परिणीता दांडेकर
नद्यांना जिवंत ठेवायचे मार्ग-उपमार्ग अनेक आहेत.. नदी-नावांचा ठाव घेणे, हा त्यांपैकी एक. कधी एकच नदी प्रदेशागणिक नावे बदलत भाषिकच नव्हे तर इतिहासाचीही वळणे दाखवते; तर कधी पाण्याच्या जागांची विविध नावे जणू भूगोलातूनच त्या त्या ठिकाणच्या बोलींचा साज लेवून उगवतात.. .
काही वर्षांपूर्वी पुण्याच्या नाल्यांचा अभ्यास महानगरपालिकेकडून सुरू होता. एक फोन आला, ‘‘टी- फोर ट्वेन्टीवन नाल्यासंबंधी माहिती आहे का?’’ टी- फोर ट्वेन्टीवन?! नंतर तो ‘नाला’ सापडला, नाला नसून ती एक उपनदी होती, वगैरे वगैरे. पण ते नाव मात्र लक्षात राहिले. खरे तर आपल्याकडे नद्यांची नावे हा एक गंभीर आणि सुंदर अभ्यासाचा विषय आहे. नावांचे आणि आपले नाते फार घट्ट. गंगेची, नर्मदेची हजार नावे आहेत. तापीची, भीमेची, गोदावरीचीदेखील नदीमाहात्म्यांमध्ये शेकडो नावे आहेत. गंगा उगम पावताना भागीरथी, मग अलकनंदेला मिळाल्यावर गंगा, बांगलादेशात पद्मा, ब्रह्मपुत्रेला मिळाल्यावर मेघना. बांगलादेशातील, बंगालमधील नद्यांची नावे तर इतकी मधुर की ऐकत राहावे. अंजना, मोधुमती, कर्णफुली, कपोताक्षी. संस्कृतप्रचुर नावे भारतभर सापडतातच. त्यात ‘शुद्धीकरण आणि पुण्यप्राप्ती’वर भर अधिक. अघनाशिनी, पापनाशिनी, लोकपावनी, अमृतवाहिनी, पयस्विनी इत्यादी. कर्नाटकात अत्यंत मधुर नावाच्या नद्या आहेत नेत्रावती, कुमारधारा, शाल्मला, सौपर्णिका, स्वर्णा.
ही सगळी अलंकारिक, कौतुकाची नावे; पण ती त्यापलीकडे फार काही बोलत नाहीत. कौतुक बऱ्यापैकी एकसुरी असते. पण बोलीभाषेतील नावे- फक्त नद्यांचीच नव्हेत तर वाहणाऱ्या, साचलेल्या, जमिनीतून अवतरणाऱ्या, आकाशातून बरसणाऱ्या, खाऱ्या, गोडय़ा, मचूळ, सदा वाहणाऱ्या किंवा अधिक कोरडय़ा पाणवठय़ांची बोलीभाषेतील नावे आपल्याबरोबर जिवंत गोष्टी आणतात. आणि हे भारतातच नाही तर जगभरात. नद्यांचे उत्सव जसे फक्त गंगा/यमुनाच नाही तर जॉर्डन, नाइल, अमु दर्या, मिसिसिपी, अॅमेझॉन.. अनेक ठिकाणी होतात, तसेच. अमेरिकेत मिसिसिपी जसजशी संथ आणि विशाल होत जाते तसतसे तिचे अनेक दुवे निखळतात आणि वेगवेगळे तलाव बनतात. पुरात हे तलाव नदीला जोडले जातात पण इतर वेळी वेगळे. यांना ‘बायू’ म्हणतात. मेक्सिको सीमेजवळ कोरडय़ा, राकट प्रदेशात काही पावसातच वाहणारे झरे आहेत. यांना आरोयो किंवा ‘वॉशेस’ म्हणतात, यांनी जमिनीला उभे कापले असेल तर यांना ‘ग्लच’ म्हणतात. अमेरिकी उत्तरेच्या राज्यांत डोंगरातून चपळपणे वाहणाऱ्या झऱ्यांना ‘रन्स’ म्हणतात, ‘रिल्स’ किंवा ‘किल्स’सुद्धा म्हणतात. जेव्हा ‘रन्स’ सपाटीला उतरतात आणि त्यांना वेगवेगळ्या वाटा फुटतात तेव्हा त्यांना ‘ब्रांचेस’ म्हणतात, नद्या भेटतात त्या जागांना ‘फोर्क’ म्हणतात. ही काही फक्त स्पानिश, डच, आयरिश किंवा जर्मन प्रभावामुळे अमेरिकेत आलेली नावे नाहीत. या प्रत्येक नावात त्या पाण्याचा स्वभाव आहे. ‘रन्स’ म्हणजे घाईत वाहणारे पाणी, तर ‘ब्रांचेस’ म्हणजे फांद्यांचा समृद्ध नदीप्रदेश. नेटिव्ह अमेरिकन नावे याहून अर्थगर्भ होती- उदाहरणार्थ, विस्कॉन्सिन नदी म्हणजे ‘लाल प्रदेशातून वाहणारी’.
आपल्याकडे अनेक भाषांनी, अनेक प्रकारच्या नद्यांनी आणि साक्षी समूहांनी दिलेली नावे तर आश्चर्यकारक आहेत. बोलीभाषेतील नद्यांचीच नावे बघू. महाराष्ट्रात पावसाळ्यात डोंगरातून अचानक लोंढा घेऊन येणाऱ्या नद्या आहेत ज्या इतर वेळेस अत्यंत शांत असतात. यांची नावे : वाघाडी, गडगडी, सैतानी, उरमोडी, दातपाडी, डोईफोडी, वाळकी. गुजरातमध्ये अनेक नद्या समुद्राला न मिळता वाळवंटात विलीन होतात. यात भूखी, सुखी, उतावली आहेत, पण इथेच गोड पाण्याच्या छोटय़ा नदीचे नाव शक्कर आहे, चंचल वाहणाऱ्या नदीचे नाव हिरण आहे. आसाममध्ये बोडो भाषेचे संस्कार झालेल्या अनेक नद्यांच्या पुढे ‘डी’ आहे. मेघालयातल्या सिमसांगच्या नावातच तिचा वाहण्याचा किणकिण नाद आहे. बंगालमध्ये गदाधारी, बाराकेश्वर, अजोय, भैरब, पगला, माथाभांगा असे प्रलयंकारी पूर येणारे नद आहेत. पद्मा म्हणजे लक्ष्मीचे, समृद्धीचे नाव. बंगालमध्ये, बांगलादेशात पद्मेची शेकडो सुंदर गाणी आहेत, पण इथली पद्मा गाळाने भरलेली आणि सतत आपल्या वाटा बदलणारी गजगामिनी. सोळाव्या शतकात पद्मा पूर्ण वेगळ्या वाटेने बंगालच्या उपसागरात मिळायची. अठराव्या शतकापर्यंत तिने हा मार्ग सोडला तेव्हा तिच्या तीरावर राजा राजबल्लभचे समृद्ध साम्राज्य होते. पद्मेने हे साम्राज्य, तिथले राजवाडे, कपडय़ांचा व्यापार सगळेच पुसून टाकले. आज बंगालच्या या राजशाही नावाच्या भागात पद्मेला स्वत:चे असे नाव आहे : कीर्तिनाशा!
अमेरिकेत अनेक ठिकाणांची नावे तिथे स्थलांतरित झालेल्यांनी आपापल्या देशीची ठेवली होती हे आपल्याला माहीत असेल; पण हाँगकाँगमध्ये जेव्हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांनी भारतीय (पंजाबी) सैनिकांना नेले, तेव्हा तिथल्या तीन नद्यांची नावे झेलम, बियास आणि सतलज झाली! थायलंडमध्ये फक्त सुरत शहरच नाही तर सुरतमधून वाहणारी तापी नदीदेखील आहे! घर हे अनेक गोष्टींनी बनते; ओळखीच्या नद्यांनीदेखील.
काही दिवसांपूर्वी एका समाजमाध्यम समूहात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांतल्या नदीप्रेमींशी चर्चा झाली आणि बोलीभाषेतील अर्थवाही नावे ऐकायला मिळाली. जसे नदी शुष्क झाल्यावर छोटय़ा खळग्यामध्ये पाणी साठते त्याला ‘झिरे’ किंवा ‘चलमा’ म्हणतात, डोहाला ‘कोंढ’ किंवा ‘ढव’, ओढय़ाला तर अनेक नावे- पांद, वगळात, लवन, व्हळ, खोंगळी.. प्रत्येकाचा अर्थ वेगळा. कोकणातील विविध नावे डोण, डर्ूी, पाणंद, ढब. सागर जाधवांनी एक सुरेख शब्द सांगितला ‘इजहिरा’, वीज पडून झालेला विहिरीपेक्षा उथळ खड्डा. वसई-विरार भागांत पाणी साठणाऱ्या भागास म्हणतात बावखल, ज्या भोवती बरेचदा नेवरीची झाडे आपली लालबुंद फुले ढाळत असतात. विहिरींना किंवा भूगर्भातल्या पाण्याला भारतभर अनेक नावे आहेत बाव, बावडी, विहीर, आड, हीर, जोहड, इत्यादी. जागांचे आणि पाण्याचे नाते पाणवठय़ांच्या नावांमध्ये दिसते जसे उंबराचे पाणी, जांभळाचे पाणी, दारचे पाणी, डोंगराचे पाणी.
ही नुसती अलंकारिक नावे नसून पाण्याचे कैक स्वभाव दर्शवणारी समृद्ध ज्ञानभाषा आहे. काका कालेलकरांनी ‘जीवनलीला’ पुस्तकात नद्यांचे अनेक प्रकार समजावले होते; त्यात होते युक्तवेणी आणि मुक्तवेणी, म्हणजे प्रवाह एकमेकांत मिसळून वाहणारी आणि एका मोठय़ा प्रवाहामध्ये वेगवेगळे प्रवाह स्वतंत्र वाहणारी नदी. याला वैज्ञानिक भाषेत ‘ब्रेडेड चॅनेल’ आणि ‘अनाब्रांच चॅनेल’ म्हणतात. पण मुक्तवेणी आणि युक्तवेणीने पक्के समजावले. प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. वाल्दियांच्या मते यमुना नाव पाण्याची चोरी करणाऱ्या नद्यांचे आहे. माहीत असलेल्या तीनही यमुना मोठय़ा नदीतून पाणी ‘चोरतात’ (शास्त्रीय भाषेत नदीचे शिरकाण!).
नदी, विहीर, आड, तलाव माणसांना एकत्र आणतात. यांच्या नावांमध्ये, आजूबाजूच्या बोलीभाषेतील म्हणींमध्ये, गाण्यांमध्ये, ओव्यांमध्ये संस्कृती, विज्ञान, साक्षीभाव यांचे साधे आणि तरीही गहन अर्थ व्यापले आहेत. अद्वैत मल्लबर्मन ‘तिताश एक्टि नोदीर नाम’मध्ये म्हणतात ‘‘मालो मासेमारांच्या या बारक्या नदीचे नाव आहे तिताश. याचा अर्थ कोणाला माहीत नाही. या नदीचे नाव जर भलेमोठे ‘बैदूर्यमालिनी’ असते तर कदाचित मालोंना ते अंगाखांद्यावर खेळवायला जडच झाले असते.’’
नदीचे, पाणवठय़ांचे अर्थवाही नाव कसे पडते? कोण ठेवते? सुनील गंगोपाध्याय यांच्या एका कथेत दुखावलेल्या बाबाला नदीचे नाव बदलून आपल्या मुलीचे नाव तिला द्यायचे असते. तो सरकारी कार्यालयात फेऱ्या घालतो, किनाऱ्यावर बोर्ड लावतो, पण नदीचे नाव बदलत नाहीच. शेवटी नदी काय, आड काय आणि पाणी काय यावर एका माणसाचा हक्क नाही. हे अनेकांचे, माणसाचे तसेच निसर्गाचे.
तुमच्या भागातील पाणवठय़ांची विशिष्ट नावे आणि त्याचे अर्थ जरूर कळवा. नद्यांना जिवंत ठेवायचे रस्ते अनेक सुंदर जागांतून जातात.
लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात. ईमेल : parineeta.dandekar@gmail.com