परिणीता दांडेकर
गोदावरी नदी नाशकात अख्खीच काँक्रीटने बंदिस्त झाली होती. पात्रातही काँक्रीट! ते काढण्यासाठी पाठपुरावा झाला, अखेर नदी मुक्त झाली.. देवांग जानी किंवा प्राजक्ता बस्ते किंवा राजेश पंडित यांचे हे काम गोदावरीचे पावित्र्य राखणारे ठरते..
मागच्या वर्षी अगदी याच तारखेला मी त्र्यंबकेश्वरला होते. राजेश पंडित आणि नाशिक जलबिरादरीबरोबर गोदावरीच्या उगमाजवळ शाळकरी मुलांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. रिपरिप पाऊस पडत होता आणि आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराजवळून कुशावर्तला जात होतो. कुशावर्त म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावल्यानंतर गोदावरी जिथे अवतीर्ण होते ते तीर्थ. डांबरी रस्ता होता, दोन्ही बाजूला तांब्याची भांडी, पूजासाहित्य, गोदावरीची स्तुती करणारे ग्रंथ, त्र्यंबकेश्वर तीर्थाचे माहात्म्य सांगणारे ग्रंथ आणि पुजारी यांची रेलचेल. तेवढय़ात राजेश पंडित मला म्हणाले, ‘‘आत्ता आपण गोदावरीच्या वरून चालतोय. पूर्वी इथून नदी वाहायची. नंतर भक्तांची आणि बाजाराची सोय व्हावी म्हणून नदीवर ‘स्लॅब’ टाकून हा रस्ता झाला.’’ गोदावरीच्या उगमाजवळ, जिथे भाविक नदीत स्नान करण्यासाठी, नदीशेजारी विविध पूजा करण्यासाठी येतात तिथे नदी गटाराप्रमाणे लोकांच्या डोळ्याआड वाहात होती. अजूनही वाहाते आहे. त्र्यंबकेश्वरात गोदावरीवर शक्य असतील तितके आघात झाले आहेत. तिच्या उपनद्यांवर बांधकामे झाली, काहींवर रस्ते आले, काहींवर इमारती आल्या, अख्ख्या नद्या पाइपमध्ये अदृश्य झाल्या आणि वर आपण तिचेच श्लोक म्हणत बसलो, नदी पात्रात मैलापाणी सोडण्यात आले. आता काही मोजक्या स्थानिकांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि जलबिरादरीसारख्या लोकांच्या पुढाकारामुळे परिस्थिती थोडी सुधारते आहे. जर गोदावरी इतकी ‘पवित्र’ नसती तर कदाचित तिची स्थिती याहून बरी असती.
त्र्यंबकेश्वरपासून ३५ किमी नाशिकला आल्यावर नदीभोवती पावित्र्याचा आणखी गच्च विळखा बसतो. २०१६ एप्रिलमध्ये जेव्हा मी पंचवटीमधील गोदावरी बघितली तेव्हा तो धक्का होता. नदी एका भकास ‘शॉपिंग मॉल’च्या ‘पार्किंग लॉट’सारखी करडी दिसत होती. पाण्याचा लवलेश नव्हता. २०१५ चा पाऊस अगदीच तोकडा होता. नदी कधी नव्हे अशी कोरडी पडली होती. भाविकांसाठी मात्र रामकुंडात ‘बोअरवेल’चे पाणी सोडण्यात आले होते. भाविकांना नदीशी, तिच्या आरोग्याशी कोणतेच घेणे नव्हते. मी जरी नाशिकची तरी हे सगळे मला दाखवत होते देवांग जानी. देवांगजी अगदी रामकुंडाच्या समोर राहतात आणि लहानपणापासून त्यांनी नदीचे रंग बघितले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की नदीत पाणी नसण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे नदीत ओतलेले काँक्रीट. बिगरपर्वतीय नद्यांच्या ‘प्रवाही’ असण्यात भूजलाचा वाटा मोठा असतो. बेड-काँक्रीटिंग म्हणजे नदीच्या तळाशी आणि किनाऱ्यावर सिमेंटने पूर्ण बंदिस्ती करून नदीचे ‘वॉशबेसिन’ केले की तिच्यात भूजल झिरपायला जागा उरत नाही. आपल्याकडची बहुतांश ‘तीर्थे’ ही जिवंत झऱ्यांनी युक्त आहेत, म्हणजे तिथे भूजल अवतीर्ण होते. तुम्ही भाविक असाल किंवा नाही, स्फटिकासारखे भूजल अवतीर्ण होणाऱ्या जागा या पवित्र वाटणारच.
पण यावरच जर सिमेंट ओतले तर? २००१ मध्ये नाशिक महानगरपालिकेने ‘कुंभ मेळ्यातील भक्तांच्या अंघोळीच्या सोयीसाठी’ २ किमी नदीला असेच गुळगुळीत केले. तसे करताना किनाऱ्याजवळची एक पुरातन ‘सात विहिरीची विहीर’देखील राडारोडा टाकून बुजवण्यात आली. गोदावरीमध्ये नुसते सिमेंट ओतण्यात आले नाही तर रामकुंडापासून थोडे खाली तिच्या पात्राच्या मध्यात एक सलग पायऱ्या असलेले कृत्रिम बेटदेखील बनवण्यात आले.. नदीच्या आत!
नदीतल्या या हस्तक्षेपाविरुद्ध जलसंपदा विभागाने बोलणे गरजेचे होते, पण तसे काही झाले नाही. गोदावरीच्या या भागात १७ कुंडे होती, पाच बारक्या नद्या तिला येऊन मिळायच्या. त्यांचा आता थांगपत्ता नाही. ही कुंडे १६९६ ते १७८८ या काळात बांधली गेली : गोपिकाबाई तास, लक्ष्मणकुंड (ज्यात १८७७-७८ च्या दुष्काळातदेखील पाणी होते), धनुष्यकुंड, रामकुंड, सीताकुंड, अहिल्याबाई कुंड, शारंगपाणी कुंड, दुतोंडय़ा मारुती कुंड, अनामिका कुंड, दशाश्वमेध कुंड, राम गया कुंड, पेशवे कुंड, खंडोबा कुंड, मुक्तेश्वर कुंड इ. सगळी शब्दश: गाडली गेली.
२०१५ मध्ये देवांग जानी यांनी नाशिक महानगरपालिकेविरुद्ध मुंबई हायकोर्टात लोकहित याचिका दाखल केली आणि त्यात जलसंपदा विभागालादेखील प्रतिवादी केले. या केसच्या २२ हेअरिंग झाल्या पण महानगरपालिकेने एकही प्रतिज्ञापत्र किंवा उत्तर सादर केले नाही. या काळात देवांग जानी नाशिक महापालिकेच्या प्रत्येक नव्या आयुक्तांशी, वकिलांशी आणि भाविकांशी संवाद साधतच होते. अनेक अधिकाऱ्यांना प्रेझेंटेशन्स केली, १९१७ चे लँड रेकॉर्ड नकाशे दाखवले, १८८३ च्या ‘गॅझेटियर’मधल्या कुंडांच्या नोंदी दाखवल्या, या कामात त्यांना आर्किटेक्ट प्राजक्ता बस्तेंनी मदत केली, त्यांनी या कुंडांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा बनवला.
२०१६ मध्ये नाशिकच्या पालिका एका आयुक्तांशी मी या संदर्भात बोलले असता त्यांनी मला विचारले की सिमेंट काढूनदेखील पाणी येईल याची हमी काय? निर्थक प्रश्न आहे हा. भूजल नदीत येईलच याची हमी कोणीच देऊ शकत नाही; पण ते तसे यावे म्हणून प्रयत्न मात्र करू शकतो. नदीपासून काही मीटर अंतरावर देवांग जानींचे घर आहे, जिथे उमा कुंड नावाचे लहान कुंड आहे. इथे शीतल पाणी रुणझुणताना मी बघितले आहे.
इतके सगळे होऊन, तीन वर्षे केस लढूनदेखील सिमेंट तसेच होते, नदी तशीच गुदमरत होती. जानी शेवटी वैतागून गोदावरीलाच म्हणाले की तुला जर मुक्त व्हायचे असेल तर आता तूच काही तरी कर, मी थकलो.
न्यायालयातला दावा, अनेक पातळ्यांवरून पाठपुरावा, सखोल अभ्यास आणि पुनरुज्जीवन आराखडा या सगळ्याचे फलित असे झाले की जेव्हा तुकाराम मुंढे नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांनी अनेक बैठकींनंतर गोदावरीतील सिमेंट काढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तोवर नाशिकमध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आराखडे बनत होते. मुंढे यांनी नदी पुनरुज्जीवानाचा निधी खरोखरच मंजूर केला! नंतर त्यांची बदली झाली आणि नव्या पालिका आयुक्तांनी देखील काम उचलून धरले.
८ जून २०२० रोजी खरोखर गोदावरीमधील सिमेंटचा कृत्रिम फलाट काढायचे काम सुरू झाले. काही अडथळे येऊनही २६ जूनपर्यंत हा फलाट पूर्ण निघाला आहे, १६८ डम्पर भरून नदीतला गच्च राडारोडा काढला गेला आहे. आता (पात्रातील) बेड-काँक्रीट काढायला सुरुवात होईल.
हे होणे अविश्वसनीय आणि अत्यंत आशादायी आहे. भारतात कुठेही असे झालेले ऐकिवात नाही. भारतभर जिथे नद्यांचे उगम पवित्र मानले जातात तिथे त्यांना काडीचाही आदर मिळत नाही. गोदावरी असो, कावेरी किंवा गंगा; उगमापासून नद्यांना मलिन करणे आणि त्यातच पावित्र्य शोधणे ही भारताच्या नद्यांची शोकांतिका आहे. गोदावरीच्या हजारो भाविकांपेक्षा एका देवांग जानी, किंवा प्राजक्ता बस्ते किंवा राजेश पंडित यांचे काम उजवे ठरते. अगदी गंगेला उगमापाशी ‘भागीरथी इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संरक्षित करणे असो किंवा त्र्यंबकेश्वरमधल्या गोदावरीच्या उगमाला वाचवणे, हे काम सोपे नाही.
अमेरिकेत ऑस्टिनजवळ सन मार्कोस नावाचे छोटे गाव आहे आणि तिथून सन मार्कोस नावाचीच छोटी नदी उगम पावते. तिचा उगमदेखील भूजालातून : ‘स्प्रिंग्ज’मधून. या निर्झरतलावाला- ‘स्प्रिंग लेक’ला पूर्ण संरक्षण आहे. इथे मासेमारीदेखील निषिद्ध आहे. शाळेतली मुले इथे नदीबद्दल शिकायला येतात, तिथे नदीचे छोटेखानी संग्रहालय आहे, नदीतले मासे, जीवसृष्टी यांचे नमुने तिथे पाहता येतात. पावित्र्य न बोलता जाणवते.
गोदावरीच्या या खऱ्या उत्खननामुळे अनेक नद्यांना आशा दिसली आहे. स्मार्ट सिटी आणि नदी पुनरुज्जीवन म्हणजे नदीत सिमेंट ओतणे नसून, नदीला डोळसपणे समजून घेऊन तिला श्वास घेऊ देणे हेच आहे. सिमेंट काढून खऱ्या अर्थाने नाशिकने गोदावरीचे ध्वजारोहण केले आहे.
लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात.
ईमेल : parineeta.dandekar@gmail.com