीता दांडेकर
भारतीय उपखंडात नदय़ांना अनन्वित सांस्कृतिक महत्त्व आहे. पण वाल्मीकी- कालिदासांनी नदीच्या परिसंस्थेचेही वर्णन केले, ते आपण वाचतो का?
ती परिसंस्था जपण्यासाठी, नदीला नैसर्गिकरीत्या वाहते ठेवण्यासाठी
आपण काही करतो का?
ऐक, हे संगमाच्या देवा,
सरतेशेवटी
जे स्थिर-स्थावर तेच क्षणिक,
जे वाहते-जंगम तेच शाश्वत
– बसवण्णा, बारावे शतक
आत्ताच्या काळात, जेव्हा आपले ओळखीचे जग थोडे अनोळखी होत आहे तेव्हा बदलाला शाश्वत मानणारे बसवण्णांचे हे शब्द जवळचे वाटतात. बसवण्णांनी खूपशा कविता कुडलासंगमदेवासाठी लिहिल्या : कृष्णा आणि मळप्रभेच्या संगमाचा देव.
भारतातील बहुतांश संगम पवित्र मानले जातात. म्हणजे फक्त स्तोत्र-पुराणांमध्येच नव्हे तर लोककथा, लोकगीतांमध्येदेखील. काका कालेलकरांनी आपल्या ‘जीवनलीला’ या खास नदय़ांच्या पुस्तकात म्हटलं आहे की, संगम का विशेष? कारण जिथे दोन नदय़ा एकत्र येतात तिथे दोन जगण्याच्या पद्धती, लोकरंग एकत्र होतो. ही जागा खचित समृद्ध. भारतभरात वेगवेगळ्या समूहांनी संगमांविषयी काव्य, गीते लिहिली. त्या बहुतांश प्रेमकथा. आसामात गोष्ट आहे की हिमावताची मुलगी गंगा आणि ब्रह्माचा मुलगा ब्रह्मपुत्र यांना लग्न करायचे होते, पण हिमावताला ते मान्य नसल्यामुळे त्याने दोघांच्या मध्ये उंच पर्वतराजी निर्माण केली. तरीही दोघांचा संगम अखेरीस सुंदरबनात झालाच. सिक्किममधल्या रंगीत आणि तिस्ता नद्यांची, कुठल्याही पुराणात न सामावणारी लोककथा अशीच आहे. इथून हजारो किलोमीटर दूर हिमाचल प्रदेशातल्या चंद्रभागा म्हणजे चिनाब नदीची जन्मकथा अगदी अशीच आहे. खाली, भारताला दोन भागांत विभागणाऱ्या आणि या उपखंडातील सगळ्यात जुन्या नदीची : नर्मदेची गोष्ट काहीशी अशीच. परिसंस्थेच्या दृष्टीनेदेखील संगम हे अत्यंत महत्त्वाचे. इथे जैवविविधतेची रेलचेल.
‘बारा गावचं पाणी’ हे खरे तर वेगवेगळ्या प्रांतांतील नावीन्यपूर्ण नदी आणि जल व्यवस्थापन पद्धतींचा आढावा घेणारे काहीसे तांत्रिक सदर. पण गेल्या महिन्यात जगभरात जे अकल्पित घडत आहे त्यामुळे काही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलत आहे. आपल्याला समाजात एका वाहत्या, स्वस्थ नदीचे मूल्य काय? ते इतर समाजांपेक्षा वेगळे आहे का? आपण भारतीय स्वत:ला नदीचे भक्त समजतो, ते खरे आहे का? सामाजिक न्याय आणि निसर्गसंवर्धन यांचा एकत्र विचार होऊ शकतो का? या प्रश्नांबद्दल विचार करणे अपरिहार्य वाटत आहे.
भारतीय उपखंडात नदय़ांना अनन्वित सांस्कृतिक महत्त्व आहे, हे वादातीत आहे. हे महत्त्व धर्माच्या, काळाच्या सीमा अलगद ओलांडते. अनेकदा दोन धर्माना सांधत नदी वाहते. जसे पाकिस्तानातील सिंध प्रांतात सिंधू नदीवर झुलेलाल किंवा झिन्दापीर या विलक्षण देवाच्या अनेक समाध्या आहेत. हा हिंदू- मुसलमान- शीख, स्त्री- पुरुष- तृतीयपंथी सगळ्यांचा देव, याचे दर्शन घ्यायला भारतातून हिंदू आणि शीख पाकिस्तानात जातात, पाकिस्तानातील विविध प्रांतांमधील लोक एकत्र येतात. नदी जेव्हा सगळ्यांना भिडते, तेव्हा तिचा देव एकाच धर्माचा असणं अवघड. तशीच बंगालच्या सुंदरबनात दडलेली बोन-बीबी. मुसलमान आणि हिंदू मासेमारांचे रक्षण करणारी, नदीत राहणारी देवता. अरुणाचल प्रदेशमधल्या मोन्पा बौद्धांसाठी नदीवर येणारा क्रौंच (ब्लॅकनेक्ड क्रेन) हाच दलाई लामाचा अवतार.
या नदीकिनारीच्या पक्ष्याचे : क्रौंचाचे वाल्मीकी रामायणातील स्थान अलौकिक. क्रौंच किंवा सारस हा खास पाणथळ जागेचा पक्षी. रामायणाची सुरुवातच गंगातीरीच्या क्रौंचवधाने होते. वाल्मीकी रामायणात नदय़ांचे अत्यंत जिव्हाळ्याने आणि डोळस चित्रण आहे. गंगेबद्दल बोलताना कुठेही फक्त पाणी देणारी आणि शेती पिकवणारी नदी इतकाच कोरडा उल्लेख नसून तिच्यातील सारस, बगळे, चक्रवाक पक्षी, तिचे वाळूचे काठ, तिची वळणं आणि धबधबे, किनाऱ्यावरची झाडं, जंगलातील हत्ती, मगरी, मासे, साप इतकेच नव्हे तर अगदी शिशुमार, म्हणजे डॉल्फिन्सचादेखील उल्लेख आहे. नदी या सगळ्या घटकांनी बनते. हाच श्लोक बघा:
जलाघाताट्टहासोग्रां फेननिर्मलहासिनीम् ।
क्वचिद् वेणीकृत जलां क्वचिदावर्तशोभिताम्।।
म्हणजे काही ठिकाणी नदी खडकाला आपटून विकट हसते, तर काही ठिकाणी पाण्याच्या फेसातून हेच हसू निर्मळ-मार्दवी होते. कधी नदी वेणीसारखी वळणे घेते, तर काही ठिकाणी गोल फिरून भोवरे तयार करते.
हे एका जिवंत नदीचे वर्णन आहे आणि आज आपण मात्र गंगेला एका विचारधारेची पाइक समजून तिच्यावर फक्त शेकडो मैला प्रक्रिया केंद्रच बांधत जातो आहोत. आपल्या पंतप्रधान वा अन्य नेत्यांनी गंगेची आरती केली ती सिमेंटच्या घाटावर. त्यानंतर ‘नॅशनल इनलॅण्ड वॉटरवेज’अंतर्गत कोणत्याही पर्यावरणीय अभ्यासाशिवाय गंगेवर जे ड्रेजिंग किंवा खोदकाम सुरू झाले त्याचा अत्यंत घातक परिणाम हजारो वर्ष तिथे राहात असलेल्या डॉल्फिन्सवर झाला : तेच हे ‘शिशुमार’, ज्यांचे कौतुक वाल्मीकींनी केले.
कालिदास रचित ‘मेघदूता’त माळव्यातील अनेक नदय़ांचे लेकुरवाळे वर्णन आहे : नदय़ांकाठच्या फुलांचे, कमळांचे, झाडांचे, प्राण्यांचे, माशांचे. ‘रेवा’ म्हणजे नर्मदा नदीचे वर्णन करताना तिच्या काठच्या गर्द जांभूळ वृक्षांचे वर्णन कालिदास करतात.
भारतीय उपखंडाचे नदय़ांचे सांस्कृतिक संचित हे खरोखरच जगात अद्वितीय आहे.
पण या भक्तीला ‘शास्त्रकाटय़ाची कसोटी’ कधी येणार? ‘नदी म्हणजे पुण्य’ हे सोयीस्कर समीकरण बदलल्याशिवाय या भक्तीला शून्य अर्थ आहे. गेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानात नाशिकमधली गोदावरी पूर्ण आटली होती, असे असताना बोअर विहिरींचे पाणी रामकुंडात सोडण्यात आले आणि शाही स्नान निर्विघ्न पार पडले! अर्धकुंभमेळ्यात क्षिप्रेचे पाणी इतके प्रदूषित होते की, पाइपद्वारे नर्मदेचे पाणी क्षिप्रेत सोडण्यात आले. तेलंगणात पुष्करुलू सणाच्या वेळी गोदावरी कोरडीठक्क होती; तर भक्त तिच्या तीराने बसवलेल्या शॉवरखाली आंघोळ करून पुण्य कमावत होते. ही अशी भक्ती काय कामाची?
अमेरिकेत नदीची पूजा होत नाही, पण मिसिसिपी नदीची अद्वितीय संग्रहालये इथे आहेत. या संग्रहालयांत नदीचा इतिहास, भूगोल, जैविक परिसंस्था, सध्याचे प्रश्न हे आपण बघू शकतो, नदीबद्दल अधिक शिकू शकतो. यापैकी एक संग्रहालय हे ‘मत्स्यालय’ (अॅक्वेरियम) देखील आहे जिथे मिसिसिपीमधल्या अनेक माशांच्या प्रजाती, मगरी बघता येतात, इथला इतिहास अनुभवता येतो.
मिसिसिपी ज्या राज्यात समुद्राला मिळते तेथील ‘लुइझियाना स्टेट युनिव्हर्सिटी’मधल्या ‘सेंटर फॉर रिव्हर स्टडीज’मध्ये लोअर मिसिसिपीचे प्रत्ययकारी मॉडेल आहे. १०,००० चौरस फुटांत पसरलेले हे ‘जिवंत’ प्रतिरूप एका तासात आपल्याला मिसिसिपीचे एका वर्षभरातील वाहणे: पाणी, गाळ, पूर हे सगळे दाखवते. मी हे मॉडेल गाइडशिवाय बघितले आणि तरीही यातून झालेली नदीची ओळख अद्भुत होती. आपल्याकडे काही महत्त्वाच्या धरणांजवळ माहिती केंद्रे आहेत, पण ‘नदीसाठी’ असे काहीही नाही. भक्त निवास, घाट, पंडे-बडवे मात्र रग्गड.
आपल्या देशाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी २०,००० कोटींचे प्रयोजन केले आहे. आपल्या इतक्या महत्त्वाच्या नदीचे जागतिक दर्जाचे संग्रहालय असेल, तर गंगेला काय हवे आहे हेदेखील आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढय़ांना कळू शकेल. आपले अद्वितीय नदी-साहित्य हे फक्त भक्तीचे नाही, डोळस ओळखीचेदेखील आहे.
कबूल की, प्रतीकांचेही महत्त्व असते. नदीची भक्ती, पूजा, तिचे प्रतीक पुजणे वगैरे कदचित काहींसाठी आजही महत्त्वाचे असेल. पण केवळ प्रतीकांमध्ये अडकून कसे चालणार? महात्मा फुल्यांनी निसर्गाचे, शेतीचे, पावसाचे लालित्यपूर्ण वर्णन आपल्या लेखनात केले आणि तरीही पाणी व्यवस्थापनातील काटेकोरपणा, सर्वसमावेशकता याबद्दल ते निग्रही होते. भूपेन हजारिका ब्रह्मपुत्र म्हणजे लुइत नदीबद्दल म्हणतात : ‘‘लुइतोते मोर घर, लुइतोते मोर पार.’ माझा आप-पर भाव, आतले-बाहेरचे विश्व दोन्ही लुइतमध्ये सामावलेले आहे.
भक्तिमार्गावरून आपली वाटचाल ज्ञानमार्गावरदेखील झाली तर आपले आणि आपल्या नदय़ांचे भविष्य उज्ज्वल असेल.
लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात. ईमेल : parineeta.dandekar@gmail.com