परिणीता दांडेकर
मिसिसिपी असो की मोखाडा.. ‘आमची आयुष्यं उद्ध्वस्त करण्यासाठीच यांना पाणी हवं असतं का?’ हा सवाल सर्वत्र कधी ना कधी होता, आजही आहे.. पाण्याचा प्रश्न हा फक्त तांत्रिक किंवा पर्यावरणीय नसून व्यापक सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे.. मग तो महाराष्ट्रातला असो की अमेरिकेतला..
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’चा बुलंद घोष अख्ख्या अमेरिकेत आणि इतर अनेक देशांमध्ये ऐकू येत आहे. करोनाचा विळखा असतानादेखील इतके लोक एकत्र येत आहेत. कारण अनेक ब्लॅक पिढय़ा वंशभेदाचे त्याहून अधिक डागणारे व्रण भोगत आहेत, ज्याचे सावट सगळ्या सामाजिक न्यायाच्या मुद्दय़ांवर पसरले आहे. करोनाचा परिणाम अमेरिकेतील एकूण जनतेवर झाला तरी सगळ्यात जास्त प्रमाणात बेरोजगार झाले ते ब्लॅक लोक, या रोगाने सगळ्यात जास्त बळी गेले ते ब्लॅक्सचे- व्हाइट्स आणि एशियन्सपेक्षा तिप्पट प्रमाणात. यामागची कारणे अनेक आहेत. त्यांच्या मुळाशी वंचित गटाला आणखीच असहाय करणारी व्यवस्था आहे.
पण भेदाची सावली सगळ्यात गडद होते नैसर्गिक संसाधनांच्या उपलब्धीमध्ये आणि हे फक्त अमेरिकेत नाही तर जगभर तितकेच खरे आहे. आणि यातला सगळ्यात ज्वलंत घटक आहे पाणी. जगभरात जिथे जिथे वंचित आणि संपन्न अशी दरी आहे तिथे पाण्याचा शस्त्र म्हणून वापर झाला आहे. मग ते नेटिव्ह अमेरिकन असोत, ऑस्ट्रेलियन अॅबोरिजिनल असोत, सीरिया-इराकमधले दुष्काळी भाग असोत किंवा भारतातल्या दलित वस्त्या आणि आदिवासी. पाण्याचा प्रश्न हा फक्त तांत्रिक किंवा पर्यावरणीय नसून व्यापक सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे या दृष्टीने बघणे गरजेचे आहे. याचे पडसाद जसे शास्त्रीय अभ्यासात सापडतात त्याहून प्रखरपणे लोककलांमध्ये सापडतात.
१९२७ मध्ये पॉल रॉब्सेन या ब्लॅक गायक-कार्यकर्त्यांने गायलेले ‘ओल् मॅन रिव्हर’ गाणे अजरामर झाले. भारतात भूपेन हजारिकापासून नामदेव ढसाळांपर्यंत अनेक या गाण्याने आणि रॉब्सेनमुळे प्रभावित झाले. हे गाणे नदीबद्दल आहे : गंगेसारखीच ‘आयकॉनिक’ नदी, मिसिसिपी. मिसिसिपी फक्त नदी नसून अमेरिकेला एकाच वेळी विभागणारा आणि सांधणारा दुवा आहे. पण एकोणिसाव्या शतकात आफ्रिकेमधून मानवांची गुलाम म्हणून ने-आण झाली ती याच नदीवरून. पुढे मुख्यत्वेकरून कपाशीची लागवड असलेल्या शेतांमध्ये ब्लॅक्सना राबवण्यात आले ते मिसिसिपी खोऱ्यातच. त्यामुळे यांची नदीगीते खचितच वेगळी. रॉब्सेन मिसिसिपीला सांगतो की ‘मला तुझ्यापासून आणि गोऱ्या साहेबापासून दूर जायचे आहे. आम्ही दिवसरात्र कपाशीची ओझी वागवतो तुझ्यासमोर, तुला आमचे हाल दिसतात पण तू एक शब्दही बोलत नाहीस’. यावरून प्रेरणा घेऊन आलेले गाणे म्हणजे हजारिकांचे ‘बिस्तीर्णो दुपारेर’ किंवा ‘गंगा बेहती हो क्यों’.
पण या दु:खाची सावली जिथे अस्खलित देखणी होते ते म्हणजे ‘डेल्टा ब्ल्यूज’. हा संगीताचा प्रकार एका अर्थी ‘जाझ’चा पाया मानला जातो. डेल्टा ब्ल्यूज तर ब्लॅक्सचे हक्काचे नदीसंगीत आणि तेदेखील मिसिसिपी डेल्टा : त्रिभुज प्रदेशाचे. १९२७-१९५० मधली ही गाणी सांस्कृतिक दस्तऐवज आहेत. १९२७ मध्ये मिसिसिपी नदीला अकल्पित पूर आला आणि काही ठिकाणी तिच्याभोवती बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. इथून पुराचे पाणी आत शिरले आणि लाखो एकर भागात दहा फूट पाणी साठले. याचा पहिला आणि सर्वाधिक फटका कपाशीच्या शेतांवर गुलाम म्हणून राबणाऱ्या ब्लॅक वस्त्यांवर झाला. हजारो बेघर झाले, बुडले. त्या वेळी बंडखोरी बाहेर येणे अवघड होते, मग यातून संगीत उमटले. बिग बिली ब्रून्झी, चार्ली पॅटन, बेस्सी स्मिथ यासारख्या अनेक ब्लॅक गीतकार-गायकांनी डेल्टा ब्ल्यूज जन्माला घालत या पुराची गाणी रचली. आज तो पूर आपण विसरलो असू; पण बेस्सी स्मिथचे ‘बॅकवॉटर ब्ल्यूज’, बिग बिलीचे ‘मिसिसिपी रिव्हर ब्ल्यूज’, चार्ली पॅटनचे ‘हाय वॉटर रायझिंग’ ही गाणी तेव्हाचे धगधगते वास्तव जिवंत करतात. आजही परिस्थिती फार बदलली आहे असे नाही.
२०१४ मध्ये मिशिगन राज्यातील फ्लिन्ट नावाच्या गावी वंशभेदाचे नवे, पण तितकेच भीषण वास्तव समोर आले. फ्लिन्ट या ब्लॅक-बहुल गावाचा पाण्याचा स्रोत पैसे वाचवण्यासाठी बदलण्यात आला आणि शिसे-प्रदूषित पाणी तिथल्या नागरिकांना पुरवण्यात आले. याचे आरोग्यावर, खासकरून मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आणि अद्यापही होत आहेत. अभ्यासकांच्या मते फ्लिन्टच्या पाण्याचा प्रश्न जितका प्रदूषणाचा होता, त्याहून जास्त वंशभेदाचा होता. हे गाव व्हाइट असते तर त्यांच्या पाण्याशी असा खेळ करताना सरकारने दहा वेळा विचार केला असता. फ्लिन्ट असो, न्यू यॉर्क असो, लॉस एन्जेलिस असो; स्वच्छ पाण्याची उपलब्धता हा तांत्रिक प्रश्न नसून त्याला वंशभेदाचे पदर आहेत. आणि त्यावर लढे उभे राहत आहेत, त्यांना काही प्रमाणात यश मिळत आहे, जसे की लॉस एन्जेलिस नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये ब्लॅक्सना विशेष स्थान मिळणे.
आपल्याकडे वंशभेद नाही म्हणून हे काहीच होत नाही? आपल्याकडील पाणी उपलब्धतेचा प्रश्न काही अंशी अधिक क्लिष्ट आहे. जोतिबा फुलेंनी दुष्काळात आपली विहीर सगळ्यांसाठी मोकळी करून, डॉ. आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून अनेक वर्षे लोटली तरीही ‘एक गाव एक पाणवठा’ इतके साधे सत्य अजूनही भारतात पूर्णत: लागू नाही. अगदी २०१८ मध्ये पाच राज्यांत अभ्यास करून काढलेले निष्कर्षदेखील हेच सांगतात. ग्रामीण भागात ६० टक्के बिगर-दलित घरांमध्ये पाणी नाही, तर ७२ टक्के दलित घरांत पाणी नाही. बाहेरून पाणी आणण्याची प्राथमिक जबाबदारी बाईची, जी गरीब, स्त्री आणि दलित अशी तिन्ही वास्तवं घेऊन जगते. या अभ्यासात जरी महाराष्ट्र नाही, तरी आपल्याकडे पाण्याबद्दल भेदभाव नाही असे म्हणणे धारिष्टय़ाचे होईल. मराठवाडय़ात पारधी पाडय़ांसाठी अजूनही विहिरी वेगळ्या आहेत. आम्ही प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार दुष्काळात इथल्या बायका गावातील इतर घरांपेक्षा दुप्पट किंमत मोजून पाणी घेतात. सरकारी नळयोजना, पाणीपुरवठा योजना या अनेकदा दूरच्या पाडय़ांपर्यंत पोचत नाहीत. हे पाडे कोणाचे असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
वनवासी गटांबद्दल असेच. मोखाडा तालुक्यात पाऊस असूनही सातत्याने दुष्काळ असणे, मुलांचा चढा मृत्युदर यामागे पाण्याची, सिंचनाची उपलब्धता नसणे ही मोठी कारणे आहेत. आणि असे असताना आपले सरकार योजना आखत आहे, मोखाडय़ाचे पाणी औद्योगिक संपन्न अशा सिन्नरकडे वळविण्याच्या. मध्य वैतरणा धरण होण्यासाठी आदिवासी गटांनी आपली घरे गमावली, पण आजही त्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. म्हणजे मुख्यत: बायांची.
शहरांमध्ये भेदभावाचा हाच प्रश्न श्रीमंत आणि गरीबवस्तीवासी असे रूप घेतो. मुंबईतील ‘पाणी हक्क समिती’ने केलेल्या नव्या अभ्यासानुसार गरीबवस्तीतील पाच लाख नागरिकांना दिवसाकाठी ६० लिटर पाणीदेखील मिळत नाही. पाच लोकांना ६० लिटर पाणीदेखील नाही! मग करोना विरुद्ध सतत हात कसे धुता येणार?
आवाज नसलेले गट : मग ते दलित असोत, आदिवासी असोत, गरीब असोत, निसर्ग आणि परिसंस्था असोत, यांची पाण्याची लढाई नेहमीच अतोनात अवघड राहिली आहे. प्रत्येक नव्या आणि जुन्या प्रकल्पामध्ये या गटांकडे सर्वात प्रथम आणि निकडीचे लक्ष दिले नाही तर ही दरी वाढतच राहणार. नळपुरवठा योजना असो, मोठे धरण असो, पाणलोट क्षेत्र विकास असो किंवा नदी पुनरुज्जीवन; वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्या दुर्बल असण्याचा फायदा घेऊन कोणतीच पाणी योजना सफल-सुजल होऊ शकत नाही. उद्रेक होतोच आणि ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरमधून आज तेच दिसत आहे.
‘‘पाण्याचं अंत:करण असतं
मूलगामी नि उदार
त्याचं पीस फिरलं तर
क्षणात खपल्या पडतात हजारो दु:खांच्या
किती करणार तटबंदी पाण्याला?
कशी घालणार वेसण
पाण्याच्या खळाळत्या रूपाला?
पाण्यासारखं सुंदर कर्तव्य
दुसरं कुठलंच नस्तं जगात
पाणीटंचाई आली तर
तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता
मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणाऱ्यांनी
काय बदलावं?’’
-नामदेव ढसाळ
लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात.
ईमेल : parineeta.dandekar@gmail.com